18 February 2019

News Flash

करिअर विशेष : कलाक्षेत्रातील ‘फाइन’ करिअर

फाइन आर्ट्स किंवा ललित दृश्यकला या क्षेत्रात करिअरकडे  एक ठरावीक अशी नोकरी मिळण्याचं साधन म्हणून बघू नये. तो सर्वागीण विकास घडवणारा मार्ग आहे.

फाइन आर्ट्सच्या शिक्षणामुळे एक कलाकार म्हणून जगता येतं आणि ती एक मूलभूत करिअर होते.

महेंद्र दामले – response.lokprabha@expressindia.com
(लेखक हे चित्रकार व  कलासमीक्षक आहेत.)
फाइन आर्ट्स किंवा ललित दृश्यकला या क्षेत्रात करिअरकडे  एक ठरावीक अशी नोकरी मिळण्याचं साधन म्हणून बघू नये. तो सर्वागीण विकास घडवणारा मार्ग आहे.

फाइन आर्टस् किंवा ललित दृश्यकला, यामधील करिअरविषयी आपली मानसिकता ही परंपरेने नकारार्थी आहे. गम्मत आहे, आपल्या देशाच्या कला परंपरेचा किंवा त्याच्या वारसाचा आपल्याला अभिमान असतो पण तरी आम्ही नकारार्थी भावना बाळगतो. आमचं मूल छान चित्र काढतं किंवा शिल्प बनवतं, असं पालक म्हणून आपण कौतुकाने सांगतो, पण या गुणांना वाव देणारी करिअर मनात भीती, संशय निर्माण करते. त्या भीतीचं मूळ स्वातंत्र्यपूर्व परिस्थितीमध्ये आहे. आपल्या समाजाची आíथक स्थिती ही त्या काळी, कोलमडलेली असताना कला निर्माण करून, पसे कमावणे, जगणे हे कठीणच होते. त्यामुळे जी भीती आपल्याकडे निर्माण झाली ती आजही मनात असते. पण हळूहळू पालकांची मानसिकता मुलांच्या गुणांना वाव देणे आणि त्यांच्या आवडीचे शिक्षण, करिअर त्यांनी करावी अशी झाल्याने फाइन आर्ट आणि अप्लाइड आर्ट यातील करिअर हे विषय आज महत्त्वाचे झाले आहेत.

वास्तविक बऱ्याच वेळी आपण फक्त चित्रकला असे म्हणत असतो. पण त्याचं शिक्षण घेताना, फाइन आणि अप्लाइड आर्ट असे दोन भाग पडतात. औद्योगिक क्रांती घडली नव्हती, तेव्हा सर्व कला या केवळ फाइन आर्ट या एकाच सदराखाली येत. औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन होणाऱ्या वस्तू विकण्यासाठी, जाहिरात करण्याची गरज भासू लागली आणि फाइन आर्ट्सचं तंत्र ‘अप्लाय’ केलं गेलं आणि ‘अप्लाइड आर्ट’चा जन्म झाला. अप्लाइड आर्टमध्ये एखादी कंपनी वस्तू, ब्रॅण्ड आदींची जाहिरात करणे आणि त्याबद्दलच्या अनेक अंगांचं शिक्षण दिलं जातं. परिणामी अप्लाइड आर्टचं शिक्षण घेतलं तर नोकरी मिळू शकते. पण फाइन आणि अप्लाइड यामधील फरक लक्षात न घेता अनेक जण आत्मविश्वासाने म्हणतात, की मला अप्लाइड आर्टच करायचं आहे!!

फाइन आर्टची मजा वेगळी आहे. त्यात मुळात आपण कलात्मक कृती करणे त्याद्वारे, कलावस्तू (ज्याला आपण ढोबळपणे कलाकृती असे म्हणतो) निर्माण होणे, त्याद्वारे भावना, विचार आदी अभिव्यक्त करणे याचं शिक्षण दिलं जातं. त्याचं भान निर्माण केलं जातं. कलाकृती निर्माण करणं हा या शिक्षणाचा एक भाग झाला. पण कलात्मक कृतीतून कलावस्तू निर्माण होण्याविषयीचे भान हा या शिक्षणातील खूप महत्त्वाचा विषय आहे. या भानामुळे फाइन आर्ट शिकलेला कलाकार हा अष्टपलू होतो. आणि त्यामुळे अनेक क्षेत्रांत त्याला काम, नोकरी मिळू शकते. ही फाइन आर्टची गम्मत आहे.

आपण इथे काही शब्द बघू. स्कोप, जॉब आणि करिअर. हे तिन्ही शब्द आपण गोंधळून, आलटून पालटून वापरतो. वास्तविक आपल्याला हे शब्द वापरून असं विचारायचं असतं की, हे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीची समाजाला गरज आहे ना? त्याला नोकरी मिळेल काय? त्याला अनेक र्वष यात काम करता येईल काय? हे सर्व प्रश्न हे काही प्रमाणात, आधी उल्लेखलेल्या भीतीशी संबंधित आहेत. फाइन आर्टचं शिक्षण घेण्याबद्दल निर्णय करताना या भीतीला बाजूला ठेवून आपण अष्टपलू क्षमता आणि तिच्याविषयीचं भान प्राप्त करणार आहोत हे समजायला पाहिजे. कारण इथे आपण ज्याला निर्मितीक्षमता, क्रिएटिव्हिटी म्हणतो त्याचं शिक्षण घेणार आहोत. क्रिएटिव्हिटीचं भान आलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या, उद्योग करता येणे शक्य आहे. क्रिएटिव्हिटी असेल तर कोणीही स्वत:ला मोल्ड करतो, अ‍ॅडॉप्ट करतो आणि अनेक प्रकारची कामे करू शकतो.

मुंबई, महाराष्ट्रात चित्रकला, शिल्पकला, मेटल क्राफ्ट, टेक्सटाईल डिझाइन, सिरॅमिक, इंटिरियर डेकोरेशन या सर्व शाखा फाइन आर्टमध्ये मोडतात. त्याचे शिक्षण हे डिप्लोमा आणि डिग्री अभ्यासक्रमाद्वारे प्राप्त होते. डिप्लोमा दहावीनंतर आणि डिग्री बारावीनंतर घेता येते. चित्रकला, शिल्पकला यातील डिप्लोमा हा पाच वर्षांचा आहे तर मेटल, सिरॅमिक आदी तीन वर्षांचे आहेत. याकरिता फाऊंडेशन कोर्स करणे आवश्यक असते. डिग्री कोर्स हा बारावीनंतर, चार र्वष असतो. त्याकरिता प्रवेश परीक्षा असते. डिग्री आणि डिप्लोमा या करता इंटरमिजिएट परीक्षा पास होणं गरजेचं आहे.

याआधीच म्हटल्याप्रमाणे, फाइन आर्टस्च्या शिक्षणामुळे क्रिएटिव्हिटी, त्याविषयीचं वैचारिक भान, आणि अनेक प्रकारची चित्रं रंगवण्याची कौशल्यं आपल्याला मिळतात, मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वप्रथम एक कलाकार म्हणून जगता येतं आणि ती एक मूलभूत करिअर होते. कलाकार म्हणून जगणं आणि कलाकृती निर्माण करणं याकडे आपण एक करिअर म्हणून बघत नाही, पण ती करिअर आहे. कलाकाराने निर्माण केलेल्या कलाकृती ज्या पद्धतीने पसंतीस पडतात, विक्री होते, त्यातून इथे अर्थार्जन होते. यानंतर, कला शिक्षक होण्याचा कोर्स पूर्ण केला तर कला शिक्षक म्हणून नोकरी मिळून आपण कार्यरत होऊ शकतो. कला शिक्षक होण्यापलीकडे मानसशास्त्राचीही आवड असेल तर आपण स्वत:ला योग्य शिक्षण घेऊन एक आर्ट थेरपिस्ट म्हणूनही घडवू शकतो.

संगणकीय तंत्रज्ञानाची आवड असेल तर आपण युजर एक्सपीरियन्स डिझाइन या क्षेत्रात काम करू शकतो. शिकवणं आणि काही प्रमाणात कला इतिहास आदी थिअरी विषयाची आवड असेल तर आपण कॉन्टेन्ट डिझाइनर म्हणूनही काम करू शकतो. कला इतिहास, त्यामधील अनेक पदर, पुरातत्त्वशास्त्र आदींची आवड असेल आणि संग्रहालयशास्त्र याबद्दलचे कोर्स केले तर संग्रहालयात क्युरेटर, कलावस्तूंचं जतन, संवर्धन करणारा कॉन्झव्‍‌र्हेटर आणि टॅक्सिडेंर्मिस्ट अशा करिअर संधी निर्माण होतात. याखेरीज एक स्टायलिस्ट म्हणून सिनेमा, फॅशन, फूड, फोटोग्राफी अशा अनेक क्षेत्रांत काम करता येतं, या खेरीज सेट डिझाइन, आर्ट डिरेक्शन, व्हिजुअल र्मचडािझग, आर्ट मॅनेजमेन्ट अशा अनेक क्षेत्रांची दारं उघडतात.

इथे काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. फाइन आर्टचं शिक्षण आणि त्याचा वापर यात थेट संबंध नाही. तसेच आपल्यातील क्रिएटिव्हिटी ओळखण्याकरता, आपल्याला स्वत:चं एक विशेष भान असावं लागतं. ते भान म्हणूनच फाइन आर्ट शिक्षणातील महत्त्वाचं आहे. फाइन आर्टमधील शिक्षणानंतर नोकरीचं स्वरूप निश्चित नाही. कारण नोकऱ्या भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत, एक असते तर सांगणं सहज शक्य असतं. तसंच एकदा नोकरी लागली की रिटायर होईपर्यंत तीच राहील अशा प्रकारे यात करिअर घडत नाही. स्वत:मधील अनेक पलू जसजसे उलगडत जातात तसतशा अनेक संधी आपल्याला उमगतात, दिसतात आणि त्यानुसार करिअर विकसित होतं. त्यामुळे एका क्षेत्रातून दुसऱ्यात स्थलांतरही होत असतं. आणि हा एक वेगळा आनंद आहे.

जगप्रसिद्ध कलाकार लिओनार्दो दा विंची त्याच्या अष्टपैलुत्वासाठी ओळखला जातो. फाइन आर्ट शिक्षणामुळे असं अष्टपलुत्व शक्य होतं. त्यामुळे आपलं करिअर अनेक अनुभवांनी समृद्ध होऊ शकतं.

First Published on June 8, 2018 1:04 am

Web Title: career special issue career in fine art