‘पारखा’ हा एस. एल भैरप्पा यांच्या ‘तब्बलियु नीनादे मगने’ या कानडी कादंबरीचा मराठी अनुवाद. ‘तू पोरका झालास.. म्हणजेच सर्व गोष्टींना पारखा झालास’ असा या शीर्षकाचा अन्वयार्थ. कादंबरीचा विषय हा गायीकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन आणि व्यावहारिक दृष्टिकोन यांतील संघर्षांचा आहे. १९६८ मध्ये ही मूळ कानडी कादंबरी प्रकाशित झाली. आणि आता २०१५ मध्ये उमा कुलकर्णीनी ती मराठीत आणली आहे. दरम्यान जवळजवळ ५० वर्षांचा काळ गेल्यानंतरही ती कालबाह्य़ झालेली नाही असेच म्हणावे लागेल. कारण आजघडीला ‘गाय’ या विषयाचे राजकारण पुनश्च ऐरणीवर आलेले आहे. नाटय़ात्म उपरोधिकता हे भैरप्पांच्या कादंबऱ्यांचे मोठे वैशिष्टय़ राहिले आहे. १९६८ मधली ही कादंबरी आता मराठीत येणे हीसुद्धा एक नियतीची नाटय़ात्म उपरोधिकताच म्हणता येईल. गायीमध्ये ३३ कोटी देवदेवता वास करतात असे मानून भक्तिभावाने तिची पूजा करणारा काळिंगज्जा आणि तिला केवळ दूध आणि मांस देणारा प्राणी मानणारा अमेरिकेतून शिकून आलेला त्याचा नातू काळिंगा यांची ही कथा आहे.
‘पारखा’ वाचताना दोन इंग्रजी कादंबऱ्यांची आठवण होते. एक म्हणजे पर्ल बक या अमेरिकन लेखिकेची ‘द गुड अर्थ’ आणि चिनुआ अचेबे या आफ्रिकन लेखकाची इंग्रजी कादंबरी ‘थिंग्ज फॉल अपार्ट’! या तीन कादंबऱ्यांमधली साम्यस्थळे विलक्षण आहेत. पहिली जरी अमेरिकन लेखिकेची असली तरी ती चिनी जीवनाबद्दलची आहे. चीन, भारत आणि आफ्रिका या तिन्ही ठिकाणी मुळात प्राचीन कृषीसंस्कृती होती. पाश्चात्यांशी आलेला संपर्क म्हणा, किंवा भारत आणि आफ्रिका यांच्याबाबतीत केवळ संपर्कच नव्हे, तर पाश्चात्त्य आक्रमणामुळेही इथे यंत्रसंस्कृती आली. हे चांगलं की वाईट वगैरे सोडून देऊ. पण या संपर्कामुळे इथल्या प्राचीन कृषीसंस्कृतीला मोठाच धक्का पोहोचला. तो बाह्य़त: जरी भौतिक स्वरूपाचा होता तरी त्यातून या संस्कृतीच्या मूल्यव्यवस्थेला जबरदस्त धक्का दिला गेला. एक प्रकारे गाय आज राजकारणात कळीचा मुद्दा ठरू पाहत असली तरी ही कादंबरी मात्र तिच्यावरून होणाऱ्या राजकारणासंबंधी नाही, तर ती ‘द गुड अर्थ’ व ‘थिंग्ज फॉल अपार्ट’प्रमाणेच या सांस्कृतिक धक्क्याची कहाणी सांगते. कृषीसंस्कृतीची मूल्यं आणि यंत्रसंस्कृतीची मूल्यं फार वेगळी असतात. श्रद्धाभाव, निष्ठा, माणुसकीसाठी त्यागाची तयारी, समाधानी वृत्ती, अधिक पैशाची लालसा नसणं ही कृषीसंस्कृतीची मुख्य वैशिष्टय़ं. याउलट, यंत्रसंस्कृतीमध्ये या गोष्टींना फारसे महत्त्व नाही. अधिकाधिक फायदा व पैसा हेच तिचे मुख्य अधिष्ठान असते. बाकी मानवी मूल्यं वगैरे गोष्टी यंत्रसंस्कृतीच्या लेखी फिजूल ठरतात. युरोपियन मिशनरी आफ्रिकेतल्या इग्बो संस्कृतीच्या मूल्यांचा नाश करतात. ‘द गुड अर्थ’मधली ओ लान ही खरीखुरी शेतकरी स्त्री आहे. कष्टाळू. मातीला आई मानणारी. तिच्या नवऱ्याच्या हातात बायकोमुळेच प्रचंड संपत्ती येते. त्याची नियत, दानत बदलते आणि तो या मातीला विसरतो. ‘पारखा’मधला काळिंगा अमेरिकेत पाश्चात्त्य यंत्रसंस्कृतीचा अंगीकार करतो. अमेरिकन स्त्रीशी लग्न करतो आणि तिथली मूल्यंही स्वीकारतो. भारतात परतल्यावर इथे आलेल्या अनुभवांनी त्याच्या मनातली मूळची संस्कृती जागी होते. तो तळमळायला लागतो. पण तोपर्यंत साहजिकच तो इथल्या संस्कृतीला, मातीला, कुटुंबाला, आईला आणि अर्थातच गोमातेला पुरता पारखा झालेला असतो.
या कादंबरीतली काळिंगज्जा ही गोपाल संस्कृतीची प्रतिनिधी असलेली हृदयस्पर्शी व्यक्तिरेखा आहे. या संस्कृतीत तो मुरलेला आहे. या संस्कृतीच्या बाहेरच्या व्यावहारिक गोष्टी त्याच्या आकलनापलीकडच्या आहेत. कोंडवाडय़ातल्या एका गाभण गायीचा मालक तिला शोधायला येत नाही म्हटल्यावर काळिंगज्जा तिचं ‘लेकमाणसासारखी आली’ म्हणून यथासांग बाळंतपण करतो. तो मालक आपल्या गायीला शोधत आल्यावर त्याला दोन दिवसांनी यायला सांगतो, कारण ओल्या बाळंतिणीला त्याने चालवत घरी न्यायला नको. नंतरही कोवळ्या वासराला चालायला न लावता त्याला हातात घेऊन जायला काळिंगज्जा सांगतो, इतका तो हळवा आहे. आपल्या शिकलेल्या नातवाचे बोलणे त्याला समजत नाही. ‘ज्यानं घरातलं ज्ञानच समजावून घेतलेलं नाही, तो परदेशातून काय आणि किती शिकणार आहे?’ असे त्याला वाटते. त्यामुळे तो परदेशातून परत येईल की नाही; आणि आल्यावर घरात राहील की नाही, याची त्याला शाश्वती नाही.
काळिंगज्जाच्या मरणाचे वर्णन म्हणजे भैरप्पांची जणू कविता आहे. त्याने यंग्टाकडे आपल्या गोठय़ाची जबाबदारी सुपूर्द केली. गायींचे रोग, त्यावरची औषधे, निगा घेण्याची पद्धत वगैरे सारं त्याला सांगितलं. गायीच्या औषधाचे पैसे घेतलेस तर तुझा वंश टिकणार नाही, असेही वर बजावले. सगळी निरवानिरव केली. त्याने यंग्टाला पावा घेऊन यायला सांगितले आणि तो आपल्या गोठय़ातच झोपला. खिडकीतून चांदणं आत आलं होतं. यंग्टानं पान खाऊन गोठय़ात पावा वाजवायला सुरुवात केली. जणू कृष्णच आपला पावा बाहेर काढतो. तो आवाज ऐकताच वळू भांडण थांबवतात. त्या वातावरणात पाव्याचा स्वर एखाद्या दीपज्योतीप्रमाणे भासतो. मध्यरात्र संपून आकाशात शुक्राची चांदणी दिसेपर्यंत यंग्टा पावा वाजवत होता. ‘गोठय़ातला दिवा शांतपणे जळत होता. काळिंगज्जाही शांतपणे झोपला होता. सकाळी तो जिवंत नव्हता. रात्री झोपेतच केव्हातरी त्याचा जीव गेलेला होता. अजूनही त्याचा चेहरा पावा ऐकत असल्यासारखा दिसत होता.’ अशिक्षित काळिंगज्जाच्या मरणाच्या वर्णनातून भैरप्पा त्या प्राचीन गोपाल संस्कृतीचे सत्त्वच जणू दर्शवतात आणि भारतीय तत्त्वज्ञानातले कर्मयोगाचे एक सूत्रही प्रकट करतात. आपल्या वाटय़ाचे कर्म गाढ श्रद्धेने, निष्ठेने आणि समर्पितभावाने करणाऱ्या काळिंगज्जाला तत्त्वज्ञासारखे शांत सुंदर मरण येते.
पण या एका बाजूमुळे भावविवश न होता भैरप्पा तटस्थपणे दर्शवतात की, कालगतीने या संस्कृतीचा ऱ्हास होणे अपरिहार्यच आहे. तिच्या जागी येणाऱ्या यंत्रसंस्कृतीचा पूर्णपणे स्वीकार करणे पाश्चात्त्य जीवनशैली स्वीकारून आधुनिक झालेल्या काळिंगालाही जमत नाही. तो विचार करतो, ‘‘विद्युतशक्ती, वैज्ञानिक खतं यासारखं विज्ञान मलाही हवंय. पशूंना आजार झाले तर त्यांना बरं करणारं विज्ञान मला पाहिजे. पण ते (पशू) केवळ माणसाच्या उपयोगासाठीच आहेत असं मानणारा दृष्टिकोन मला अजिबात नकोय! आपणा भारतीयांची गोष्ट वेगळी आहे. आम्हाला ट्रॅक्टर पाहिजे आणि गोपूजाही पाहिजे.’’ हा या कादंबरीतल्या समस्येचा गाभा ते मांडतात. श्रद्धा आणि व्यवहार यांचा योग्य समन्वय व्हायला हवा असे ते सुचवतात. भैरप्पा यांच्यातला कथनकार कादंबरीच्या पहिल्याच पानापासून वाचकाचे बोट धरतो आणि शेवटच्या पानापर्यंत ते बिलकूल सोडत नाही. तीच प्रवाही शैली उमा कुलकर्णीनी या कादंबरीच्या अनुवादातही तंतोतंत राखली आहे. वाचायलाच हवी अशी ही कादंबरी आहे. ल्ल
‘पारखा’-
डॉ. एस. एल. भैरप्पा,
अनुवाद- उमा कुलकर्णी,
मेहता प्रकाशन,
पृष्ठे- २७६, किंमत- २९५ रुपये.