जगातील लोकसंख्येची वाढ, त्यातील संक्रमण, त्याची कारणे आणि परिणाम यांचा अद्ययावत असा अभ्यास या पुस्तकातून जाणून घेता येतो. विकसित देशांसाठी सततची वाढती लोकसंख्या काहीशी उपकारक ठरली असली तरी, विकसनशील देशांसाठी मात्र ती लोकशाहीसारख्या शासनप्रणालीवरच अरिष्ट ठरू पाहत आहे.  
विसाव्या शतकात जगाच्या लोकसंख्येत विशेष लक्षणीय वाढ झाली. १९३०मध्ये जगाची लोकसंख्या अवघी दोन अब्ज होती आणि शतकाअखेरीस ती सहा अब्ज झाली. म्हणजे तिप्पट वाढ झाली. जगातल्या विकसित व विकसनशील देशांत लोकसंख्यावाढ अनेक संक्रमणावस्थेमधून झाली आहे.
‘पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट – द डेमोग्रॅफिक ट्रान्झिशन’ या लोकसंख्याविषयक पुस्तकाचे लेखक टॉम डायसन ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या विख्यात संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करतात. मुंबईतील ‘इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस’मध्ये ते व्हीजिटिंग प्राध्यापक आहेत. लोकसंख्येतील संक्रमणाने आधुनिक जगाच्या निर्मितीत मूलभूत भूमिका बजावली आहे आणि ही वस्तुस्थिती सर्वसाधारणपणे दुर्लक्षित झाली आहे, असा डायसनचा दावा आहे. लोकसंख्याशास्त्रज्ञ संक्रमणाच्या सुटय़ा बाबीकडे प्रामुख्याने आपले लक्ष केंद्रित करतात. उदाहरणार्थ प्रजोत्पादन.
डायसन शहरीकरणाकडे फारसे लक्ष देत नाहीत. आर्थिक वृद्धीमुळे लोकसंख्येचे संक्रमण होत असते असे मानले जात होते, पण प्रस्तुत पुस्तकात हे खरे नाही असा दावा केला आहे. विद्यमान आर्थिक परिस्थितीच्या बाहेर स्वतंत्रपणे ते संक्रमण घडत असते. लोकसंख्येच्या संक्रमणामुळे विकासाचा अभ्यास करण्यासाठी एक सुयोग्य चौकट निर्माण होते. डायसनने या पुस्तकात चार विभागांतील आठ प्रकरणांमधून लोकसंख्या व विकासाचे विवेचन, विश्लेषण केले आहे. जन्मप्रमाण, मृत्युप्रमाण हे संक्रमण घडवणारे दोन महत्त्वाचे घटक आहेत. मृत्युप्रमाणात घट झाली, की जनसामान्य भविष्याचा गंभीरपणे विचार करतात. मृत्युसापेक्षपणे ही दूरची घटना वाटते. परिस्थिती स्थिर होत जाते आणि जनता वाढत्या प्रमाणात बचतीचा व गुंतवणुकीचा विचार करते. संक्रमणामुळे शिक्षणाचे महत्त्व वाढते आणि कुटुंब संस्थेत बदल व्हायला मदत होते.
लोकसंख्याशास्त्राचे बलस्थान हे आहे, की फार मोठय़ा लोकसंख्येसाठी व काही दशकांच्या काळासाठी लोकसंख्येसंबंधी सापेक्षाने काही निश्चित भाकिते करता येतात.
लोकसंख्या संक्रमण मूलारंभ, सक्रिय परिणाम यांची माहिती, विवेचन प्रतिपादन करताना आकृत्या दिल्या आहेत. स्वीडनची लोकसंख्या १८०० मध्ये २३ लक्ष होती आणि १९८० मध्ये होती ८३ लक्ष. १८०० मध्ये फक्त १० टक्के लोकसंख्या मोठय़ा गावात राहत होती, पण १९८० मध्ये ८३ टक्के शहरांत, मोठय़ा गावांत राहणारी होती. श्रीलंकेतील संक्रमण स्वीडनच्या संक्रमणानंतर अंदाजे १०० वर्षांनंतर झाले. ते अद्याप पुरे झालेले नाही. श्रीलंकेतील जन्मप्रमाण व मृत्युप्रमाणात प्रचंड घट झाली आहे. संक्रमणाची पहिली मोठी प्रक्रिया म्हणजे १८व्या शतकाच्या उत्तरार्धात वायव्य युरोपातील देशांमध्ये मृत्युदरात घट होऊ लागली. भारत व चीनसारख्या फार मोठय़ा लोकसंख्येच्या देशांसहित काही विकसनशील देशांतही संक्रमणामुळे लोकसंख्येत वाढ होणार आहे.
सर्व संक्रमणांमध्ये मूलभूत अनुक्रमांमध्ये काही साम्य, सारखेपणा दिसून येतो. संक्रमणपूर्व परिस्थितीत बहुसंख्य आई-वडिलांना खूप कमी मुलांचे संगोपन करावे लागते. जन्मप्रमाण खूप अधिक होते, तसेच मृत्युप्रमाणही अधिकच होते. विश्व लोकसंख्या आणि संक्रमण यासंबंधी माहिती व विवेचन करताना जगातील काही देशांची लोकसंख्येची स्थिती कशी असेल हे विस्ताराने मांडले आहे. उदाहरणार्थ, आफ्रिकेची लोकसंख्या २०१०मध्ये ८२ कोटी, म्हणजे एकूण विश्व लोकसंख्येच्या १२ टक्के होती. जन्मदर दर हजारी ३९ असल्यामुळे लोकसंख्यावाढ २०१२ मध्ये २.९ टक्के झाली. मध्यपूर्वेतील मृत्युदर इतका कमी आहे की तो आणखी कमी होणे कठीण आहे.
आग्नेय आशियातील इंडोनेशिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम हे अधिक लोकसंख्येचे देश आहेत. हा विभाग लोकसंख्येबाबत अधिक प्रगत आहे. अंदाजे ४८ टक्के लोकसंख्या शहरी भागात राहत आहे. २०१०मध्ये पूर्व आशियाची लोकसंख्या १.५६ अब्ज होती. यामध्ये ८७ टक्के लोकसंख्या चीनची होती. जपानची लोकसंख्या अवघे आठ टक्के. पूर्व आशियातील चीन व जपान हे दोन देश लोकसंख्या संक्रमणाची दोन चांगली उदाहरणे आहेत. चीनच्या आकारामुळे तेथील संक्रमण जलद वाढीचे आहे. १९५०-५३ मध्ये चीनचे सरासरी आयुर्मान होते ४० व एकूण प्रजोत्पादन दर होता ६.२. लोकसंख्या वाढत आहे दर वर्षी ०.६ टक्के दराने.
संक्रमणाचे सामाजिक-मानसिक परिणाम लोकसंख्येवर होत असतात. मृत्युदरात घट झाल्यामुळे भविष्याबद्दल उदंड विश्वास निर्माण होतो. ज्या परिस्थितीत जनसामान्य जन्माला येतात व त्यांची जडणघडण होते ती परिस्थिती अधिकाधिक सुरक्षित होत असते. म्हणून व्यक्ती आपल्या दूरवरच्या भविष्याबद्दल, स्थैर्याबद्दल अधिक विचार करतात व व्यावहारिक, वास्तव योजना असतात. वृत्ती-प्रवृत्तीमधील व अपेक्षांतील बदल संथपणे होतात. संक्रमणामुळे समाजात विवाहास असलेले महत्त्व कमी होत असते. प्रजोत्पादनात घट झाल्यामुळे स्त्रियांच्या स्वायत्ततेत वाढ होते व त्यांची आयुष्ये पुरुषांसारखी अधिक होतात. स्त्री-पुरुष भेदभाव कमी होताना दिसतात. नागरीकरण व नागरी वाढ होण्यास संक्रमणाचा प्रभाव खूप असतो. त्यामुळे सामाजिक परिणामही दिसून येतात. या सामाजिक गुंतागुंतीचा परिणाम आर्थिक व राजकीय होत असतात. मृत्युदरात घट झाल्यामुळे जनसामान्यांत आर्थिक उत्पादन क्षमतेत आरोग्य सुधारणाचा परिणाम दिसून येतो. संसर्ग जन्म विकारामुळे होत असलेले मृत्यू कमी होतात.
लोकसंख्या संक्रमण व लोकशाही संक्रमण यांच्या संबंधाविषयी डायसनननी फारसे लिहिले नाही. त्याचे अंशत: कारण असे आहे, की दोनही संक्रमणे युरोप व उत्तर अमेरिकेत साधारणपणे एकाच काळात झाली. अनेक विकसनशील देशांमध्ये शासन व प्रशासन पद्धतीत वाढत्या लोकसंख्येस सामावून घेण्यासाठी अनेक बदल करावे लागले. नैसर्गिक लोकसंख्या वाढीमुळे लोकशाहीकरणावर अयोग्य, वाईट प्रभाव झाला आहे. त्यामुळे निरनिराळे वांशिक व धार्मिक संघर्ष होण्यास मदत झाली आहे. आंतरराष्ट्रीय निरनिराळ्या अभ्यासांतून व माहितीवरून अभ्यासाअंती असे दिसून आले आहे की, लोकसंख्यावाढीमुळे लोकशाही शासनप्रणालीवर अनिष्ट परिणाम होत आहे. त्याचे भयावह परिणाम भविष्यात होण्याची शक्यता आहे. म्हणूनच तर लोकसंख्येच्या धोक्याची पूर्वसूचना जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे.

पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट –
द डेमोग्रॅफिक ट्रान्झिशन : टॉम डायसन,
रावत पब्लिकेशन्स, जयपूर,
पाने : २६८, किंमत : ६९५ रुपये.