19 November 2019

News Flash

आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती काय करावे, कोठे जावे?

आपल्या आवडत्या विषयात एखादी शिष्यवृत्ती मिळवून देशाबाहेर जाऊन संशोधन करायला मिळावं अशी खूप जणांची इच्छा असते.

एखादी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती घेऊन भारताबाहेरील संशोधनक्षेत्राचा अनुभव घेणे आणि त्या प्रक्रियेत वैयक्तिक आणि त्या त्या संशोधनाची क्षितिजे रुंदावणे त्यासाठीची तयारी खूप पातळ्यांवर करावी लागते.

चारुता कुळकर्णी – response.lokprabha@expressindia.com

आपल्या आवडत्या विषयात एखादी शिष्यवृत्ती मिळवून देशाबाहेर जाऊन संशोधन करायला मिळावं अशी खूप जणांची इच्छा असते, पण त्यासाठी नेमकं काय करायचं ते माहीत नसतं.

आत्ताच्या काळात इंटरनेटवर अमर्याद माहितीचा साठा खुला असला तरी त्यातून आपल्या उपयोगाचे काय आणि कसे निवडून घ्यायचे हा मोठ्ठा प्रश्न, त्यातून विषय संशोधनविषयक करियरचा असेल तर या प्रश्नाची सुरुवात बऱ्याचदा ती माहिती नक्की कुठे दडलीय इथपासून होते! विज्ञान, तंत्रज्ञान किंवा सामाजिक शास्त्रांमधील संशोधन ही अतिशय अनवट, अगदी बिकट म्हणावी अशी वाट..पण स्वत:च्या करियरबद्दल जागरूक असणारी आताची आमची पिढी ही वाटही कसोशीने धुंडाळताना दिसते. ती धुंडाळायच्या मार्गातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मानला जाणारा टप्पा म्हणजे एखादी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती घेऊन भारताबाहेरील संशोधनक्षेत्राचा अनुभव घेणे आणि त्या प्रक्रियेत वैयक्तिक आणि त्या त्या संशोधनाची क्षितिजे रुंदावणे! अर्थात अशी ही वाट खरोखरच चोखाळायची तर त्यासाठीची तयारी खूप पातळ्यांवर करावी लागते.

मार्केट में क्या हैं?

स्वत:च्या क्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या संधींची माहिती ठेवणे आणि सतत ठेवत राहणे ही (इतर अनेक क्षेत्रांइतकीच!) संशोधन क्षेत्रात काम करू पाहणाऱ्यांची गरज! संशोधन क्षेत्र हे ज्ञान तयार करण्याचे क्षेत्र असल्याने त्यात प्रत्येक व्यक्तीकडे ‘रिसोर्स’ म्हणूनच बघितले जाते, त्यामुळे माहिती घेण्यात आणि ठेवण्यातला पहिला टप्पा म्हणजे तुम्ही संशोधक म्हणून एकूण क्षेत्राशी आणि इतर क्षेत्र-सहकाऱ्यांशी विविध मार्गानी कनेक्टेड राहणे हा! त्यासाठी ResearchGate https://www.researchgate.net/, Academia https://www.academia.edu/, अगदी LinkedIn www.linkedin.com अशा संशोधन आणि एकूणच करियरविषयक समाजमाध्यमांचा जरूर विचार, वापर करावा. इथे स्वतची प्रोफाईल तयार करून, तिला नित्यनेमाने न्हाऊ-माखू घातले तर स्वतच्या शिक्षणातले महत्त्वाचे मलाचे दगड आणि काळानुरूप तयार होणारी आपली ‘प्रतिभा’ इतरांबरोबरच आपल्याला जाणवून देता येते. शिवाय, या सर्व ठिकाणी त्या त्या आणि जवळपासच्या संशोधन शाखांमधील सहकाऱ्यांचा सहवास लाभत असल्याने या जागा चर्चासाठी सतत खुल्या असतात. तेव्हा जगभरात ज्ञानाच्या क्षेत्रात कुठे आणि काय चालले आहे हे जाणून घेत राहण्यासाठी या व्यासपीठांचा उपयोग करणे महत्त्वाचे आहे, बऱ्याचदा इथे घडणाऱ्या चर्चामधून आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तींचा मार्ग दिसायला लागतो.

ती ती विद्यापीठे देत असलेल्या शिष्यवृत्ती वगळता भारतीय संशोधकांसाठी काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती –

अवघा युरोप खुला करून देणाऱ्या युरोपियन युनियनच्या मेरी क्युरी आणि इरॅसमस फेलोशिप.

जर्मनीसाठी हुम्बोल्ट फाऊंडेशनकडून दिल्या जाणाऱ्या फेलोशिप.

अमेरिकेसाठी फुलब्राईट फाऊंडेशनकडून दिल्या जाणाऱ्या फेलोशिप.

वरील बहुतांशी शिष्यवृत्ती पीएच.डी. आणि त्यानंतरच्या संशोधनासाठी देऊ केल्या जात असल्या तरी यातील प्रत्येकामध्ये त्यापूर्वीही भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अनुभव घेण्याच्या तरतुदी आहेत. उदाहरणार्थ,

इरॅसमस हा मुळात स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रॅम आहे. त्या त्या विषयात मास्टर्स, किंवा अगदी बॅचलर्स करत असताना आपल्या कामात हातखंडा असणारी युरोपातील एखादी शैक्षणिक संस्था हेरून ठेवता आली तर या शिष्यवृत्तीअंतर्गत त्या ठिकाणी शिकण्यासाठी किंवा संशोधन करण्यासाठी सहा महिन्यापर्यंतचा काळ घालवता येतो.

मेरी क्युरी फेलोशिप हा अजस्र प्रोग्रॅम आहे, त्यातल्या ‘इंटिग्रेटेड ट्रेिनग नेटवर्क’ अंतर्गत मास्टर्स करतानाच किंवा पीएच.डी. सुरू करण्यापूर्वीचा काळ युरोपातील एखाद्या विशिष्ट संशोधनप्रकल्पात (पगार घेऊन!) स्वयंसेवक म्हणून काम करायला मिळते. हा मार्ग खासकरून विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या होतकरूंसाठी खुला आहे, पण अर्थात अलीकडच्या इंटरडिसीप्लिनरी संशोधनाच्या काळात सामाजिक शास्त्रांमधील संधीही खूप वाढल्या आहेत.

फुलब्राईट-नेहरू मास्टर्स फेलोशिप या खास अमेरिकेतील पदव्युत्तर शिक्षणासाठी! शिवाय मास्टर्सनंतर संशोधनासाठी एखादा खास विषय आणि त्यासाठी नावाजलेली एखादी अमेरिकन संस्था डोक्यात असेल तर फुलब्राईटच्या ‘अ‍ॅकॅडेमिक अ‍ॅण्ड प्रोफेशनल एक्सलन्स प्रोग्रॅम’ अंतर्गत सहा महिन्यापर्यंत तिथे जाण्याची संधी आहे.

बाकी सर्व शिष्यवृत्ती या पोस्टडॉक, अर्थात पी.एचडी.-नंतर संशोधन काम उभे करण्यासाठी खुल्या आहेत. त्यांचा  काळ साधारण दोन वष्रे असतो. यामध्ये पदार्थविज्ञान आणि तंत्रज्ञान (फिजिकल सायन्सेस), रसायनशास्त्रे (केमिकल सायन्सेस), जीवविज्ञान (लाईफ सायन्सेस), पृथ्वीविज्ञान (जिओ अ‍ॅण्ड एन्व्हायरॉनमेंटल सायन्सेस), सामाजिक शाष्टद्धr(२२९ो (ह्य़ुमॅनिटीज् अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस) इत्यादी क्षेत्रनिहाय शिष्यवृत्त्या दिल्या जातात. ही क्षेत्रनिहाय रचना खरं तर साधारण अर्ज करणाऱ्यांच्या आणि निर्णयप्रक्रियेच्या सोयीसाठी आहे आणि त्यात विशिष्ट विषयांचे बंधन असे नाही, उलट स्वतच्या क्षेत्रात उत्तम काम उभं करताना इतर क्षेत्रांना स्पर्श करून इंटरडिसिप्लिनरी संशोधन उभं राहावं यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं जातं.

या सगळ्यांची माहिती कुठे मिळते?

उत्तर सोपं आहे – इंटरनेटवर! पण ती सहजासहजी सापडेल असे नाही. त्यासाठी वर म्हटल्याप्रमाणे इंटरनेट आणि समाजमाध्यमांचा वापर करण्यात तयार असणे गरजेचे आहे! स्वतला आवडतील आणि लागू पडतील अशा संधी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रॅम, मास्टर्स/पीएच. डी. फेलोशिप, पोस्टडॉक, विशिष्ट संशोधनाचा विषय, इंडियन रिसर्चर असे सगळे ‘कीवर्डस्’ वापरून ही शोधाशोध करायची! वर म्हटलेल्या महत्त्वाच्या शिष्यवृत्तींची एकत्रित माहिती खालील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे –

युरोपियन युनिअन https://euraxess.ec.europa.eu/

हुम्बोल्ट फाऊंडेशन https://www.humboldt-foundation.de/web/home.html

फुलब्राईट फाऊंडेशन http://www.usief.org.in/Fellowships-for-Indian-Citizens.aspx

पण इथेही बहुतेक सर्व ठिकाणी स्वतची प्रोफाईल तयार करून ठेवणे हे गरजेचे/संयुक्तिक आहे, जेणेकरून तुमच्या पाश्र्वभूमीला साजेशा, विषयनिहाय संधी पटापट हाती लागतात.

माहिती मिळाली की काय करू?

वरील कोणतीही शिष्यवृत्ती निवडली तरी अर्जाच्या प्रक्रियेत दोन गोष्टी कराव्या लागतात. पहिली तुमच्या शिक्षण-संशोधनकामासाठी योग्य संस्थेबरोबरच त्यामधला/मधली योग्य गुरू धुंडाळणे आणि त्यांच्यासोबत सल्ला-मसलत करून तुम्ही सदर शिष्यवृत्तीतून काय साधू इच्छिता याचा लेखाजोखा (दिलेल्या वेळेत!) सादर करणे! गुरूशोधाची प्रक्रिया पुन्हा आपल्याला पुन्हा काही अंशी संशोधनाशी निगडित समाजमाध्यमांकडे घेऊन जाते आणि तिथल्या चर्चाचे महत्व अधोरेखित करते. अशा व्यासपीठांवर किंवा आंतरराष्ट्रीय परिषदांच्या निमित्ताने झालेले परिचय आणि त्यावेळी कामासंदर्भात झालेल्या चर्चा एकत्र काम बांधायला मदत करतात, कारण शेवटी हा मामला कामाबद्दलच्या निष्ठेइतकाच एकमेकांबरोबर नवे संशोधन उभे करता येण्याच्या अनुरूपतेशी येऊन थांबतो. अशी अनुरूपता ही शेवटी संशोधनाबद्दलची चर्चा किती काळ आणि किती सकस झालीय यावर तयार होत असते- गमतीगमतीत आम्ही मंडळी याला ‘रिसर्च डेटिंग’ म्हणतो! एकत्रित चर्चामधूनच अर्जाच्या प्रक्रियेचा उरलेला भाग साधला जातो तो म्हणजे शिष्यवृत्तीच्या पशातून उभ्या राहणाऱ्या कामासाठीचा लिखित प्रस्ताव. हा प्रस्ताव म्हणजे शास्त्रीय पटवापटवीच, यात आम्ही अमूकतमूक का उभं करतोय, कसं उभं करतोय आणि कशासाठी उभं करतोय असं सगळं (त्या- त्या) शास्त्राच्या काटय़ावर तोलून मापून पटवून द्यावं लागतं. या ठिकाणी मुद्दा पुन्हा संशोधनक्षेत्राच्या मूळ गाभ्याला स्पर्श करतो – हे क्षेत्र ज्ञानाचं आहे, तिथे ज्ञान असणं आणि दाखवता येणं दोन्ही गरजेचं आहे!  अर्थात या सर्व शिष्यवृत्त्यांच्या प्रस्तावांना विशिष्ट शब्द/पानमर्यादा असल्याने अशा लिखाणात आटोपशीरपणा आणि सुसूत्रता असणंही गरजेचं आहे, एकुणात अशा कुठल्याही अर्जाच्या प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ घेणे-देणे, वेळेचे नीट व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक आहे! शिवाय, अशी एखादी अर्जप्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला शिष्यवृत्ती पावतेय की नाही हे कळायला किमान चार ते सहा महिन्यांचा काळ द्यावा लागतो. तेव्हा अशा संधी पूर्णत्वाला नेताना (स्वत:वरच्या आणि कामावरच्या!) श्रद्धेची आणि सबुरीची गरज असते आणि अशा निरनिराळ्या प्रक्रियांमधून तावून-सुलाखून संशोधन क्षेत्रात टिकून राहताना वर्षांनुवष्रे प्रयत्न करत राहण्याची आणि सतत मनाच्या मशागतीचीही!

First Published on June 7, 2019 1:07 am

Web Title: international scholarship
Just Now!
X