हनिमूनसाठी जायचे तर ठिकाण शांत, रोमॅण्टिक, गर्दी नसलेले आणि निसर्गरम्यही असायला हवे. खाण्यापिण्यासकट कुठल्याही सोयीसुविधांसाठी कष्ट पडू नयेत आणि ते मध्यमवर्गीय जोडप्यांच्या खिशाला परवडणारेही असायला हवे.  हे सारे अगदी नेमके जुळून येते ते आपल्या शेजारील भूतानमध्ये. सांस्कृतिक समानतेमुळे आणि भूतानवासीयांना वाटणाऱ्या भारताविषयीच्या आपुलकीमुळे तिथे आपलेपणा तर वाटतोच, पण निसर्गाने त्याची संपत्ती दोन्ही हातांनी उधळल्याने आपण भूतलावरील स्वर्गात असल्याचाच भास होतो. शांतता हा गुण तर भूतानच्या वातावरणातील कणाकणात आहे. नेहमीच सुखद गारवा हे भूतानचे वैशिष्टय़च म्हणायला हवा. हा गारवा कधी अवखळ वाऱ्यासोबत किंचित बोचराही होतो आणि मग वातावरण रोमॅण्टिक न होते तर नवलच!

एरवी मुंबई-पुण्याला कोकीळकूजनच ऐकू येते. पण भूतानला जाग येते की, हिमालय सापडणाऱ्या वैशिष्टय़पूर्ण पक्ष्यांच्या कूजनाने. दिवसा २० अंशांपर्यंत असणारे तापमान रात्री अनेकदा शून्याच्या दिशेने खाली येते. या रोमॅण्टिक वातावरणात भूतानची सैर आयुष्यातील एक अनमोल आठवण होऊन जाते. निसर्गातील सांगीतिक नादमयता आणि समोर नजरेस पडणाऱ्या अप्रतिम रंगीत अलंकरण केलेली बौद्ध मठ-मंदिरे, त्यावरील फडफडणाऱ्या रंगीत पताका आपल्याला एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जातात.

पश्चिम बंगालमधून आल्यानंतर पहिले भूतानी शहर लागते ते फुन्श्तोलिंग. इथे परवाना प्रक्रिया पार पाडल्यानंतर प्रवास पारोच्या दिशेने सुरू होता. पारोला विमानतळही आहे. पण फुन्श्तोलिंग ते पारो रस्त्यावरून होणारा नयनरम्य प्रवास चुकवू नये असा. हा प्रवासही या मार्गाइतकाच रोमॅण्टिक आहे. मध्ये लागणारी छोटेखानी गावे, जून ते ऑगस्टमध्ये  येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरी.. वाटावे की, आता दिवसभर हा असाच ठाण मांडून राहणार. काही मिनिटांतच ढगांच्या दुलईत आपले गायब होणे आणि मग काही मिनिटांनंतर येणारी कोवळी उन्हे हे सारे स्वर्गीय आणि तेवढेच रोमॅण्टिक असते. मार्च ते जून हा तर भूतानभेटीचा सर्वोत्तम कालखंड. आणि सप्टेंबरनंतर गेलात तर भूतानच्या शहरांमध्ये फिरता येईल, पण आतल्या भागात, गावांना जाणे बर्फामुळे थोडे कठीण होऊन बसते. पण हा काळ बर्फाळ भूतान अनुभवण्यासाठी केव्हाही चांगलाच.

ताक्सांग मोनास्ट्रीला तीन तासांचा ट्रेक आहे. त्याविषयीची माहिती स्वतंत्र लेखात दिली आहे.

दुसरा दिवस किंवा संध्याकाळी पारो म्युझियम करता येईल. पारो झाँग हेही तेवढेच नेत्रसुखद आहे. इथेच जवळ एक जुना द्रुग्येल किल्ला व राजवाडाही आहे. तिसऱ्या दिवशीचा मुक्काम थिंपू अर्थात भूतानची राजधानी. इथे येताना मार्गावर लागणारे चोर्टन मेमोरिअल काही वेळेस दाट धुक्याआड गायब झालेले असते. थिंपूमध्ये एका टेकडीवर असलेली बुद्धाची भलीमोठी शिल्पाकृती केवळ अप्रतिम आहे. हे ठिकाण आपल्याला थिंपूचे वेगळे दर्शन घडवते. थिंपूपासून अगदी जवळच्या ताबा या ठिकाणी हॉटेलची खूप चांगली सोय आहे. इथून थिंपूचे विहंगावलोकनही करता येते. रात्री तर इथल्या राजवाडय़ाच्या किंवा संसद इमारतीचे (अर्थात ही इमारत कलात्मक भूतानी स्थापत्याप्रमाणे बांधलेली आहे) दिवेलागणीच्या वेळचे घडणारे दर्शन डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. हवेतला तो गारवा, रात्रीची नीरव शांतता आणि जिवलगाची सोबत.. आणखी काय हवे!

पुनाखा म्हणजे भूतानची पूर्वीची राजधानी. एप्रिल ते जूनमध्ये गेलात तर पुनाखा मठमंदिराच्या आवारातील नीलमोहर पूर्ण बहरलेला दिसेल. फुलारलेला नीलमोहर प्रेमाला वेगळेच भरते आणणारा असतो. हा मठमंदिराचा परिसरही लोभसवाणा आहे. इथून पाय निघता निघत नाही.. खरे तर बौद्ध मठमंदिरे म्हणजे आयुष्याचा क्षणिकवाद सांगणारी ठिकाणे. म्हणूनच बहुधा आपण इथे आयुष्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करू लागतो.. नकळत. हनिमून म्हणजे केवळ शारीरिक जवळीक नव्हे तर रेखीव, सौंदर्यासक्त आयुष्याची सुरुवात ठरावी!

केव्हा जाल : सर्वोत्तम कालखंड- मार्च ते जून (त्यानंतर पानगळ व बर्फाचा कालखंड सुरू होतो.). जून ते ऑगस्ट पावसालाही सामोरे जावे लागते (इथला पाऊसही तेवढाच रोमॅण्टिक असतो).

कसे जाल : थेट पारोला विमानाने (शक्यतो हे टाळा, कारण रोमॅण्टिक प्रवासाला मुकाल). भारतात पश्चिम बंगालमधील बागडोगरा विमानतळावरून फुन्श्तोलिंगला भूतानमध्ये प्रवेश.
वैदेही – response.lokprabha@expressindia.com