किन्नरी जाधव 

स्त्री चालकांच्या आयुष्यात ‘अबोली’ रिक्षा आली आणि त्यांना रोजगाराचं एक वेगळं साधन मिळालं, ज्यामुळे अनेकींना आर्थिक स्वातंत्र्य तर मिळालंच, पण काहींचे संसारही उभे राहिले, मुलांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले. अशा आत्मसन्मान मिळवलेल्या २०० स्त्रिया आज ठाण्यामध्ये, तर ५० जणी पनवेलमध्ये ही अबोली रिक्षा चालवत आहेत. त्यांच्या आयुष्यात ही प्रकाशवाट आणणाऱ्या, मोटार वाहन विभागातल्या पहिल्या महिला साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ठरलेल्या आणि सध्या पनवेल येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या आजच्या दुर्गा आहेत, हेमांगिनी पाटील

Praniti Shinde, Solapur,
सोलापूरचे भाजपचे दोन्ही खासदार सतत दहा वर्षे नापासच, प्रणिती शिंदे यांची टीका
not a single word about Sharad Pawar in pm narendra modis speech in wardha
मोदींच्या भाषणात शरद पवारांबाबत चकार शब्द नाही, काय असावे कारण…
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
What DCM Devendra Fadnavis Said About Nana Patole?
नाना पटोलेंच्या कार अपघातावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, “महाराष्ट्राच्या राजकारणात…”

अगदी अलीकडेपर्यंत काही सामान्य वाटणाऱ्या व्यवसायांमध्ये पुरुषांची मक्तेदारी कायम होती. त्याचे एक ठळक उदाहरण म्हणजे रिक्षा. समाजजीवनाला नेहमीच नवी दिशा देणारे उपक्रम राबविणाऱ्या ठाणे शहरात गेल्या दोन वर्षांपासून हे परिवर्तन घडले आणि स्त्री चालक असलेली ‘अबोली’ रिक्षा रस्त्यावर धावू लागली. नेहमीच्या काळ्या-पिवळ्या रिक्षांमध्ये अवतरलेली ही अबोली रिक्षा आणि ती चालवणारी स्त्री चालक रस्त्यावर दिसल्यावर सुजाण नागरिकांच्या नजरा कौतुकाने त्यांच्याकडे वळल्या. हे परिवर्तन घडवणाऱ्या आणि सर्वात महत्त्वाचे ‘तुम्ही हे करू शकता’ असा आत्मविश्वास गरजू स्त्रियांमध्ये निर्माण करणाऱ्या अधिकारी आहेत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील. आज ठाण्याबरोबरच पनवेल येथेही या अबोली रिक्षा दौडू लागल्या आहेत.

हा प्रवास कठीण नसला तरी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक अडथळे होते. या स्त्रियांना रिक्षा चालवण्याचा परवाना मिळण्यासाठी मंत्रालयात अडचणी येत होत्या. दहावी अनुत्तीर्ण असलेल्या स्त्रियांना रिक्षा चालवण्याचा परवाना मिळत नव्हता. हेमांगिनी पाटील यांनी ही अट शिथिल करण्यासाठी जोमाने प्रयत्न केले. त्यांनी सतत मंत्रालयातील अधिकाऱ्यांना केलेल्या पत्रव्यवहारामुळे अखेर ठाण्यातील स्त्रियांच्या हाती रिक्षा आली. अर्थात विरोध झालाच, पण त्याला उत्तर देण्याचे बळ हेमांगिनी पाटील यांनी स्त्रियांच्या मानसिकतेत रुजवले. हेमांगिनी यांच्यामुळे आपले संसार उभे करू शकणाऱ्या स्त्रियांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड सन्मानाची भावना आहे. या योजनेमुळे आज ठाणे, पनवेलमधील अनेक स्त्रियांमध्ये सुरक्षित प्रवासाची भावना असते. रात्री उशिरा घरी परतणाऱ्या अनेक जणींकडे या रिक्षाचालक स्त्रियांचे मोबाइल क्रमांक असतात. त्या त्यांच्याशी थेट संपर्क करून रात्री स्टेशनवर बोलावून घेतात आणि निर्धास्तपणे परतीचा प्रवास करतात. उत्पन्नाचे नवीन साधन मिळवणाऱ्या स्त्री रिक्षाचालक आणि प्रवासी स्त्रिया दोघींना या अबोलीचा फायदा होतो आहे.

हेमांगिनी पाटील मूळच्या उत्तर महाराष्ट्रातील. मालेगाव येथील आर.बी.एच. कन्या विद्यालयातून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. २००१ मध्ये मोटार वाहन विभागात पहिली महिला साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नाशिकमध्ये त्यांची निवड झाली. या विभागात १७ वर्षे नाशिक, अकोला, कोल्हापूर, सांगली, नागपूर आणि ठाणे येथे त्यांनी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम पाहिले. ठाणे शहरात २०१३ ते २०१७ या कालावधीत हेमांगिनी या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर कार्यरत असताना एका तरुणीने विनयभंगापासून वाचण्यासाठी धावत्या रिक्षातून उडी मारली. या घटनेने हेमांगिनी पाटील अस्वस्थ झाल्या. ठाण्यासारख्या शहरातही प्रवासादरम्यान स्त्रिया किती असुरक्षित असतात, हेच यातून अधोरेखित झाले. तत्कालीन अप्पर पोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत अनेक उपायांची चर्चा झाली होती. त्यातूनच एखाद्या वेगळ्या रंगाची रिक्षा स्त्री रिक्षाचालकांसाठी तयार करण्याची कल्पना हेमांगिनी पाटील यांना सुचली. या कल्पनेतूनच जन्म झाला स्त्री चालकांच्या अबोली रिक्षांचा.

अबोली रिक्षाचा प्रकल्प राबवण्यात हेमांगिनी यांना फारसा संघर्ष करावा लागला नाही. मात्र या प्रकल्पासाठी काही पुरुष रिक्षाचालकांचा विरोध त्यांना पत्करावा लागला. अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. गरोदर स्त्रिया रिक्षा कशी चालवणार, रात्रीच्या वेळी लांब पल्ल्यावरचे भाडे कसे स्वीकारणार? पण स्त्रियांचा प्रवास सुरक्षित करण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या हेमांगिनी पाटील यांना विरोध करणाऱ्यांना कृतीतून उत्तर द्यायचे होते. २०१६ मध्ये पहिल्या टप्प्यात पंधरा स्त्रिया वाहन प्रशिक्षण केंद्रात रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी रुजू झाल्या आणि ठाणे शहरात स्त्रिया चालक असलेल्या अबोली रिक्षा दिमाखात धावू लागल्या. साडी नेसून वा खाकी किंवा पांढऱ्या रंगाच्या गणवेशात रिक्षाचालक स्त्रिया दिसू लागल्या. आज ठाणे शहरात २०० पेक्षा अधिक अबोली रिक्षा धावत आहेत. पूर्वी ज्या महिला धुणी-भांडी करून अतिशय तुटपुंज्या रोजगारात कुटुंब सांभाळत होत्या त्याच स्त्रिया रिक्षा व्यवसायामुळे उत्तम रोजगार मिळवत आहेत. पैशांमुळे अडणारे मुलांचे शिक्षण त्या रिक्षा व्यवसायाच्या रोजगारावर पूर्ण करू शकल्या.  ‘‘पूर्वी शाळेत काम करून हातात फक्त तीन ते चार हजार रुपये मिळायचे. आता रिक्षा चालवत असल्यामुळे चांगला नफा होतो,’’ असे ठाण्यातील पहिल्या स्त्री रिक्षाचालक अनामिका भालेराव सांगतात. तर सुनीता आवटी या स्वत: गॅरेजमध्ये काम करणाऱ्या, त्या स्वत:च रिक्षा चालवायला शिकल्या आणि आज त्या रिक्षा तर चालवतातच पण त्यांनी इतर चौघींनाही रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण दिले आहे.

सध्या हेमांगिनी पाटील या पनवेलमध्ये कार्यरत असल्याने त्यांनी तिथेही ‘अबोली’ रिक्षांची संकल्पना राबवली असून पनवेलमध्ये ५० स्त्री रिक्षाचालक आहेत. तसेच महाराष्ट्रातील पहिला स्त्री रिक्षाचालकांचा थांबा पनवेल येथे सुरूझाला आहे. स्त्री रिक्षा चालकांना एखाद्या थांब्याजवळ रिक्षा उभ्या केल्यावर काही पुरुषांकडून आजही विरोध होतो. पण स्त्रिया आवाज उठवतात. काही अडल्यास स्त्रिया हेमांगिनी पाटील यांच्याशी आजही संपर्क साधत अडचणींवर मात करतात.

या सर्व स्त्रियांना वेगळा रोजगार देऊन त्यांना आत्मभान देण्याचे श्रेय जाते हेमांगिनी पाटील यांनी कल्पकतेने राबविलेल्या अबोली रिक्षा योजनेला. स्त्रियांमध्ये परिवर्तनाचा पायंडा घालून देणाऱ्या अशाच हेमांगिनी पाटील यांची आज समाजाला गरज आहे.

हेमांगिनी पाटील

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

संपर्क क्रमांक  – ९७०२७६२९९९