lp50मकरसंक्रांतीचा सण देशभर साजरा होतो. या सणातील सर्व प्रांतीय विविधतेत एक समान गोष्ट म्हणजे-तीळगूळ. वडील माणसे लहानांना तीळ व गुळापासून बनवलेली मिठाई देतात आणि म्हणतात, ‘‘तीळगूळ घ्या, गोड बोला.’’ परिचितांना, कुटुंबीयांना आपले प्रेम दाखवण्याचा प्राचीन काळापासून चालत आलेला हा रिवाज!

सर्वच मानव समूहांमध्ये प्रेम व्यक्त करण्याच्या विविध परंपरा असतात. परंतु त्या आपल्या धर्म, जात, समाज, कुटुंब यांच्यापुरत्या मर्यादित असतात. आम्ही जगाला प्रेम अर्पण करण्याचे ठरवल्यावर संक्रांतीलाच त्याचा पहिला प्रयोग करायचे ठरवले. साहजिकच रक्ताची नाती, मित्रमंडळी या चौकटींच्या पलीकडे जाऊन कुणाला तीळगूळ द्यावा, असा प्रश्न आम्हाला पडला.

आम्ही असे ठरवले की या समाजमंदिराच्या पायाचे जे दगड आहेत, त्यांच्याबरोबर संक्रांत साजरी करावी. मंदिराचा कळस सर्वाचे लक्ष आकर्षून घेतो. पण तो डोलारा तोलणाऱ्या पायाच्या दगडांचा विचार क्वचितच होतो. मग पहिला विचार आला तो रिक्षावाल्यांचा. आपल्याला कुठलीतरी आणीबाणीची वेळ गाठायची असते. आपण सार्वजनिक वाहनांचा विचार बाजूला सारून रिक्षाला हात करतो. रिक्षावालासुद्धा गर्दीतून, खड्डय़ांनी चाळण झालेल्या रस्त्यावरून, मार्ग काढून आपल्याला वेळेवर इच्छित स्थळी नेऊन पोहोचवतो. आपण पोचलो, की त्याच्या अंगावर पैसे फेकतो, अनेकदा सुट्टय़ा पैशांवरून वादावादी होते आणि अशांत मनाने आपण आपल्या कामाकडे वळतो. पण वेळ साधली म्हणून कधी आपण रिक्षावाल्याचे आभारसुद्धा मानत नाही.

‘तुम्हाला काय वेड लागलं आहे का? तुम्हाला काय रिक्षावालेच सापडले का तीळगूळ द्यायला? त्यांची लायकी तरी आहे का? आपल्याला लुटायलाच टपलेले असतात..’

मित्रमंडळींच्या अशा प्रतिक्रिया आम्हाला अपेक्षितच होत्या. आणि त्यात त्यांचा काय दोष? रिक्षावाले मुद्दाम लांबच्या रस्त्याने घेऊन जातात, सुट्टय़ा पैशांसाठी अडवणूक करतात, असे आपल्या सर्वानाच वाटते. या कटुतेमुळे आपण त्यांच्याकडे सहानुभूतीने बघत नाही, कृतज्ञताही दाखवत नाही. उलट त्यांना अनादराने वागवतो. त्या बदल्यात रिक्षावालेही आपल्याकडे ‘एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन आदळायचे ओझे’ याच दृष्टीने बघत असणार. आपल्याला जेरीला आणण्याच्या क्लृप्त्या शोधत असणार.

जरा विचार करा, सकाळच्या घाईगर्दीच्या वेळेत रिक्षावाल्याशी खडाजंगी करून आपण कामाला सुरुवात केली तर त्याचा परिणाम आपल्या कामावर, मन:स्थितीवर होणारच ना! आणि रिक्षावालासुद्धा त्यानंतर येणाऱ्या सर्व प्रवाशांशी घुश्श्यातच वागणार! वरवर लहानसे वाटणारे हे प्रसंग समाजात किती गढूळ वातावरण निर्माण करतात! सर्वाच्याच मनात शत्रुत्वाचा अग्नी चेतावतात. या ज्वाळा शांत करण्याचा एकच उपाय, प्रेमाचे सिंचन करणे!

आम्ही तोच उपाय अवलंबण्याचे ठरवले व संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून रिक्षास्टॅण्डवर गेलो. आम्ही गिऱ्हाईक नाही हे समजल्यावर रिक्षावाले जरा वैतागले. आपण घाईत आहोत, असे दाखवू लागले. पण आम्ही चिकाटी सोडली नाही. त्यांच्या सेवेबद्दल त्यांना धन्यवाद दिले. फूल व लहानसे शुभेच्छापत्र दिले. तीळगूळ दिला व त्यांच्या रिक्षामध्ये एक स्टीकर लावला. त्यावर मजकूर होता-

’ रिक्षावाले आपले बांधव आहेत. त्यांच्याशी स्मितवदनाने संभाषण करा. त्यांना अहो-जाहो म्हणून संबोधा.

’ तुम्ही रिक्षातून उतरताना त्यांना धन्यवाद द्या व शक्य असल्यास त्यांना एखादे चॉकलेट द्या.

’ त्यांच्याशी एखाद दुसऱ्या रुपयासाठी वाद घालू नका.

रिक्षावाल्यांनी सुरुवातीला स्टीकर लावून घ्यायला काचकूच केली, पण ती जाहिरात नाही हे समजल्यावर परवानगी दिली. तीळगूळ व भेटकार्ड सर्वानी आनंदाने घेतले.

‘काय मग? रिक्षावाल्यांनी तुम्हाला अगदी आनंदाने मिठीच मारली असेल ना? की भाडय़ात काही सवलत दिली?’ काही तिरकस प्रश्न..

प्रामाणिकपणे सांगायचे तर रिक्षावाल्यांना लगेचच आपल्याबद्दल प्रेम वाटायला लागेल, असे नाही. ते आपली अडवणूक थांबवतील, भाडेवाढीसाठी संप करून आपल्याला वेठीला धरणार नाहीत, या जरा जास्तच अपेक्षा झाल्या, नाही का?

आपल्या अशा प्रेमळ वागण्याला रिक्षावाले तशाच प्रेमाने प्रतिसाद देतील अशी अपेक्षा अवास्तव आहे. त्यांच्या डोक्यात केवळ गिऱ्हाईक आणि भाडे एवढाच विचार असणार. आपल्याला तीळगूळ देणारा माणूस कोण आहे हे बघण्याची तसदीसुद्धा ते कदाचित घेणार नाहीत.

पण आपण या अपेक्षा का करायच्या? प्रेमाने वागण्याचा निर्णय आपला आहे, मग रिक्षावाले कसेही वागले तरी आपण प्रेमानेच वागायचे, निरपेक्षपणे! आपल्या प्रेमसिंचनाने त्यांच्या मनात प्रेमाचे बीज पेरले जाईल. त्याची फळे मला मिळणार नाहीत, पण मला ती अपेक्षाच नाही. या बीजाचे अंकुर इतरांना सुखावू लागले, तर त्यातच या प्रयोगाचे यश आहे. वेळ लागेल, पण हे होईल हे निश्चित!

प्रेमाच्या या प्रयोगाला सुरुवात केल्यावर आमची रिक्षावाल्यांशी सुट्टय़ा पैश्यांवरून होणारी भांडणे हळूहळू बंदच झाली. आता आम्हाला फक्त त्याच्यातला माणूस दिसतो- प्रदूषणातून वाट काढणारा, आपल्या शरीराची चाळण करून घेणारा, रात्री बेरात्री आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवणारा! आमच्या अनेक समविचारी मित्रमंडळींनी आपल्या गावांत, शहरांत या प्रयोगाची सुरुवात केली आहे.

तुमचं काय? या, प्रेमाचा प्रयोग करायला घाबरू नका. निरपेक्षपणे प्रेम देण्यात काय जादू असते, याचा अनुभव घ्या. आणि हो, संक्रांत केवळ निमित्त, रिक्षावाले कायमच आपल्या प्रेमाचे अधिकारी आहेत!
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com