‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या ‘एव्हरेस्ट-ल्होत्से’ मोहिमेस नुकतेच यश आले. आठ हजार मीटरपेक्षा उंच दोन शिखरांवर एकाच वेळी यश मिळवणारी ही पहिली भारतीय नागरी मोहीम ठरली आहे. या मोहिमेचा नेता उमेश झिरपे याने या यशानंतर ‘बेस कॅ म्प’हून व्यक्त केलेल्या भावना.

एव्हरेस्ट आणि ल्होत्से या दोन उत्तुंग शिखरांच्या विजयाच्या पताका घेऊनच काल मी ‘कॅम्प २’वर मुक्कामी आलो. माझ्यासोबत ‘ल्होत्से’ शिखर सर केलेला आशीष मानेदेखील होता. काल-आजच्या यशावर चर्चा करत असतानाच टेंटमध्ये आडवा झालो आणि ‘गिरिप्रेमी’ ते ‘गिर्यारोहण’ अशा प्रवासाचे अनेक टप्पे उलगडत गेले.
‘आनंदासाठी गिर्यारोहण’ हे घोषवाक्य घेतलेल्या ‘गिरिप्रेमी’ने गेल्या दोन-अडीच दशकांत धाडस, चिकाटी आणि अभ्यासूवृत्तीने सहय़ाद्री आणि हिमालयात अनेक डोंगरवाटांचा शोध घेतला. हा शोध त्या पर्वतांचा, अवघड वाटांचा, निसर्गाचा, साहस-धाडसाचा तर होताच, पण त्या जोडीनेच तो स्वत:चा आणि समाजाचादेखील होता. या शोधातूनच या साऱ्यांत ‘गिर्यारोहण’ कुठे आहे ते आम्हाला सापडले. सापडलेले, गवसलेले हे ‘गिर्यारोहण’ समाजात घेऊन जावे, त्याने सारा समाज भारून टाकावा या हेतूने गेली काही वर्षे आमची धडपड सुरू आहे. एव्हरेस्ट आणि ल्होत्सेसारख्या मोहिमा यासाठी केवळ निमित्त आहेत.
हा खेळ आव्हानांचा आहे. साहसाने भरलेला आहे. जीवन-मृत्यूच्या दारातला आहे.. पण यातूनच तर जीवनाला, व्यक्तिमत्त्वाला खरा आकार, अर्थ येतो. चांगल्या, निकोप, विधायक वृत्तीने केलेल्या गिर्यारोहणाने अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाल्याचे मी पाहिले, अनुभवले आहे. मूल्यांवरची त्यांची पकड दृढ झाली आहे आणि विधायक विचारांची कास त्यांनी धरली आहे.
सुरुवातीला सहय़ाद्रीतील पदभ्रमण, मग हिमालयातील मोहिमा असे करत ‘गिरिप्रेमी’ने ‘एव्हरेस्ट’चे शिवधनुष्य उचलले आणि २०१२ साली आठ आणि १३ साली तीन असे तब्बल ११ गिर्यारोहकांनी ते पेलूनही दाखवले. ‘एव्हरेस्ट’साठी येणारा खर्च, त्यासाठीची शारीरिक- मानसिक तयारी पाहता ही मोहीम काढणेच मुळी धाडसाचे, थोडेसे वेडेपणाचे! पण ‘गिरिप्रेमी’ने हे धाडस केले आणि यशस्वीही करून दाखवले.
एव्हरेस्ट झाल्यावर पुढे अनेकांचे गिर्यारोहण थांबते. पण आम्हाला नवी आव्हाने, जबाबदाऱ्या सतावू लागल्या. म्हणूनच गेल्या वर्षीच्या मोहिमेनंतर आम्ही जगातील आठ हजार फुटांवरच्या सर्व शिखरांचा वेध घेण्याचा संकल्प सोडला. जगात अशी १४ शिखरे आहेत. गिर्यारोहणाच्या भाषेत यांना ‘एट-थाऊजंडर्स’ असे म्हणतात. आज जगात हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढय़ाच लोकांनी ही सगळी शिखरे सर केलेली आहेत. भारतात तर अशी एकही व्यक्ती नाही. या शिखरांचे स्वप्न ‘गिरिप्रेमी’ने उराशी बाळगले आणि एव्हरेस्टपाठोपाठ यंदा ‘ल्होत्से’चे नवे पानही त्यात यशस्वीरीत्या जोडले.
भारतात गिर्यारोहणविषयक शिक्षण देणाऱ्या तीन संस्था आहेत. पण या तीनही संस्था हिमालयात कार्यरत आहेत. महाराष्ट्रात सहय़ाद्रीच्या अंगाने अशी एखादी प्रशिक्षण देणारी संस्था सुरू करण्याचे ‘गिरिप्रेमी’चे स्वप्न आहे. पाहूयात, या साऱ्या स्वप्नांच्या वाटेवर किती मजल मारता येते!
‘गिर्यारोहण’ हा एक शरीर आणि मनाचा विकास करणारा खेळ आहे. निसर्गाच्या अधिकाधिक जवळ गेल्याने या खेळ-छंदातून व्यक्तिमत्त्वाचा खऱ्या अर्थाने विकास होतो. धाडस, साहस, चिकाटी, नेतृत्वगुण, एकाग्रता, आत्मविश्वास आणि चारित्र्य असे व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू इथे फुलतात. शरीर तंदुरुस्त होते आणि मन निसर्गाप्रमाणे साफ-शुद्ध होते. अशा या निरोगी व्यक्तिमत्त्वांमधूनच मग चांगला, सुदृढ समाज तयार होतो. या साऱ्यांसाठीच समाजात, विशेषत: लहान मुलांमध्ये या क्रीडाप्रकाराचा प्रसार होणे गरजेचे आहे. ‘एव्हरेस्ट-ल्होत्से’सारख्या मोहिमांचा हाच खरा हेतू आहे. त्यांच्या चर्चा, जनजागृतीतून असे निकोप ‘गिर्यारोहण’ रुजले तरच ही मोहीम यशस्वी झाली असे म्हणता येईल!