14 October 2019

News Flash

दसरा विशेष : वाहनक्षेत्राला झळाळी

भारतीय बाजारातील वार्षिक वाहन खरेदीपैकी तब्बल ३० टक्के वाहनखरेदी सणासुदीच्या हंगामात होत असते.

(संग्रहित छायाचित्र)

आसिफ बागवान

वाहन खरेदीसाठी दसरा-दिवाळीसारखा मुहूर्त बहुतेकांना साधायचा असतो. त्यामुळे या काळात वाहनांच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. यंदा पेट्रोलच्या किमतीच्या वाढीचं सावट असलं तरी ग्राहकांची वाहन खरेदीची लगबग सुरू झाली आहे.

कोणत्याही शुभकार्याची सुरुवात शुभमुहूर्तावर करावी, हा संकेत आपल्याकडे प्रचलित आहे. मग गृहप्रवेश असो की वाहन किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी असो, हे व्यवहार शुभदिनी करण्यात येत असतात. अशा खरेदीला दसरा-दिवाळी यापेक्षा आणखी मंगलमय वातावरण कोणते? त्यामुळेच सणासुदीच्या दिवसांत, त्यातही दसरा-दिवाळीच्या काळात भारतीय बाजाराला वेगळीच झळाळी प्राप्त होते. अतिशय शुभ समजल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी दीड मुहूर्त (दसरा आणि दिवाळीचा पाडवा) या काळात येतात, हे त्यातले एक महत्त्वाचे कारण. पण त्याखेरीज या काळात कंपन्यांकडून बोनस वाटप केले जात असल्याने ग्राहकांची क्रयशक्तीही वाढलेली असते. साहजिकच घरातील महत्त्वाच्या वस्तूंच्या खरेदीसाठी दसरा, दिवाळी हे मुहूर्त निवडले जातात. वाहनखरेदीसाठीही हा महत्त्वाचा हंगाम असतो. त्यामुळे दरवर्षी दसरा-दिवाळी येताच वाहनक्षेत्राला टवटवी आल्याचे दिसून येते. यंदादेखील असा उत्साह  असून ग्राहकराजाला आकर्षित करण्यासाठी वाहन कंपन्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

सणासुदीचा हंगाम हा वाहनक्षेत्रासाठी नेहमीच फलदायी राहिला आहे. भारतीय बाजारातील वार्षिक वाहन खरेदीपैकी तब्बल ३० टक्के वाहनखरेदी सणासुदीच्या हंगामात होत असते. त्यामुळे भारतीय वाहनक्षेत्राचे पूर्ण लक्ष दसरा, दिवाळी या हंगामावर केंद्रित झालेले असते. २०१७ हे वर्ष वाहनक्षेत्रासाठी अतिशय लाभदायी ठरले. आधीच्या वर्षीच्या तुलनेत वाहनविक्रीत झालेल्या सरासरी साडेनऊ टक्क्यांच्या वाढीनंतर भारतीय वाहन उद्योग जगातील चौथ्या क्रमांकाचा वाहनउद्योग क्षेत्र बनला. गत आर्थिक वर्षांत देशांतर्गत कंपन्यांकडून दोन कोटी ९० लाख वाहनांचे उत्पादन करण्यात आले. तर गेल्या वर्षभरात दोन कोटी ४९ लाखांच्या आसपास वाहनांची विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने वाहनांवरील उपकरात वाढ करूनही वाहनविक्री वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदा तोच कल कायम राहील, अशी वाहन क्षेत्राची अपेक्षा आहे. मात्र गेल्या वर्षभरात बाजारातील वातावरणात झालेले नकारात्मक बदल वाहनक्षेत्रासाठी आव्हानात्मक ठरणार आहेत.

सणासुदीच्या काळातील उत्साह सोडता, बाजारात सध्या फारसे चैतन्य नाही. अधिक महिन्यामुळे यंदा दसरा-दिवाळी हे महत्त्वाचे सण काहीसे लांबणीवर पडले. त्यातच देशातील अनेक भागांना यंदा पुराचा तडाखा बसला. केरळसारखे राज्य तर पुरामुळे पुरते कोलमडून पडले आहे. याखेरीज इंधन दरवाढीमुळे बसणाऱ्या महागाईच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झळा, डॉलरच्या तुलनेत धडपडत असलेला रुपया, त्यामुळे झाकोळलेला शेअर बाजार अशा सगळ्या नकारात्मक वातावरणात दसरा, दिवाळी येत आहेत. साहजिकच इतर वर्षांच्या तुलनेत यंदा ग्राहक खरेदीच्या बाबतीत काहीसा सावध पवित्रा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच वाहनक्षेत्रासाठी चालू आर्थिक वर्ष आतापर्यंत फारसे उत्साहवर्धक राहिलेले नाही. २०१७-१८ या गत आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांत वाहन क्षेत्राची प्रगती यथातथाच राहिली आहे. मारुतीसारख्या देशातील अग्रगण्य वाहनकंपनीच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीचा वेग गतवर्षीच्या १६.३ टक्क्यांच्या  तुलनेत १०.५ टक्के इतका राहिला आहे. तर ह्य़ुंदाई, महिंद्रा या कंपन्यांच्या विक्रीतही फारशी वाढ झालेली नाही. टाटा मोटर्सने टिअ‍ॅगो आणि नेक्सन या वाहनश्रेणीच्या जोरावर यंदा विक्रीत चांगली तेजी नोंदवली आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे टाटा मोटर्सच्या एका प्रवक्त्याने मान्य केले. केरळमध्ये निर्माण झालेली पूरस्थितीही वाहनउद्योगासाठी काहीशी चिंताजनक असल्याने या प्रवक्त्याने सांगितले.

या सर्वाचा एकत्रित परिणाम यंदा दसरा- दिवाळीत पाहायला मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे  आहे. सध्या वाहनवितरकांकडे आधीचाच साठा मोठय़ा प्रमाणावर पडून आहे. अशातच सणासुदीच्या निमित्ताने कंपन्यांकडून नवनवीन वाहनांच्या श्रेणी बाजारात आणण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या आणि वितरक अनेक सवलती आणि योजना घेऊन येत आहेत. मारुती आणि ह्य़ुंदाईसारख्या कंपन्यांनी आपल्या वाहनांवर १० ते ४५  हजारांपर्यंत रोख बोनस आणि जुन्या वाहनाच्या मोबदल्यात अतिरिक्त बोनस देण्याचे जाहीर केले आहे. तर टाटा आणि महिंद्रा या कंपन्यांनी रोख बोनसखेरीज पहिल्या वर्षांचा मोफत विमा देण्याची योजना जाहीर केली आहे. सणासुदीच्या हंगामातील वाहनखरेदी ग्राहकांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.

नवीन काय?

सणासुदीच्या काळात झळाळून जाणाऱ्या बाजारात नावीन्याची रुजवात करून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहन कंपन्या दरवर्षी या हंगामात नवनवीन वाहने सादर करतात. यंदाही तोच कल कायम राहिला असून सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांत जवळपास २६ नवीन कार लाँच होत आहेत. याचाच अर्थ आठवडय़ाला दोन या वेगाने सध्या नवीन कार बाजारात येत आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा आकडा निश्चितच अधिक आहे. त्यामुळे भोवतालचे वातावरण प्रतिकूल जाणवत असले तरीही वाहन कंपन्यांनी खरेदीदारांवरील विश्वास आणि शुभ मुहूर्ताचा पायंडा मोडला नसल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या हंगामात बाजारात येत असलेल्या नवीन कारपैकी बहुतांश कार या आधीच्या श्रेणीचीच सुधारित आवृत्ती आहे. मात्र, त्यातही ह्य़ुंदाईची सँट्रो, मारुतीची अर्टिगा आणि फोर्ड अ‍ॅस्पायर या कार्सबद्दल उत्कंठा आहे. ह्य़ुंदाईची सँट्रो ही गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरली होती. तीच कार आता नवीन रूपात ग्राहकांच्या भेटीस येत आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हाताळता येणारी ‘ओआरव्हीएम’ यंत्रणा, स्टीअरिंगवरील बटणे, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट पॅनेल अशी वैशिष्टय़े असणार आहेत. अर्टिगाची नवी आवृत्ती ही आसनव्यवस्थेच्या बाबतीत अधिक आरामदायी असणार आहे. तसेच त्यामध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डेटाइम लाइट, स्वयंचलित क्लायमेट कंट्रोल ही वैशिष्टय़े आहेत.

उच्च श्रेणीतील कार्सना मागणी

तीन ते आठ लाख रुपयांच्या दरम्यानच्या कारची ग्राहक बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहण्यात येत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र पूर्ण बदलले आहे. वाढत्या उत्पन्न स्तरासोबत भारतीयांचा प्रीमियम किंवा लक्झरी कारकडे असलेला ओढाही वाढत चालला आहे. बीएमडब्ल्यू, जॅग्वार लॅण्ड रोव्हर, मर्सिडिज बेन्झ, व्होल्वो या परदेशात लोकप्रिय असलेल्या कंपन्यांच्या महागडय़ा गाडय़ांना भारतीय ग्राहकांचीही पसंती मिळू लागली आहे. अशा महागडय़ा कंपन्यांच्या वाहनविक्रीत या वर्षी चांगलीच वाढ झाली आहे. जानेवारी ते जून २०१८ या काळात बीएमडब्ल्यूने पाच हजार ७१७ गाडय़ांच्या विक्रीची नोंद केली, तर मर्सिडिजच्या सात हजार १७१ गाडय़ांची या काळात विक्री झाली. जॅग्वार आणि व्होल्वो यांच्या वाहनविक्रीने तर गतवर्षीच्या तुलनेत यंदा अनुक्रमे ६६ आणि ३३ टक्के वाढ नोंदवली आहे. या सर्व कंपन्यांसाठी जानेवारी ते जून हा काळ भारतातील आजवरच्या सर्वाधिक विक्रीचा हंगाम ठरला आहे.

जी गोष्ट प्रीमियम गाडय़ांची तीच ‘एसयूव्ही’चीही आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षांत भारतात छोटय़ा कारपेक्षाही ‘एसयूव्ही’ना अधिक मागणी असल्याचे दिसून आले. छोटय़ा कारची गत आर्थिक वर्षांतील वाढ तीन टक्के असताना एसयूव्हीच्या विक्रीत मात्र २१ टक्क्यांची वाढ झाली. गेल्या वर्षी नऊ लाखांच्या आसपास ‘एसयूव्हीं’ची विक्री झाली. महिंद्रा स्कॉर्पिओ, मारुती ब्रेझा, ऑडि क्यू७, मर्सिडिज जीएलसी या ‘एसयूव्ही’ना जास्त मागणी असल्याचे दिसून येत आहे. हाच मूड यंदाही कायम राहण्याची शक्यता आहे.

दुचाकी बाजार नवा विक्रम रचणार

दुचाकी हे भारतीयांचे सर्वाधिक पसंतीचे वाहन आहे. देशातील मोठय़ा मध्यमवर्गाला आजही चारचाकी वाहन घेणे परवडत नाही. त्यामुळे दुचाकींच्या बाबतीत भारत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. दुचाकी उत्पादन आणि विक्रीच्या बाबतीत गेल्या वर्षी तर भारतीय वाहन उद्योगाने आधीचे सर्व विक्रम मोडीत काढले. २०१७-१८ या आर्थिक वर्षांत भारतीय कंपन्यांनी तब्बल दोन कोटी दुचाकींच्या विक्रीची नोंद केली. एका आर्थिक वर्षांत झालेली ही सर्वाधिक दुचाकी विक्री आहे. एवढेच नव्हे, तर गत आर्थिक वर्षांत उत्पादन करण्यात आलेल्या एकूण वाहनांमध्ये दुचाकींची संख्या ८० टक्के इतकी होती. या दोन्ही गोष्टींनी भारताला दुचाकीच्या बाबतीत जगातील अव्वल क्रमांक मिळवून दिला आहे. आर्थिकदृष्टय़ा परवडणारे दर, सहज उपलब्ध कर्जसुविधा या दोन गोष्टी दुचाकींना अधिक पसंती मिळण्यासाठी कारणीभूत आहेतच; मात्र त्याचबरोबर तरुणवर्गाची आजही दुचाकींनाच अधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येते. साहजिकच देशात तरुण वयोगटातील लोकसंख्या सर्वाधिक असताना दुचाकींची मागणीही सर्वाधिक आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षांत आतापर्यंत दुचाकी निर्मात्या कंपन्यांच्या फार काही हाती लागलेले नाही. एकूणच वाहनक्षेत्राला ज्या कारणांनी छळले, तीच कारणे दुचाकीच्या बाजारातील उदासीन वातावरणाला जबाबदार आहेत. मात्र, उदासीन म्हणतानादेखील दुचाकींच्या विक्रीत फारशी घट झालीय, अशी परिस्थिती नाही. हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो आणि टीव्हीएस मोटर्स या आघाडीच्या तीन कंपन्यांनी २०१८-१९ च्या पहिल्या सहामाहीतील विक्रीत अनुक्रमे ९.२, २७ आणि १३ टक्के वाढ नोंदवली आहे. मात्र केरळ आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांतील पूरस्थितीने दुचाकी निर्मात्या कंपन्यांना काहीसे चिंतेत पाडले आहे. भारतातील एकूण दुचाकी विक्रीपैकी जवळपास दहा टक्के दुचाकींची विक्री या दोन राज्यांत होत असते. त्यामुळे दुचाकी कंपन्या काहीशा अडचणीत आहेत. आता पश्चिम बंगालमध्ये सुरू होत असलेला दुर्गा महोत्सव तेथील बाजारात पुन्हा चैतन्य निर्माण करेल, अशी या कंपन्यांची आशा आहे.

दरम्यान, एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अर्थात प्रीमियम दुचाकींनाही भारतात मोठी पसंती मिळत असून रॉयल एनफिल्ड, हार्ले डेव्हिडसन या कंपन्यांसह बजाज, होंडा, हिरो, टीव्हीएस या भारतीय कंपन्याही १५० सीसीपेक्षा अधिक क्षमतेचे इंजिन असलेल्या आणि आकर्षक रचना असलेल्या दुचाकींच्या निर्मितीवर भर देताना दिसत आहेत. अवघ्या तीन-चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या नवीन श्रेणीने गेल्या वर्षांत दहा लाखांहून अधिक प्रीमियम बाइकच्या विक्रीची नोंद केली आहे. वेगाशी स्पर्धा करणाऱ्या या बाइक लांब पल्ल्याच्या आणि डोंगराळ भागातील प्रवासासाठी उपयुक्त ठरत आहेतच पण त्यांना प्रतिष्ठेचेही कोंदण प्राप्त झाले आहे. त्यामुळे चार चाकी वाहन खरेदी करण्याची क्षमता असतानाही अनेक जण या बाइक खरेदी करण्यावर भर देत आहेत.

बाजारात आलेल्या, येणाऱ्या प्रमुख कार

कार                     किंमत (रुपये)

मारुती सुझुकी             ८-१२ लाख

सिअ‍ॅझ फेसलिफ्ट

फोर्ड फिगो                ४.८-७.८ लाख

फोर्ड फिगो अ‍ॅस्पायर         ५-९ लाख

निसान डॅट्सन गो       ४.८ लाख

निसान डॅट्सन गो+          ५.३ लाख

महिंद्रा मरॅझ्झो              १०-११ लाख

महिंद्रा एक्सयूव्ही ३००        ९.९९ लाख

महिंद्रा जी४ रेक्स्टन          २० लाख

मर्सिडिज बेंझ ई क्लास       ६०-६५ लाख

ऑल टेरेन

पोर्श कॅयेन                  २ कोटी ३६ लाख

ह्य़ुंदाई सँट्रो                 ३-५ लाख

मारुती सुझुकी अर्टिगा         ७-११ लाख

टाटा टिअ‍ॅगो जेटीपी           ५.९९ लाख

मारुती सुझुकी वॅगन-आर         ४-६ लाख

response.lokprabha@expressindia.com

First Published on October 12, 2018 1:06 am

Web Title: article about shine in vehicle area