-सुनिता कुलकर्णी

करोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणारे मृत्यू याची सर्वसामान्यांच्या मनात इतकी धास्ती निर्माण झाली आहे, की आपलं अचानक बरवाईट काही झालं तर पुढची सारवासारव आधीच केलेली बरी असाही विचार केला जातो आहे. या सारवासारवीमध्ये मुख्यत: येते आर्थिक बाजू. ज्यांनी आयुष्यभर पै पै जमवून घरं उभी केली आहेत, गुंतवणूक केली आहे, सोनंनाणं साठवलं आहे, त्यांच्यासाठी आर्थिक हिशेब करायला तशी हाताची दहा बोटं पण जास्त होतात. पण पुढच्या पिढीला तोशीस लागणार नाही, अशी आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबांची संख्याही समाजात कमी नाही.

पण गंमत म्हणजे खाऊनपिऊन सुखी असलेले असोत की सुबत्तेचं जिणं जगणारे असोत, गेले दोन महिने या दोन्ही थरांमधून लॉ फर्मकडे किंवा व्यक्तिगत पातळीवर वकिलांकडे आपल्या संपत्तीच्या वाटपाचं इच्छापत्र कसं करायचं, इच्छापत्र आणि मृत्यूपत्र यामध्ये काय फरक असतो याची विचारणा होते आहे.

वास्तविक इच्छापत्र आणि मृत्यूपत्रात काही फरक नसतो. मृत्यूपत्र हा शब्दही उच्चारायला काही लोकांना आवडत नाही आणि इंग्रजीमधल्या विल या शब्दाचे भाषांतर म्हणून इच्छापत्र हा शब्द आला. इच्छापत्र करण्यासाठी वकिलाकडे जायचीही गरज नसते. लेजर पेपरची (हिरव्या रंगाचा जाडसर कागद) टिकण्याची क्षमता चांगली असल्यामुळे ते सहसा लेजर पेपरवर करतात. इच्छापत्र कितीही वेळा करता येते. पण ते नवीन केले की जुन्या इच्छापत्राचा आणि ते रद्द करत असल्याचा त्यात उल्लेख करणे आवश्यक असते.

इच्छापत्रावर किमान दोन साक्षीदारांच्या नावपत्त्यासकट सह्या आवश्यक असतात. त्या दोघांपैकी एकजण फॅमिली डॉक्टर असणे जास्त योग्य ठरते. या दोनपैकी एक साक्षीदार तरूण, परिचित असणे आवश्यक असते. इच्छापत्राची अंमलबजावणी आपल्या मृत्यूनंतर होणार असल्यामुळे त्याचा व्यवस्थापक म्हणून तरूण, विश्वासू व्यक्ती नेमणे आवश्यक ठरते. आपल्या पश्चात वाद टाळण्यासाठी इच्छापत्राची नोंदणी करणे उपयुक्त ठरते. संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर इच्छापत्राच्या अंमलबजावणीसाठी लाभार्थींना न्यायालयातून प्रोबेट म्हणजे इच्छापत्राच्या सत्यतेचा दाखला घेणे बंधनकारक असते. इच्छापत्र करण्यासाठी वकिलाची गरज लागत नाही, फक्त किमान दोन साक्षीदारांची गरज लागते. इच्छापत्राच्या नोंदणीसाठी तसेच प्रोबेटसाठी मात्र वकिलाची गरज लागते.

आता करोनाच्या धास्तीमुळे लोक इच्छापत्र करून ठेवायचा विचार करू लागले असले, तरी एरव्हीसुद्धा वेळेवर इच्छापत्र करून ठेवले तर आपल्या वारसदारांमध्ये वाद निर्माण होणं, संपत्तीवाटपासाठी पळापळ करावी लागणं या गोष्टी टाळता येतात. इच्छापत्राबरोबरच आपल्या सगळ्या गुंतवणुकीमध्ये एक किंवा दोन वारसदारांचं नामांकन केलेलं असणं आवश्यक आहे.