वातावरणात तणाव निर्माण झाला. संशयास्पद हालचाली दिसल्यामुळे रोमियो फाईव्हच्या नेतृत्वाखालील बिनीचे जवान पोझिशन घेऊन तयार होते. पोझिशन घेणे म्हणजे हातघाईचा प्रसंग. गोळागोळीला कधीही सुरुवात होणार होती.

सी. आर. पी. एफ. ही जगातील सर्वात मोठी निमलष्करी सेना आहे. संपूर्ण भारतात त्यांच्या २४१ बटालियन आहेत. एका बटालियनमध्ये सहा-सात कंपन्या असतात त्यापकी एक कायम प्रशिक्षण घेत असते. प्रत्येक कंपनीत १००-१३० जवान असतात. एकटय़ा बिजापूरमध्ये सहा बटालियन तनात आहेत. छत्तीसगडमध्ये नक्षलवादविरोधी अभियान राबवणारी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणात असलेली डी.आर.जी. (ऊ्र२३१्रू३ १ी२ी१५ी ॠ४ं१२ि) ही यंत्रणा आहे. यामध्ये सुमारे ७५ टक्के जवान समर्पण केलेले जुने नक्षलवादी आहेत. डीआरजी ही आक्रमक फौज आहे. कारण त्यांना जंगलांची आणि नक्षलवाद्यांच्या कार्यपद्धतीची माहिती आहे तसेच त्यांच्यात वैयक्तिक सुडाची भावना असते, त्यामुळे ही फौज जास्त यशस्वी होताना दिसते. नक्षलवादी डीआरजीला प्रचंड घाबरतात.

या उलट सीआरपीएफची अवस्था आहे. यातील जवान स्थानिक नाहीत. त्यांना गोंडी ही स्थानिक बोलीभाषा येत नाही. जंगलाची पूर्ण माहिती होईपर्यंत पूर्ण जोशाने ऑपरेशन राबवता येत नाही. त्यामुळे त्यांना बचावात्मक पावित्रा घ्यावा लागतो. सी. आर. पी. एफ. ची खासियत म्हणजे ते एकाच पोझिशनवर दोन दोन दिवससुद्धा तग धरू शकतात. त्यामुळे येथे एरिया डॉमिनेशनसाठी सी.आर.पी.एफ. आणि एन्काऊंटरसाठी डी.आर.जी. असे सरळ विभाजन आहे.

आमच्या ऑपरेशनचा मुख्य उद्देश एरिया डॉमिनेशन हा होताच, शिवाय फौजेचे अस्तिव दाखवणे हादेखील होता. फोर्स नेमेडपासून पदमूर आणि पुढे मोसलापर्यंत वेगवेगळ्या मार्गाने जाणार होती. पदमूरमध्ये ते सकाळी आरोग्य शिबीर देखील भरवणार होते. हा जनसंपर्क (पब्लिक रिलेशन) चांगले करण्याचा एक भाग होता. ज्यांचा जनसंपर्क चांगला त्यांची हानी कमी हे सूत्र सी.आर.पी.एफ. अनुभवातून शिकत आहे. आम्ही ज्या पदमूर भागात जाणार होतो तेथे गेल्या एका वर्षांत पोलीस, प्रशासनाचा एकही कर्मचारी/अधिकारी गेलेला नव्हता आणि मोसला भागात तर त्यांचे अस्तित्वच नव्हते.

बटालियन मुख्यालयात जेवण करण्याचा सी.ओं.चा आग्रह मोठय़ा प्रयासाने टाळला. कारण मला ‘जंगल पानी’ (नैसर्गिक विधी) शक्य होईल तितके टाळायचे होते. आम्ही कंपनी मुख्यालयात बाईकवरून पोहोचलो. मी तिवारी नावाच्या आरक्षक हुद्दय़ाच्या जवानाच्या मागे बसलो होतो. जाताना एका पक्ष्याचा आवाज आला, मी त्याला विचारले ‘‘ये सही में पंछी का आवाज है या अंदर के लोगों का सिग्नल है?’’ (छत्तीसगड भागात नक्षलवाद्यांचा उल्लेख नक्षलवादी असा न करता ‘अंदर के लोग’ असा करतात.) तिवारी हसून म्हणाला, ‘‘सर लगता है आपने ‘टँगो चार्ली’ बहुत बार देखी है. यहाँ ऐसा नही होता. उनका सिग्नल सिर्फ उनको समझता है और हमारा हमें.’’

कंपनी मुख्यालयात ब्रीिफग झाल्यावर रात्री दहाच्या सुमारास एक एक सेक्शन बाहेर पडू लागला. सी.ओ., जिल्हाधिकारी आणि मी मध्यभागी असणार होतो. जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि ओघाने माझ्या संरक्षणाची जबाबदारी थापा आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांवर सोपवली होती. थापा दोन र्वष एन.एस.जी. मध्ये होता.

ती पौर्णिमेची आदली रात्र होती. त्यामुळे लख्ख प्रकाश होता. त्याचा फायदा दोन्ही बाजूंना मिळणार होता. चालून पाच मिनिटे झाली आणि मी दगडात पाय अडकून साष्टांग दंडवत घातला. दोन्ही गुढघे झेजरले. थापाने मला हात धरून उठवले. पुढच्या आणि मागच्या दहा लोकांना हे कळले होते. मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. पण सी.ओ.ने धीर दिला ‘‘कोई नही, धरती को प्रणाम किया आपने मकरंदबाबू. अब सब ठीक होगा.’’  तसं पाहिलं तर माझा आगाऊपणा नडला होता. सर्वजण एका रेषेत चालले होते. मीच थोडा डाव्या बाजूला वळून जायचा प्रयत्न केला आणि पडलो. मला जंगलाचा पहिला नियम कळला, पुढच्यावर लक्ष ठेवून चालायचं. उगाच वेगळी वाट पकडायची नाही. जंगलाचे अनेक नियम मला पुढे कळणार होते. मी स्वत:ला समजावले की मी यांच्यासारखा प्रशिक्षित नाही. त्यामुळे मी त्यांची बरोबरी करू शकणार नाही, पण आपल्याकडून चुका होणार नाहीत आणि आपला त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची. माझा विचार चांगला होता पण अंमलबजावणी पातळीवर आनंद होता. माझे दोन्ही हात मोकळे होते. ते मी स्वेटरच्या खिशात घालून चालत होतो. अचानक मला आधाराला काही असावे अशी ‘हुक्की’ आली आणि मी बाजूला पडलेले एक लाकूड उचलले आणि त्या लाकडावरचे २०-२५ लाल डोंगळे माझ्या हातावर चढले. थापाने कसला तरी स्प्रे मारेपर्यंत त्यांच्यातल्या दोन-तीन डोंगळ्यांनी माझ्या हाताचा कडकडून चावा घेतला होता. मला दुसरा नियम कळला, जंगलात कुठल्याही वस्तूला खात्री केल्याशिवाय हात लावायचा नाही.

सुमारे ३० मिनिटे चालून झाल्यावर आम्ही सकाळच्या ‘चित्रातील’ जागेवर येऊन पोहोचलो. सकाळी ती जागा जितकी सुंदर वाटत होती त्याहून रात्री जास्त सुंदर वाटत होती. आम्हाला भेरुडी नदी गुडघाभर पाण्यातून सुमारे ५० मीटर चालत पार करायची होती. आम्ही नदी पार करून वाळूत आलो. आजूबाजूला पाहिल्यावर लक्षात आलं की, त्यांना आमच्यावर आक्रमण करण्यासाठी ही अत्यंत योग्य जागा होती. घनदाट झाडांनी वेढलेल्या मध्यम उंचीच्या टेकडय़ांचा आडोसा घेतल्यास निसरडे टोकदार दगड असलेली नदी पार करताना चालीने मंदावलेल्या फौजेवर थेट निशाणा साधता येणार होता. आख्खी कंपनी नष्ट करणे १५ जणांच्या समूहाला सहज शक्य होते. आमच्या अध्र्याहून अधिक फौजेने अजून नदी पार करायची होती. आत्ता आक्रमण झाले असते तर केवळ नशीब बलवत्तर असेल तरच आम्ही वाचणार होतो. आमच्याकडे बंदूकदेखील नव्हती. असती तरी तिचा उपयोग झाला नसता. ‘लन्र्ड हेल्पलेसनेस’ या संज्ञेचा आम्हाला प्रत्यय येत होता. जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मी, आम्ही आमच्या एकमेकांच्या भावना ओळखल्या. मग मन वळवण्यासाठी आम्ही ध्रुव तारा शोधायला सुरुवात केली. सप्तर्षी दिसत नव्हते, त्यामुळे ध्रुवतारा दिसणार नव्हता. जिल्हाधिकाऱ्यांनी मला मृग नक्षत्र दाखवले. मी त्यांना रोहिणी आणि कृत्तिकेचा पुंजका दाखवेपर्यंत पुढे चालण्याची ऑर्डर आली होती. पुढे जाण्याआधी आम्ही काऊंट घेतला. माझा नंबर पुढून ४४ आला. संख्याशास्त्राप्रमाणे मागून काऊंट घेताना तो ५१ येणे आवश्यक होते. कारण आम्ही ९४ जण होतो. सुदैवाने तो ५१ आला. थोडय़ाच वेळात काऊंट बरोबर आल्याची खात्री करून पुढील मार्गक्रमणा सुरू झाली.

कडाक्याच्या थंडीचा, जंगलातल्या निबिडतेचा सराव व्हायला सुरुवात झाली होती. जिल्हाधिकारी माझ्या पुढे होते त्यांच्यावर लक्ष ठेवून चालत राहिलो. मनात विचार येत होते. मुख्यमंत्र्यांनी तेंदूपत्ता संग्रहाकांना एक हजार २५० कोटी रुपये बोनस म्हणून वाटले. त्यांना बोनस मिळाला म्हणजे जास्त तेंदूपत्ता तोडायला प्रोत्साहन मिळाले. आता ते जास्त तेंदूपत्ता तोडतील त्याची जास्त तंबाखू, विडय़ा तयार होतील. त्यातून व्यसनाधीनता वाढेल, रोग वाढतील. या बोनसच्या पशाचा थेट ४० टक्के वाटा नक्षलवादी घेतील, त्यातून नवी शस्त्रे घेतील. या जिल्ह्य़ाला जिल्हा खनिज फंडातून १५० कोटी मिळाले. त्यातील काही वाटा आरोग्यव्यवस्थेवर खर्च झाला. १२५०:१५० हे गुणोत्तर व्यस्त आहे की अस्ताव्यस्त? समस्या गुंतागुंतीच्या आहेत की त्या प्राधान्यक्रम चुकल्यामुळे गुंतागुंतीच्या झाल्या आहेत ? यावर उपाय काय आहे?

एक छोटा ओहळ लागला. त्याच्या मध्यभागी एक दगड होता, त्यावर पाय ठेवून कलेक्टर पुढे गेले. मीपण तसाच जाणार तोच थापाने माझा हात पकडून मागे ओढले. मी खिळून उभा राहिलो. पांढऱ्या रंगाची अर्धवर्तुळे नागमोडी वळणाने संथगतीने पुढे जात होती. तो सुमारे दोन फूट लांबीचा मण्यार (क्रेट) होता. थापाला तो कसा दिसला माहीत नाही. मण्यार म्हणजे अतिविषारी न्यूरोटोक्सिक सर्प. भारतात सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंपकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त मण्यार दंशामुळे होतात. ‘‘चलिये सर’’ थापाचा आवाज आला आणि मी चालू लागलो.

आता मला कुटरूच्या मुलींचे चेहरे दिसू लागले. सरस्वती, अनिता, मालती, प्रिया, आसमाही आणि बऱ्याच. बहुतेकींना खरुज झालेली. उवा तर सगळ्यांच्याच केसांत होत्या. पण शासनदरबारी उवांवरच्या औषधाची तरतूद नाही. त्यासाठी ‘विशेष बाब’ करावी लागेल. त्यासाठी वेळ लागेल. या मुलींचे भविष्य काय? चुणचुणीत तर सगळ्याच होत्या. त्यातल्या फारच थोडय़ा शिकतील. शिक्षिका-नर्स होतील. बऱ्याच मधेच शाळा सोडतील. त्यांची लहान वयात लग्ने होतील. लहान वयात मुलेपण होतील. काही प्रसूतीच्या वेळी दगावतील. काही अपप्रचाराला बळी पडून ‘आत’ जातील. त्यातील काही लाल वासनेची शिकार होतील. काहींवर लाखांची बक्षिसे लागतील. त्यातील एखादी समर्पण करून बाहेर येईल. कदाचित आमदार बनेल..

थापाच्या मागेच रेडिओ सेट घेतलेला जवान चालत होता. त्याच्या रेडिओ सेटवर खर-खर झाली. मी फक्त ‘‘रोमियो-एट, धीस इज रोमियो फाईव्ह’’ इतकेच ऐकले. कारण तोपर्यंत तो सी.ओ.जवळ गेला होता. सर्वाना थांबायचा आदेश आला. जिल्हाधिकाऱ्यांना आणि मला दोन झाडांच्या आडोशाला नेण्यात आले. थापा आणि त्याचे साथीदार आमच्याभोवती कोंडाळे करून उभे राहिले. सी.ओ.च्या खांद्यावरची ए.के. ४७ हातात आली. त्यांनी कमरेला बांधलेली मॅगझिन्स चाचपडून पाहिल्याचे जाणवले. वातावरणात तणाव निर्माण झाला. संशयास्पद हालचाली दिसल्यामुळे रोमियो फाईव्हच्या नेतृत्वाखालील बिनीचे जवान पोझिशन घेऊन तयार होते. पोझिशन घेणे म्हणजे हातघाईचा प्रसंग. गोळागोळीला कधीही सुरुवात होणार होती. सुमारे १७ मिनिटे अशीच तणावपूर्ण शांततेत गेली आणि लवंगी फटाक्याची माळ सुटी करून एकच फटका उडवल्यावर जितका आवाज होतो तितका आवाज झाला. सी.ओ.चा चेहरा उतरला. तो आवाज म्हणजे ‘संत्री’ने (नक्षलवाद्यांचा खबरी) फोर्स आल्याचा दिलेला इशारा होता. मोठे सावज निसटले होते.

नक्षलवाद्यांची ही अत्यंत जुनी आणि प्रभावी पद्धत. या सुटय़ा फटाक्याचा आणि भरमारच्या गोळीचा आवाज सारखाच येतो. भरमार ही एक तोडय़ाची बंदूक असते. हे एक मूलभूत हत्यार आहे. नक्षलवाद्यांच्या दलाच्या (संगम) शिपायांकडे या बंदुका असतात. काही जणांकडे ३०३ असतात, काही जणांकडे चक्क तीर-कामटे असतात. दलम कमांडर आणि वरच्या अधिकाऱ्यांकडे  ए.के. ४७ असतात. त्यांचे सर्वात मोठे हत्यार आय.डी. हे आहे. आय.डी.च्या साह्य़ाने अत्यंत मूलभूत गोष्टी वापरून, कमीत कमी धोका पत्करून प्रतिपक्षाची जास्तीत जास्त हानी करता येते. काही वर्षांपूर्वी अशाच फटाक्यांच्या आवाजाला भरमारच्या गोळीचा आवाज समजून सी.आर.पी.एफ.च्या जवानांनी २० अंदाधुंद राऊंड फायर केले होते. त्यामुळे नक्षलवाद्यांना त्यांच्या पोझिशन आणि ताकदीचा अंदाज आला आणि त्यांनी माघार घेण्याआधी सात जवानांना टिपले होते. पण आता सी.आर.पी.एफ. देखील शहाणी झालेली होती, त्यामुळे या वेळी गोळीबार झाला नाही. मोसलाच्या दिशेने गेलेल्या रोमियो टेनला सतर्क केले गेले. रोमियो फाईव्हला आता पुढे जाण्यात धोका दिसत नव्हता. पण सी.ओ.ची ऑर्डर हवी होती. सी.ओ.ने प्रथम काऊंट घेण्याची ऑर्डर दिली. माझा नंबर पुढून ४४ आला. सुदैवाने तो मागून ५१ आला. थोडय़ाच वेळात काऊंट बरोबर आल्याची खात्री करून पुढील मार्गक्रमणा सुरू झाली. अंग गरम झाल्याने एव्हाना मी स्वेटर काढून ठेवला होता. आमचा बेस कॅम्प पदमूर या गावी असणार होता. तेथे दोन वाजता पोहोचायचे नियोजन होते, पण आम्ही अर्धा तास उशिरा पोहोचलो. काही सेक्शन्सनी गावात शोधाशोध केली तेव्हा गावात एकही पुरुष नसल्याचे दिसले. फोर्सला घाबरून सुमारे सात नक्षलवाद्यांसह सर्व पुरुष जाच नको म्हणून पळून गेले होते.

सर्वजण सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर एका डेरेदार वृक्षाखाली आम्ही आमची पथारी पसरली. एक मोठी ताडपत्री, त्यावर दोन-तीन चादरी पसरून सी.ओ., जिल्हाधिकारी आणि मी आपापल्या स्लीिपग बॅगमध्ये शिरलो. झोपण्याआधी मी आजूबाजूला काही सुळसुळतंय का हे पाहण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. कारण तो तुकतुकीत मण्यार माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. पण शिणवटा इतका आला होता की लगेच झोप लागली.

जाग आली तेव्हा साडेपाच वाजले होते. उणेपुरे अडीच तास मी झोपलो होतो, पण फ्रेश वाटत होते. रात्रभर टपटप आवाज करत दवाचे थेंब पडत होते. स्लीिपग बॅग आणि चादरी ओल्या झाल्या होत्या. जिल्हाधिकारी आणि सी.ओ. संथ लयीत घोरत होते. त्या उमद्या अधिकाऱ्यांना मी एकवार बघून घेतले आणि दीर्घ श्वास घेत ती अतिशुद्ध हवा फुप्फुसात भरत तसाच बसून राहिलो. रात्रभर जंगलातून चालणे हे एक मेडिटेशन होतं. शांतता मिळवायला लोक काय काय करतात. पण आपलं शरीर, आपलं मन हे शांतता, तल्लीनता याचं एक कोठार आहे. फक्त त्या कोठाराचा दरवाजा असा सापडावा लागतो.

सहा वाजण्याच्या सुमारास थोडे फटफटले तेव्हा कळले की थापा आणि त्याचे तीन साथीदार आमच्यावर पहारा करत रात्रभर उभे होते. मला थापाशी बोलायची खूप इच्छा होती. काल रात्री ती राहून गेली होती, कारण ऑपरेशनमध्ये बोलायला पूर्ण बंदी असते. अगदीच जरूर पडली तर कुजबुजत बोलायचे असते आणि कुजबुजत बोलणे मला कधीच शक्य झाले नसते.

हळूहळू उजाडत होतं तसतसा फोर्सच्या फॉम्रेशनचा अंदाज आला. ४०० मीटरच्या परिघात चार-पाचच्या गटाने जवान पहारा करत होते. मी थापाजवळ गप्पा मारायला गेलो. बसके नाक, डोळ्यांच्या खोबणी, गाल थोडे वर आलेले असा थापा बुटका या प्रकारात मोडणारा होता पण शरीरयष्टीने काटक होता. त्याचा युनिफॉर्म आणि ए.के ४७ काढली असती तर तो सनिक आहे असे कोणाला वाटले देखील नसते. मिझोरामचा थापा ३२ वर्षांचा होता. त्याचे पूर्वज स्थलांतरित होते. त्याची बायको सातवीपर्यंत शिकलेली होती आणि त्यांना सात वर्षांची एक मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा होता. त्याचा भाऊ जमशेदपूरला कारखान्यात होता आणि कुटुंबासह तिथेच राहात होता. त्याची आई चहाची टपरी चालवत होती. ‘‘आप मुंबई आये है कभी?’’ मी विचारले ‘‘जी सर एक बार.’’ मला सर म्हणू नको असे बजावूनसुद्धा त्याने मला सर म्हणणं सोडलं नव्हतं. मी पुढे विचारलं ‘‘कब?’’ ‘‘२६/११ हुआ था तब मैं एन.एस.जी. में था, तब आया था..लेकिन मं कव्हर में था. अंदर नहीं गया’’ थापाने शांतपणे प्रांजळ उत्तर दिलं. मी स्तब्ध झालो. मी मनात म्हणालो, मुंबईच्या काही चमको पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांनी न गाजवलेल्या शौर्यावर २०० पानांचं पुस्तक लिहिलं आणि हा सरळ सांगून मोकळा झाला की मी कव्हरमध्ये होतो. ‘‘तू जे गुणगुणत होतास ते खूप छान होतं, काय अर्थ आहे त्याचा?’’ थापा चक्क लाजला, तो सांगतच नव्हता. पण शेवटी बोलला की ते पहाडी भाषेतलं विरहगीत आहे. थापा गेल्या दहा दिवसांत त्याच्या बायकोशी बोललेला नाही. इथे नेटवर्क असतं तेव्हा तिथे नसतं आणि तिथे असतं तेव्हा इथे नसतं. दोघांचं नेटवर्क आहे असा योग जुळून येतं तेव्हाच त्याचं बोलणं होतं. थापाने अचानक उठून सावधानमध्ये पोटावर आडवा हात ठेवला. तोपर्यंत सी.ओ. आमच्याजवळ आला होता. ‘‘क्यों मकरंद बाबू, रात कैसी रही?’’ त्याने विचारलं. ‘‘मस्त रही सर, थापा के शब्दों में बयान करूं तो ये रात फिर ना आएगी, ये रात भूल ना पाएगी.’’ सी.ओ.ने थापाकडे मिस्कीलपणे पाहिलं. थापा ‘‘क्या कह रहे है सर.’’ म्हणत पुन्हा लाजला. सी.ओ.चं लक्ष माझ्या फाटलेल्या विजारीकडे आणि त्यावर लागलेल्या रक्ताच्या डागाकडे गेलं. म्हणाला, ‘‘आपको तो बुरी चोट आई है, अभी कॅम्प लगेगा तो दवा लगा लेना.’’ तो बोलला ते खरं होतं, जखम झाली होती आणि त्याला विजारीचं कापड लागल्यावर आणखी हुळहुळत होती. तो प्रसंग आठवून मी पुन्हा शरिमदा झालो. अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेल्या त्या सी.ओ.ने ते लगेच ओळखलं. तो पाठीवर थाप मारून म्हटला, ‘‘आपने बहुत अच्छा किया, आप और डी.एम. साहब तो हमसे भी ज्यादा िहमतवाले  है, कोअर नक्षल एरिया में बिना हथियार के आ गये. भाई मान गये आपको.’’ यावर मी फक्त कसनुसं हसलो.

जिल्हाधिकारी उठले होते, त्यामुळे आम्ही तिकडे गेलो. ‘‘मकरंद तुझी सनई फार जोरात वाजते.’’ माझ्या घोरण्याकडे निर्देश करून ते मला म्हणाले. मला जंगल पानी करायचे नव्हते त्यामुळे त्यांना सोडून मी जवानांच्या दुसऱ्या घोळक्यात सामील झालो. त्यांची चहा बनवायची तयारी चालू होती. ‘‘िनद हुई ना सर अच्छी? और चलना है आगे.’’  ‘‘हां आप ही के कंधे पर सर रखके सोया था’’ ‘‘डर तो नहीं लगा?’’ ‘‘लगा! साप का बहुत डर लग रहा था.’’  ‘‘अरे सर दस साल से फौज यहां है, अब तक एक भी जवान साप काटने से नहीं मरा.. यहाँ इन्सान ही इन्सान का सबसे बडम दुश्मन है.’’

आम्ही चहा घेतला तोपर्यंत मोसला भागात गेलेल्या फौजा परत येऊ लागल्या. पदमूरमधून पळून गेलेल्या नक्षलवाद्यांना मोसलामध्ये पुन्हा फौजेचा सामना करावा लागला. मोसलामध्येही फौज असेल याचा त्यांना जरा देखील अंदाज नव्हता त्यामुळे त्यांची पुरती तारांबळ उडाली. पण महिला आणि लहान मुलांची ढाल करून मोसलामधून देखील त्यांना पोबारा करण्यात यश मिळाले. डेप्युटी कमांडट मोहंतीला िभतीवरून चढून जाताना एक नक्षलवादी दिसला पण त्याला टिपणार तोच एक लहान मुलगा मध्ये आला. पण त्याला त्या गावात नक्षल वॉरंट असलेले तीन लोक सापडले. तीन वर्षांपासून ते पोलिसांना हुलकावणी देत होते. मोबाइलवरच्या फोटोवरून त्यांची ओळख पटवली गेली होती. त्यातला एक नक्षलींचा प्रोपोगांडा मास्टर होता. त्याचा होल्ड इतका होता की गावातल्या सगळ्या महिला रात्रभर पायपीट करून त्याच्याबरोबर फौजेसोबत आल्या होत्या. कारण फौज मध्येच एन्काऊंटर करते ही भीती आणि नक्षलवाद्यांनी दिलेले प्रशिक्षण. त्यांना जायला सांगून देखील त्या जात नव्हत्या. त्यामुळे त्यांनासुद्धा मुख्यालयात नेण्याचे ठरले. तो प्रोपोगांडा मास्टर पक्का मुरलेला होता. रात्रभर मोहंतीबरोबर िहदी बोलणारा तो सी.ओ. आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर फक्त गोंडी बोलू लागला. त्यामुळे आता त्याची चौकशी जिल्हा पोलिसांच्या मदतीने संयुक्तपणे करायची होती.

मोहंतीने आणखी एका मांडू नावाच्या मुलाला पकडले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला विश्वासात घ्यायचा प्रयत्न केला पण तो सगळ्याची उत्तरे माहीत नाही अशीच देत होता. आम्ही झोपलेल्या झाडाकडे निर्देश करून हे झाड कोणते आहे हे ते तरी सांग असे बोलल्यावर त्याने ते झाड मोहाचे आहे असे सांगितले. म्हणजे रात्रभर आम्ही मोहाच्या झाडाखाली झोपलो होतो.

आरोग्य शिबिराचा तसा बोजवारा उडाला. कारण गावकऱ्यांना आता त्यात इंटरेस्ट नव्हता. त्यांनी फक्त औषधे ठेवून घेतली. मला तिथल्या मुलांशी संवाद साधायचा होता पण भाषेच्या अडचणीमुळे ते पण जमले नाही. पी.आर. फारसा चांगला झाला नाही याची सल सी.ओ. च्या चेहऱ्यावर दिसत होती.

त्यातल्या एका म्हाताऱ्या बाईला जिल्हाधिकारी आल्याचे कळले आणि ते तिला कळल्याचे फक्त जिल्हाधिकाऱ्यांनाच कळले. ते त्यांना कसे कळले याचे उत्तर मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी मला अजून दिलेले नाही.

सुमारे आठ वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. यावेळी आम्ही आल्या वाटेपेक्षा वेगळी वाट निवडली होती. हेसुद्धा सी.आर.पी.एफ.ला अनुभवातून आणि काही बळी गेल्यानंतर आलेले शहाणपण. परतीच्या प्रवासात सहसा माणूस थोडा गाफील होतो. नक्षलवाद्यांनी अनेक वेळा या गाफीलपणाचा फायदा घेऊन डाव साधलेला आहे.

मला रात्रीच्या आणि सकाळच्या जंगलात जास्त फरक वाटत नव्हता. रातकिडे सकाळीसुद्धा कीरकीर करत असतात हे मला या प्रवासात कळले. मला का कोण जाणे आता माझ्या घरच्यांची आठवण येऊ लागली. मी असे काही करत आहे याचा त्यांना थांगपत्ता नव्हता. आम्ही चालत होतो तेवढय़ात थांबण्याचा इशारा आला. काही वेळाने आम्ही पुन्हा चालू लागलो. एका शेतात उतरलो तर आम्हाला तीन चपलांचे जोड उलटे पालटे पडलेले दिसले. पुढे जाऊन कळले की आणखी तीन नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. ते पकडले किंवा मारले गेले असते तर ती सी.आर.पी.एफ.चं मोठं यश ठरलं असतं. कारण त्यांच्याजवळ भरमार होते. डेप्युटी कमांडर नायकने त्यांना लोकेट केले पण प्रोपोगांडा मास्टरसोबत आलेल्या महिलांची ढाल करून पोझिशन घेईपर्यंत नक्षलवादी पळून गेले. त्यांचा पाठलाग करण्याची ताकद फक्त डी.आर.जी. मध्ये होती आणि ती या वेळी आमच्यापासून किमान ४० किमी अंतरावर असलेल्या जंगलात अभियान राबवत होती. कारण काहीही असो, तोडय़ाची बंदूक ए.के.४७ ला भारी पडली होती. सी.आर.पी.एफ. बद्दल आदर आणि नक्षलवाद्यांबद्दल चीड असूनदेखील कोणाचेच रक्त सांडू नये अशी माझी मनोमन इच्छा होती. ती पूर्ण झाली होती.

११ च्या सुमारास आम्ही कंपनी हेड क्वार्टरला पोहोचलो. आम्ही शेवटचा काऊंट घेतला. माझा नंबर पुढून ४४ आणि मागून ५१ आला. आम्ही सगळे सुखरूप परत आलो होतो. सी.ओं.नी नेव्हिगेटरवरून कन्फर्म केले. जी.पी.एस. मध्ये एरियल डिस्टन्स २६ किलोमीटर येत होतं. म्हणजे आम्ही सुमारे ३१ किलोमीटर चाललो होतो. मोसलावाले दहा किलोमीटर जास्त चालले होते. सी.ओ. चे ब्रीिफग झाल्यानंतर मी जवानांसमोर समोर कृतज्ञता व्यक्त केली.

मला जाण्याआधी थापाला भेटायचे होते. थापा आमच्याबरोबर सावलीसारखा राहिला. वेळ पडल्यास तो आमच्यासाठी त्याचे प्राण देण्यात मागेपुढे पाहणार नव्हता. त्याच्या बराकीत गेलो तेव्हा तो आराम करायच्या तयारीत होता.माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नव्हते, मी त्याला आिलगन दिले. ‘फिर मिलेंगे सर’ तो विश्वासाने म्हणाला. पण असे होणे ही अशक्यप्राय घटना होती. मी आता त्याला पुन्हा कधीही भेटणार नव्हतो. तो एक आरक्षक हुद्दय़ाचा शिपाई होता त्यामुळे त्याच्या आयुष्यातल्या कोणत्याच घडामोडीची बातमी प्रसिद्ध होणार नव्हती. मी नास्तिक आहे. पण आता त्याच्यासाठी मी रोज प्रार्थना करणार आहे. कारण माझ्याकडे त्याच्यासाठी करण्यासारखे दुसरे काहीच नाही.

आमच्या ऑपरेशनला संमिश्र यश मिळाले होते. जिथे फोर्स पोहोचली नव्हती तिथे ती पोहोचली. साहजिकच नक्षलवाद्यांच्या हालचालीला आळा बसणार होता. जिल्हाधिकारी मोहिमेत सामील झाल्यामुळे फोर्सचा हौसला शतपटींनी बुलंद झाला होता. ती म्हातारी बाई जिल्हाधिकारी कलेक्टर आल्याची खबर आजुबाजूच्या परिसरात पोहोचवणार होती. त्याचा ही सकारात्मक परिणाम होणार होता.

सी.आर.पी.एफने काही तांत्रिक, सामरिक चुका केल्या. नदी पार करताना ते जास्त वेळ थांबले. ते एका रेषेत सरळ चालतात त्यामुळे त्यांना व्हर्टकिल रेंज मिळते; पण दोन फुटांपलीकडे समांतर रेंज मिळत नाही. त्यामुळे चार-पाच फुटांवर दबा धरून बसलेले नक्षलवादी डाव साधू शकतात. या उलट डी.आर.जीचे लोक छोटय़ा सेक्शन्समध्ये समांतर चालतात त्यामुळे त्यांना दोन्ही रेंज मिळतात.

सी.आर.पी.एफचे मुख्य कार्य जमाव नियंत्रणात ठेवणे, संचारबंदी लागू असलेल्या भागात गस्त घालणे अशा पद्धतीचे आहे. आणि फार फार तर ते एक महिना चालेल असे गृहीत धरलेले आहे. कायम युद्ध क्षेत्रात राहणे हे सी.आर.पी.एफ.चे काम नाही. जंगल युद्धासाठी ते प्रशिक्षितदेखील नाहीत. नक्षल भागात काम करताना डिफिकल्ट एरिया पोस्टिंग म्हणून त्यांना ५० टक्के जास्त पगार मिळतो. पण त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी जास्त प्रयत्न केले पाहिजेत. डी.आर.जी. आणि सी.आर.पी.एफ. यांच्यात समन्वय असला पाहिजे आणि शक्यतो संयुक्त मोहिमा राबवल्या पाहिजेत. एरिया डॉमिनेशनची वारंवारिता वाढवली पाहिजे.

नक्षलवादी आणि फोर्स या दोघांमध्ये ज्याचा जनसंपर्क चांगला आहे त्याची सरशी होते. गावकऱ्यांनी मदत केली नाही तरी चालेल; पण ते निष्क्रिय राहणे हे दोघांच्या फायद्याचे ठरते. त्यामुळे त्यांना वश करण्यासाठी दारू आणि इतर प्रलोभनांचा अवलंब केला जातो. त्याऐवजी प्रशासनाशी समन्वय साधून गावात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होईल, सुसंवाद निर्माण होऊन विश्वासार्हता वाढीस लागेल असे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सन्यासोबत वावरल्याचे भारावलेपण जाणवत असतानाच वास्तव नजरेआड होऊ नये याचा मी आटोकाट प्रयत्न केला. जिल्हाधिकारी आणि मी ‘आत’ जाऊन आलो यावर प्रथम कोणाचाच विश्वास बसला नाही. हा प्रामाणिक, कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी चमको नसल्यामुळे त्याची माध्यमातदेखील चर्चा झालेली नाही.

युद्धस्य कथा: रम्य: या उक्तीचा प्रत्यय मात्र मला या प्रसंगानंतर आला. कारण हा अनुभव किमान सातआठ वेळा वेगवेगळ्या समूहात कथन करावा लागला.

बिजापूर सोडण्याआधी कल्याणीबरोबर पोटा-केबिनमध्ये जाण्याचा योग आला. पोटा-केबिन ही संकल्पना पूर्णपणे छत्तीसगडची संकल्पना आहे. ही एक प्रकारची आश्रमशाळा असते; पण तिचे बांधकाम असे असते की तिचे एका जागेहून दुसऱ्या जागेत सहज स्थलांतर करता येते. एका पोटा केबिनमध्ये मलेरिया आणि अतिसाराची फिल्मद्वारे माहिती देतानाच कल्याणीने एक उपक्रम घेतला. प्रत्येक मुलीला छोटय़ा चिठ्ठय़ा देण्यात आल्या आणि त्यावर तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टी लिहायला सांगितल्या. मुलींना फक्त एकाच गोष्टीची भीती वाटत होती ती म्हणजे डास! कारण त्यांना सरासरी दोन वेळा तरी मलेरिया झाला होता. नक्षलवाद्यांची भीती वाटते असे कोणीही लिहिले नव्हते. हे चित्र आशादायक होते, पण त्याचे तीन निष्कर्ष निघत होते.

त्यांना खरोखर त्यांची भीती वाटत नाही. कारण ते त्यांना आपले वाटतात. त्यांना आमच्याबद्दल काहीच लिहायचे/बोलायचे नाही अशी नक्षलवाद्यांनी ताकीद दिली असेल.

या निष्कर्षांवरून अनुमान निघायला वेळ जाऊ द्यावा लागणार होता. पण त्यांच्या मनातील डासांचे  भय घालवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यास कल्याणी सुरुवात करणार होती.

बिजापूरमध्ये सर्वात भावलेली गोष्ट कोणती तर ती म्हणजे विविधतेतील एकता. भिन्न प्रांतांचे, भाषेचे लोक येथील समस्यांवर मात करायला माणूस म्हणून एक होतात ही घटनाच मुळी लक्षवेधी आहे. येथे शिरूरचा जिल्हाधिकारी आहे, बार्शीची डॉ. ऐश्वर्या आहे, विदर्भातील कल्याणी-पवन हे जोडपं आहे, तामिळनाडूचा नागुलन आहे, दिल्लीचा सी.ओ.जोहरी आहे, उत्तरप्रदेशचा तिवारी, ओरिसाचा मोहंती, कर्नाटकचा नायक, बिहारचा रामनिवास, मिझोरामचा थापा अशी अनेक माणसं एकत्र येऊन काम करत आहेत.

मी या भागातील समाजाच्या सर्व थरातील लोकांना भेटलो. पण त्यांच्या अस्तित्वाचे मूळ कारण असलेल्या नक्षलवाद्यांना भेटलो का? याचे थेट उत्तर नाही असे आहे. पण अधिक खोलात जाऊन विचार केला तर मी नक्षलवाद्यांना भेटलो किंबहुना माझ्या तेथील वास्तव्याचा एकही क्षण असा नव्हता की मी नक्षलवाद्यांना भेटलो नाही. कुटरूच्या मधुकर राव आणि त्यांच्या अनाथ आश्रमातील मुलींमध्ये, सी.आर.पी.एफच्या जवानांमध्ये मी नक्षलवाद्यांना, त्यांच्या विचारसरणीलाच तर भेटत होतो. पण हेसुद्धा इतके साधेसरळ नाही. नक्षलवाद्यांचे सध्याचे प्रारूप सोडा, पण नक्षल चळवळीचा जन्म का झाला? शोषणामुळे? शोषण कोण करत होते? जमीनदार, शासन व्यवस्था. या शासनकर्त्यांना निवडून कोण देत होते? आपण !! म्हणजे या सर्वाच्या मुळाशी आपणच आहोत काय? मग आपणच निर्माण केलेल्या समस्येवर मात करायला आपण एक होतो ही मोठी घटना आहे काय?

आज नक्षलवाद्यांचे उच्चाटन करण्यासाठी का होईना, पण सरकारला आदिवासी, त्यांच्या समस्या, इच्छा-आकांक्षा यांची नोंद घावी लागत आहे. पुढील २५ वर्षांच्या काळात नक्षलवादाचा बीमोड होईल. त्यानंतर शासन आदिवासींच्या विकासासाठी, जंगलांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहील? लोकमताचा दबाव राहिला तर निश्चितच!!

नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी काय करावे तर लोककल्याणकारी योजना धडाक्याने राबवाव्यात आणि पोलीस यंत्रणेने कायदा व सुव्यवस्था राखावी. या दोन्ही यंत्रणांनी समन्वयाने आणि सहकार्याने वागावे. हे अनेक विचारवंत, सामाजिक कार्यकत्रे यांच्या अनुभवातून, विचारमंथनातून व्यक्त झालेले आणि आंध्रप्रदेशने यशस्वी केलेले मॉडेल आहे. बिजापूर हा एका मागास राज्यातील दुर्गम जिल्हा. याच जिल्ह्य़ात एक चांगला अधिकारी हे मॉडेल अनेक अडचणींचा सामना करत राबवताना दिसत आहे. त्याची फळे आत्ता कुठे दिसू लागली आहेत.

पण याला वास्तवाची एक भेदक किनार आहे. ही व्यवस्था एका अधिकाऱ्यावर आणि त्याच्या कर्तव्यदक्षतेवर अवलंबून आहे. त्याची कधीना कधी बदली होईलच. नव्याने आलेल्या अधिकाऱ्याची मानसिकता, विचारसरणी वेगळी असेल. एखाद्या मंत्र्याशी/आमदाराशी वाद होऊन हा अधिकारी येथे ‘पनिशमेंट पोिस्टग’वर आला असेल तर तो आपला कार्यकाळ पूर्ण करण्यावर भर देईल. सध्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या भरवशावर येथे आलेल्या व्यक्तींचा भ्रमनिरास होऊन ते आपापल्या प्रदेशात पुन्हा जातील आणि दीड वर्षांत महत्प्रयासाने उभी राहिलेली यंत्रणा, वाढीस लागलेली विश्वासार्हता एका क्षणात धुळीस मिळेल.

हा दोष व्यवस्थेचा आहे. पण ही व्यवस्था आपणच निर्माण केलेली आहे. त्यामुळे अंतिम जबाबदारी आपलीच आहे आणि ती आपण झटकली तर ‘‘ये पावन धरती यहां की, इसे चंदन बनाना है’’ असं एकसुरात म्हणणाऱ्या मुलांच्या मनातील आशावाद नष्ट होईल आणि या ओळी म्हणजे शब्दांचे बुडबुडे ठरतील. असं होऊ नये यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे.
(उत्तरार्ध)
मकरंद दीक्षित – response.lokprabha@expressindia.com