नीरजा

कवयित्री

मडक्यागाडग्यात लपवून ठेवलेल्या पैशांतून काटकसरीत संसार करणारी बाई, जर पुरुषांनी त्यांचे निर्णय तिच्यावर लादले नाहीत तर देशाचाही संसार करू शकते..

रजनी परुळेकर ही सत्तरीच्या दशकापासून लिहिणारी आमची कवयित्री मैत्रीण, तिच्या ‘स्वप्न’ या दीर्घ कवितेत  म्हणाली आहे,

‘स्वत:च्या श्रमाने कमावलेला पगार

तोही हातात द्यायचा पुरुषाच्या निमूटपणे

हे आर्थिक स्वातंत्र्य

आणि अनेक स्त्रिया अनुभवणे

ही पुरुषाची प्रतिष्ठा!’

स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या समाजातील स्थानाविषयीचं व त्यांच्या मानसिकतेविषयीचं योग्य निरीक्षण मांडणाऱ्या या कवितेत सामाजिक, लैंगिक, आर्थिक स्तरावर बाई कशा प्रकारे दुय्यम स्थानावर फेकली गेली आहे आणि तिच्याकडे आजवर एक वस्तू म्हणून कसं पाहिलं आहे याचं चित्रण आलं आहे. रजनीनं केलेल्या बाईच्या आर्थिक स्वातंत्र्यावरच्या या भाष्याची आठवण आज झाली ती ताज्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं.

एकविसाव्या शतकाची दोन दशकं संपलेली आहेत. स्त्रियांना त्यांचे हक्क मिळावे म्हणून अनेक चळवळी, आंदोलनं झाली. युरोप-अमेरिकेत मतदानाच्या हक्कापासून ते संपत्तीवरील हक्कांपर्यंत सगळ्या गोष्टींसाठी भांडावं लागलं. आपलं स्वत्व सापडल्यावर स्वत:चा शोध घेण्यासाठी तिकडे इब्सेनची ‘नोरा’ घराबाहेर पडली, तर आपल्याकडेही शिकलेल्या मुली ‘घराबाहेर’ पडल्या. गेल्या शे-दीडशे वर्षांत स्त्री-शिक्षणाच्या झालेल्या प्रसारामुळं आपणही स्त्रीसाठी तयार केलेल्या वेगवेगळ्या चौकटींतून बाहेर पडून स्वत:ला शोधू शकतो, आपले निर्णय घेऊ शकतो आणि आर्थिकदृष्टय़ा सक्षम होऊ शकतो याचा विश्वास स्त्रियांना वाटायला लागला. स्त्रीवादी चळवळीनं स्त्रीला तिच्या हक्कांविषयी सजग केलं. अर्थात ही चळवळ आणि या चळवळीनं केलेल्या आंदोलनांविषयी, त्यातून मिळालेल्या हक्कांविषयी किती स्त्रियांना माहीत आहे याचा विचार केला, तर निराशाजनक चित्र दिसतं. तरीही या चळवळीच्या झालेल्या परिणामांमुळं आज अनेक स्त्रिया कॉर्पोरेट जगात, विविध व्यवसायांत, वेगवेगळ्या नोकरी-धंद्यांत, शिक्षण किंवा आरोग्य यांच्याशी निगडित असलेल्या पेशात कार्यरत आहेत. अनेक स्त्रिया मग त्या सुशिक्षित असोत की अशिक्षित, वेगवेगळी कामं करून, नोकरी करून आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देत आहेत. गावखेडय़ांपेक्षा महानगरांत त्यांची संख्या मोठी असली तरी संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर तशी कमीच आहे; पण तरीही अनेक तळागाळातील स्त्रिया गावखेडय़ात रोजंदारीच्या कामावर कधी मजूर म्हणून, तर कधी कामगार म्हणून कामं करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे मेहनत करून थोडाफार पैसा कमवत आहेत. मुंबईतील ‘लेडिज स्पेशल’ किंवा स्त्रियांच्या डब्यातून प्रवास केला तर अशा अर्थार्जनासाठी बाहेर पडलेल्या विविध स्तरांतील स्त्रियांची भेट होते. त्यात डॉक्टर, शिक्षक, सीए, पत्रकार, वकील, कॉर्पोरेट जगतातील विविध हुद्दय़ांवर असलेल्या स्त्रिया, पोलीस खात्यात काम करणाऱ्या, शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या स्त्रियांपासून ते आया, घरकाम करणाऱ्या स्त्रियांपर्यंत सर्वच स्त्रियाआत्मविश्वासानं बाहेर पडलेल्या दिसतात. आज कमावणाऱ्या या स्त्रियांना आपण भेटतो तेव्हा त्यांच्यातल्या आत्मनिर्भर स्त्रीची भेट होते.

महाराष्ट्रातील अनेक गावांतही अशा काही स्त्रियांची भेट होते; पण या स्त्रियांशी गप्पा मारल्यानंतर लक्षात येतं की, एक-दोन तास जिथं मोकळेपणानं व्यक्त होता येतं त्या लोकलमधील स्त्रियांच्या डब्यात सापडलेल्या हव्याहव्याशा अवकाशाचं किंवा छोटय़ा शहरातील मैत्रिणींच्या घराचं दार बंद करत बाहेर पडून जेव्हा त्या त्यांच्या पुरुषांच्या घरात शिरतात; तेव्हा त्यांच्यातला हा आत्मविश्वास हरवून गेलेला असतो. कारण त्या घरात त्यांच्या आत्मविश्वासाला पोषक वातावरण नसतं. त्या घरात त्यांना सतत ‘तुला काय कळतंय?’ हे ऐकवून ऐकवून त्यांच्यातल्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण केलेलं असतं. अशा परिस्थितीत आपल्याला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा हक्क नाही हे त्यांच्या लक्षात येतं आणि त्यातून हळूहळू कोणतेही निर्णय घेण्याची क्षमता आपल्यात नाही असंही त्यांना मनोमन वाटू लागतं. एखाद्या माणसाला सतत तू काय करू शकत नाहीस हे सांगितलं, की त्याला ते खरं वाटू लागतं तशी अवस्था आज अनेक स्त्रियांची आहे.

या व्यवस्थेनं दिलेल्या दुय्यमत्वामुळं आलेले न्यूनगंड जोपासत जेव्हा मुली वाढतात; तेव्हा त्यांना वाटायला लागतं की, आपण काहीही केलं तरी शारीरिकदृष्टय़ा पुरुषापेक्षा जास्त बलवान नाही बनू शकणार. आपण कितीही नकार दिला तरी पुरुषाचा वर्चस्ववाद नाही नाकारू शकणार. आपण कितीही ताकद लावून नकार दिला तरी आपल्यावर बलात्कार होणार, तोंडावर अ‍ॅसिड फेकलं जाणार. आपण कितीही मोठय़ा पदाला पोहोचलो तरी कुटुंबात आपली भूमिका ही एका आईची, पत्नीची आणि गृहिणीचीच असणार, कारण ज्या संस्कृतीत आपण राहतो ती संस्कृती आपल्याला सांगत असते की, घरात शिरल्यावर तू मुलांची आई असतेस, गृहिणी असतेस, एका पुरुषाची अर्धागिनी असतेस, त्याच्या शेजेची सोबतीण असतेस. अशा कल्पना गोंजारत ती जगते, त्यामुळेच मग पेप्सिकोची सीईओ इंद्रा नुई तिच्या मुलाखतीत अभिमानानं सांगते की, ‘माझ्या घरात शिरताना मी माझ्या डोक्यावरचा हा शिरपेच काढून माझ्या मुलांची आई होते.’

आपण प्रथम स्थानावर येऊच शकत नाही हे इतकं सहज स्वीकारलेलं असतं की, मग कंपनीचे मोठमोठे आर्थिक व्यवहार करणाऱ्या स्त्रिया घरातले आर्थिक व्यवहार नवऱ्याच्या हातात देण्यातच समाधान मानतात. हे आर्थिक व्यवहार स्त्रियांच्या हातात सहजपणे येतात ते नवरा नावाचा पुरुष त्यांच्या आयमुष्यात नसेल तर – जर त्या कुमारिका किंवा विधवा असतील तर किंवा नवरा अगदीच कुचकामी असेल तर. अन्यथा खूप कमी स्त्रिया घराची आर्थिक जबाबदारी पूर्णपणे उचलून आपण कमावलेला पैसा कसा खर्च करायचा याचा निर्णय घेताना दिसतात. त्यामुळेच या कमावणाऱ्या बायकांतील अनेक जणी रजनी परुळेकर म्हणतात तसं नवऱ्याच्या हातात पगार देतात आणि स्वयंपाकघराशी निगडित खर्च करणे किंवा स्वत:च्या कपडय़ालत्त्यासाठी खर्च करणे यालाच आर्थिक स्वातंत्र्य समजतात, तर दुसरीकडे आपल्या पासबुकात किती पैसे आहेत हे आपल्या बायकांना माहीत असण्याचं कारण नाही, असं समजणाऱ्या पुरुषांना मात्र आपल्या  बायकोच्या पासबुकात किती पैसे आहेत हे जाणून घेणं आणि हवे असल्यास खर्च करणं, हा आपला जन्मसिद्ध म्हणजे या व्यवस्थेनं दिलेला हक्क आहे असं वाटत असतं. पुरुष अनेकदा म्हणतात, ‘आम्ही काय नाही म्हणतो का? त्यांनी घ्यावा सगळा आर्थिक व्यवहार हातात.’ पण हे म्हणताना पुढचं वाक्य असतं ते- ‘त्यांना जमणार आहे का?’ त्यामुळे बायकांनाही प्रश्न पडतो, ‘खरंच, हे आपल्याला जमणार आहे का?’

अर्थात याला अनेक अपवाद आहेत. आज अनेक स्त्रिया भक्कमपणे आपल्या घराची आर्थिक बाजू धरून आहेत,घराची घडी कोलमडण्यापासून वाचवताहेत. कित्येक जणी शेअरबाजारापासून वेगवेगळे व्यवसाय समर्थपणे करताहेत; पण हे प्रमाण तुलनेनं कमी आहे हे कबूल करावं लागेल.

याचं कारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ जाळून एवढी वर्ष झाली असली तरी त्यात अधोरेखित झालेली आपल्या समाजव्यवस्थेची मानसिकता आजही पुसली गेलेली नाही, हे आहे. त्यामुळेच आपल्या व्यवस्थेनं आजही आर्थिक व्यवस्थेतला स्त्रीचा सहभाग म्हणावा तसा मान्य केला नाहीच, पण आज एकविसाव्या शतकात पोहोचलेल्या, स्वत:ला शोधू पाहाणाऱ्या स्त्रीनंदेखील आपल्या आर्थिक हक्कांविषयी म्हणावी तशी जागरूकता दाखवलेली नाही. आपल्या प्राचीन ग्रंथांतही त्याचा विशेष उल्लेख नाही. ‘मनुस्मृती’त तर संपत्तीमध्ये कोणाकोणाचा सहभाग असावा याची चर्चा करताना कुठेही स्त्रीचा किंवा तिच्या मुलींचा उल्लेख केलेला नाही. पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती मुलांनाच मिळावी हे सांगतानाच पहिल्या मुलाला, दुसऱ्या मुलाला किती वाटणी मिळावी हेही सांगितलं आहे. त्याला स्वत:चा मुलगा नसेल तर त्याच्यापासून दुसऱ्या स्त्रीला झालेल्या मुलांना ती मिळावी किंवा त्याच्या बायकोनं नियोगानं जन्माला घातलेल्या मुलांना ती द्यावी, असं सांगितलं आहे. यातील कोणीही नसेल तर काय याविषयी चर्चा नाही. स्त्रीला ती मिळावी असा उल्लेख कुठेही नाही. स्त्रीची संपत्ती म्हणजे फक्त लग्नाच्या वेळी तिला मिळालेले दागदागिने हे स्त्रीधन. या संपत्तीची काळजीही ती स्वत: घेऊ शकत नाही. ती कोणा पुरुषानंच घ्यावी, असं सांगितलं आहे. आज ‘मनुस्मृती’चा गौरव करू पाहणाऱ्या स्वयंघोषित संस्कृतिरक्षकांनी जर ती नीट वाचली तर लक्षात येईल की, आठव्या अध्यायातील २८व्या श्लोकात ‘संतती होत नसल्याने पतीने दूर ठेवलेल्या स्त्रियांचे, मुलगा नसलेल्या स्त्रियांचे व संरक्षक नसलेल्या स्त्रियांचे धन तसेच पतिव्रता व विधवा स्त्रियांचे धन राजाने संरक्षिले पाहिजे,’ असं सांगितलं आहे.

सांगायचा मुद्दा हाच की, संपत्तीतील हक्क, कुटुंबातीला महत्त्वाचे आर्थिक व्यवहार हा आपला प्रांत नाही हे आजही अनेक स्त्रियांच्या मनावर खोलवर रुजलेलं आहे म्हणजे ते रुजवलं गेलेलं आहे. घरातल्या कर्त्यां पुरुषानं घरखर्चासाठी दिलेले पैसे जमेल तेवढी काटकसर करून वापरणे आणि त्यातून जमलं तर थोडेसे वाचवून घरातल्या बरण्यांत किंवा डब्यांत लपवून ठेवण्यात आणि वेळ आली तर घरासाठीच वापरण्यात अनेक स्त्रियांचा जन्म जातो. काही या वाचवलेल्या पैशांत स्वत:वर खर्च करण्याचा प्रयत्न करतात. नवऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगल्या असणाऱ्या स्त्रिया त्यानं दिलेल्या पैशांत थोडी भिशीची किंवा किटी पार्टीची अथवा शॉपिंगची मौज करतात आणि त्यालाच पैसे खर्च करण्याचं स्वातंत्र्य असं समजतात.

अनेकदा नवरा वारल्यानंतर किंवा तो बाहेरगावी असेल किंवा बदलीच्या गावी असेल तर त्याच्या गैरहजेरीत इलाज नसल्याने या स्त्रिया सक्तीनं आर्थिक व्यवहारात लक्ष घालतात, पण हेही मोठय़ा प्रमाणात नाही. जमिनीचे, संपत्तीचे, घरांचे, व्यवसायांचे व्यवहार मात्र घरातील दुसऱ्या पुरुषांच्या मदतीनंच केले जातात. त्यामुळे स्त्रियांना अर्थसंकल्प वगैरेंमध्ये रस असणं तर फार पुढची गोष्ट असते. नोकरी, व्यवसाय न करणाऱ्या स्त्रियांचं आर्थिक भान हे जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीविषयी चर्चा करण्यापलीकडे जात नाही आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं आर्थिक भान हे आपल्या पगारावर किती इन्कम टॅक्स बसणार या प्रश्नापलीकडे जात नाही. हा देशाचा अर्थसंकल्प केवळ आपली प्राप्ती आणि आपल्याला भराव्या लागणाऱ्या करांपुरता मर्यादित नसतो. तर त्यात आपलं संरक्षण, शिक्षण, आरोग्य अशा विविध गोष्टींविषयीची धोरणं ठरत असतात. या गोष्टींवर होणाऱ्या खर्चातून सरकारची या विभागांविषयीची आस्था दिसून येत असते हे अनेकदा लोकांच्या लक्षातही येत नाही.

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नवऱ्याच्या हातात पगार आणून देणं नाही, तर आर्थिक निर्णयांबरोबरच घरातले सारे महत्त्वाचे निर्णय घेणं असतं, हे स्त्रियांना लहानपणापासून सांगायला हवं यात शंका नाही; पण त्यासाठी पुरुषसत्ताक व्यवस्थेची मानसिकता बदलण्याची गरज आहे. खरं तर स्त्रियांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं ही या मानसिकतेच्या बदलामुळेच मिळू शकतील. ज्याप्रमाणे बलात्काऱ्यांना फाशी देऊन प्रश्न सुटणार नाही, असं आपण म्हणतो; तेव्हा स्त्रीकडे वस्तू म्हणून पाहण्याची आणि आपल्यापेक्षा ती वरचढ होऊन नये म्हणून तिला शारीरिकदृष्टय़ा खच्ची करून दाबून टाकण्याची मनोवृत्ती बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं आपल्याला वाटत असतं. त्याचप्रमाणे बाईनं अर्थकारणातही रस घ्यायला हवा, असं आपण म्हणतो तेव्हा घरातले महत्त्वाचे निर्णय तसेच आर्थिक निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हा त्यांचा हक्क आहे, हे पुरुषाला समजावणं गरजेचं आहे असं मला वाटत असतं. आपण सबजेक्ट आणि बाई ऑबजेक्ट असल्याची जी पुरुषाची भावना आहे ती प्रथम बदलायला हवी.

आपण कर्ते पुरुष आणि बाई आपण सांगू ते करणारी, हा समज दूर केला तर कदाचित तिच्या हातात घराच्या आर्थिक नाडय़ा येतील आणि त्या आल्या तर ती त्या व्यवस्थित आणि खंबीरपणे सांभाळेल. शेवटी कोणतीही गोष्ट पूर्ण जबाबदारीनं अंगावर आली तर ती कोणतीही व्यक्ती व्यवस्थित पार पाडते. बाईही ती पार पाडेल, फक्त तिला सन्मानानं ती जबाबदारी देण्याची गरज आहे. ती एकदा दिली तर कवयित्री शान्ता शेळके म्हणतात तशी तीही म्हणेल-

‘माहीत नव्हते मला माझे बळ, माझी दुर्बलता

सतत मला वेढून बसलेली भीरूता

माझे माझ्याशी असलेले भांडण

माझ्या निकट सहवासातलेही माझे एकाकीपण

काहीच उमगत नव्हते यांतले

होते केवळ असह्य़ घुसमटणे एका अथांगातले..

आता आतल्या आत मी आहे उलगडत

क्षणोक्षणी विस्तार पावत

पोचते आहे जाऊन माझ्याच अंतरंगाच्या  कानाकोपऱ्यापर्यंत.

मी चकित होते आहे, स्तिमित होते आहे..’

( शोध, ‘जन्मजान्हवी’)

हा आपल्या अस्तित्वाचा शोध आज बाई घेते आहे. तिला स्वत:ला उलगडू दिले, सगळ्या पातळीवर विस्तार पावू दिले तर कदाचित आर्थिकदृष्टय़ा ती सबल होईलच, पण सारे निर्णयही सहज घेऊ शकेल. मडक्यागाडग्यात लपवून ठेवलेल्या पैशांतून काटकसरीत संसार करणारी बाई जर पुरुषांनी त्यांचे निर्णय तिच्यावर लादले नाहीत तर देशाचाही संसार करू शकते हे ती दाखवून देईल आणि मग केवळ तीच नाही तर सगळेच चकित होतील, स्तिमित होतील.

nrajan20@gmail.com