|| पंकज घाटे

अंदमानहून १९२१ साली वि. दा. सावरकरांना रत्नागिरीत आणण्यात आलं. पुढे सावरकरांच्या पुढाकारानं ज्या सुधारणा झाल्या, त्यांची पायाभरणी इथल्या कारागृहात शंभर वर्षांपूर्वी झाली होती. त्याचा वेध घेणारा हा विशेष लेख…

Inadequate Public Relations, Misconduct to office bearers , lead to cut the ticket, Mumbai bjp members of parliament, gopal Shetty, Poonam Mahajan, manoj kotak, lok sabha 2024, north Mumbai lok sabha seat, Mumbai north central lok sabha seat, north east Mumbai lok sabha seat, marathi news, bjp Mumbai, Mumbai news,
जनता व कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन मुंबईतील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवले
Amol Kolhe, mic, Bhosari Constituency,
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
dhule marathi news, dr subhash bhamre marathi news
मंत्र्यांसमोर भाजपचे उमेदवार डाॅ. सुभाष भामरेंविषयी नाराजी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्यात कार्यकर्ते संतप्त

 

वि. दा. सावरकर आणि रत्नागिरी यांचं एक विशेष नातं आहे. १९२१ साली अंदमानहून त्यांना रत्नागिरीच्या कारागृहात आणण्यात आलं. यंदा या घटनेला शंभर वर्षं पूर्ण होताहेत. इथून १९२३ साली येरवडा तुरुंगात सावरकरांची रवानगी झाली. पुढे १९२४ साली क्रांतिकारक सावरकरांना राजकारणात भाग न घेण्याची तसेच जिल्हा न सोडण्याची अट लादून ब्रिटिश सरकारनं रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवलं. १९३७ मध्ये त्यांची यातून मुक्तता झाली.

रत्नागिरीत आणल्यानंतर पहिला महिना सावरकरांना अत्यंत दु:सह स्थितीत घालवावा लागला. त्यांच्या मनात आत्मघाताचे विचार येऊन गेले. एका रात्री आयुष्याच्या इतिकर्तव्यतेची रूपरेखा स्पष्ट एकाग्रपणे आखून नव्या जीवनक्रमाला सुरुवात करण्याचा निर्धार त्यांनी मनोमन केला. सावरकरांच्या आयुष्याचा पुढचा टप्पा खरं तर इथूनच सुरू होतो. दोनेक महिन्यांत कारागृहात रुळल्यानंतर तिथे त्यांनी हिंदू शुद्धी चळवळीला सुरुवात केली. पुढे रत्नागिरीत सावरकरांच्या पुढाकाराने ज्या सुधारणा झाल्या, त्याची पायाभरणी इथल्या कारागृहात शंभर वर्षांपूर्वी झाली.

अर्थात, १९२४ सालानंतर जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी नसल्यामुळे ब्रिटिश काळातला रत्नागिरी जिल्हा (सध्याचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा) हेच सावरकरांचं कार्यक्षेत्र झालं. या पर्वात त्यांनी हिंदू संघटन, धर्म-भाषा-लिपी यांची शुद्धी चळवळ, अस्पृश्यता निवारण, अस्पृश्यांचा देवालय प्रवेश, पतितपावन मंदिराचा प्रयोग, स्त्रियांची तसेच जात्युच्छेदक सहभोजने, स्पृश्यास्पृश्य मुलांना शाळेत सरमिसळ बसवण्याची चळवळ, स्वदेशी अशा अनेक चळवळी केल्या. तसेच त्यांनी इथल्या वास्तव्यात ‘हिंदुपदपादशाही’, ‘मोपल्यांचे बंड’, ‘भाषाशुद्धी’, ‘माझी जन्मठेप’, ‘विज्ञाननिष्ठ निबंध’, ‘हिंदुत्व’ यांसारखे ग्रंथ, ‘गोमांतक’, ‘सप्तर्षी’, ‘रानफुले’ हे कवितासंग्रह, तसेच ‘उ:शाप’, ‘संन्यस्त खड्ग’, ‘उत्तरक्रिया’ ही पूर्ण आणि ‘बोधिवृक्ष’ हे अपूर्ण नाटक लिहिलं. याशिवाय त्या वेळच्या आघाडीच्या आणि स्थानिक नियतकालिकांतूनही ते अखंड लिहीत होते.

सावरकरांच्या आधी भारतात शतकभरापासून अनेक सामाजिक बदल होत होते. सावरकरांचा समाजसुधारणांचा मार्ग यातूनच निर्माण झाला. ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज यांसारख्या सुधारणावादी पंथांनी सर्व धर्मांतील चांगली तत्त्वं एकत्र आणून आपला नवा पंथ रूढ केला. काही बाबतींत सत्यशोधक समाजाचा अपवाद वगळल्यास, या प्रकारची बहुतांश समाजसुधारकांची कामं उच्चवर्णीय हिंदूंच्या सामाजिक सुधारणांच्या पलीकडे गेलेली नव्हती. अस्पृश्यांचा प्रश्न भोवती काय चाललं आहे ते बघून कळत असला, तरी त्यास हात घालण्याचं धैर्य यायला विसावं शतक उजाडावं लागलं.

विसावं शतक सुरू झाल्यावर विठ्ठल रामजी शिंदेंसारखे सुधारक मानवतावादी दृष्टीनं अस्पृश्यांच्या प्रश्नाला हात घालू लागले. त्यातूनच बहुसंख्य हिंदूंपासून फटकून न राहता, ब्राह्मो समाजासारखी स्वत:ची वेगळी चूल मांडून सुधारणा न करता अस्पृश्यांच्या प्रश्नाकडे अभिजन वर्ग पाहायला लागला. श्री. म. माटेंसारखे सुधारक तर अशा रीतीने स्वतंत्र आणि तुसडा पंथ न स्थापन करता, समाजाच्या पोटी राहूनच या प्रश्नाची सोडवणूक करता येईल, असे विचार मांडू लागले. त्याच वेळी टिळकांसारखे पुढारीही या प्रश्नाच्या सोडवणुकीला अनुकूल होऊ लागलेले दिसत होते. पुढचा राजकीय खेळ संख्येच्या बळावरच रंगणार हे चित्र दिसू लागल्यावर अभिजन पुढारी राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी समाजसुधारणांना पाठिंबा देऊ लागले, हे तोवर स्पष्ट दिसायला लागलं.

सावरकर अंदमानात गेले तेव्हाच्या आणि ते सुटून आले तेव्हाच्या परिस्थितीत मोठा फरक पडला होता. एके काळी क्रांतिकारकांच्या मोठ्या उलाढाली होणाऱ्या महाराष्ट्रात टिळकयुग संपून गांधीयुग सुरू झालं होतं. ज्यांचा सावरकरांवर मोठा प्रभाव होता ते शि. म. परांजपे, क्रांतिकार्यातील सहकारी सेनापती बापट यांच्यासारखी मंडळी गांधीमार्गाकडे झुकली होती. गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिल्यामुळे हिंदू-मुस्लीम प्रश्नाचं चक्रच उलटं फिरलं. महाराष्ट्रात स्वातंत्र्य चळवळ नवी उभारी घेत असताना, केवळ ब्राह्मण-ब्राह्मणेतरच नव्हे, तर ब्राह्मणेतरांमध्ये मराठा-मराठेतर वाद सुरू झाला.

विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात मुसलमानांचे राजकीय अस्तित्व मान्य करणाऱ्या काँग्रेससह अन्य पक्षांना अस्पृश्य वर्गाच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागली. काँग्रेस-लीग यांच्यात लखनौ येथे कराराला मान्यता मिळवण्यासाठी अस्पृश्य वर्गाचं साहाय्य मिळवणं काँग्रेसला आवश्यक वाटू लागलं. होमरुल चळवळ आणि माँटेग्यू घोषणा यांमुळे राजकीय परिस्थिती झपाट्यानं बदलली.

१९१९ सालच्या माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणांच्या अनुषंगाने नेमलेल्या साऊथबरो समितीसमोर विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष झाली. अस्पृश्यांनीच अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व करावं, यावर आंबेडकरांचा भर होता. यानंतर महाराष्ट्रात अस्पृश्यांच्या परिषदा घेण्याची रीघ लागली. याचबरोबर सहभोजन आणि मंदिर प्रवेशाच्या चळवळीही सुरू झाल्या.

या सर्व घडामोडी चालू असताना अस्पृश्य अस्मिता जागृत होऊन तिला नवे अंकुर फुटले. आजवर वर्चस्व मिळवण्याच्या या खेळातला हा भिडू सर्वार्थानं बहिष्कृतच होता. आपली सामाजिक किंमत कमी मानण्यात येत असली, तरी राजकीय किंमत मात्र अधिक आहे, ही जाणीव अस्पृश्य नेत्यांना झाली; तसेच ती वाढावी यासाठीही त्यांचा प्रयत्न सुरू झाला. चळवळीची वाटचाल जसजशी होऊ लागली तसे हे संघर्ष उफाळून आले. ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध या मुद्द्यावर ब्राह्मणेतर आणि अस्पृश्य एकत्र येत असले, तरी त्यांच्यात संघर्ष होऊ शकतो ही जाणीव डॉ. आंबेडकरांना होती. त्यामुळे त्यांचा मार्ग वेगळा झाला.

अस्पृश्यांच्या उद्धारासाठी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, सावरकर, माटे यांच्यासारख्या सवर्ण हिंदूंनी चालवलेल्या चळवळीविषयी आंबेडकर साशंक आणि उदासीन असत. त्यांची रणनीती आणि डावपेच आंबेडकरांना कधीच पसंत पडले नाहीत. त्यांचा अशा प्रयत्नांना मुळातूनच विरोध होता. असे मतभेद असल्याने या सुधारकांनी अस्पृश्योद्धारासाठी- एखादा अपवाद वगळल्यास- एकत्र येऊन काम केल्याचं दिसत नाही. याउलट, अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींचं नेतृत्व आपल्या हाती न घेता त्या समाजातील व्यक्तींनीच पुढे येऊन नेतृत्व केलं पाहिजे, अशी दृष्टी बाळगणाऱ्या छत्रपती शाहूंना आंबेडकरांनी ‘अस्पृश्यांचा सर्वोत्तम मित्र’ असं म्हटलं आहे. छत्रपती शाहूंनी अशा नेतृत्वाला आपल्या परीनं सर्वतोपरी साहाय्य केलं. महात्मा गांधींचा कल स्पृश्य हिंदूंच्या अंत:करणातील सद्भावना आणि भूतदया जागृत करण्याकडे होता. याचा तोंडवळा मानवतावादी असला, तरी अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे गांधी सामाजिक दृष्टीनं पाहण्यापेक्षा सनातनी सुधारकाच्या भूतदयेनं पाहात. अस्पृश्यता निवारण हा गांधींच्या दृष्टीनं व्यक्तिगत प्रश्न होता, तो काँग्रेसचा सर्वमान्य कार्यक्रम नव्हता.

याउलट, सावरकरांची भूमिका हिंदुराष्ट्रवादी सुधारकाची होती. संघटना व समतेच्या पायावर जातीविहीन हिंदू समाज निर्माण करून एकसंध सामर्थ्यशाली हिंदुराष्ट्र उभारण्याचं त्यांचं ध्येय होतं. अस्पृश्यतेच्या प्रथेमुळे हिंदू समाजात फूट पडून तो दुबळा बनतो, त्यामुळे अस्पृश्यतेचं उच्चाटन करणं सावरकरांना एकजिनसी हिंदुराष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक वाटत होतं. त्यांच्या प्रचाराचा भर हिंदूंची भावना, बुद्धी जागृत करण्याकडे होता. त्याचप्रमाणे अस्पृश्यांच्या धर्मांतराला त्यांनी जमेल तितका विरोध केला आणि परधर्मात गेलेल्यांना स्वधर्मात पुन्हा आणण्यासाठी शुद्धी चळवळीसारखे उपक्रम हाती घेतले. सनातनी, परंपरावादी हिंदूंच्या ढोंगी वृत्तीवर कोरडे ओढणे आणि परधर्मी प्रचारकांना तोडीस तोड उत्तर देणं, असं त्यांचं धोरण असे. वरवर सामाजिक दिसणारी ती चळवळ मुख्यत: राजकीय होती.

आंबेडकरांची भूमिका यापेक्षा मुळातच वेगळी होती. आंबेडकरांना अस्पृश्यांच्या दु:ख-दारिद्र्याच्या दुष्टचक्राला भेदून त्यास वाचा फोडायची होती. स्पृश्य हिंदूंच्या भूतदयेचा ते तिरस्कार करत. त्यांना दयेपेक्षा हक्क हवे होते. आंबेडकरांच्या चळवळीचं कार्य मुख्यत: स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मोद्धार या सूत्रांवर चाललं. स्पृश्य हिंदूंशी समतेचा लढा उभा करताना ब्रिटिश सरकारकडून मिळतील ते हक्क पदरात पाडून घेण्याचं त्यांचं धोरण होतं.

हिंदू धर्माच्या विशिष्ट रचनेमुळे व जातिव्यवस्था व्यवसायांशी म्हणजे आर्थिक व्यवहाराशी जोडल्याने धर्मांतर हा पेच होऊन बसला होता. जातीच्या उतरंडीतील निम्नस्तरीय जाती व अस्पृश्य यांनी लक्षणीय संख्येत इस्लाम व ख्रिश्चन धर्म स्वीकारले. अशा जातींना मुळात चिकटलेले व्यवसाय सोडता आले नाहीत तसेच त्यांचं नव्या धर्मातलं स्थान दुय्यम स्वरूपाचंच राहिलं. तर हिंदू धर्मात राहिलेल्या अस्पृश्यांना लाथा घालायच्या आणि ख्रिस्ती किंवा मुसलमान झालेल्या अस्पृश्यांशी ‘शेकहँड’ करायचा, अशी हिंदूंची मनोवृत्ती राहिली. याबद्दल सावरकरांनी वारंवार तीव्र नापसंती व्यक्त केली होती.

१९-२० मे १९२९ मध्ये मालवण येथे अस्पृश्यांची शिक्षण परिषद भरली होती. परिषदेचे नियोजित अध्यक्ष डॉ. आंबेडकर होते. परंतु मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपामुळे त्यांना मालवणला जाणं अशक्य झालं. संयोजकांनी सावरकरांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली व ती त्यांनी मान्य केली. अशा स्थानिक परिषदांचे आयोजक पुष्कळदा अशा पुढाऱ्यांच्या जातींचा भेद न करता- ते आंबेडकर असो वा सावरकर- त्यांना आवर्जून बोलावत असत.

ब्रिटिशांनी मुस्लिमांना जितकं झुकतं माप दिलं तितकं अस्पृश्यांना दिलं नाही. हे दोन्ही वर्ग काँग्रेसला हिंदूंची प्रातिनिधिक संस्था मानत होते. काँग्रेसनं मात्र यांमुळे निर्माण होणारे राजकीय-सामाजिक प्रश्न अंतर्गत समस्या मानून त्या आपापसात सोडवता येतील असा पवित्रा घेतला. मुस्लीम लीग जशी भारतातील मुसलमानांची प्रातिनिधिक व वजनदार संस्था होती; तशी ब्राह्मणेतर व अस्पृश्यांची अखिल भारतीय संघटना नव्हती. किंबहुना ब्राह्मणेतर चळवळीचे केंद्र आणि पसारा महाराष्ट्रातच होता. आंबेडकर आणि अस्पृश्यांचे तगडे संघटन हा महाराष्ट्रापुरता अपवाद वगळल्यास, अन्यत्र अस्पृश्यांची शक्ती खूपच क्षीण होती. ब्राह्मणेतर पक्षाचा उदय, वाढ व १९३० च्या आसपास आलेलं अपयश ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक विशेष घटना. उच्चवर्णीयांविरुद्ध ब्राह्मणेतरांनी चालवलेल्या झगड्यात दलितांची सहानुभूती बहुजन समाजाच्या बाजूची असली, तरी डॉ. आंबेडकरांनी दलितांची पक्ष संघटना ब्राह्मणेतर पक्षात कधी विलीन केली नाही.

गांधी आणि आंबेडकर यांच्यातील पुणे करारानंतर अस्पृश्योद्धाराच्या चळवळीत मंदिरप्रवेश, पाणवठे खुले करणे आणि सहभोजनांची नवी लाट निघाली. काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश द्यावा म्हणून स्थानबद्ध असलेल्या सावरकरांनी नाशिककरांना अनावृत पत्र लिहिलं. रत्नागिरीत भागोजी शेठ कीरांच्या मदतीनं पतितपावन मंदिरही उभं राहिलं. जेव्हा या मंदिराची कोनशिला बसवली गेली त्या वेळी ‘बहिष्कृत भारत’मध्ये याविषयी एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात कीरांनी आपला पैसा अशा प्रकारे खर्च करण्याऐवजी अस्पृश्य वर्गातील लोकांच्या शिक्षणासाठी व अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीत खर्च केला असता तर तो सत्कारणी लागला असता, असा अभिप्राय दिला होता. बहिष्कृत वर्गास खास देवळांची जरुरी नाही; उलट अशी देवळे बांधल्याने अस्पृश्यतेचा प्रश्न सुटणे अधिक लांबणीवर पडेल; अस्पृश्यांसाठी खास देवळं बांधली तरी स्पृश्य व अस्पृश्य यांच्यातली भेदरेषा कायम होईल, अशी त्यांची भूमिका होती.

अस्पृश्यांकडे ज्या दृष्टीनं स्पृश्य वा अभिजन सुधारक पाहत होते, त्या दृष्टीच्या आणि त्यांच्या मार्गाच्या मर्यादा अस्पृश्य पुढाऱ्यांना जाणवत होत्या. आंबेडकरांना या प्रश्नावर जितका पाठिंबा मिळाला तितका शिंदे, गांधी, माटे आणि सावरकरांना का मिळू शकला नाही, असा प्रश्न इथे उपस्थित होतो.

सावरकरांचं व्यक्तित्व, लेखन, वक्तृत्व आणि तत्त्वज्ञान कितीही आकर्षक असलं; तरी बहुसंख्य हिंदू त्यांच्यापाठी न जाता काँग्रेसकडे वळले. सावरकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे नानाविध उपक्रम हाती घेतले त्या उपक्रमांना त्यांच्या सर्वच अनुयायांनी पाठिंबा दिला नाही. ‘भाला’कार भोपटकरांनी तर आंबेडकर आणि सावरकर या दोघांनाही अस्पृश्यांचे ‘खरे शत्रू’ म्हणून जाहीर केलं होतं! ‘धर्मवीर’ म्हणून ओळखले जाणारे विश्वासराव डावरे व दामुअण्णा चंद्रात्रे यांच्यासारख्या अनुयायांनी मुसलमानांविरुद्ध सावरकरांनी चालवलेल्या मोहिमेत त्यांना निष्ठेनं साथ दिली, मात्र अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात सावरकरांसह यायला ते तयार नव्हते.

ब्राह्मणेतर समाज जागृत होऊन राजकारणात महत्त्वाचा भिडू झाला. अस्पृश्यांची वाटचालही त्याच दिशेनं होऊ लागली. या समूहांनी शेकडो वर्षं अन्याय सहन केला, ते अनेक संघर्षांत टिकून राहिले; पण कधीही सामूहिक बलिदानाचा वा क्रांतीचा मार्ग त्यांनी स्वीकारला नाही. पुढे डॉ. आंबेडकरांच्या चळवळीनं धरलेला जोर आणि मनुस्मृती दहन, चवदार तळ्याचा सत्याग्रह, मंदिरप्रवेशाचा संघर्ष व संभाव्य धर्मांतराची घोषणा यामुळे अस्पृश्योद्धाराचे सर्व संदर्भ बदलले.

आंबेडकरांच्या हिंदू धर्म सोडून बाहेर पडण्याच्या आग्रहाला माटे, सावरकर आणि गांधी या तिघांनीही विरोध केला. अस्पृश्य हे हिंदूच आहेत आणि हिंदूच राहिले पाहिजेत याबाबत त्यांच्यात एकवाक्यता होती. मात्र, आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करून अस्पृश्यांना समान नागरिक म्हणून मान्यता मिळवण्याच्या त्यांच्या भूमिकेला मोठा पाठिंबा मिळू लागला. १९४७ मध्ये साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश द्यावा यासाठी उपोषण केलं. त्या वेळी मंदिरप्रवेशाची चळवळ करूनही आंबेडकरांनी- ती चूक होती आणि ती नंतर मला कळून आल्याचं म्हटलं. मानवी हक्कांच्या संदर्भात अशा तऱ्हेच्या झगड्यांमध्ये काही तथ्य नाही अशी त्यांची खात्री झाली होती.

या सगळ्याला तत्कालीन जागतिक पार्श्वभूमीचाही संदर्भ आहे. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांमुळे जगाच्या रचनेत, त्याहीपेक्षा आर्थिक स्थितीत वेगानं बदल झाले. ब्रिटिशांनी भारत सोडण्याची, सत्तांतराची प्रक्रिया गतिमान झाली. निरनिराळ्या समाजगटांची बदललेली आर्थिक स्थिती, या गटांची मिळेल त्या मार्गानं समाजावर प्रभुत्व मिळवण्याची अथवा टिकवण्याची धडपड, त्यांच्यात निर्माण झालेल्या नव्या अस्मिता अशा गोष्टी या समाजसुधारणा मार्गांच्या मुळाशी आहेत. परंतु सहिष्णू, सर्व काही गिळून पचवून टाकण्याची असामान्य ताकद असलेल्या हिंदू मनाची टोकदार वृत्ती बोथट करण्याचा सावरकरांनी आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न केला. रत्नागिरीतल्या स्थानबद्धतेत त्यांना मर्यादित यशही मिळालं. पण ते मन पूर्णत: बदलणं त्यांच्या ताकदीबाहेरचं होतं.

(लेखक इतिहासाचे अध्यापन करतात.)

pankajghate89@gmail.com