संस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर मग सगळा प्रश्नच मिटतो. आपल्याला मग थोर सांस्कृतिक-गुरख्याच्या भूमिकेत जाण्यावाचून गत्यंतरच नसते. आणि एकदा माणूस त्या भूमिकेत गेला, की त्याच्या हाती लाठी, काठी, दंड, दगड यांशिवाय दुसरे काही असूच शकत नाही. अशा माणसांची दृष्टी अधू आणि संवादाचे इंद्रिय पंगू झालेले असते. त्यांच्याशी बोलणे होऊच शकत नाही. मात्र इतरांची, म्हणजे तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्यांची गोष्ट जरा निराळी असते. आपण हे समजून घेऊ शकतो, की संस्कृती हे साचलेले डबके नसते. ती प्रवाही असते. बदल हा तिचा स्थायिभाव असतो आणि सांस्कृतिक नीतिमूल्ये नेहमीच कालसापेक्ष असतात. तीच गोष्ट त्या त्या संस्कृतीतून जन्मलेल्या सामाजिक संस्थांची. त्यांत कालानुरूप बदल झाले नाहीत, तर त्या संस्था कोसळतात तरी किंवा कुजतात तरी आणि शिल्लक त्यांची ममीभूत कलेवरेच राहतात. ज्या बदलतात, त्या शतकांचे रस्ते चालूनही सळसळत्या राहतात. उदाहरणार्थ आपली भारतीय विवाहसंस्था.
आपण कधी हे नीट ध्यानीच घेत नाही, की आपल्या संपूर्ण कुटुंबव्यवस्थेच्या तळाशी उभी असलेली ही विवाहसंस्था अनेक बदलांतून गेलेली आहे. नित्य बदलत आहे. मागे-पुढेही होत आहे. पूर्वी विवाहाचे वय काय असावे या मुद्दय़ावरून या महाराष्ट्रात रणकंदन झाले होते. हे वय शारदा (सारडा) कायद्याने निश्चित केले. पुढे त्या कायद्यातही बदल झाला. विधवाविवाह ही गोष्टही तशीच. वैधव्य प्राप्त झालेल्या महिलेने विवाह करणे म्हणजे घोर पापच अशी एके काळी महाराष्ट्रातील धर्ममरतडांची धारणा होती. ती बदलली की नाही ते माहीत नाही, पण आज समाज मात्र बदलला आहे. विधवाविवाह ही आज धर्म बुडालाछाप विलाप करण्याची गोष्ट राहिलेली नाही. १८८४ सालच्या महाराष्ट्रात रखमाबाई जनार्दन सावे या मुलीने आपला बालपणी झालेला विवाह नाकारला. नवरा अशिक्षित, रोगी आणि व्यसनी असल्याने आपण नांदावयास जाणार नाही, अशी भूमिका त्या २० वर्षांच्या मुलीने घेतली. तेव्हा सगळा प्रांत हादरून गेला होता. खरे तर त्यापूर्वी घटस्फोट होत नव्हते असे नाही, पण ते पुरुषांच्या बाजूने होत असत. ही पहिलीच अशी घटना होती, की जेथे बाईने नवरा नाकारला. आज हा नकाराधिकार समाजसंमत झालेला आहे आणि त्याने विवाहसंस्था अजिबात कोसळलेली वगरे नाही. उलट ती अधिक मानवी झाली आहे. व्यक्तिस्वातंत्र्य या मूल्यास अधिक अभिमुख झाली आहे. दोन व्यक्तींनी विवाह न करता वैवाहिक आयुष्य जगण्याच्या लिव्ह इन रिलेशिनशिप नामक संकल्पनेला उचलून धरण्याइतपत सुजाणतेच्या पायरीवर आली आहे. समिलगी विवाहांकडेही याच नजरेने पाहायला हवे, पण त्याऐवजी आपण पाश्चात्त्य किरिस्तावी लैंगिक कल्पनांच्या आहारी जाऊन करण्यात आलेला जुना ब्रिटिश कायदा कवटाळून ठेवत आहोत. समिलगी संबंध ठेवणाऱ्या युगुलांना त्या जुनाट कायद्याला अनुसरून जन्मठेपयोग्य गुन्हेगार मानत आहोत. कुटुंबसंस्था आणि विवाहसंस्था यांच्या नावाने दिन दिन म्हणत वैचारिक पळापळ करत आहोत. लैंगिकता आणि शरीरसंबंध याबाबतच्या खुलेपणाच्या निरोगी संस्कृतीचा वारसा असणाऱ्या समाजाला हे खासच अशोभनीय आहे. पण त्यात आपलीही काही चूक नाही म्हणा. इतिहासाची ओढ फक्त कढ काढण्यापुरतीच असणाऱ्या समाजात हे असेच होत असते.  समलिंगी संबंधांमुळे आपला धर्म भ्रष्ट होईल, कुटुंबसंस्था आणि विवाहसंस्था यांचे वाटोळे होईल, अशी भीती मनात असणाऱ्यांनी मुळात एकदा नीट समजून घेतले पाहिजे, की आज आपण ज्याला असभ्य, अश्लील, अनतिक मानतो अशा लैंगिक संबंधांतूनच आपली विवाहसंस्था आणि म्हणून कुटुंबसंस्था उत्क्रांत झालेली आहे. याच्या पुष्टय़र्थ आपल्या वेद, इतिहास आणि पुराण वाङ्मयातून असंख्य पुरावे आहेत. अलौकिक वा अद्भुताच्या आवरणाखाली ते एरवी झाकलेलेच राहिले असते. परंतु इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी त्यांचे अर्थ आणि संगती लावली आणि त्यातून भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हा अमोल ग्रंथ सिद्ध केला. त्यांनी त्यातून साधार दाखवून दिले आहे, की अतिप्राचीन आणि प्राचीन समाजात स्त्री-पुरुष समागमासंबंधी अशा अनेक चाली होत्या, की ज्यांच्या केवळ उच्चारानेही आजचे सनातनी नखशिखान्त सटपटतील. भारतीय दंड विधानाच्या ३७७ व्या कलमात पशूशी संभोग हा अपराध मानला आहे. राजवाडे सांगतात, अतिप्राचीन आर्षलोकांत स्त्रिया व पुरुष पशूंशी संग करीत व तो दिवसाढवळ्या सर्वासमक्ष करीत व त्यात काही विपरीतपणा त्यांना भासत नसे. या संदर्भात त्यांनी महाभारतातील दम ऋषीचे उदाहरण दिले आहे. तो हरिणीशी रममाण असताना पंडुराजाचा बाण लागून मेला. अश्वमेध यज्ञात घोडय़ांशी यजमानपत्नीने निजण्याचे प्रतीकरूप कर्म हा त्या पाशवी चालीचाच अवशेष आहे. ऋष्णयजुर्वेदसंहितेत, तत्तिरिय संहितेत या यज्ञाच्या वेळी करावयाचे नाटक दिलेले आहे. त्यात हा सर्व विधी रंगवून सांगितला आहे आणि तो महाबीभत्स आहे.
 ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळातील यम आणि यमी या बहीण-भावातील संवादाचे सूक्त सर्वप्रसिद्ध आहे. त्यात यमी आपल्या सख्ख्या भावाला, तू माझ्याशी पतीभावाने वाग आणि आपल्या बापाचा नातू माझ्या ठायी उत्पन्न कर, असे म्हणते. आता हे काही एकटेदुकटे उदाहरण नाही. यूथावस्थेतील समाजात आई, बाप, भाऊ, बहीण यांच्यात समागम सरसहा होत असत, असे राजवाडे दाखवून देतात. महाभारताच्या उद्योगपर्वाच्या १०६ ते १२३ या अध्यायांत माधवीचे आख्यान आहे. गालव नावाच्या ऋषीला गुरुदक्षिणा देता यावी यासाठी ययातिराजाने आपली मुलगी माधवी दिली. ऋषीने तिला स्वत:ची मुलगी म्हणून तीन राजांना एकेक पुत्र होईतोपर्यंत क्रमाक्रमाने भाडय़ाने दिली आणि नंतर ती मुलगी गालवाने आपला गुरू विश्वामित्र याला भार्या म्हणून अर्पण केली. तिच्यापासून विश्वामित्राला एक पुत्र झाला. त्यानंतर त्याने तिला तिचा बाप जो ययाति त्याच्या स्वाधीन परत केली. राजवाडे सांगतात, या कथेत तीन आर्ष चालींचा निर्देश झाला आहे. एक – बाप आपल्या मुलीला वित्त म्हणून वाटेल त्यास काही काळ भाडय़ाने देऊ शके. दोन – शरीरसंबंध काही विवक्षित काल करण्याच्या अटीवर मुली गहाण टाकता येत असत आणि तीन – पुत्ररूप जो शिष्य त्याची मुलगी म्हणजे आपली नात पितृरूप जो गुरू तो काही काल बायको करू शके. हे तर काहीच नव्हे, तर घरी आलेल्या मित्राला वा पाहुण्याला स्वस्त्री संभोगार्थ देण्याची चाल पुरातनकालापासून पाणिनीच्या कालापर्यंत भारतीयांत होती. या आर्ष समाजात देवांना अग्रोपभोगाचा हक्क असे. विवाहाच्या वेळी करण्यात येणारा लाजाहोम हा त्या देवांच्या हक्कातून वधूची सोडवणूक करण्याचा विधी आहे. आपले सर्व विवाहविधी अग्निसाक्ष होतात, याचे कारणही प्राचीन समाजाच्या लैंगिक व्यवहारांत दडलेले आहे. राजवाडे सांगतात, आपले रानटी ऋषिपूर्वज आगटीभोवतील यज्ञकुंडावर विवाहाचे मुख्य प्रयोजन जे प्रजोत्पादन ते करीत. त्या स्मृतीच आज आपण जपत असतो.
 तर मुद्दा असा, की स्त्री ही संपूर्ण कुळाची मालमत्ता असणे. तिचा उपभोग कुळातील कुणीही, प्रत्यक्ष तिच्या पुत्रांनीही घेणे येथपासून बहुपतीत्व वा बहुपत्नीत्व ते एकपत्नीत्व व एकपतीत्व अशा प्रकारे विवाहसंस्था कालानुरूप उत्क्रांत झाली आहे. आता पूर्वी जे होते ते चांगले होते, अनुकरणीय होते, असे काही कोणी म्हणणार नाही. ते पाशवीच होते. पण त्या-त्या काळात ते नैतिकही होते. कारण नतिकता ही गोष्टच खास समाज व कालसापेक्ष असते. त्यामुळे झाले ते नतिकतेलाच धरून झाले असेही काही आपण तात्त्विकदृष्टय़ा म्हणू शकत नाही. अखेर उद्याचा समाज आपल्या एकपत्नीत्वाला वगरे अनतिक म्हणणार नाही, असे काही कोणी छातीठोकपणे सांगू शकणार नाही. तेव्हा आज समिलगी व्यक्तींच्या विवाहास समाज वा विधिमान्यता मिळाली म्हणून काही संस्कृतीचे आकाश कोसळणार नाही. झालेच, तर जे समाजभयाने चोरून-लपून परंतु दैहिक प्रेरणेने केले जाते त्यात खुलेपणा येईल. ते अधिक निरामय असेल. समाजातील संस्था कोणतीही असो, कालौघात टिकून राहतात त्या त्या-त्या संस्थेतील समाजाच्या धारणा करणाऱ्या गोष्टीच, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. विवाहसंस्थेच्या इतिहासातून एवढा बोध मिळाला, तरी तो पुरेसा आहे.
 (संदर्भ – भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, लोकवाङ्मयगृह)

Shani Maharaj Finally To Leave Kumbh Rashi At 2025 Till 2027
शनी महाराज ‘या’ दिवशी घर सोडणार; २०२७ पर्यंत गुरुकडे राहून ‘या’ ३ राशींना देणार अपार संपत्ती; यश पायाशी घालेल लोटांगण
Navpancham Yog
सुर्य आणि केतुने निर्माण केला दुर्मिळ राजयोग! या राशींच्या लोकांचे नशीब चमकणार; वैवाहिक जीवनात आनंदी आनंद
People of this zodiac sign will get a lot of money
१४ जूनपर्यंत होणार भरभराट! सूर्य चमकवणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे भाग्य; कमवणार बक्कळ पैसा
Shani Nakshatra Parivartan May 2024
शनी देणार बक्कळ पैसा! नक्षत्र परिवर्तनाचा ‘या’ तीन राशींना होणार मोठा फायदा
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : ५ दिवसानंतर सूर्याचं होणार संक्रमण! ‘या’ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ; मिळेल बक्कळ पैसा
Redevelopment of old buildings issues
पुनर्विकासाचे धडे : काय काय घेऊन जाणार?
surya gochar 2024 budhaditya rajyog will make is taurus these zodiac sign luck can be more shine
शुक्र राशीत बनणार बुधादित्य राजयोग; ‘या’ राशींचे लोक करणार छप्परफाड कमाई! नोकरी-व्यवसायात मिळेल यश?
Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…