scorecardresearch

विज्ञानाचे पंख करू!

कराडच्या मध्यवर्ती ठिकाणी दीड दशकापूर्वी  डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र उभे राहिले. ‘स्वप्नात रमणे सुरू झाले की ती प्रत्यक्षात उतरवण्याची ऊर्जाही आपल्यात येते’, या विश्वासातून विज्ञान शिक्षक डॉ. संजय पुजारी यांनी ते सुरू केले.

विज्ञानाचे पंख करू!
डॉ. संजय पुजारी यांच्यासह विज्ञान प्रयोगात रममाण झालेले विद्यार्थी.

विजय पाटील

कराडच्या मध्यवर्ती ठिकाणी दीड दशकापूर्वी  डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र उभे राहिले. ‘स्वप्नात रमणे सुरू झाले की ती प्रत्यक्षात उतरवण्याची ऊर्जाही आपल्यात येते’, या विश्वासातून विज्ञान शिक्षक डॉ. संजय पुजारी यांनी ते सुरू केले. तिथे पाऊल ठेवताच ‘विज्ञानाचे पंख करू’, या प्रेरणागीताचा प्रत्यय येतो.

विज्ञानावरची पुस्तके वाचतंय, कुणी विज्ञानविषयक चित्रपट पाहतंय, कुणी दुर्बिणीतून दूरचे जग न्याहाळतंय, कुणी विज्ञानातील प्रयोग हाताळतंय, कुणी अगदी त्या अवकाशातील ग्रहगोल ताऱ्यांमध्ये रमलेलंय..जोडीला पुन्हा अनेक प्रश्न, कुतूहल आणि अथांग जिज्ञासा. हे दृश्य पुण्या-मुंबईतील कुठल्या शाळा-प्रयोगशाळेतील नाही, तर कराडसारख्या तालुक्याच्या ठिकाणचे आहे. डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र या संस्थेत कायम दिसणारे हे दृश्य.

विज्ञान हा विषय पुस्तकातून शिकण्यासारखा नाही. प्रत्यक्ष अनुभवावर आधारित कुठलीही गोष्ट शिकल्यास, त्यातही विज्ञानासारखी किचकट गोष्ट कुणी समजून सांगितली तर ती आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरते. हीच बाब लक्षात घेऊन कराडमधील विज्ञानाचे  शिक्षक डॉ. संजय पुजारी यांनी १ जुलै २००६ रोजी या केंद्राची स्थापना केली. भारताची पहिली महिला अंतराळवीर डॉ. कल्पना चावला यांच्यातील विज्ञान असोशीचा विचार करत तिचेच नाव या केंद्राला देण्यात आले. त्याचे उद्घाटन कल्पनाचे वडील बनारसीलाल चावला यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी हरियाणातील कर्नालहून येथे आलेले चावला संस्थेच्या प्रेमातून पुढेही वरचेवर इथे येत राहिले आहेत. कल्पनाची बहीण सुनीता चौधरी यांनी डॉ. कल्पना चावला यांच्या संग्रहातील काही पुस्तके या केंद्राला भेट दिली आहेत.

ज्ञानयोगी होऊन आम्ही, विज्ञानाचे पंख करू

तारे सारे मोजून येऊ, सूर्यालाही थक्क करू

अष्टग्रहांना जिंकून घेऊ, भव्य ही संकल्पना

आदर्श आहे कल्पना, अन् प्रेरणा ती कल्पना

असे प्रेरणागीत असलेले डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र म्हणजे विज्ञानावरची चालतीबोलती प्रयोगशाळा आहे. कराडच्या मध्यवर्ती ठिकाणी ही संस्था आहे. साधारण दोन हजार चौरस फुटांच्या या जागेत विज्ञानातील विविध प्रयोग, ते सांगणाऱ्या वस्तू, विज्ञान खेळणी, पुस्तके मांडलेली आहेत.

डॉ. पुजारी या साऱ्यामागचे प्रेरणास्रोत. कराडच्या शिक्षण मंडळाचे विज्ञान शिक्षक म्हणून ते नुकतेच सेवानिवृत्त झाले; परंतु त्याच्याआधी किती तरी वर्षांपासून त्यांनी हे विज्ञानकार्य सुरू केले. ‘प्रत्येकाने मोठी, भव्य स्वप्नं पाहावीत. स्वप्नात रमणे सुरू झाले, की ती प्रत्यक्षात उतरवण्याची ऊर्जाही स्वाभाविकपणे आपल्यात येते,’ असा विचार ते मांडतात. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विकसित, महासत्ताक भारताचे स्वप्न आणि अंतराळवीरांगना डॉ. कल्पना चावला यांच्या प्रेरणेतून डॉ.  पुजारी यांनी आपले आयुष्य विज्ञान प्रसारासाठी वेचण्याचा निश्चय केला.  यातूनच या विज्ञान केंद्राची कल्पना पुढे आली.

दर रविवारी आणि एरवीच्या छोटय़ा-मोठय़ा सुटीच्या काळात हे केंद्र सुरू असते. या काळात परिसरातील मुले इथे येतात आणि विज्ञानातील अनेक क्लिष्ट गोष्टी समजून घेतात. यासाठी शुल्क म्हणाल तर ते ऐच्छिक आहे. मुलांना विज्ञानप्रेमी बनवून त्यांच्यातील जिज्ञासूपणाला चालना देणे आणि विज्ञानवादी बनवण्याचा प्रत्यक्ष अनुभवही देणे हे संस्थेचे मुख्य काम. महाराष्ट्रभरातूनही वैयक्तिकरीत्या येथे अनेक जण येतात. विज्ञान सहली येतात. धमाल गाणी, विज्ञानावर आधारित जादूचे प्रयोग, पपेट शो आणि विज्ञानाचे असंख्य प्रयोग यांचा समावेश असलेली पाच तासांची विज्ञान सहल हे तर इथले खास वैशिष्टय़.

या केंद्रात विज्ञान व तंत्रज्ञान सहजसोप्या पद्धतीने शिकवले जाते. पक्षी निरीक्षण, वनस्पतींची ओळख, विज्ञान प्रतिकृती बनवणे, विज्ञान सहली, शास्त्रज्ञांची व्याख्याने ऐकवणे, चर्चासत्रे, विज्ञान प्रश्नमंजूषा, पर्यावरणविषयक चित्रपट, नाटकांचे सादरीकरण, निसर्गभ्रमंती, औद्योगिक केंद्रे, आधुनिक शेतीच्या ठिकाणांना भेटी आदी उपक्रमांतून विज्ञान आणि त्याचा विचार रुजवला जातो. यामुळे एरवी अवजड वाटणाऱ्या या विषयाची सहज गोडी लागते.

संस्थेतर्फे दरवर्षी २८ फेब्रुवारी या विज्ञानदिनी खोडदला (ता. जुन्नर) सर्वाधिक मोठय़ा रेडिओदुर्बीण (जी.एम.आर.टी.) अनुभवण्यासाठी अभ्याससहल जाते. रेडिओदुर्बीण म्हणजे काय? तिचे काम कसे चालते? त्यातून आकाश निरीक्षण कसे केले जाते याची माहिती या वेळी दिली जाते. संस्थेतर्फे दर महिन्याला एका शास्त्रज्ञाच्या व्याख्यानाचे केंद्रात आयोजन केले जाते. यामध्ये जे प्रत्यक्ष येऊ शकतात, ते येतात तर उर्वरित मान्यवरांचे विचार ‘ऑनलाइन’ किंवा त्यांची यापूर्वीची संकलित व्याख्याने ऐकवली जातात. यामध्ये आजवर डॉ. जयंत नारळीकर, मोहन आपटे, डॉ. पंडित विद्यासागर यांच्यापासून ते अमेरिकेत ‘जेनेटिक्स’वर काम करणारे शास्त्रज्ञ डॉ. विपुल राणा, डॉ. अपर्णा राणा अशा अनेकांचे विचार इथे मुलांना ऐकवले गेले आहेत. विज्ञानाचा प्रसार आणि गोडी वाढवणारे चित्रपट आणि कार्यक्रमही मुलांना दाखवले जातात. विज्ञानवादी डॉ. नरेंद्र दाभोलकर हेही या विज्ञानकेंद्रात आवर्जून येत असत. इथली मुले विवेकवादी होत विज्ञानप्रसाराचेही कार्य साधतील, असे ते म्हणत. या कार्यातूनच ती समाजातील अनिष्टता उघड करतील, असा ठाम विश्वास डॉ. दाभोलकर व्यक्त करीत असत. स्वत: डॉ. पुजारी विज्ञानप्रसारावर व्याख्याने देतात. ज्ञानरचनावाद ही शिक्षकांसाठीची कार्यशाळाही इथे भरते.  सीडी, डीव्हीडीचाही इथे मोठा संग्रह आहे. नासा, इस्रो, विज्ञानप्रसार केंद्र, बालचित्रवाणी, डिस्कव्हरी चॅनेल, अ‍ॅनिमल प्लॅनेट यांच्या निसर्ग, पर्यावरण, अवकाश, खगोलशास्त्र, मानवी शरीररचना, प्राणी, पक्षी, वनस्पती या विषयांवरचे माहितीपट केंद्रात उपलब्ध आहेत. याचे सादरीकरण आणि नंतर त्यावर प्रश्नोत्तरे, चर्चा होते. ध्वनी, प्रकाश, उष्णता, यांत्रिकी, न्यूटनचे गतीविषयक नियम,  ग्रामोफोन, प्लाझ्मा स्थिती, लंबकाचे प्रयोग इथे विविध साहित्य आणि छायाचित्रांमधून मांडलेले आहेत. 

अनेकदा शिक्षक दिग्दर्शक पद्धतीने विज्ञानाचे प्रयोग दाखवतात; पण तेच विज्ञान केंद्रात मुलांना हे प्रयोग हाताळायला मिळतात. वेगवेगळय़ा पद्धतीने एकच प्रयोग कसा करता येईल, याचे मार्गदर्शन केले जाते. प्रयोगाच्या साहित्याबरोबरच राइट बंधूंच्या विमानापासून विविध विमानांच्या प्रतिकृतींचा संग्रह, रॉकेट, क्षेपणास्त्र, उपग्रह, स्पेस शटल यांच्या प्रतिकृतीदेखील येथे आहेत. विविध प्रकारचे कॅमेरे, आकाशनिरीक्षणाच्या दुर्बिणी इथे पाहण्यासाठी आहेत. वैज्ञानिक संशोधनाचे साहित्य, प्रतिकृती, शास्त्रज्ञांची छायाचित्रे इथे प्रदर्शित केलेली आहेत. करोना महामारीच्या काळात पुजारी यांनी स्वत: बनवलेले शास्त्रज्ञांचे छोटे पुतळे आणि पाठय़पुस्तकात नसणारे दोनशेहून अधिक प्रयोगांचे प्रदर्शन संस्थेत मांडलेले आहे. प्रत्येक प्रयोगाच्या मार्गदर्शनासाठी विज्ञान प्रसारक आहेत. दुर्गम, डोंगराळ, ग्रामीण भागातील मुलांना व लोकांना तेथे जाऊन विज्ञान प्रयोग दाखवण्यासाठी फिरती प्रयोगशाळा कार्यरत आहे.

कराडसारख्या ठिकाणी विज्ञानप्रसारासाठी लावलेले हे रोप हळूहळू फुलत आहे. ही चळवळ एकीकडे रुजवली असली तरी ती सांभाळणे, चालवणे यातील आव्हाने डॉ. पुजारी यांनाच पेलावी लागत आहेत. करोना कालावधीत विज्ञान केंद्र, फिरती प्रयोगशाळा हे सारे ठप्प राहिले.  त्यामुळे वीज, पाणी, मिळकत कर, दैनंदिन खर्च व विज्ञान प्रसारकांचे वेतन देणे अशक्य झाल्याने हा प्रकल्प अडचणीत आला आहे. सेवानिवृत्तीमुळे विज्ञान केंद्राच्या कामात पूर्णवेळ कार्यरत राहण्याची संधी असताना आर्थिक विवंचना असल्याने डॉ. पुजारी यांच्यासमोर यक्षप्रश्न उभा आहे. विज्ञानप्रसाराच्या या कामाला दानशूरांकडून आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे.

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wings of science science center through a telescope ysh

ताज्या बातम्या