38-lp-celeb-houseहृषीकेश जोशी
मुंबईत स्वत:चं घर असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतंच. १९९७ मध्ये मी मुंबईत आलो. नट म्हणून तेव्हाची माझी आर्थिक परिस्थिती बघता मुंबईत स्वत:चं घर हे माझ्यासाठी फक्त स्वप्नच होतं. प्रत्यक्षात उतरेल याचा कधी विचारच केला नव्हता. किंबहुना ते किती कठीण आहे याचीच जाणीव व्हायची. लग्न झाल्यानंतर तीन वर्षांनी घर घेतलं. त्यावेळी दर वर्षी घर बदलायचो. बोरिवलीमध्ये नॅशनल पार्कजवळ एका बंगल्यात तळमजल्यावर भाडय़ाने राहायचो. त्या भाडय़ाचे पैसे देण्यापेक्षा स्वत:च्याच घराचा हप्ता थोडा जास्त असला तरी स्वत:चं घर व्हायला हवं असं वाटू लागलं. ‘स्वत:ची स्पेस’ यावर श्रद्धा आणि प्रेम असल्यामुळे सतत घर शोधत होतो. घरांच्या किमती जास्त होत्या. तरीही घरं बघायचो. कोणत्या भागात घर घ्यायचं, कामाच्या वेळेनुसार काय सोयीचं होईल वगैरे विचार सतत मनात असायचे. एकदा पक्कं ठरवलं की, आता घर घ्यायचंच. या निर्णयात माझी बायको सगळ्यात जास्त ठाम होती. तिने हा विषय अतिशय गंभीरपणे हाताळला. पूर्णत्वाकडे नेला. गोरेगावात एक घर पसंत पडलं होतं. त्याच वेळी  बिंबीसारनगर येथे कमी किमतीत म्हाडाचं घर मिळेल अशी शक्यता होती. त्यासाठी टोकन मनी दिला होता. पण का कोणास ठाऊक  ६०-७० घरं जी सुरुवातीपासून बघत होतो त्यापैकी पहिलंच घर जास्त खुणावत होतं. मनात भरलं होतं. म्हाडाचं घर मी कॅन्सल केलं. म्हाडाचं घर बुक करण्याच्या चार महिने आधी जे घर डोक्यात होतं त्या घराकडे पुन्हा गेलो. तोवर ते विकलं गेलेलं नव्हतं. ते घर घ्यायचं ठरवलं. माझी बायको आर्किटेक्ट असल्यामुळे तिला लोन मिळालं. त्याच्या वरची रक्कम दोन लाख इतकी होती. ते पैसे कसेबसे गोळा केले. घरमालकाला अमुक एका तारखेला रक्कम देतो असं सांगितलं होतं. बँकेने सँक्शन केलेल्या लोनची रक्कम ज्या दिवशी मिळणार त्याच्या पाच दिवस आधी लोनच्या रकमेतले दोन लाख कमी केले. आता ही वाढीव रक्कम भरण्याचं दडपण आलं. शिवाय भाडय़ाच्या घरात सगळी बांधाबांध झाली होती. त्या रकमेसाठी आम्ही जमवाजमव करू लागलो. प्रचंड कठीण होतं. घरमालकाला या संपूर्ण घटनेमुळे खात्री पटेनाशी झाली. पुण्यातल्या बँकेने लोन सँक्शन केलं होतं. लोन सँक्शन झाल्याची डिमांड ड्राफ्टची कॉपी मी घरमालकाला फॅक्स केली. तेव्हा त्याला खात्री पटली. पुण्याच्या बँकेचा अधिकारी डिमांड ड्राफ्ट घेऊन आमच्यासोबत मुंबईला आला. रात्री एक वाजता माझ्या घराचा व्यवहार झाला. रात्री दोन वाजता आम्ही आमच्या घराची किल्ली घेतली. पाठ टेकायला स्वत:ची हक्काची जागा २००३ मध्ये आम्हाला मिळाली. दुसऱ्या दिवशी सगळं सामान लावलं. त्या दिवशी एक तर स्वत:चं घर नाहीतर फुटपाथ अशीच परिस्थिती होती. या सगळ्यात माझ्या बायकोची मला उत्तम साथ मिळाली. स्वत:चं घर होऊ शकतं असं वाटलंच नव्हतं. पण, आता ते झालंय. आता घराचं कर्जही फेडून झालं. घर रिन्यूएट केलंय. अतिभपकेबाज आमची आवड नाही. तसं न होऊ देता साधं, सुटसुटीत, देखणं, आल्हाददायी वाटेल असं घर सजवलंय. बायको आर्किटेक्ट असल्यामुळे तिनेच डिझाइन केलंय. गरजा लक्षात घेऊन घरातल्या वस्तूंची मांडणी केली आहे. मी, माझी बायको आणि मुलगा सुखाने राहतोय. माझं वनबीएचके घर आहे. त्यानंतर अनेकदा वाटलं होतं की आणखी मोठं घर घेऊ या. पण एक ठरवलंय अजून मोठं घर होईल तेव्हा होईल. पण आताचं माझं स्वत:चं पहिलं घर मी कधी विकेन असं मला अजिबात वाटत नाही. हे घर न विकता शक्य झालं तरच दुसरं घर घेईन. या घराशी असलेली इमोशनल अटॅचमेंट खोलवर आहे.
शब्दांकन : चैताली जोशी
response.lokprabha@expressindia.com @chaijoshi11