News Flash

गणेश विशेष : सुभाषितांतील गणपती!

कोणत्याही नवीन कार्याच्या प्रारंभी गणपतीला नमन करण्याची पद्धत सुपरिचितच आहे.

गणेश विशेष : सुभाषितांतील गणपती!

हर्षदा सावरकर response.lokprabha@expressindia.com
गणपती! या नावातच एक जादू आहे! लहान असो, मध्यमवयीन असो वा वृद्ध; सगळ्यांनाच आपलीशी वाटणारी आणि जिच्याशी अगदी मित्रत्वाच्या भावनेने संवाद साधता येईल अशी देवता! गणपतीवर अनेक भाषांमधून वर्णनात्मक, संशोधनात्मक, काव्यात्मक असे बरेच लिहिले गेले आहे आणि यापुढेही लिहिले जाईलच.. पण तरीही ‘अत्यतिष्ठत् दशाङ्गुलम्’ या न्यायाने, लिहिणाऱ्याला हा विषय अजूनही मोहात पाडतो आणि मग ‘लिहिता किती लिहिशील..’ अशी अवस्था अगदी सहजच होऊन जाते.

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती ।

तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम् ॥

अशी सुभाषितांची महती सांगणारं सुभाषित संस्कृत भाषेत सापडतं. अगदी कमी शब्दांमध्ये नेमका पण तितकाच रसाळ, काव्यात्म आशय व्यक्त करणारी ही सुभाषितं म्हणजे एक मोठंच भांडार आहे. ‘यू नेम अ थिंग अ‍ॅण्ड यू हॅव इट!’ अशा प्रकारे या सुभाषितांचे वण्र्य विषयही तितकेच वैविध्यपूर्ण आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यातलं माधुर्य, गेयता, प्रासादिकता अशा गुणांमुळे रसिक सुभाषितरसामध्ये अक्षरश: न्हाऊन निघतो. आणि मग या वैविध्यपूर्ण विषयांचा धांडोळा घ्यायला एखादा रसिक वाचक सरसावला नाही तरच नवल!

सुभाषितांच्या अनेकविध विषयांपैकी सर्वांनाच प्रिय असणाऱ्या गणपतीवर संस्कृत भाषेमध्ये अनेक सुभाषितं रचली गेली आहेत. गणेशाच्या स्तुतीपर असणाऱ्या सुभाषितांची संख्या तशी मोठी आहे. पण त्यांमध्येही त्याच्या बालरूपाचं, बालसुलभ लीलांचं, त्याच्या कुटुंबाचं आणि त्याच्या जगावेगळ्या वाहनाचं वर्णन करणारी काही वेगळी सुभाषितं आढळतात. त्यातीलच  वैशिष्टय़पूर्ण सुभाषितं निवडून त्यांचा परामर्श या लेखातून घेण्यात आला आहे. संस्कृत जाणणाऱ्या आणि न जाणणाऱ्या अशा सगळ्याच वाचकांसाठी हा प्रयत्न थोडासा रंजक ठरू शकेल!

कोणत्याही नवीन कार्याच्या प्रारंभी गणपतीला नमन करण्याची पद्धत सुपरिचितच आहे. सर्व विघ्नांची शांती करणारा म्हणून विघ्नहर्ता या नात्याने गणपतीचं स्तवन केलं जातं. अगदी कार्यारंभीच असं नाही, पण अशा अनेक वेगवेगळ्या कारणांनी माणूस देवाची करुणा भाकतच असतो. रस्त्याने चालताना कुत्र्याला किंवा तत्सम प्राण्याला घाबरणाऱ्या मनुष्यासमोर तो प्राणी अवतरला की त्या व्यक्तीची भीतीने अक्षरश: गाळण उडते आणि मग ‘गणपतीबाप्पा, वाचव रे बाबा!’ असं मनात म्हणत बाप्पाचा धावा करतच ती व्यक्ती पुढे जाते. पण कधी असा विचार केलाय का, की खुद्द गणपतीबाप्पाच रस्त्याने त्याच्या वाहनावरून जात असताना समोरून मार्जारमहोदया अवतरल्या तर त्या उंदीरमहाशयांची आणि पर्यायाने आपल्या बाप्पांची काय अवस्था होईल? त्यामुळे आपल्या वाहनाच्या रक्षणासाठी खुद्द गणाधिपती या मार्जारमहोदयांची स्तुती करतात, असं सुभाषितकार म्हणतात.

गणेश: स्तौति मार्जारं स्ववाहस्याभिरक्षणे ।

महानपि प्रसङ्गेन नीचं सेवितुमिच्छति ॥

दुसरं असं की, माणूस कितीही मोठा असला तरी कधी कधी आपल्या कार्यसिद्धीसाठी त्याला क्षुद्र व्यक्तींनाही शरण जावं लागतं! मग भलेही आमचे कविकुलगुरू कालिदास म्हणाले असेनात की ‘याच्ञा मोघा वरमधिगुणे नाधमे लब्धकामा’ (अधम माणसाकडून सफल होणाऱ्या याचनेपेक्षा एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीकडे केली गेलेली विनंती निष्फळ ठरली तरी चालेल.) कालाचा महिमा, दुसरं काय! सुभाषितकार अशा काही सुभाषितांमधून त्यांचा धोरणी विचार नक्कीच दाखवून देतात!

गणपतीची अनेक नावं आपल्याला सुपरिचित आहेत. त्याचं दिसणं, त्याच्या आवडीनिवडी किंवा त्याचं कर्तृत्व अशा अनेक गोष्टींशी त्याची अनेक नावं निगडित आहेत. या पूर्वीच्या सुभाषितात आपण त्याच्या वाहनाचा उल्लेख पाहिला. याच वाहनावरूनच गणपतीसाठी एक विशेषण योजलं जातं; आणि तेच वापरून त्यायोगे सुभाषितकाराने कशी अर्थचमत्कृती साधली आहे, ते पाहू.

तमाखुपत्रं राजेन्द्र भज माज्ञानदायकम् ।

तमाखुपत्रं राजेन्द्र भज माज्ञानदायकम् ॥

या सुभाषितात एकच ओळ दोनदा वापरली आहे आणि तीच खरी गंमत आहे. सुभाषितकार म्हणतो, हे राजेन्द्रा अज्ञानाला कारणीभूत ठरणाऱ्या तमाखुपत्राचे (तंबाखूच्या पानाचे) सेवन करू नकोस. पण ज्ञान आणि समृद्धी यांचा कारक असणाऱ्या त्या आखुपत्राची (गणपतीची) सेवा कर!

आखु याचा अर्थ उंदीर! त्यामुळे आखुपत्र, आखुवाहन अशी विशेषणे गणपतीसाठी वापरलेली दिसून येतात.

गणपतीचे कुटुंब हाही सुभाषितकारांचा एक आवडता विषय! मानवी भावभावना, नातेसंबंध यांचे प्रतिबिंब देवतांविषयीच्या रचनांमधूनही दिसून येतं आणि सुभाषितकाराची प्रतिभा काय काय कल्पनाविलास करू शकते याचं मजेशीर प्रत्यंतर त्या सुभाषितांमधून येतं.

घरातली भावंडं अगदी गुण्यागोविंदाने, कधीही न भांडता, एकमेकांची खोड न काढता अगदी शांत, समंजसपणे राहिली आहेत असं उदाहरण शोधूनही सापडणार नाही. मग आपले देव याला कसे अपवाद असतील?

हे ‘हेरम्ब’ ‘किमम्ब’ ‘रोदिषि कुत:’ ‘कणर लुठत्यग्निभू:’

‘किं ते स्कन्द विचेष्टितम्? मम पुरा संख्या कृता चक्षुषाम्’ ।

‘नैतत्तेप्युचितं गजास्य चरितं’ नासां मिमीतेऽम्ब मे’

तावेवं सहसा विलोक्य हसितव्यग्रा शिवा पातु व: ॥

गणपतीला रडताना पाहून पार्वतीनं कारण विचारलं. तर काय म्हणे, ‘कार्तिकेयानं माझे कान ओढले!’

‘असं का रे केलंस कार्तिकेया?’ म्हणून त्याला विचारावं तर तो म्हणतोय, ‘यानं माझ्या डोळ्यांची संख्या मोजली’ (कार्तिकेय षण्मुख ना!)

‘गजानना, असं करू नये बाळा’, म्हणून पार्वतीने समजावायला जावं तर तो म्हणतोय, ‘आई, माझ्या सोंडेची लांबी की गं मोजली यानं!’

त्यांच्या अशा भांडणावर पार्वतीला हसावं की रडावं ते कळेना!

तपशील वेगळे असले तरी घरोघरी दिसणारी ही परिस्थिती सारखीच! अशा दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टींमधून गणेशाचं एक लोभस बालरूप सुभाषितकाराने किती सुरेख रंगवलं आहे!

या अशा खास पुत्रांची आणि त्याहूनही वैशिष्टय़पूर्ण पतीची काळजी घेत संसार करणाऱ्या पार्वतीचंही सुभाषितकाराला नवल वाटतं. आणि म्हणून तो म्हणतो –

स्वयं पञ्चानन: पुत्रौ गजाननषडाननौ ।

दिगम्बर: कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे ॥

गजानन (हत्तीचे मुख असलेला) आणि षडानन (सहा मुखे असलेला) असे पुत्र आणि पञ्चानन असा शंकर! असे घरात असताना पार्वती अन्नपूर्णा नसती तरच नवल!

पण, इतकंच नाही. हा सगळा गोतावळा सांभाळत संसाराचा गाडा हाकणाऱ्या शंकराविषयीही सुभाषितकार कधी कधी हळवा होतो. त्यानं विषप्राशन केलं याचं कारण सुभाषितकाराला कुठेतरी या सगळ्या गुंत्यात सापडतं.

अत्तुं वाञ्छति वाहनं गणपतेराखुं क्षुधार्त: फणी

तं च क्रौञ्चपते: शिखी च गिरिजासिंहोऽपि नागाननम् ।

गौरी जह्नुसुतामसूयति कलानाथं कपालानलो

निर्विण्ण: स पपौ कुटुम्बकलहाद् ईशोऽपि हालाहलम् ॥

शंकराच्या गळ्यातील सर्पमहाशय गजाननाच्या वाहनावर लक्ष ठेवून आहेत. संधी मिळताच केव्हाही त्याला गिळंकृत करतील. या सर्पमहाशयांकडे कार्तिकेयाचे वाहन असणाऱ्या मोराचे लक्ष आहे. इकडे गिरिजेचं वाहन असलेल्या सिंहाचं गणपतीकडे लक्ष आहे. शंकराने गंगेला डोक्यावर धारण केल्याने पार्वती केव्हाचीच करवादलेली आहे. शंकराच्या कपाळातील अग्नी त्याच्या जटेतील चंद्राकडे असूयेने पाहतोय! हे इतकं सगळं महाभारत आजुबाजूला घडत असताना कोणता शहाणा मनुष्य स्थितप्रज्ञ राहू शकेल बरे?

संस्कृत काव्यांमध्ये किंवा नाटकांमध्ये प्रारंभी कायमच इष्टदेवतेचं स्तवन पाहायला मिळतं. नाटकांमधील या मंगलश्लोकालाच नांदीश्लोक असं संबोधलं जातं. आज सादर होणाऱ्या नाटकांमधूनही ही परंपरा आपल्याला पाहायला मिळते. संस्कृत साहित्य परंपरेतील असाच एक लोकप्रिय नाटककार म्हणजे भवभूती! त्याच्या ‘मालतीमाधवम्’ या नाटकाची सुरुवात गणेशाच्या स्तवनाने होते. वर आलेल्या श्लोकात जसा या साऱ्या परिवाराच्या वाहनांचा उल्लेख आहे; तसाच पण एका वेगळ्या आशयाने युक्त असणारा त्याच वाहनांचा उल्लेख या वैशिष्टय़पूर्ण रचनेद्वारे दिसून येतो.

सानन्दं नन्दिहस्ताहतमुरजरवाहूतकौमारबर्हि-

त्रासान्नासाग्ररन्ध्रं विशति फणिपतौ भोगसङ्कोचभाजि ।

गण्डोड्डीनालिमालामुखरितककुभस्ताण्डवे शूलपाणेर्

वैनायक्यश्चिरं वो वदनविधुतय: पान्तु चीत्कारवत्य: ॥

शिवाने त्याच्या नृत्याला सुरुवात केल्यानंतर नंदीने ढोल वाजविण्यास सुरुवात केली. ढोलाचा आवाज ऐकून कार्तिकेयाचे वाहन असणाऱ्या मोराला जणू काही मेघगर्जना होते आहे असे वाटले आणि तो शंकरापाशी आला. त्याला जवळ येताना पाहून शंकराच्या गळ्यातील नाग घाबरला आणि लपण्यासाठी आसरा शोधू लागला. त्याला तो आसरा मिळाला गजाननाच्या सोंडेत! आणि हे सर्पाधिराज सोंडेत शिरल्याने गजाननाने जोरजोरात मस्तक हलवून भलीमोठी शिंक दिली.

महादेव भिक्षाटन करत फिरतो याचंही कुतूहल सुभाषितकारांच्या नजरेतून सुटलेलं नाही.

स्वयं महेश: श्वशुरो नगेश: सखा धनेशस्तनयो गणेश:।

तथापि भिक्षाटनमेव शम्भोर्बलीयसी केवलमीश्वरेच्छा ॥

खरं तर तो स्वत: महादेव, त्याचा सासरा पर्वताधिराज हिमालय, त्याचा मित्र कुबेर आहे आणि मुलगा गणाधिपती! असं असलं तरीही याला बिचाऱ्याला भिक्षा मागत फिरावं लागतं. याला ईश्वरेच्छा बलवान असंच कारण द्यावं लागतं.

पण असं सगळं जरी असलं तरी सामान्य लोकांप्रमाणे देवतांच्याही आयुष्यात चार सुखाचे प्रसंग येतात.

युगपत्स्वगण्डचुम्बनलोलौ पितरौ निरीक्ष्य हेरम्ब: ।

तन्मुखमेलनकुतुकी स्वाननमपनीय परिहसन् पायात् ॥

आपल्या गालांचे चुंबन घेण्यास एकाच वेळी सरसावलेल्या आपल्या माता-पित्यांना पाहून मिस्कील गजाननाने हळूच आपले मुख मधून काढून घेतले आणि तो हसू लागला. अशा बालसुलभ चेष्टा करणारा हा गजानन आपल्या सर्वांचं रक्षण करो, अशी प्रार्थना सुभाषितकार करतो.

जसा हा आईवडिलांची गंमत पाहणारा गजानन वरच्या सुभाषितातून रंगवला आहे, तसंच लहानग्यांमध्ये असणारं बालसुलभ कुतूहल या सुभाषितातून दिसणाऱ्या बालगणेशामध्ये दिसतं.

क्रोडं तातस्य गच्छन्विशदबिसधिया शावकं शीतभानो-

राकर्षन्भालवैश्वानरनिशितशिखारोचिषा तप्यमान:।

गङ्गाम्भ: पातुमिच्छुर्भुजगपतिफणाफूत्कृतैर्दूयमानो

मात्रा सम्बोध्य नीतो दुरितमपनयेद्बालवेषो गणेश:॥

आपल्या वडिलांच्या मांडीवर चढून बाल गणेशाने शंकराच्या डोक्यावरील चंद्रकोर धरायचा प्रयत्न केला. त्याला जणू ती कोर म्हणजे कमळाचा देठच वाटला. तसं करत असताना शंकराच्या तिसऱ्या नेत्राच्या ज्वालेची धग त्याला लागली. त्याने पोळल्याने साहजिकच त्याचा हात शंकराच्या जटेतून बाहेर पडणाऱ्या गंगेकडे जातोय तोवरच त्याच्या गळ्यात ठाण मांडून बसलेल्या भुजंगपतीने फूत्कार सोडला. आपल्या पुत्राचे हे खटय़ाळ चाळे थांबावेत म्हणून पार्वतीने त्याला हाक मारून जवळ बोलावले.

बऱ्याचदा संस्कृतात आढळणारी ही सुभाषिते उपलब्ध साहित्यामधून घेतलेली असतात; पण कधी तरी असंही दिसतं की, अशा प्रकारच्या बऱ्याच सुभाषितांचे कर्ते अज्ञातच आहेत आणि ही सुभाषिते त्यांच्या अंगभूत गोडव्यामुळे परंपरेचा भाग होऊन जातात; पण उपलब्ध सुभाषितांच्या धर्तीवर आजही नवनवीन सुभाषिते रचली जातात. संस्कृतचे एक अभ्यासक एच. एस. राघवेन्द्र यांनी रचलेलं हे सुभाषित पाहू. गणेशाचं एकंदर स्वरूप मानवी अवताराला प्रतिकूल असूनही त्याचा पराक्रम, कर्तृत्व इतकं असामान्य आहे की, प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सृष्टीचे कर्ते-धर्तेही त्याला वंदन करूनच पुढे जातात, असं हे सुभाषितकार सांगतात.

मलाज्जातो मातु: पितुरपि वशान्नष्टनृमुखो

रथो मूषी लम्बं जठरमथ भग्नश्च रदन: ।

तथाप्यादौ पूज्यो विधिहरिहरैर्हस्तिवदन:

क्रियासिद्धि: सत्त्वे भवति महतां नोपकरणे ॥

मातेच्या शरीराच्या मलापासून निर्माण झालेला, पित्यामुळे ज्याने आपले मानवी मस्तक गमावले असा, रथ/वाहन म्हणून मूषक बाळगणारा असा हा गणेश लंबोदर आणि एकदंत आहे आणि असे असूनही त्याच्या पराक्रमामुळे किंवा महत्तेमुळे तो ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांना वंदनीय आहे. खरोखर, क्रियेची सिद्धी ही माणसाकडे काय साधने आहेत यावर अवलंबून नसून त्याच्या पराक्रमावर अवलंबून असते.

आज अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून टोकाचे निर्णय घेणाऱ्या सगळ्यांच्याच डोळ्यात अंजन घालणारा श्लोक आहे हा!

केवळ ब्रह्मा, विष्णू आणि महेशच का? तर सगळेच देव गजाननाला वंदनीय मानतात आणि म्हणूनच कोणत्याही मोठय़ा कार्याच्या आरंभी त्याचे चिंतन करतात. पुढील सुभाषितातून असाच आशय व्यक्त करून तो गजानन आमचे रक्षण करो, असे साकडे सुभाषितकार त्याला घालतो.

जेतुं यस्त्रिपुरं हरेण हरिणा व्याजाद्बलिं बध्नता

स्र्ष्टुं वारिभवोद्भवेन भुवनं शेषेण धर्तु धराम् ।

पार्वत्या महिषासुरप्रमथने सिद्धाधिपै: सिद्धये

ध्यात: पञ्च्शरेण विश्वजितये पायात्स नागानन: ॥

भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा नाश करतेवेळी, बळीला पाताळात धाडण्यासाठी निघताना भगवान विष्णूने, विश्वनिर्मिती करणाऱ्या ब्रह्मदेवाने, पृथ्वीचा भार घेता यावा म्हणून शेषाने, महिषासुराच्या वधावेळी पार्वतीने, वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त करता येण्यासाठी ऋषींनी आणि संपूर्ण विश्वावर अधिराज्य गाजवू इच्छिणाऱ्या मदनाने श्रीगजाननाचं चिंतन करूनच पुढे पाऊल टाकलं. तोच हा गजानन तुम्हां आम्हां सर्वाचं रक्षण करो!

गणेशाच्या विविध रूपांचं वर्णन करणाऱ्या सुभाषितांची अशी बरीच उदाहरणे देता येतील. या आणि अशा मोहक, चित्ताकर्षक रचनांच्या माध्यमातून दिसणारी गणपती ही देवता सुभाषितकारांच्याही तितकीच जवळची असावी. वेगवेगळ्या वृत्तांमधून रचली गेलेली अनेक स्तोत्रं, नामावल्या यांच्या पसाऱ्यात ही अशी थोडी वेगळ्या आशयाची, वैशिष्टय़पूर्ण सुभाषितं, संख्येनं फार नसली तरीही, रसिकांच्या वाचनानंदात नक्कीच काहीतरी वेगळी भर टाकून जातात!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2021 1:53 am

Web Title: ganesh chaturthi 2021 ganesh festival 2021 ganeshotsav 2021 article 03 zws 70
Next Stories
1 गणेश विशेष : ललाटिबब ते गणेशपट्टी
2 ‘’जागर : मलाबार युद्धसराव आणि चीन!
3 निमित्त : गणपतीची मूर्ती कशी असावी?
Just Now!
X