अमेरिकेसारखा देश जगातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल देशांतील महिलांचे सक्षमीकरण हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा भाग का मानतो आणि शांतता चळवळींत महिलांच्या सहभागाला अमेरिकेची मदत का मिळते, याबद्दल अमेरिकेच्या नूतन परराष्ट्रमंत्र्यांनी  ‘लोकसत्ता’साठी मांडलेले हे विचार..
जॉन केरी
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच आठवडय़ात मला म्यानमारच्या काही धडाडीच्या महिलांच्या एका गटास भेटण्याची संधी मिळाली. त्या गटातल्या दोघींनी एकेकाळी राजकीय कैदी म्हणून तुरुंगवास भोगला होता. आपल्या आयुष्यात अनंत असह्य आणि अविश्वसनीय अशा यातना भोगूनही त्यांच्यातली उमेद संपली नव्हती. मुलींना शिक्षण आणि नव्या उद्यमशीलतेसाठी प्रशिक्षण, बेरोजगारांना नोकरी आणि नागरी चळवळींना बळ देण्यात त्यांनी कितीतरी धडाडीने कार्य चालविले आहे. म्यानमारमधील सशक्त अशा परिवर्तनाच्या त्या तितक्याच सशक्त अशा दूत ठरतील आणि येत्या काही वर्षांत आपला देश आणि आपला समाज यांच्या प्रगतीला चालना देतील, याबाबत माझ्या मनात तरी शंका नाही.
स्त्रिया व मुलींच्या हक्कांच्या रक्षणासाठी आणि त्या हक्कांची जोपासना करण्यासाठी अमेरिका आज जगभरातील देशांसोबत, संघटनात्मक व व्यक्तिगत पातळीवरही जे काम करीत आहे  ते काम किती महत्त्वाचे आहे हे समाज परिवर्तनाचा आधारस्तंभ ठरणाऱ्या अशा महिलांना भेटल्यावर प्रकर्षांने लक्षात येते. आज अमेरिकाच काय कोणताही देश ज्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समस्यांचा सामना करीत आहे त्यांची सोडवणूक स्त्रियांच्या संपूर्ण सहभागाशिवाय केवळ अशक्य आहे, ही वस्तुस्थिती आहे.
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या किंवा जागतिक आर्थिक परिषदेच्या पाहणीनुसार, ज्या देशात स्त्री आणि पुरुषांना समान हक्क आणि अधिकार आहेत ते देश आर्थिक आघाडीवर दुसऱ्या अर्थसत्तांशी तोडीस तोड स्पर्धा करतात. मात्र ज्या देशांत वैद्यकीय सेवा, शिक्षण, राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रतिनिधित्व, व्यापारात वाव अशा गोष्टींत स्त्रिया आणि मुलींना वंचित ठेवले जाते ते देश अशा स्पर्धेत टिकाव धरीत नाहीत. जर शेती करणाऱ्या स्त्रियांनाही पुरुष शेतकऱ्यांइतकाच बियाणे, खते आणि तंत्रज्ञानाचा लाभ मिळाला तर जगभरातील कुपोषित आणि अल्पपोषित लोकांची संख्या त्या १५ कोटींवरून १० कोटींवर आणतील, असे संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटनेने आपल्या अहवालात स्पष्ट नमूद केले आहे.
जगाच्या पाठीवर अनेक समाजगटांत आजही स्त्रिया आणि मुलींबाबत तुच्छतेची भावना आहे. त्यांना शाळेत जाण्याची संधी नाकारली जाते. लहान वयातच त्यांना लग्नाच्या दावणीला जुंपले जाते. महिलांवरील अत्याचारांपायी कितीतरी जणी प्राणास मुकल्या आहेत अथवा मनाने खचून मृतवत जीवन जगत आहेत.
दोन मुलींचा बाप असल्याने ‘निर्भया’सारख्या मुलींच्या पालकांना किती यातना भोगाव्या लागत असतील, या कल्पनेनेच मी अतिशय अस्वस्थ होतो. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या त्या अवघ्या २३ वर्षांच्या मुलीला दिल्लीत धावत्या बसमध्ये भीषण यातना भोगाव्या लागल्या आणि नंतर मृत्यूही पत्करावा लागला, याचं कारण एकच ती ‘स्त्री’ होती..
पाकिस्तानच्या मलाला युसूफझाईवरही असाच बसमध्ये हल्ला झाला. ती शाळेत निघाली होती आणि तिचा एकच गुन्हा होता पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षणासाठी ती दहशतवादाला न जुमानता लढत आहे. तिच्या पालकांचे मनही किती आक्रंदत असेल, याचीही मी कल्पना करू  शकतो. पण मलाला तिच्या तत्त्वांसाठी आजही निर्भयतेने ठामपणे उभी आहे, अगदी त्याचप्रमाणे आपल्यावर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याच्या पकडीतून सुटता येऊ नये यासाठी प्राण सोडतानादेखील  ‘निर्भया’ ठाम होती आणि या दोघींच्या वडिलांनीही आपल्या मुलीच्या आणि समस्त महिलांच्या बाजूने ठामपणे प्रतिक्रिया दिल्या या गोष्टी मला अतिशय प्रेरक वाटतात.
आपल्या समाजाचा अर्धा हिस्सा असलेल्या महिलांना मागे टाकून कोणताही देश प्रगती साधू शकणार नाहीच. त्यामुळेच प्रगती, उन्नती, स्थैर्य आणि शांततेच्या या आपल्या समान तत्त्वांच्या पूर्ततेसाठी स्त्री-पुरुष समानता अनिवार्य आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाद्वारे पुढचे पाऊल टाकण्यासाठीही जगभरातील स्त्रिया आणि मुलींच्या प्रगतीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे आमचे ठाम मत आहे.
याच भूमिकेतून आम्ही महिला उद्योजिकांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यातला सहभाग वाढवीत आहोत. याचे कारण उद्योग क्षेत्रातील महिला केवळ त्यांच्या कुटुंबाचीच प्रगती साधत नाहीत तर देशाची आर्थिक स्थितीही उंचावतात. आम्ही मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहोत कारण त्यामुळेच त्या बालविवाहाच्या प्रथांना खरी  मूठमाती देतील, गरिबीचे दुष्टचक्र तोडतील, आपल्या समाजाचे नेतृत्वही करतील आणि नागरी चळवळींना बळ देतील. स्त्रीशिक्षणाचे प्रमाण वाढले आणि साधनसंपत्तीत त्यांना वाटा मिळाला तर पुढील पिढीचे आरोग्यमान आणि शिक्षणमानही उंचावेल.
मातेचे आरोग्य सुधारावे, शेती करणाऱ्या महिलांना बळ द्यावे आणि महिलाविरोधी अत्याचार रोखावेत यासाठी आम्ही जगभर समविचारी लोकांबरोबर कार्य करीत आहोत. कारण महिला जर सुदृढ आणि सुरक्षित असतील तर समाजाचेच अंतिमत: भले  होते. जागतिक अर्थकारणाला या महिलांच्या रूपाने मग जसे काम करणारे हात लाभतील तसेच सर्जनशील नेतृत्वही लाभेल. जगात जिथे जिथे शांततेसाठीच्या वाटाघाटी सुरू आहेत आणि संरक्षक उपाय योजले जात आहेत तिथे तिथे महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी अमेरिका नेहमीच जाणीवपूर्वक प्रयत्नशील असते. कारण महिलांचे अनुभव, त्यांची तळमळ आणि त्यांचा दृष्टिकोन हा पुढील अनेक संघर्षांना पायबंद घालतो आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या शांतता व स्थैर्याला आधारवत होतो, असा आमचा अनुभव आहे.
आज जागतिक महिला दिन आहे. हा आनंदाने साजरा करायचा क्षण आहे. प्रगतीत अडथळा निर्माण करणारी असमानता जरी जगाच्या कानाकोपऱ्यात असली तरी ती नष्ट करण्याचा निर्धार स्वतच्या मनाशी करण्याचाही हा दिवस आहे. हा निर्धार आम्ही करू शकतो आणि त्याबाबत बांधीलही राहू शकतो. या एका निर्धारामुळेच तुमच्या मुली शाळेची बस निर्भयतेने पकडू शकतील, आमच्या भगिनी त्यांच्यातील अपरंपार क्षमतांचा पुरेपूर वापर करू शकतील आणि प्रत्येक मुलगी आणि महिला ही तिच्या या अपरंपार क्षमतेला साजेसे जीवन जगू शकेल.