पत्रकार की चळवळ्या?

मारिया रेसाचा युक्तिवाद आणखी ताणून स्वीकारायचा म्हटला तर आपण एवढे म्हणू शकतो की, फार तर पत्रकार हा ‘तटस्थ चळवळ्या’ असतो

सुधीर पाठक

पत्रकार आणि चळवळ्या या दोघांचा संबंध तसा निकटचा असतो. नेमका पत्रकार व चळवळ्या यांच्यातील सीमारेषा फारच धूसर असते. पत्रकार कधी चळवळ्याच्या रूपात प्रविष्ट झाला हेच उमगत नाही. अगदी श्रीकृष्णाच्या भाषेत सांगायचे तर, ‘न धरी शस्त्र करी सांगेन युक्तीच्या गोष्टी चारी’ अशी अवस्था पत्रकारांची असली पाहिजे. चळवळ्या व्यक्तीत कायम अस्वस्थता असते. तो कृतीपर कारवाई करायला जातो, त्या कारवाईचे काय परिणाम चांगले वाईट होतील. ते भोगायला तयार असतो. कृतीपर चळवळीचा कार्यकर्ता होण्यासाठी, त्या चळवळीचे वैचारिक अधिष्ठान काय आहे याचे चिंतन, मनन करण्याची गरज नसते. उलट अनेकदा हे वैचारिक अधिष्ठान पत्रकाराने पुरविले असते किंवा पुरवावे अशी अपेक्षा असते.

स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याला अनुभव होता की राजकारणात असणारे अनेक नेते हे पत्रकार होते. पत्रकार म्हणून त्यांच्या लेखणीने त्यांनी समाज चेतविला होता, कार्यप्रवण केला होता. महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक किंवा सामाजिक परिवर्तनाचा आग्रह धरणारे गोपाल कृष्ण गोखले, आगरकर हे सर्व जण त्यांच्या स्वातंत्र्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी पत्रकार म्हणून वृत्तपत्र काढते झालेत. महात्मा गांधी यांचा यंग इंडिया, हरिजन लोकमान्यांचा केसरी, मराठा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रबुद्ध भारत यांनी केलेले योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. त्यातील प्रत्येक जण हा चळ्वळीत नेता होता, आघाडीवर राहत होता. त्याची शिक्षाही त्यांनी भोगली आहे. आपण पत्रकार आहोत म्हणून आपल्याला शिक्षा होऊ नये किंवा कमी शिक्षा व्हावी असा युक्तिवादही त्यांच्यापैकी एकानेही कधीच केला नाही. हेतूपूर्ततेचे माध्यम म्हणून त्यांनी पत्रकारितेचा वापर केला.

फक्त पत्रकार म्हणून वावरत चळवळीचा वन्ही चेतविणारे पत्रकारही आपल्याला माहीत आहेत ते प्रत्यक्ष संघर्षांत वा लढय़ात कधीही उतरले नाहीत. संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी झाली. पुढे विदर्भ, मराठवाडय़ासह महाराष्ट्र झाला, पण त्याचा पहिला हुंकार हा बेळगाव साहित्य संमेलनातील पत्रमहर्षी ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या भाषणात होता. त्यांनी आपल्या लेखणीने महाराष्ट्र निर्मितीसाठी खूप मोठय़ा प्रमाणावर वातावरण निर्मिती केली, पण भाऊसाहेब माडखोलकर हे कधीही प्रत्यक्ष चळवळीचे नेते नव्हते, कार्यकर्ता म्हणून कधी वावरले नाहीत. मात्र संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करण्यासाठी वैदर्भीय जनतेचा रोष त्यांनी सहज ओढवून घेतला होता आणि तो स्वीकारला होता. विदर्भाची चळवळ तेव्हा जोमात होती. तरुण भारत व माडखोलकर यांना किती शिव्याशाप त्या वेळी खावे लागत वा तरुण भारताचे अंककिती जाळले गेले? याची माहिती आजच्या पिढीला नसली तरी त्या पिढीला होती. भाऊसाहेब आयुष्यभर पत्रकार राहिल्यामुळेच महाराष्ट्र निर्मितीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आपल्या वृत्तपत्रातून विचारू शकले की ‘हे राज्य मराठय़ांचे की मराठी भाषकांचे?’ त्यांच्याबद्दल चळवळीतील नेत्यांना व सत्ताधाऱ्यांनाही इतका आदर होता की अग्रलेखातून त्यांनी विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर यशवंतराव चव्हाण यांनी विधानसभेत धोरणविषयक सविस्तर निवेदन करून दिले होते.

आचार्य अत्रे यांचे उदाहरण मात्र वेगळे होते, ते पत्रकार तर होतेच, पण चळवळीचे नेतेही होते. मराठा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीची भूमिका बजावू शकला. ‘‘आम्ही हरलो, आम्ही जिंकलो’’ असा मथळा ते देऊ शकले. असे मोठे पत्रकार वगळले तर आपल्याला असाही अनुभव येतो की इकडे चळवळीचे नेतृत्व करायचे. मोर्चा काढायचा आणि त्या मोर्चाला अनिष्ट वळण लागले की कारागृहात जावे लागू नये म्हणून आपण पत्रकार आहोत, मोर्चात मी नव्हतोच, नेतृत्वही माझे नव्हते, मी फक्त वृत्त संकलन करून माझी वृत्तपत्रीय जबाबदारी पार पाडीत होतो अशी भूमिका घ्यायची, असे युक्तिवाद न्यायालयात करायचे. असेही काही नेते बघायला मिळतात!

 पत्रकार की चळवळ्या हा प्रश्न आताच उद्भवण्याची कारण ठरले आहे ते फिलिपिन्सची पत्रकार मारिया रेस्सा हिने काढलेले ‘जर्नालिझम इज अ‍ॅक्टिव्हिझम’- ‘पत्रकारिता हेच चळवळेपण’ तिच्या मुलाखतीची सात मिनिटांची क्लिप समाजमाध्यमांवरही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे त्याची पुनरावृत्ती टाळून एवढेच म्हणता येईल हे विधान पूर्णसत्य नाही फार तर अर्धसत्य म्हणता येईल किंवा सत्याचा एक आयाम म्हणून त्याकडे बघता येईल.

 चळवळीचे वैचारिक अधिष्ठान व चळवळ वाढविण्याचे, पसरवण्याचे माध्यम पत्रकारिता असते, पण पत्रकारितेत प्रत्यक्ष कृती करण्याला कधीही स्थान नसते. मात्र, प्रत्यक्ष कृती केली नसली तरी त्या चळवळीचे परिणाम वा विपरीत परिणाम होतील ते भोगण्याची, त्याचे पितृत्व स्वीकारण्याची तयारी पत्रकाराला ठेवावी लागते. आणीबाणी आठवा. होय तीच आणीबाणी. पत्रकारांनी बसावे, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली असताना पत्रकारांनी शरणागती पत्करली होती. आणीबाणीतील स्वातंत्र्याची गळचेपी होण्याने क्षुब्ध झालेली मंडळी बघायला मिळतात. आपली एका एका पत्रप्रतिष्ठानातील नोकरी त्यागून चळवळ्या होणारा पत्रकारही दि. वि. गोखले यांच्या रूपाने बघायला मिळाला, पण त्याच वेळी त्याच प्रतिष्ठापनात पत्रकार असणाऱ्या व्यक्तीवर बडोदा डायनामाइट प्रकरणात आरोपी होण्याची पाळी आली होती.  पत्रकार ते चळवळ्या हे परिवर्तन कधी कसे झाले हे समजले नाही, असाच काहीसा अनुभव १९९० साली रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळातही आला होता. मुलायमसिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि परिंदा भी पर नही मार पायेगा, अशी दर्पोक्ती त्यांनी केली होती. त्या वेळी चळवळे असणाऱ्या अनेक जणांनी आपण वृत्तपत्र प्रतिनिधी आहोत, अशी ओळखपत्रेही बनविली होती. चळवळ्या मंडळींची ती एक व्यूहरचनाही असू शकते पण पत्रकाराने चळवळ्या होण्याची रचना असू शकत नाही. १९९२ साली बाबरी ढाचा पडला त्या वेळी जे कोणी प्रत्यक्ष कृती करणारे होते त्यात एकही पत्रकार नव्हता. चळवळ्या व्यक्तीला त्याचे उद्दिष्ट प्राप्तीसाठी कोणताही मार्ग निवडता येतो तो उद्दिष्टपूर्तीने भरलेला असतो त्यामुळे सूक्तासूक्त मार्गाची त्याला पर्वा नसते. यश संपादन करण्याची मनीषा त्याच्या वर्तनावर मात करीत असते किंवा त्या ईर्षेने तो भरलेला असतो त्यामुळे त्या घटनेचा सारासार विचार करण्याची, त्याच्या परिणामांचा विचार करण्याची क्षमता त्याने गमावलेली असते किंवा ती क्षमता त्याच्यात हरविली असते. तो चळवल्या भावनोद्रेकात वाहून जातो नव्हे तो त्याचा अंगभूत गुण असतो, याउलट पत्रकार भावनाशून्य नसतो, पण सारासार विचार करण्याची आपली क्षमता कायम ठेवून असतो. काय जनहिताचे, काय देशहिताचे, समाजहिताचे आहे याचा निर्णय घेऊ शकतो. मारिया रेसाचा युक्तिवाद आणखी ताणून स्वीकारायचा म्हटला तर आपण एवढे म्हणू शकतो की, फार तर पत्रकार हा ‘तटस्थ चळवळ्या’ असतो. नक्षलवादी चळवळीत आपण बघतो की चळवळीतील कार्यकर्ता प्रत्यक्ष कृती करणारा वेगळा होता तोवर पोलीस यंत्रणा त्यावर कारवाई करू शकत होती, पण जिथे ‘शहरी माओवादा’वर कारवाई सुरू झाली तिथे समाजातील विचारवंत, साहित्यिक, पत्रकार यांच्यावर अन्याय होतो, अशी भावना सुरू  झाली, ठाम होऊ लागली पण त्यांच्या प्रत्यक्ष कृतीचे पुरावे हाती लागल्यावर ती भावना क्षीण होत गेली आणि मोजक्या समर्थकांत उरली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Philippine journalist maria ressa nobel peace prize winner relationship between journalists and movements zws

Next Story
मनोरी, गोराई आणि उत्तनला ‘निवासी विकासा’ची आस!