‘ अभिव्यक्ती-एक उलट तपासणी’ परिसंवादात वक्त्यांचा सूर
प्रशांत देशमुख
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी, वर्धा : सामाजिक मूल्यांची पडझड समाजमाध्यमांचा प्रभाव वाढवणारी आहे. त्यामुळे या माध्यमांस योग्य वळण देण्याचे काम आव्हानात्मक असल्याचा सूर आजच्या संमेलनातील परिसंवादात उमटला.९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील मनोहर म्हैसाळकर सभागृहाच्या बापुरावजी देशमुख व्यासपीठावर ‘समाज माध्यमांतील अभिव्यक्ती-एक उलट तपासणी’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजमाध्यमे लोकतांत्रिक असली तरी तेवढीच अनियंत्रित आहेत. त्याचा प्रभाव वाढत चालला आहे. हा संक्रमणाचा काळ असून जे उपयुक्त तेच काळाच्या ओघात टिकेल. त्यावर वैचारिक वाचन ओघाओघानेच होत असले तरी ही माध्यमे सामान्य माणसांना जवळची वाटतात. कारण त्याची किल्ली त्यांच्याच हाती असते. लोकतांत्रिक व्यवस्था असल्याने सहज त्यावर प्रदर्शित होता येते. समाजाशी संलग्न असल्याने आपण मागे पडू नये म्हणून सामान्य त्यावर व्यक्त होतात. मुख्य प्रवाहातील माध्यमांपेक्षा ही माध्यमे अब्जावधीने वाढत जाणारी आहेत, असे पांडे यांनी मत व्यक्त केले.
संदीप भारंबे यांनी अन्नाप्रमानेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गरज प्रत्येकाला असते. म्हणून चांगल्या कामासाठी या कामाचा उपयोग केला पाहिजे. केवळ मत व्यक्त करण्याचे साधनच नव्हे तर उदरनिर्वाहाचे साधन म्हणून समाजमाध्यमांचा चलाखीने उपयोग केला जात आहे. अनेकांसाठी ते उत्पन्नाचा एक स्त्रोत ठरत आहे, असे मत व्यक्त केले. सत्ताधाऱ्यांविरोधात भावना व्यक्त करण्यासाठी ते निर्बंध नसलेले एक उपयुक्त व्यासपीठ असल्याचे मत प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केले.
नितीन नायगावकर, रमेश कुलकर्णी यांनीही मत व्यक्त केले. वक्त्यांचे स्वागत संमेलनाचे कार्यवाह डॉ. रवींद्र शोभणे यांनी चरखा व सूतमाला देवून केले.दोन कोटींच्या विनियोगावर लक्ष ठेवण्यासाठी समितीसाहित्य संमेलनासाठी दरवर्षी दोन कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या दोन कोटींचा विनियोग ज्या ठिकाणी संमेलन असेल ते स्थानिक संयोजक योग्यरित्या करतात की नाही, हे पाहण्यासाठी साहित्य महामंडळाकडून एक समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, प्रकाश पागे, मिलिंद जोशी, दादा गोरे यांचा समावेश आहे.
पुढच्या वर्षीच्या संमेलनासाठी पाच निमंत्रणे..
पुढच्या वर्षी होणाऱ्या ९७ व्या साहित्य संमेलनासाठी अंमळनेर, औदुंबर, सांगली, सातारा व जालना येथून निमंत्रणे महामंडळाला प्राप्त झाली आहेत. १५ पर्यंत आणखी काही ठिकाणांहून निमंत्रणे येण्याची शक्यता आहे.
सवलतीच्या दरातील कागदासाठी ठराव..
प्रकाशन व्यवसाय चालवणे मोठी कठीण गोष्ट झाली आहे. कागद खूप महाग झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाशकांना सवलतीच्या दरात कागद मिळावा, यासाठी उद्या संमेलनाच्या समारोपीय सत्रात ठराव मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे.
फडणवीस यांची आज उपस्थिती
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी येथे येणार असून ‘गांधीजी ते विनोबाजी-वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून’ या परिसंवादास आवर्जुन उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री फडणवीस हजर राहणार होते. परंतु, त्यावेळी अन्य महत्त्वाचा कार्यक्रम आल्याने ते सकाळच्या परिसंवादाच्या सत्रात उपस्थित राहतील. सकाळी दहा वाजता आचार्य विनोबा भावे सभामंडपात होत असलेल्या ‘गांधीजी ते विनोबाजी’ या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विनय सहस्त्रबुध्दे आहेत. ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे, रमाकांत खलप, डॉ. प्रशांत धर्माधिकारी, भानू काळे आणि श्रीकांत देशमुख परिसंवादात विचार मांडतील.