बायजाबा आज जरा लवकरच घरी आला, दिवसभराच्या कामानं शरीर आणि घरच्यांच्या आठवणीनं मनं शिणून गेल होतं. थकल्या शरीरानंच तो झोपडीवजा घरात आला, आज कधी नव्हे ते त्याला वाटलं, आज ‘आय’ पाहिजे होती, तो बाहेर आला, घराबाहेरच्या ओसरीवर शांत बसून राहिला. तेवढय़ात पारावरच्या तुकाबाचं लक्ष त्याच्याकडे गेलं, त्यानं तिथूनच हाक मारली,

‘‘ए बायजाबा, ये की इकडं?’’

बायजाबानं तिथूनच मान हलवून नकार दिला. तुकाबाच्या लक्षात आलं बायजाबाचं आज काही तरी बिनसलंय, तो तसाच उठून बायजाबांकडे आला.

‘‘काय रं, बरं हायस ना?’’

‘‘हं’’

‘‘मग मूग गिळल्यागत का बसला?’’

‘‘तुका, आज घरच्यांची लई याद आली.’’

‘‘मला नाई ठावं, कुणाला इचारावं गावात त्यांच्याबद्दल?’’

‘‘मला तर काही तरी इपरीतच वाटतंय, चल आपण पांडबाकडं जाऊ गावातल एकच जुन खोड उरलय,’’

‘‘त्यालाच माहितं असल?’’

आणि दोघंही पांडबाच्या घराकडे निघाले, जातानाही नेमकी सुरुवात कुठून करावी याचाच विचार बायजाबा करत होता. विचार करत करत ते दोघं पांडबाच्या घरी पोहचले. पांडबा माजघरात खाटेवर पडला होता, वय झाल्याने तब्येत यथातथाच, बाजबा हलक्या पावलाने पांडबाजवळ गेला आणि तिथेच खाली खाटेजवळ बसला आणि हळूच बोलला,

‘‘पांडबा, जरा बोलायच होतं तुझ्याशी?’’

‘‘बोल की,’’ पांडबा पुटपुटला.

‘‘आता नग, जेवणं उरकली की मग.’’

‘‘बायजाबा, एवढं काय काम हाय रे. की एकटय़ानं बोलायचयं?’’ पांडबाची सून बायजाबाला पाणी देत बोलली.

‘‘काय नाय आक्का, असंच आज जरा घरच्यांची याद आली.’’

‘‘अगो, बाई मला वाटलं आभाळंच कोसळलं की काय? अरे बोल की सगळ्यांसमोर.’’

बायजाबा अवघडल्यागत झाला, पण आज बोलायचंच असं ठरवलं होतं, पण सुरुवात कुठून करावी हेच कळेना आणि तेवढय़ात पांडबाच्या सुनेनचं विचारलं,

‘‘बायजाबा, तुझी आय आठवते का रे तुला? कारण ती दोघं मेली तव्हा तू ३-४ वर्षांचा असशील.’’

‘‘चांगली व्हती दोघं बी. तुझा आजा-आजी, काका, माय-बाप अन् तुझी बहीण. सगळी चांगली व्हती!’’ पांडबा स्वगत बोलावं तसा बोलला. सगळ्यांनी चकून पांडबाकडं बघितलं पण क्षणभरंच. बायजाबा परत मान खाली घालून बसला, पांडबाची सून परत कामाला लागली अन् तुकोबा तिथंच आडवा झाला.

‘‘पांडबा, माझा असं कुणीच नाही, एकटा किती दिस काढू? जीव कावल्यागत होतो बघ?’’

‘‘कुणीच कसं नाही? बहीन हाय की..’’

‘‘बहीण?’’

‘‘ हा तुझ्या घरात. तू, तुझी मोठी बहीण, आय-बाप, काका, आजा-आजी होते, पण एक वर्षी तुझा आजा-आजी काही तरी आजार झाला आन् एकाच वक्ताला दोघंबी गेले.’’ पांडबाला दम लागला, त्यांन एक दीर्घ श्वास घेतला, पांडबा सांगत होता तसं बायजाबा सावरून बसला.

‘‘पुढ सांग की.’’

‘‘हा. त्याचा लई परिणाम बावर आन् काकावर झाला. तुझा बा तरी लेकरांकडं बघून धीर धरत होता, पण तुझ्या काकानं हाय खाल्ली. त्यानं अन्न-पाणी सोडलं, अन् त्यातच मेला, तुझा बा अन् आय लई रडले. तुझ्या काकाला लेकरावानीच सांभाळत व्हते, पण तुझा बा आता लई खचला होता, अन् त्याच्या मनानं येगळच घेतलं. तुझी बहीण ९-१० वर्षांची आसंल तेव्हा. तिचं लगीन दूरच्या गावात करून दिलं, आन् पदर यायच्या आत पाठवणी करून दिली कायमची! त्यानं ठरवलं, या गावात राहायचंच नाय, तुझी आय लई रडायची, पोरीची एवढय़ा लहानपणी पाठवणी केली म्हणून, पण तुझा बा म्हणायचा, की ति इथं राह्य़ली असती तर तीबी मेली असती, असं म्हणून तुला घेवून गाव सोडण्याच्या तयारीत होता, पण त्या वेळी गावची जत्रा होती म्हणून त्याला वाटलं शेवटची जत्रा हाय आपली, देवीचा आशीर्वाद घेवून कायमचा गाव सोडावा, पण नियतीच्या मनात काय चाललंय काय कळणार? गावच्या जत्रेत प्लेगची साथ आली अन्..’’

‘‘पांडबा!’’

‘‘अर्धा गाव त्यात मेला, मढं उचलायाबी लोक कमी पडत.’’

‘‘माय न् बा त्यातच गेले?’’

पांडबा, काहीच बोलला नाही. त्याला एवढं बोलून दम लागला. इकडे बायजाबानं डोळे पुसले. त्याला एकदम आठवलं, आपल्याला एक बहीण आहे. तर त्यानं पांडबाला हलवलं आणि म्हणाला, ‘‘पांडबा, एवढं सांगितलं, आता एकच किरपा कर. तिचं गाव सांग.’’

‘‘हमजापूर; चांगलं आठवतंय मला, पण पंचक्रोशीच्याबी पल्ल्याड हाय ते.’’

‘‘काही गोत्र, कूळ तिकडचं?’’

‘‘नाही बा, आता नाय आठवत बघ.’’

‘‘पांडबा, लई उपकार झालेत बघ, उद्याच निघंन म्हनतो बहिणीला शोधाया. एकच हाय ती.’’

‘‘आरं पण..’’

‘‘आता काय बी बोलू नगं.’’

बायजाबा वेगळ्याच उत्साहानं भारला गेला, आपल्या हक्काचं- रक्ताच्या नात्याचं कुणी आहे, ही जाणीव त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने दुसऱ्याच दिवशी शिदोरी बांधली आन् पिठाचं गाठोड घेऊन बहिणीच्या ओढीनं पाय ओढत पाय नेईल तिकडे निघाला. एखाद्या गावात थांबायचं, एखाद्या गावातल्या ताई-आक्काकडं भाकरीचं पीठ देवून दोन भाकरी टाकून घ्यायच्या, रात्र झाली तर मुक्काम करायचा, नाही तर प्रवास सुरू ठेवायचा. गाव बरंच दूर असावं, कारण आतापर्यंत बरीच गावं पालथी घालून झाली होती, तसाच तो एका गावात शिरला,

‘‘ताई हे कोणतं गाव?’’

‘‘शिरणापूर, तुम्हास्नी कुठं जायचं भाऊ?’’

‘‘हमजापूर.’’

‘‘ते व्हयं, ही नदी दिसती न्हवं, त्यानं सरळ जावा, शेवटच्या टोकाला गावच हाय. आता कुठं दिस वरती आलाय; सांजच्या वक्तापर्यंत तू तिथं पोहचशील बघ.’’

‘‘ताई, लई उपकार झाले बघ, पण ताई लई दुरून आलो. दोन भाकरी टाकून देता का?’’

‘‘तू बस त्या झाडाखाली, मी भाकरी टाकून देते. आणं ते पीठ इकडे.’’

बायजाबा त्या माऊलीचे आभार मानून पुढील प्रवासाला निघाला. हमजापूर जवळ आलं म्हटल्यावर आतापर्यंतच्या प्रवासाचा शीण उतरला. तो झपाटय़ाने निघाला, आपली बहीण कशी आसल, आपण भेटल्यावर तिला कसं वाटंल याचा विचार करत करत दुपार झाली, एका झाडाखाली विश्रांती घेऊन तो पुन्हा निघाला. त्याला अजिबात वेळ गमवायचा नव्हता, उनं उतरू लागली तसं तो अजून उतावीळ झाला, अन् चालताना मंदिराचा कळस दिसू लागला. बायजाबा हरखून गेला. मनानं केव्हाच गावात पोहोचला, हळूहळू गाव दृष्टिक्षेपात येऊ लागला, पण तसतसा तो मनातून चरकला, घाबरला. गावाच्या अजून जवळ जाताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. बायजाबा धाय मोकलून रडू लागला, कारण त्याच्यासमोर गाव नव्हतंच, होते फक्त गावाचे अवशेष. संपूर्ण गाव पुरात वाहून गेला होता, ओसाड पडला होता. घरं-दारं, माणसं उद्ध्वस्त झाली होती, मंदिर उंचावर होतं म्हणून कसंबसं तग धरून होतं. बायजाबाला काहीच समजेना, काय करावं? कुठे जावं? आणि विचारावं तरी कुणाला? नंतर कोण जाणे किती वेळ गेला बायजाबा तिथेच बसला. विच्छिन्न अवस्थेत. पक्षी घराकड परतले, चांदणं पडलं पण बायजाबाला कशाचीच शुद्ध नव्हती. तो तिथेच उघडय़ा डोळ्यांनी पडून राहिला.

सूर्यकिरणांनी मात्र बायजाबा शुद्धीवर आला. आता या जगात खरंच आपल कुणीच नाही ही जाणीव बायजाबाचा एकटेपणा अधोरेखित करून गेली, आता परतीशिवाय पर्याय नाही, पण तो नेमक्या कोणत्या वाटेनं निघावं हे त्यालाही कळेना. तो फक्त चालत राहिला. सूर्य डोक्यावर आला तसं एक गाव लागलं. थोडं थांबून पुढं निघावं, असा विचार करत तो गावात शिरला. एका झाडीखाली बसला. एका कुटुंबानं तिथं एक झोपडं बांधलेलं होतं. तेही नवीनच दिसत होतं. बाहेर मोकळ्या जागेतच चूल पेटवलेली होती, बायजाबानं त्या माऊलीला म्हटलं,

‘‘ताई, दोन भाकरी टाकून देते का?’’

‘‘भाऊ, लई थकल्यावानी वाटताया. काय झालं? अन् आला कुठून?’’

‘‘..’’ तो काहीच बोलला नाही. त्याला वाटलं, आपला बा, माय आन् बहीणबी मेली आन् आता आपणबी मरणार. त्या माऊलीनं त्याच्याजवळचं पीठ घेतलं. भाकरी टाकायला सुरुवात केली.

‘‘भाऊ दोन टाकू की चार?’’

‘‘..’’

‘‘अरे बोल की बाबा काही तरी. बानू, पाणी दे मला भाकरी टाकायला आन् मामालाबी दे तांब्याभर.’’

बायजाबाला त्याही अवस्थेत ‘मामा’ शब्द कानाला गोड वाटला.

‘‘काय बाई पीठ हे, किती पाणी पितंय. बानू अजून पाणी घे जरा. भाऊ माझ्या माहेरच्याकडचंबी पीठ आसंच हाय. लई पाणी लागतंय.’’

बायजाबाचं मन परत हरखलं आणि उत्सुकतेनं त्यानं विचारलं,

‘‘कन्च माहेर माऊली?’’

‘‘शिक्रापूर.’’

‘‘तुझं नाव?’’

‘‘का रे बाबा, एवढं काय काम?’’

‘‘माऊली, म्या शिक्रापूरचा. माझ्या बहिणीला शोधाया आल्तो, हमजापूर सासर तिचं.’’

माऊलीचे हात तिथेच थबकले ती वेगळ्याच नजरेनं बायजाबाकडं बघू लागली.

‘‘माझा बा-माय, आजा-आजी अन् काका कुणीबी ऱ्हायलं नाय. एकच बहीण उरली, हमजापूरला गेलो तर तिथं सगळचं उद्ध्वस्त झालं होतं. वाट फुटंल तिकड निघालो अन् हिथं येवून पोहचलो.’’

‘‘तुझं नाव बायजाबा तर नाय?’’

बायजाबाचा शोध पूर्ण झाला होता. एका भाकरीच्या पिठानं दोन भावंडांना भेटवलं होतं, बायजाबाला त्याच्या हक्काचं, त्याच्या रक्ताचं माणूस भेटलं.
मयूरी जाधव – response.lokprabha@expressindia.com