शहरात किती अनधिकृत बांधकामे आहेत याबद्दल खुद्द नाशिक महापालिकेतील नगररचना विभागच अनभिज्ञ आहे. गेल्या काही वर्षांत तसे सर्वेक्षणच झालेले नाही. दुसरीकडे कर विभागाकडील माहितीनुसार शहरात तीन लाख ५५ हजार ७२० मिळकती आहेत. त्यापैकी थोडय़ाथोडक्या नव्हे तर १३,०७४ मिळकती अनधिकृत असल्याची नोंद आहे.
शहरातील मोकळ्या जागांवर कब्जा करून नगरसेवकांनी बेकायदेशीरपणे संपर्क कार्यालये थाटली आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकरणात मनसेचा कोणी लोकप्रतिनिधी आढळल्यास त्याची गय केली जाणार नसल्याचे सांगणाऱ्या राज ठाकरे यांच्या पक्षातील काही नगरसेवकदेखील त्यास अपवाद नाहीत. सामाजिक संस्थांच्या नावाखाली मोकळे भूखंड नाममात्र दरात हडप करून त्यावर कार्यालय बांधणे सर्रासपणे सुरू आहे. जुन्या नाशिकमधील बिकट स्थितीतील पुरातन वाडे ही तर राजकीय मंडळींसाठी सोन्याची खाणच. पावसाळ्यापूर्वी या वाडय़ांना ‘धोकादायक वास्तू’ म्हणून नोटीस बजावली जाते. त्याचा आधार घेऊन दुरुस्तीच्या नावाखाली वाडय़ांच्या जागी थेट नव्या इमारती बांधण्याची किमया बाहुबली नगरसेवकांनी केली आहे. निवासी स्वरूपाच्या बांधकामात परस्पर बदल करून व्यावसायिक वापर करणे, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचा गळा घोटून त्यावर मॉलची उभारणी असे अनेक उद्योग राजकीय मंडळींनी प्रत्यक्षात आणूनही पालिकेच्या लेखी ती अनधिकृत बांधकामे नाहीत.
राजकीय वजन वापरून स्थगिती
धुळे शहरात आ. अनिल गोटे यांनी शिवतीर्थच्या वाहनतळाच्या जागेवर आपल्या ‘लोकसंग्राम’ पक्षाचे कार्यालय थाटले आहे. शासकीय जागेवर ‘पांझरा अॅव्हेन्यू’ची उभारणी करताना तिचा व्यावसायिक तत्त्वावर वापर केल्याची तक्रार मध्यंतरी करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने हे अतिक्रमण पाडण्याची नोटीस बजावल्यावर आ. गोटे यांनी राजकीय वजन वापरून शासनाकडून त्यास स्थगिती मिळविली.
शासनाकडूनच अभय!
जळगाव शहरात तर अनधिकृत बांधकामांना खुद्द शासनाकडूनच अभय मिळत असल्याची तक्रार महापालिकेने केली आहे. शहरातील नाथ प्लाझा, जे. टी. चेंबर्स आणि आर. जे. टॉवर्स या बहुचर्चित इमारती पालिकेने अनधिकृत ठरविल्यानंतर त्या पाडण्यासाठी शासनाने स्थगिती दिली. महात्मा गांधी रस्त्यावर बांधण्यात आलेले नाथ प्लाझा हे भव्य व्यापारी संकुल भाजपचे माजी विधान परिषद सदस्य गुरूमुख जगवाणी यांच्याशी संबंधित आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या प्रेमापोटी त्या इमारतीचे नामकरण नाथ प्लाझा असे केले गेल्याचे कार्यकर्ते सांगतात. आर. जे. टॉवर्स ही इमारत माजी नगरसेवक अजय जाधव यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. जाधव हे शिवसेनेचे आ. सुरेश जैन यांचे कट्टर समर्थक आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2013 रोजी प्रकाशित
अनधिकृत बांधकामांची नोंदच नाही!
शहरात किती अनधिकृत बांधकामे आहेत याबद्दल खुद्द नाशिक महापालिकेतील नगररचना विभागच अनभिज्ञ आहे. गेल्या काही वर्षांत तसे सर्वेक्षणच झालेले नाही. दुसरीकडे कर विभागाकडील माहितीनुसार शहरात तीन लाख ५५ हजार ७२० मिळकती आहेत. त्यापैकी थोडय़ाथोडक्या नव्हे तर १३,०७४ मिळकती अनधिकृत असल्याची नोंद आहे.
First published on: 05-05-2013 at 12:07 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik municipal corporation has no record of illegal construction