प्रशांत ननावरे – response.lokprabha@expressindia.com
आवड म्हणून लोकांनी ‘फूड ब्लॉगिंग’ करायला सुरुवात केली आणि पाहता पाहता ते आज एक स्वतंत्र करिअर म्हणून उदयाला येत आहे.

गरमागरम उकडीचा मोदक फोडून त्यावर सोडलेली साजूक तुपाची धार, चुलीवर केलेली भाकरी, नाका-तोंडातून पाणी आणणारा, पण चवीचं समाधान देणारा झणझणीत कोल्हापुरी रस्सा किंवा लस्सीच्या शेवटच्या थेंबापर्यंत मिळणारा गारवा आणि गोडवा.. एकामागोमाग सारे पदार्थ कसे झर्रकन डोळ्यासमोर येऊन गेले ना? एव्हाना जिभेवरील रुचिकलिकांनी या वेगवेगळ्या पदार्थाच्या चवीही तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचवल्या असतील. काय गंमत आहे ना? खरं तर आता वाचताना यातील कुठलाही पदार्थ तुमच्यासमोर प्रत्यक्षात नाही; पण हे वाचून तुमच्या आवडत्या चवीच्या आठवणी जरूर ताज्या झाल्या असतील.

एखादा खाद्यपदार्थ बनवणं ही जशी एक कला आहे तसंच त्याविषयी लिहिणं हीदेखील कला आहे. चवदार, चटकदार, चमचमीत पाककृतींची रसभरीत वर्णनं वाचणं ही खरं तर अस्सल खवय्यांसाठी नेहमीच शिक्षा असते. कारण ते वाचून पोटात पेटलेला जठराग्नी शमवण्यासाठी त्या क्षणी लेखकाच्या नावाने खडे फोडण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय हाती नसतो. पदार्थ बनवण्याची प्रक्रिया, त्यामध्ये वापरले जाणारे जिन्नस, त्याचं सादरीकरण आणि ग्रहण याविषयी लिखाण हा काही नवीन विषय नाही. पुस्तकं, वर्तमानपत्रातील सदरं, मासिकं यांमधून गेले शतकभर लिहून येत आहे आणि मुख्य म्हणजे खाद्यपदार्थाविषयी वाचणं हा लोकांच्या सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे.

ब्लॉगच्या रूपाने त्याची व्याप्ती मोठय़ा प्रमाणात वाढली आणि ‘फूड ब्लॉग’ ही नवीन संज्ञा नावारूपाला आली. स्थळ, काळ, विषय यांना कुठलीही मर्यादा नसलेलं आणि कुठलाही संपादकीय हस्तक्षेप नसलेलं एखाद्या व्यक्तीचं इंटरनेटवरील स्वतंत्र व्यासपीठ अशी ब्लॉगची सर्वसाधारण व्याख्या करता येईल. त्यावर तुम्ही पाहिजे तेव्हा, मनाला वाट्टेल त्या विषयावर शब्दसंख्येची तमा न बाळगता लिहू शकता. दोन दशकांपूर्वी ब्लॉिगगला सुरुवात झाली तेव्हा लोकांनी ज्या विविध विषयांची लिखाणासाठी निवड केली त्यातलाच महत्त्वाचा विषय होता ‘फूड’. खाद्यपदार्थाविषयी लिहिण्यासाठी ‘ब्लॉग’चा उपयोग होऊ शकतो आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातील खवय्यांपर्यंत आपण पोहोचू शकतो हे नवं माध्यम लेखकांच्या ध्यानात आलं.

इंटरनेटचं जाळं वेगाने पसरायला सुरुवात झाल्यानंतर या विषयाला तर खाद्यपदार्थ बनवणं आणि खाणं याविषयी प्रेम असणं या मूलभूत अटीच पुरेशा ठरू लागल्या. वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवड असलेल्या गृहिणींनी तोडक्यामोडक्या शब्दांमध्ये घरबसल्या पदार्थाच्या पाककृती लिहायला सुरुवात केली, तर खादाडीची आवड असलेले भटके आपले अनुभव स्वत:च्या भाषेत पोस्ट करू लागले. पदार्थाविषयी लिहिताना केवळ रेसिपीचं बंधन न ठेवता खाद्यपदार्थासंबंधी विविध विषयांना यानिमित्ताने हात घालता येऊ शकतो याची जाणीव यानिमित्ताने झाली. परदेशात दोन दशकांपूर्वी ‘फूड ब्लॉगिंग’ची मुहूर्तमेढ रोवली गेली असली तरी भारतात त्यासाठी एकविसावं शतक उजाडावं लागलं. आपल्याकडे २००५-०६ च्या आसपास फूड ब्लॉिगगला सुरुवात झाली आणि अवघ्या चार-पाच वर्षांतच फूड ब्लॉग लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. उंची रेस्टॉरंटमधील पदार्थाबाबत लिहितानाच रस्त्यावरील वैशिष्टय़पूर्ण पदार्थानीसुद्धा ब्लॉगचे रकाने भरू लागले. मी दहा वर्षांपूर्वी फूड ब्लॉग लिहायला घेतला तेव्हा केवळ पदार्थाच्या रेसिपीबद्दल न लिहिता पदार्थ, रेस्टॉरंटचा इतिहास, पदार्थ बनवण्याची पद्धत आणि रेस्टॉरंटच्या भेटीत मालक, इतर गिऱ्हाईकांसोबत झालेला संवाद स्वत:च्या शब्दांमध्ये मांडण्यास सुरुवात केली. त्यातून लोकांना पदार्थाच्या रेसिपींपलीकडच्याही गोष्टी वाचायला आवडतात हे लक्षात आल्याचं ‘फाइनली चॉप्ड’ या प्रसिद्ध ब्लॉगचे लेखक कल्याण करमाकर सांगतात.

भारतात इंग्रजीमध्ये ‘फूड ब्लॉिगग’ ऑर्कुटच्या जमान्यापासून होत असलं तरी मराठीमध्ये हा ट्रेण्ड यायला थोडासा उशीरच झाला. ‘अन्न हेच पूर्णब्रह्म’ या लोकप्रिय ब्लॉगची सुरुवातही २०१४ सालची. या ब्लॉगच्या लेखिका सायली राजाध्यक्ष सांगतात, ‘‘मला खाणं, खिलवणं आणि खाद्यसंस्कृतीविषयी प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे अनेक जण माझ्याकडे सल्ले मागायचे. त्यातूनच एखादी सणक येते तसा मी ब्लॉग सुरू केला. सुरुवातीला साध्या-सोप्या रेसिपी लिहायला सुरुवात केली. नंतर लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. मग पदार्थाच्या प्रत्येक टप्प्याचे फोटो, त्यांचा उगम कुठे झाला, घटक पदार्थ कुठून आले याचाही लिखाणात समावेश करायला लागले. त्यासाठी पुस्तकं आणि विकिपीडियाचा आधार घेतला. लोकांचा मिळणारा प्रसिसाद पाहून एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे, ब्लॉग लिखाणात सातत्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.’’ लोकांसोबत जोडलेलं राहण्यासाठी आठवडय़ातून एक तरी ब्लॉग पोस्ट टाकायला हवी असं सायली यांना वाटतं. शिवाय बोलीभाषेत आणि आपलं ज्या भाषेवर प्रभुत्व आहे त्या भाषेत ब्लॉग लिहिला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता. शिवाय मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या कीबोर्डवरून हल्ली कुठलीही भाषा सहज टाइप करता येत असल्यामुळे लिहिणं अधिकच सुकर झालं आहे. सायली यांचा ब्लॉग आज जगातील ८० देशांमध्ये वाचला जातो, हे उदाहरण त्यासाठी पुरेसं आहे.

‘फूड ब्लॉग’ लिहिताना पदार्थाचा इतिहास, तो बनवण्याची पद्धत, बनवण्याच्या पद्धतीत होत गेलेले बदल, त्यामध्ये वापरले जाणारे जिन्नस, ते कुठून आणि का आले, एका पदार्थाचा दुसऱ्या प्रदेशातील पदार्थासोबत असणारा संबंध, काही पदार्थ ठरावीक प्रांतातच का मिळतात, ते विशिष्ट ऋतूतच का खाल्ले जातात, पदार्थाशी संबंधित आख्यायिका, गमतीदार गोष्टी याविषयीसुद्धा माहिती असणं आणि ते योग्य शब्दांमध्ये मांडणं हे तुमच्या ब्लॉगला वेगळं परिमाण प्राप्त करून देऊ शकतं. दस्तावेजीकरणाच्या दृष्टीनेही त्याला महत्त्व आहे, हे या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांनी लक्षात ठेवायला हवं.

फेसबुक किंवा गुगलच्या ‘ब्लॉगस्पॉट डॉट कॉम’मुळे तर चालू खात्यावरच ब्लॉग लिहिता येऊ शकतो. त्यासाठी किचकट ब्लॉग साइट्सच्या भानगडीतही पडण्याची आवश्यकता नाही. स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या उगमानंतर गेल्या पाच-सात वर्षांत ‘फूड ब्लॉिगग’चा चेहरामोहराच बदलून गेला आहे. पदार्थाच्या वर्णनासोबतच हल्ली तो पदार्थ दिसतो कसा हे पाहण्यात लोकांना अधिक रस असतो. त्यामुळे चांगले फोटो काढणारा प्रत्येक जण स्वत:ला फूड ब्लॉगर म्हणवून घेऊ लागला आहे, तर ज्यांचा लिहिण्यात हातखंडा नाही त्यांच्यासाठी ट्विटर या मायक्रो ब्लॉिगग साइटने आणि इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, िपटरेस्ट या फोटो, व्हिडीओ अ‍ॅप्सनी काम अतिशय सोप्पं करून ठेवलेलं आहे; पण केवळ पदार्थाचे फोटो किंवा व्हिडीओ टाकणं एवढय़ापुरताच हा विषय कधीच मर्यादित नव्हता. त्यामुळे आजही फोटो आणि व्हिडीओ हे स्वतंत्र विषय असले तरी त्यांना चांगल्या शब्दांची जोड असणं तितकंच आवश्यक मानलं जातं.

व्हिडीओच्या माध्यमातून ‘फूड ब्लॉगिंग’ने आणखीन एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. त्याला ‘व्लॉिगग’ असं म्हणतात. लिखाणाला असलेलं भाषेचं आणि बुचकळ्यात टाकणाऱ्या फोटोंचं बंधन व्हिडीओने मिटवून टाकलं आहे. शिवाय चांगल्या आíथक लाभांमुळेही ब्लॉगर्सनीही आता ब्लॉगकडे आपला मोर्चा वळवळा आहे. ‘डिलेक्लेटबल रेवरीज’ या पुरस्कारप्राप्त फूड ब्लॉगच्या लेखिका व्हर्निका अवल यांना वाटतं की, अगदी नवख्या लोकांचा केवळ फूड ब्लॉिगगवर उदरनिर्वाह होऊ शकत नाही. या क्षेत्रातील स्पर्धा झपाटय़ाने वाढत असून तुमचं एका विशिष्ट विषयात स्पेशलायझेशन असल्याशिवाय लोकांची त्याला पसंती मिळत नाही. शिवाय हौशे-नवशे-गवश्यांची संख्या वाढल्याने अनेक चांगले लेखक गर्दीत हरवून जातात. फेक फॉलोअर्सचा आकडा फुगवलेल्यांचीही संख्या मोठी आहे. त्याच्याच बळावर दिखाऊपणा करून विविध कंपन्यांसोबत त्यांच्या प्रॉडक्टसाठी करार केले जातात. त्यामुळे या क्षेत्रात येताना या विषयाच्या तांत्रिक बाजूही समजून घेणं गरजेचं आहे.

खरं तर आवड म्हणून लोकांनी ‘फूड ब्लॉगिंग’ करायला सुरुवात केली आणि पाहता पाहता ते आज एक स्वतंत्र करिअर म्हणून उदयाला येत आहे. असं असलं तरी या विषयाचं प्रशिक्षण देणारा कोणताही अभ्यासक्रम किंवा पदवी उपलब्ध नाही; पण इंटरनेटवर ‘फूड ब्लॉगिंग’ कसं करावं याविषयी भरपूर माहिती उपलब्ध आहे. शिवाय रोजच्या लिखाणातूनही अनेक गोष्टी शिकता येतात, असं तज्ज्ञांना वाटतं. या विषयाचं वाढतं महत्त्व लक्षात घेता ‘ब्लॉगर्स’ ही एक वेगळी जमात उदयास आली असून ऑनलाइन जगतात नव्याने दाखल होणाऱ्या मोबाइल अ‍ॅप्समध्ये त्यांना चांगली मागणी आहे. खाद्यसंस्कृतीत रस असणाऱ्यांसाठी जागा, वेळ, विषय, वय आणि भाषेचं बंधन नसल्याने ज्यांच्याकडे लिखाणाचं अंग, गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन, नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आणि तांत्रिक कौशल्य आहे त्यांच्यासाठी इथे अनेक संधी उपलब्ध आहेत. सोशल मीडियावरील अनेक पॉप्युलर हॅण्डल्सही चांगल्या लेखकांच्या नियमितपणे भेटी घडवून आणत असतात. त्यांच्या प्रवासाचा खर्च उचलतात. त्यातून वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात, प्रसिद्धी मिळते आणि अर्थार्जनही होतं.

पूर्वी या क्षेत्रात म्हणावा तसा पसा नव्हता तरीही खूप प्रामाणिकपणे लेखन केलं जात असे. आता या क्षेत्रात पसा आल्याने अर्धवट ज्ञान असलेल्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे चांगला मजकूर निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान आहे. या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांनी या गोष्टीचं भान ठेवल्यास त्यांच्या नावाचे हॅशटॅग लोकप्रिय होण्यास वेळ लागणार नाही हे नक्की.