21 April 2019

News Flash

बाप्पा मोरया : रूप पाहता लोचनी

गणपतीत केली जाणारी ही फोटोग्राफी हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात अर्थातच वैयक्तिक राहात  नाही.

विशाखा कुलकर्णी

रविवारी गणपतीच्या सजावटीचं सामान काढत होते माळ्यावरून. सगळा पसारा आवरत असताना एकदम जुना अल्बम पुढय़ात आला. फक्त गणपतीचा. मोठ्ठाच्या मोठ्ठा अल्बम आणि त्यात आजोबांच्या काळापासून दरवर्षीच्या गणपतीचे फोटो.  बरं घरच्या गणपतीचे फोटो तर होतेच सोबत आई, मामा सगळ्या मंडळांच्या गणपतीला गेल्यावर त्याच्या सजावटीचे काढलेले फोटो, गणपतीला असलेली सीनसिनरी, आईने भाग घेतलेले मेळे. सगळं काही एखाद्या सिनेमासारखं पुढय़ात आलं त्या फोटोंमुळे. यात फोटो केवळ गणपतीचे असले तरी ते खूप काही सांगून जात होते. त्या वेळी असलेली घरची परिस्थिती, सजावटीची ‘फॅशन’, सजावटीला वापरल्या जाणाऱ्या वस्तू, गणपतीची कालपरत्वे बदलत जाणारी मूर्ती.. अगदी सगळंच. मेळ्याचे फोटो बघून आई तर अगदी आठवणीत हरवून गेली. आता तसे मेळे कुठे राहिले..आणि आता तशी माणसं, तसं वातावरणही नाही, या संवादासकट अल्बम गुंडाळला गेला, आणि विषयही. पण एक मात्र कळलं, हे फोटो नसते, तर एवढं वैविध्य कळलंही नसतं.

त्या काळी तरी कॅमेऱ्यात रोल घालून फोटो काढण्याची पद्धत असल्याने दरवर्षीचा एखाद दुसराच फोटो असे. आता प्रत्येकाच्या हातात कितीतरी फीचर्स असलेल्या मोबाइल कॅमेराने गणेशाचे ‘सुंदर ते ध्यान’ टिपण्याचा मोह कोणाला न होतो, तरच नवल!

गणपती कार्यशाळेपासून, ते विसर्जनापर्यंत गणेशाचं मोहक रूप कॅमेरात बंदिस्त करून अनेक जण वर्षभर त्या स्मृती जपतात. कार्यशाळेत आकार घेत असलेले आपले बाप्पा घरी आल्यावर मूर्ती न वाटता, चक्क जिवंत वाटतात! फोटोतही घरात आणलेल्या बाप्पाचे तेजोमय रूप अगदी वेगळेच भासते. मग घरातील तरुण आणि ‘नवफोटोग्राफर’ सुरू होतात. बाप्पाच्या पायाचे पंचवीसेक अँगल. रोज घातलेल्या हाराचे फोटो, एखादा दागिना असेल तर ते घातलेले बाप्पाचे फोटो. एक ना हजार प्रकार. पण मजा अशी आहे, की कितीही फोटो काढले तरी बाप्पाचं रूप एका फ्रेममध्ये सामावत नाही, हेच खरं.!

मोबाइलवर फोटो काढणारे घरातल्या गणपतीचेच कित्येक फोटो काढतात, तर काही हौशी फोटोग्राफर्स मोबाइल कॅमेराने आगमन मिरवणूक, विसर्जन मिरवणूक, विविध मंडळांचे गणपती या सगळ्यांचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करतात.  विविध फिल्टर्स, त्यातल्या तांत्रिक गोष्टी, अर्थात कॉन्ट्रास्ट, ब्राइटनेस हे सगळं करून मोबाइलवरच अप्रतिम फोटो काढता येतात. शिवाय बाप्पाच्या मूर्तीसह आजूबाजूच्या आरास आणि फुलांच्या सजावटीमध्ये असलेल्या अनेक रंगांमुळे हे फोटो अगदी अप्रतिम दिसतात. आणि बाप्पाचे फोटो घरबसल्या काढल्याने तरुणांची फोटोग्राफीची हौस भागते.

हे झालं मोबाइल फोटोग्राफर्सचं, पण हल्ली डिजिटल कॅमेरा, डीएसएलआर या गोष्टी अगदी सहज उपलब्ध असतात. फोटोग्राफी हा व्यवसाय असणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. अशांनासुद्धा गणेशोत्सव ही पर्वणीच असते, समाजाच्या विविध स्तरांमध्ये साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाचे विविध रंग टिपण्याची संधी व्यावसायिक फोटोग्राफरना मिळते. मग त्यात आगमनाच्या मिरवणुकीत बेधुंदपणे नाचणारी तरुणाई असो, किंवा आपल्या बाप्पाचं विसर्जन का झालं, हा प्रश्न डोळ्यात घेऊन उभी असलेली चिमुरडी असो, अशा एक फोटोंमध्ये हजारो शब्द व्यक्त करू शकणार नाहीत, अशा भावभावना क्षणार्धात चित्रित होतात. याशिवायसुद्धा, बाप्पाच्या समोर नतमस्तक होणारे भाविक, आणि बाप्पाच्या डोळ्यांमध्ये मूर्तिकाराने केलेली कमाल, ज्यामुळे त्याची नजर सर्वत्र आहे असेच वाटावे, असे काही फोटो अगदी अप्रतिम दिसतात. मोठमोठय़ा मंडळांतील बाप्पांचे सुंदर सुंदर फोटो अगदी संग्राह्य़ वाटतात. अशा फोटोंची (पान २९ वर) चिकटवही करण्याचा छंदही अनेक जण जोपासतात.

गणपतीत केली जाणारी ही फोटोग्राफी हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात अर्थातच वैयक्तिक राहात  नाही. आपण काढलेले फोटो जगाला दाखवण्यासाठी पटापट सोशल मीडियावर अपडेट केले जातात, यासाठी अनेकदा इन्स्टाग्राम व फेसबुकवर विशेष पेजेसही तयार केली जातात. ही पेजेस फक्त फोटोग्राफी, किंवा गणपती विशेष फोटोग्राफीसाठी खास असतात. ती फोटोग्राफर्स अपडेट करू शकतात. फोटोग्राफीचे ग्रुप्सही असतात, ज्यावर फक्त गणपतीचे फोटो शेअर केले जातात.   आपल्या बाप्पाचे फोटो व्हाट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकवर सर्वत्र डीपीसाठी ठेवले जातात.  स्टेट्ससुद्धा गणपतीमय झालेलं असतं, थोडक्यात काय, दहा दिवस गणपती यत्र-तत्र- सर्वत्र असतो.  गणपतीच्या दिवसांमध्ये विविध ठिकाणी घरगुती गणेश सजावट स्पर्धा आयोजित केल्या जातात. हल्ली ‘सेल्फी विथ बाप्पा’चीही क्रेझ आहे. एका अर्थी बाप्पासोबत सेल्फी काढून देव- भक्ताचं नातं अगदी मित्रत्वाच्या पायरीवर येऊन पोचलेलं दिसतं. ‘सेल्फी विथ बाप्पा’ अशा स्पर्धाही होतात. या स्पर्धामध्ये आबालवृद्ध उत्साहाने सहभागी होतात.  काही ठिकाणी अशा स्पर्धा मोठमोठी बक्षिसे लावूनही होतात, ज्यात गणपातीबाप्पाचे विविध रूपांतील फोटो स्पर्धक कुठल्याही एडिटिंग किंवा फिल्टरशिवाय पाठवू शकतात. आता यातही कॅमेरा आणि मोबाइल कॅम अशा विभागातून वेगवेगळी बक्षिसे दिली जातात.

थोडक्यात काय, बाप्पाचे रूप जसे काळासोबत बदलत गेले, तसेच ते रूप टिपण्याच्या पद्धतीही बदलत गेल्या, मात्र ते रूप डोळ्यांत सामावून घेणारी भक्ती आणि प्रेम मात्र त्रिकालाबधित आहे.

First Published on September 14, 2018 1:50 am

Web Title: ganesh chaturthi festival ganeshotsav 2018 article 5 2