इयत्ता दहावीच्या भूगोल पाठय़पुस्तकातील एक-दोन नकाशेच चुकीचे आहेत असे नव्हे. हे पाठय़पुस्तकच चुकीच्या आधारांवर तयार केले गेले, याचे पुरावे पुस्तकातील अनेक चुकांमधून मिळतात. त्यामुळे हेच पुस्तक कायम ठेवण्याचा आग्रह मोडून काढायला हवा..
दहावीच्या नव्याने प्रकाशित करण्यात आलेल्या भूगोलाच्या पाठय़पुस्तकात चुका आहेतच, पण या वेळी पाठय़पुस्तकाच्या रचनेत जो बदल केला आहे तो धक्कादायक आहे. देशाचा (भारताचा) भूगोल शिकण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यातील दोन प्रमुख पद्धती म्हणजे :
१) एकात्मिक/ एकत्रितपणे भूगोल शिकणे
२) प्रादेशिक भूगोल प्रदेशनिहाय शिकणे
पाचवी व पूर्वीच्या दहावीच्या भारताच्या भूगोलासंबंधी आतापर्यंत ही ‘एकात्मिक’ पद्धतच राबविण्यात आली आहे. त्यानुसार ‘भारता’सारखा एखादा भू-भाग संपूर्णपणे डोळ्यासमोर ठेवून एकूण भूगोलाचा एकत्रितपणे अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे त्यातील नकाशेदेखील संपूर्ण भारताचे होते व त्यातून संपूर्ण देशातील भौगोलिक घटकांचे वितरण एकाच वेळी एकसंधपणे शिकले जात असे. आतापर्यंत हीच पद्धत चालू असताना राज्याच्या माध्यमिक शिक्षण मंडळाने अचानक ‘प्रादेशिक’ पद्धती स्वीकारलेली दिसते. त्याप्रमाणे भारताचा भूगोल प्राकृतिक विभागानुसार तुकडय़ात-तुकडय़ात लिहिला आहे. हा नवा दृष्टिकोन शालेय स्तरावर अचानकपणे अवलंबिला जाण्यावर प्रमुख हरकत आहे.
‘प्रादेशिक’ दृष्टिकोन का नको
१) प्रादेशिक दृष्टिकोनाबद्दल तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नसून तो शालेय पातळीवर अवलंबिण्यात विरोध आहे. कारण संपूर्ण देशाच्या अनेक समस्या समजण्यास प्रथम ‘देश’ हे एकक मानून सलग प्रदेश एकात्मिक दृष्टीने पाहणे इष्ट व सोपे असते.
२) प्रदेशांचा भूगोल सर्वसाधारणपणे बीएच्या तिसऱ्या वर्षी किंवा एमएच्या पातळीवर शिकवितात.
३) प्रादेशिक दृष्टिकोन शालेय पातळीवर कधीच घेतला न गेल्याने तो पचविणे अध्यापकांनाही कठीण जाईल. तसेच आठवीपर्यंत ढकलगाडीने पुढे आलेल्या विद्यार्थ्यांना हा भूगोल भयंकर वाटेल.
४) संपूर्ण देशाचे एकत्रित चित्र उभे राहिले तरच बरेचसे भौगोलिक संबोध स्पष्ट होतात. प्रादेशिक पद्धतीने ते होत नाहीत. उदा. देशातील लोहमार्गाचे बंदरकेंद्रित जाळे व ब्रिटिशांचे व्यापारी धोरण यांचा सहसंबंध, तसेच भारतातील ऊर्जा साधने व त्यांचा विकास, कोळशाच्या खाणींचे दामोदर खोऱ्यातील केंद्रीकरण, त्यानुसार अणुशक्ती केंद्र दूर तर औष्णिक केंद्रे जवळ व पावसाचे मान, पर्वतमय प्रदेश व जलविद्युत केंद्र यांचे सहसंबंध. भौगोलिक घटकांचे एकमेकांशी असलेले सहसंबंध संपूर्ण भारताचे एकत्रित चित्र समोर ठेवून म्हणजेच संपूर्ण भारताचा नकाशा पुढे ठेवून समजणे सोयीचे आहे. भूगोल म्हणजे अशा सहसंबंधांचा अभ्यास आहे व म्हणून प्रादेशिक विभागांच्या सीमांमध्ये आड आल्यास हा संबंध कळणे कठीण आहे.
५) ओ.एच.के. स्पेट व लेअरमॅथ, आर. एल. सिंग किंवा डॉ. सी. डी. देशपांडे या मोठमोठय़ा भूगोलतज्ज्ञांनी प्रथम भारताचा एकत्रित अभ्यास झाल्यानंतरच त्याची प्रादेशिक विभागणी करून प्रत्येक प्रदेशाचा सूक्ष्म अभ्यास केला. त्या वेळी मानव-पर्यावरण संबंध व प्राकृतिक, सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक घटकांच्या संदर्भात प्रदेशांची वैशिष्टय़े वर्णिल्या आहेत. म्हणजेच प्रादेशिक भूगोल समजण्यासाठी पूर्वीचा एकात्मिक भूगोल मनात पक्का ठसणे आवश्यक आहे.  म्हणूनच अशा प्रकारचा भूगोल वरच्या पातळीवर म्हणजे विद्यापीठाच्या पातळीवरच अभ्यासक्रमात अंतर्भूत करतात. दहावीसाठी तर खचितच नाही.
 ६)  मंडळाच्या तथाकथित भूगोलतज्ज्ञांनी सीबीएसई-आयसीएससी/ आयबी किंवा इतर राज्यांच्या दहावी स्तरावर काय चालले आहे याचा तुलमात्मक अभ्यास केला आहे काय? कोणत्या मंडळाने हा प्रादेशिक दृष्टिकोन स्वीकारला आहे? तसे नसेल तर आपल्या मंडळाच्या तथाकथित तज्ज्ञांना एवढी घाई कसली झाली की, विद्यापीठाच्या स्तरावर जो विशेष अभ्यास होतो तो दहावीच्या अनिवार्य विषयासाठी या पातळीवर शिकवावा? पाचवीचा भारताचा भूगोल एकात्मिक आहे, पण प्राथमिक शाळेतील वास्तव वेगळेच आहे! त्यात केवळ माहितीचा डोंगर असतो व स्पष्टीकरण नसते. म्हणूनच तोच एकात्मिक दृष्टिकोन ठेवून माध्यमिक स्तरावर पुन्हा संपूर्ण भारताचा भूगोल योग्य त्या शास्त्रीय, तांत्रिक, भौगोलिक, आर्थिक व ऐतिहासिक स्पष्टीकरणांसह शिकवावा लागतो. म्हणजे एकात्मिक दृष्टिकोन तोच असावा फक्त केवळ ‘ज्ञान’ देण्याच्या पातळीवरून ‘आकलनाच्या’ पातळीकडे वळावे व उच्च माध्यमिक स्तरावर ‘उपयोजनाच्या’ उद्दिष्टाकडे वळावे हा शैक्षणिक सिद्धांत आहे. म्हणूनच भारताचाच भूगोल आपण एककेंद्रित पद्धतीने पाचवी, दहावी, बारावी व पदवी स्तरावर पुन:पुन्हा शिकतो. शेवटच्या स्तरावर भूगोल हा ‘समस्याप्रधान’, ‘उपयोजनप्रधान’  व ‘प्रकल्पप्रधान’ असावा अशी अपेक्षा असते. पण भारताचे चित्रात दाखविल्याप्रमाणे तुकडे करून शिकणे शालेय पातळीवर घातक ठरेल. (चित्र- पृष्ठ-१ भूगोल पाठय़पुस्तक)
घातक का?
हे पाठय़पुस्तक फक्त महाराष्ट्रातील मराठी मुलेच अभ्यासणार आहेत, मात्र इतर बोर्डाची व राज्यांची मुले एकात्मिक भारताचा भूगोल शिकणार आहेत. ‘आपल्या बोर्डाचा अभ्यासक्रम दिल्लीच्या स्तरावर न्या’, याचा अर्थ प्रादेशिक दृष्टिकोन स्वीकारा असे नाही. आपल्या मंडळाने एमएच्या पातळीवर चालू शकणारा भूगोल अचानकपणे दहावीत आणून मराठी मुलांचे खच्चीकरण केले आहे, कारण कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत (यूपीएससी, एमपीएससी) एकात्मिक प्रश्न विचारले जातात. मंडळाचे नवीन भूगोलाचे पुस्तक अभ्यासणाऱ्या मुलांना या स्पर्धात्मक परीक्षा जड जातील आणि हे पुस्तक एकदा सुरू झाले की, दहा वर्षे चालू राहणार आहे. मराठी मुलांना या पाठय़पुस्तकाचा स्पर्धा परीक्षांना उपयोग नसल्यामुळे इतर पुस्तके वाचावी लागतील.
वितरण की हिस्सा?
हे पुस्तक रद्द करण्याचे एक दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे सदर पुस्तकावरून अभ्यास व लेखक मंडळ सदस्यांना ‘वितरण’ व ‘हिस्सा’ यातील फरकदेखील समजलेला नाही. सदर पुस्तकात भारताचे जे विविध प्रादेशिक विभाग पाडण्यात आले आहेत, त्यांचे स्वतंत्र नकाशे दिले आहेत. या नकाशांचे आकार आपल्या मनात कधीच बसलेले नाहीत, कारण संपूर्ण भारत डोळ्यासमोर ठेवून आपण भूगोल शिकलेलो असतो. आता हे विविध विभाग दाखवून त्या त्या प्रदेशांची भुरूपे, खडक व खनिजे, मृदा, हवामान, वनस्पती वर्णन करून लोकवस्तीच्या वितरणाचा नकाशा टिंब पद्धतीने दाखविलेला आहे. मात्र त्या त्या विभागांत कोणती खाद्य-पिके होतात व कोणती नगदी पिके होतात यांचे तथाकथित चित्र प्राकृतिक नकाशाच्या पाश्र्वभूमीवर मोठ्ठे वर्तुळ काढून त्यात त्या त्या पिकांचे प्रमाण (हिस्सा) वर्तुळखंडाने (सेक्टरने) दाखविले आहे. त्यांच्या रंगात व सूचीमधील रंगांमध्ये बरीच विसंगती आहे व त्यावरून हिस्सा कोणत्या पिकाचा आहे तेही कळत नाही! गंमत म्हणजे नकाशाचे उपशीर्षक ‘पिकांचे वितरण’ असे दिले आहे ते संपूर्ण चूक आहे. कारण ते वर्तुळखंड वितरण नसून हिस्सा दाखविते. भूगोलाच्या अभ्यासात वितरणास म्हणजे त्या त्या पिकांचा पसारा किंवा क्षेत्र दाखविणे आवश्यक व योग्य असते, पण ते टिंब पद्धतीने नकाशातील क्षेत्रावर जेथे होते तेथे दाखविणे आवश्यक असते. नुसत्या हिस्से दाखविणाऱ्या वर्तुळखंडांनी वितरण दाखविताच येत नाही. लोकसंख्येचे वितरण जसे टिंब पद्धतीने दाखविले आहे तसे पिकांचे दाखवावयास हवे होते. म्हणजे जे पीक ज्या ठिकाणी होते तेथील भौगोलिक पर्यावरण लक्षात घेऊन वितरणाचे स्पष्टीकरण देता येते. म्हणजे तागाचे वितरण मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये (बंगामध्ये) दाखविण्यात आले पाहिजे. प्रत्यक्षात बंगालमध्ये नगदी पिकात ‘ताग’ दाखविलाच नाही! आसाममध्येही नाही! (आकृती ५.८)
पिकांचे खरे वितरण हे पाऊसमान, तापमान व मृदा या गोष्टींवर निसर्गत: अवलंबून असते. त्यावर मानवनिर्मित सिंचनाचा प्रभाव पडल्यावर त्या पिकाखालील क्षेत्र वाढते. उदा. पंजाबातील बासमती तांदूळ किंवा महाराष्ट्रातील ऊस. पण या पुस्तकातून कोणत्याच नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचे वितरण न दाखविता ‘हिस्से’ किंवा प्रमाण दाखविले हे भयानक आहे! कुठे गेले ते लोहमार्गाचे व रस्त्यांचे जाळे, देशभरातील उद्योगकेंद्रे व औद्योगिक पट्टे, ऊर्जानिर्मिती केंद्रे आणि पर्यटन केंद्रे? जर घटनाच नकाशांतून दाखविल्या नाहीत तर त्यांना जबाबदार भौगोलिक व इतर घटक कसे समजणार? व दोघांचे सहसंबंध समजणे अशक्यच!
प्रमुख चुका
जो काही ‘प्रादेशिक’ दृष्टिकोन घेतला आहे त्यातही जे काही वर्णन आहे ते त्या त्या प्रदेशाचे घेताना इतर जवळील दुसऱ्या प्रदेशाचे घेतले आहे. उदा. ‘दख्खनच्या पठारावरील पाठ पाहा.’ त्याला ‘द्वीपकल्यीय पठर’ हा शब्दही वापरला आहे. प्रत्यक्षात दख्खनच्या पठाराला समुद्रकिनारा लागून नाही तर तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन अशी द्वीपकल्याची समज येत नाही! या दख्खनच्या पठारात तामिळनाडूचे वर्णन कसे आले. ते राज्य तर दिलेल्या नकाशाप्रमाणे दख्खन पठाराच्या बाहेर आहे. एवढेच नव्हे तर ‘संस्कृती’ अशी टीप लिहिलेले नृत्याचे छायाचित्र, मदुराईचे मंदिर इत्यादी गोष्टी त्याच पाठात कशा आल्या?
इतर काही वैगुण्ये
सदर पुस्तकात एकूण २० पाने अर्ध-कोरी म्हणजे फुकट घालविली आहेत! त्या त्या ठिकाणी सुयोग्य चित्रे, छायाचित्रे, तक्ते, व्यंगचित्रे टाकता आली असती किंवा संहिता छापताना ‘फॉन्ट’च मोठा करून मुलांना पुस्तक वाचणे सुलभ करता आले असते.
जी छायाचित्रे मधून मधून टाकली आहेत तीदेखील पुष्कळशी अस्पष्ट आहेत! तसेच ती विषयाशी नेमकी जुळणारी नाहीत. उदा. चहाच्या मळ्यातील बाई महत्त्वाची की मळ्याचा उतार महत्त्वाचा? येथे उतार दिसतच नाही.
सूचीमधील रंग सारखेच दिसतात. त्यामुळे बाजरी जास्त की ज्वारी जास्त, गहू जास्त की तांदूळ हे कळत नाही. आकृत्या, नकाशे, चित्रे हे सर्व समजण्यासाठी असतात की पाने भरण्यासाठी.
सदर पुस्तकाची एवढी चिकित्सा झाल्यावर मंडळाच्या अधिकाऱ्यांना काही सूचना कराव्याशा वाटतात.
१) सदर पुस्तकाचे अभ्यास मंडळ व लेखक मंडळ (भूगोल या विषयाचेच) ताबडतोब बरखास्त करावे (जे की आता केले आहे).
२) हे पाठय़पुस्तक बाजारातून ताबडतोब मागे घ्यावे; रद्द करावे.
३) सदर पुस्तक चुका दुरुस्त करून अतिरिक्त वाचनासाठी वापरावे, पण पाठय़पुस्तक नव्यानेच लिहावे. सध्याच्या पुस्तकातील एकूण १ ते ९ प्रकरणांपैकी प्रकरण क्र. २ पासून क्र. ८ पर्यंत असलेला मजकूर पूर्णत: रद्द करण्याजोगा आहे.
४) लवकरात लवकर नवीन लेखकांची समिती तयार करावी व जूनच्या अंतापर्यंत नवीन पुस्तक बाजारात आणण्यासाठी युद्धपातळीवर काम व्हावे. त्यासाठी समितीला आवश्यक त्या सोयी पुरवाव्यात.
 (लेखक भूगोल विषयाचे साठय़े महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी भूगोलाच्या पाठय़पुस्तक मंडळावर काम केले आहे)