मर्मग्राही समीक्षक, साक्षेपी संपादक आणि संवेदनशील साहित्यिक रा. ग. जाधव यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या समग्र कार्याचा घेतलेला परामर्श..
२७ मे २०१६, शुक्रवार, वैशाख कृष्ण पंचमी, शके १९३८ रोजी सकाळी सहाच्या सुमाराला प्रा. रा. ग. (रावसाहेब गणपतराव) जाधव यांनी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी (जन्म २४ ऑगस्ट १९३२) या जगाचा निरोप घेतला. गेले पन्नास-पंचावन्न दिवस ते आजारीच होते आणि अधूनमधून त्यांची प्रकृती गंभीर होत होती. चाळीस दिवस तर ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये होते. गेले आठ-दहा दिवस त्यांना घरी आणले होते. त्यांच्या एकेका अवयवसंस्थेचे कार्य बंद पडत चालले होते. गेले दोन-तीन दिवस प्रकृती खालावली होती. पोटात फारसे काही जात नव्हते म्हणजे शरीर काही स्वीकारत नव्हते. तरी आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्यांना शुद्ध होती. रात्रीपासून घसरण सुरू झाली आणि सकाळी मृत्यूने त्यांना गाठले. जवळपास वर्षभर त्यांच्या प्रकृतीची काही ना काही तक्रार सुरूच होती. दोनतीनदा हॉस्पिटलच्या वाऱ्या घडल्या होत्या. तरी बरे वाटायचे तेव्हा ते त्यांच्या घराजवळच्या ‘राज’ हॉटेलमध्ये येऊन बसायचे. त्यांना भेटायला येणारी मंडळी तेथेच यायची. चहाच्या कपाबरोबर गप्पा व्हायच्या. प्रकृती बरी होती तेव्हा ते रोज सकाळी साडेपाच पावणेसहाच्या सुमारास फिरायला जात. परलोकाच्या प्रवासाला जातानाही ते असेच नेहमीच्या वेळी फिरायला गेल्यासारखे गेले.
रा. ग. जाधव यांच्या निधनामुळे एक मर्मग्राही समीक्षक, एक साक्षेपी संपादक आणि संवेदनशील साहित्यिक हरपला आहे. साठ वर्षांच्या त्यांच्या साहित्यसेवेला मृत्यूने पूर्णविराम दिला आहे. त्यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचे अनेक पलू आहेत. साहित्यविषयाचा जाणकार अध्यापक, दलित साहित्याचा मर्मज्ञ भाष्यकार, आधुनिक मराठी साहित्याचा चिकित्सक समीक्षक, मराठी कविता, कथा आणि नाटक यांचा सौंदर्यशोध घेणारा रसिक हे त्यांपकी प्रमुख होत. ते स्वत: हळुवार, भावनाशील व चिंतनशील कवी होते. ‘मावळतीच्या कविता’, ‘वियोगब्रह्म’, ‘बापू : एकभाषित चिंतनकाव्य’ आणि ‘मित्रवर्या’ हे त्यांचे काव्यलेखन. याशिवाय त्यांच्या जीवनकार्याचे एक अतिशय महत्त्वाचे अंग त्यांच्या संपादनकार्याशी निगडित आहे. शासकीय महाविद्यालयातील अध्यापकाची नोकरी सोडून ते लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली सुरू झालेल्या ‘विश्वकोशा’त मानव्य विद्याशाखेचे विभागसंपादक म्हणून काम करू लागले. १९७० ते १९८९ अशी एकोणीस वष्रे ते काम त्यांनी अगदी मनापासून केले. वेगवेगळ्या ज्ञानशाखांचे ज्ञान संपादन करून त्यांनी आपल्या साहित्याभ्यासाला त्या ज्ञानाची जोड दिली. ‘पर्यावरणीय प्रबोधन आणि साहित्य’ हे त्यांचे सद्धांतिक स्वरूपाचे समीक्षात्मक पुस्तक ही या तपस्येचीच परिणती होती. त्यांची सर्वागीण योग्यता लक्षात घेऊनच कालांतराने विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. अध्यक्षपदाच्या कालावधीत दोन खंडांच्या कामाची पूर्ण सिद्धता त्यांनी केली. विश्वकोशातील प्रत्येक नोंद ते स्वत: बारकाईने वाचत, तपासत, तीत आवश्यक त्या दुरुस्त्या करीत आणि नंतरच त्या नोंदीला अंतिम रूप प्राप्त होई. विश्वकोशाला पूर्णता प्राप्त होण्यास ज्या ज्या मान्यवरांचे परिश्रम कारणीभूत ठरले त्यात जाधव यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख करावा लागतो.
त्यांच्या हातून घडलेले संपादनाचे दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे ‘साधना’ साप्ताहिकाला साठ वष्रे झाल्याच्या निमित्ताने प्रा. प्रधान व त्यांनी मिळून केलेले ‘निवडक साप्ताहिक साधना’चे संपादन! प्रत्येकी अडीचशे पृष्ठांच्या एकंदर आठ भागांत हे काम त्यांनी उभे केले आहे. सर्व अंक पाहून त्यातील लेखांसंबंधी चर्चाविनिमय करून महत्त्वाच्या लेखांचे त्यांनी केलेले संपादन साधनाच्या प्रबोधनकार्याची यथोचित कल्पना देणारे झाले आहे. नियतकालिकांतील साहित्याचे निवडक स्वरूपाचे इतके नमुनेदार संपादन दुसरे दाखवणे अवघड आहे. या दोन कामांइतकेच किंबहुना यांहूनही महत्त्वाचे त्यांचे संपादनकार्य म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रसिद्ध झालेल्या १९५१ ते २००० या कालावधीतील मराठी साहित्याच्या इतिहासग्रंथांची चार भागांतील निर्मिती. अशा प्रकारचा २००० पर्यंतच्या वाङ्मयाचे समालोचन करणारा ग्रंथ अन्य भारतीय भाषांत झालेला नाही. या कामासाठी विषयनिहाय वेगवेगळ्या तज्ज्ञ अभ्यासकांची मदत जाधव मिळवू शकले हे त्यांचे यश म्हणावे लागेल.
सा. रे. पाटील यांच्या निधनानंतर ‘साधना’च्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी एप्रिल २०१५ पासून कारभार पाहायला सुरुवात केली. त्या जबाबदारीचे एक दडपण त्यांच्यावर होते. अध्यक्ष म्हणून काम करण्यापूर्वी इ.स. २००४ ते २०१५ अशी अकरा वष्रे ते विश्वस्त होतेच. ‘साधना’चे विश्वस्तपद ही फार मोठी सामाजिक जबाबदारी आहे याची त्यांना अखंड जाणीव होती. विश्वस्त म्हणून काम करताना ‘साधना’च्या एका पचाही अपव्यय होत नाही ना याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे. ‘साधना’ प्रकाशनाने काय करावे आणि काय करू नये यासंबंधीच्या त्यांच्या कल्पना अगदी सुस्पष्ट होत्या. दाभोलकरांचा स्वभाव साहसी होता. वेगवेगळ्या योजना ते एकापाठोपाठ आखत आणि यशस्वीपणे पारही पाडत, परंतु या उपक्रमांत त्यांना सतत सावधगिरीचा इशारा देण्याचे काम जाधव करीत. त्यांनी व्यक्तिश: स्वत:चे अल्पसे उत्पन्न काटकसरीने वापरलेच, पण संस्थेचे पसेही जपून वापरले जाताहेत ना याबाबत ते सदैव जागरूक असत.
साहित्यसमीक्षा ही खऱ्या अर्थाने जाधवांची आवडती लेखनशाखा होती. साहित्याचा आत्मप्रत्यय प्रमाण मानून ते लिहीत आणि साहित्यकृतीचे आपल्याला जाणवलेले सौंदर्य विशद करून ते मांडत. साहित्याविषयी जोवर सूत्ररूपाने काही लिहिता येत नाही तोवर त्यांच्या लेखनाला आरंभ होत नसे. केवळ वर्णनपर लिहावे असा त्यांचा िपड नव्हता. आस्वादक लिहायचे, परंतु तो आस्वाद चिकित्सावृत्तीतून उमलून आला पाहिजे असे त्यांना वाटत असे. त्यांनी केलेली ‘मुक्ती’, ‘विघ्नहर्ती’, ‘तलावातले चांदणे’, ‘भुजंग’, ‘सूड’, ‘विदूषक’, ‘नागीण’ इत्यादी कथांची रसग्रहणे किंवा चित्रे, कोलटकर, सुर्वे, ग्रेस इत्यादी कवींच्या काव्याची आकलने त्यांच्या विचक्षण लेखनशैलीचा मनोज्ञ आविष्कार आहेत.
‘आगळीवेगळी नाटय़रूपे’ या पुस्तकामधून त्यांनी ‘नटश्रेष्ठ व चार सांगीतिका’, ‘श्रीमंत’, ‘एक शून्य बाजीराव’, ‘सखाराम बाइंडर’, ‘महानिर्वाण’, ‘वासनाकांड’, या नाटय़कृतींची पृथगात्मता विवरणपूर्वक सांगितली आहे. सकारात्मक दृष्टीने विचार करणारे व दलित साहित्याच्या सामर्थ्यांचा बोध घडविणारे पहिले भाष्यकार रा. ग. जाधव होत. दलित साहित्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात त्यांच्या समीक्षेचा वाटा सिंहाचा आहे. समीक्षात्मक स्वरूपाची त्यांची चाळीस पुस्तके त्यांच्या प्रगल्भ वाङ्मयीन दृष्टीचा पुरावा आहेत. समीक्षकापाशी असाव्या लागणाऱ्या प्रतिभेचे सुरम्य विलसित त्यांच्या समीक्षेतून दृष्टीस पडते. साहित्य, समाज व संस्कृती यांविषयीच्या सातत्यपूर्ण चिंतनाने त्यांच्या समीक्षेला सौंदर्य व सामथ्र्य या दोहोंची प्राप्ती घडली. साहित्याच्या आशयद्रव्याची, रंगरूपांची, अर्थपूर्णतेची, मूल्यांची संगती लावून देणारे समग्रलक्ष्यी चिंतन म्हणजे समीक्षा अशी समीक्षेविषयीची त्यांची धारणा त्यांच्या लेखनामधून वेळोवेळी प्रकटली आहे. समीक्षाक्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळेच २००४ साली औरंगाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना लाभले.
जाधव कायमच्या निवासासाठी पुण्यात आले आणि त्यांच्या आयुष्यातील उत्कर्षांचा काळ सुरू झाला. त्यांचा गौरव वेगवेगळ्या पुरस्कारांनी झाला. यशवंतराव चव्हाण पुरस्कार, प्रियदर्शनी पुरस्कार, युगांतर प्रतिष्ठान पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार इत्यादी. या सगळ्यांवर कळस चढविला तो २७ फेब्रुवारी २०१६ या मराठी भाषादिनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाच लाखांचा िवदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन केलेल्या सन्मानाने!
रा. ग. जाधव हे अगदी विलक्षण स्वभावाचे गृहस्थ होते. स्त्रियांविषयीचा मृदुभाव आणि बालकांविषयीचा वात्सल्यभाव त्यांच्या अंत:करणात ओतप्रोत भरलेला होता. त्यांच्या नित्याच्या वागण्याबोलण्यांत तो सतत उमटत असे. नरेंद्र दाभोलकर या बुद्धिवादी आणि विज्ञानवादी विचारसरणीच्या मित्राच्या सहवासात राहूनही जाधवांचा ग्रहमानावरील विश्वास ढळला नव्हता. रोज सकाळी उठल्यावर आजचे भविष्य काय आहे यावर आपला आजचा दिवस कसा जाणार याची कल्पना ते करीत. कधी शनी वक्री आहे, कधी राहूची दशा अमुकतमुक आहे, गुरुबदल केव्हा होणार आहे, असे तपशील त्यांच्या बोलण्यात नित्य येत. चांगलेचुंगले खायलाप्यायला व चांगले ल्यायला त्यांना आवडत असे. आइस्क्रीम तर त्यांना अतिशय आवडत असे. ते कधी स्वत: क्रिकेट खेळले नाहीत, परंतु क्रिकेटच्या सामन्यांत त्यांना खूप रस होता.
रा. ग. जाधव यांचे कौटुंबिक जीवन हे एक गूढच होते आणि शेवटपर्यंत ते गूढच राहिले. ते एकटे राहात. आपल्या अपयशी कौटुंबिक जीवनातील दु:ख आणि वेदना त्यांनी स्वत:च्या अंत:करणात खोलवर दडवून ठेवल्या होत्या. वाटय़ाला आलेल्या एकाकीपणाचे व घोर वंचनेचे शल्य उराशी बाळगत समाजात त्यांनी आनंदीपणाचा व समाधानीपणाचा मुखवटा धारण करून सगळे आयुष्य काढले. व्यक्तिगत जीवनातले सगळे दु:खद आघात त्यांनी सोसले होते. त्या आघातांनी ते अनेकदा घायाळ झाले होते, परंतु आपल्या दु:खाचे, व्यथांचे प्रदर्शन तर दूरच, त्याचा साधा उच्चारही त्यांनी कधी केला नाही.
ते आजारी पडले तेव्हापासून त्यांची सर्व देखभाल विनोद शिरसाठ यांनी मनोभावे केली. शुश्रूषा करण्याचे अतिशय अवघड काम गुणवंत या कार्यकर्त्यांने केले आणि राजेंद्र मोरे व जयश्री मोरे या दाम्पत्याने त्यांची सेवा करून शेजारधर्माचे सर्वतोपरी पालन केले. तसे पाहता गेल्या वर्ष-दोन वर्षांत जाधव आपल्या एकंदर आयुष्याविषयी साशंक झाले होते. त्यांची जीवनेच्छा हळूहळू ओसरत चालली होती. शेवटच्या चारेक महिन्यांत तर ते मनाने पलतीरीच गेले होते. महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार दिला खरा, परंतु त्याचा आनंद काही त्यांना झाला नाही. मंत्रिमहोदय त्यांना भेटायला व पुरस्कार प्रदान करायला घरी आले होते, पण हे आपले खिडकीपाशी जाऊन बसले होते. अवतीभोवती माणसे होती, परंतु जाधव त्या माणसांत नव्हते. दिवसेंदिवस ते जास्तजास्त एकटे होत गेले. कोणाला भेटण्याची, कोणाशी बोलण्याची, कसली कसली म्हणून इच्छाच त्यांच्यात उरली नाही. वरवर पाहता जरी ते सर्वाचे होते तरी ते कोणाचेच नव्हते. त्यांचे जगणे आणि जाणे हे फ्रँक ओकोनर या कथाकाराच्या भाषेत बोलायचे तर ‘लोन्ली व्हॉइस’ बनले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– डॉ विलास खोले 

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life journey of r g jadhav
First published on: 29-05-2016 at 02:38 IST