News Flash

स्वागत : कबीरांचा वसंत

वसंत ऋतूच्या हर्षोल्हासात गायल्या जाणाऱ्या पदांना फागु, होरी आणि बसंत या नावाने ओळखले जाते.

52-lp-kabirवसंत ऋतूचे आगमन झाले आहे. संत साहित्यात वसंत हे काव्यरूप सुप्रसिद्ध आहे. त्यात संत कबीरांच्या चौदा रत्नस्वरूपी काव्यरत्नांत वसंत या काव्यरूपाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वसंत ऋतू हे उत्कर्षांचे प्रतीक आहे.  डॉ. नजीर मुहम्मदांच्या मते वसंत ऋ तूच्या वातावरणाचे वर्णन तथा वसंतोत्सवात गायल्या जात असल्याने फागु काव्यास वसंताची व्याख्या आहे. याचे शास्त्रीय रूप धमार आणि लौकिक रूप फागु असे आहे. हे      ऋ तुपर लोकगीतांवर आधारित काव्य आहे. या शैलीत वासंतिक पद लिखाणाची प्रथा खूपच जुनी आहे. अकराव्या शतकात अपभ्रंश भाषेचे कवी अद्दहमाणच्या काव्यरचनेत या काव्यरूपाचा समावेश झाल्याचे आढळते. अशा या लोक प्रचलित काव्यरूपास ग्रहण करून संत कबीरांनी त्यास आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत परिवर्तित केले आहे. यात त्यांनी वसंतकालीन निसर्ग तथा वातावरणाद्वारे उपदेशात्मक प्रवृत्ती अवलंबली आहे. मायेचे तर्जन आणि शृंगारिक वर्णनांद्वारे विषयासक्त आणि अविवेकी जनतेला त्यांनी विचलित होताना दर्शवले आहे.

संत साहित्यात वसंत हे काव्यरूप सुप्रसिद्ध आहे. त्यात संत कबीरांच्या चौदा रत्नस्वरूपी काव्यरत्नांत वसंत या काव्यरूपाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत कबीरांची वसंत पदावली मुख्यत: रमैनी आणि शब्द पद्धतीत आढळते. संत जगजीवन साहेब, दरिया साहेब, भीखा साहेब, गुलाल साहेब, संत जगजीवनदास, संत सहजोबाई इत्यादींचे वसंत नावाने काव्यरचना आढळते. या सर्व काव्यरचनांवर वैचारिक तथा छंदात्मकतेच्या दृष्टिकोनातून संत कबीरांचा पगडा दिसतो.

कबीर बिजक, आदीग्रंथ, कबीर ग्रंथावली आणि कबीर शब्दावली या ग्रंथांत कबीरांचे वसंत हे कबीरांचे काव्यरूप आढळते. कबीर बिजक या कबीरपंथीयांच्या ग्रंथात बसंत नावाच्या प्रकरणात कबीरांच्या एकूण १२ पदांचा समावेश आहे. आदी श्रीगुरु ग्रंथसाहिबमध्ये राग बसंत या शीर्षकात संत कबीरांची आठ काव्ये आढळतात. तर कबीर ग्रंथावलीमध्ये राग बसंत या मथळ्याखाली कबीरांच्या तेरा पदांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच कबीर ग्रंथावली या कबीर पंथीयांच्या ग्रंथात शब्द बसंतमध्ये सद्गुरू कबीरांची २७ पदांचा उल्लेख आहे. मात्र काही पदे विविध ग्रंथांत एकसारखी आलेली आहेत. त्यामुळे या चारही गं्रथांतील संत कबीरांच्या एकूण वसंत पदांची संख्या ४९ अशी आहे.

सद्गुरू कबीरांनी मानवाला परमानंद प्राप्तीसाठी प्रेरित केले असून अहर्निश मोक्षरूपी बसंत साजरा करण्यास सांगितले आहे. सद्गुरू कबीरांनी बारोमास आपल्या जीवनात वसंतोत्सव साजरा केला होता. आपले जीवन हे चैतन्यमयी आहे. आपले मन हे प्रफुल्लित असल्याशिवाय प्रपंचातून परमार्थ साधता येणे कठीण आहे. म्हणूनच ते म्हणतात.

‘‘जाके बारोमास बसंत होय। ताके परमारथ बुझे बिरला कोय॥’’

सद्गुरू कबीरांनी या सच्चिदानंद आत्म्यास वसंताची उपमा दिली आहे. त्यांनी आवागमन रहित अशा वैकुंठवासाकरिता भक्तवत्सल अशा ईश्वराच्या शरणांगतीचा मार्ग दृढ केला आहे. त्यासाठी त्यांनी यमपाशाची थोडी भीती दाखवून वसंताचा संयोग साधला आहे. तसेच कबीरांनी जिव्हेच्या माध्यमातून परमात्म्याच्या नामस्मरणाकडे निर्देश केला आहे. त्यासाठी त्यांनी योग्यांसाठी परमात्मप्राप्ती किती अवघड आहे ते दर्शवले आहे. त्यान्वये जिभेचा खरा वापर करण्याकडे त्यांचा कल आहे. ते म्हणतात.

‘‘रसना पढि लेहू श्रीबसंत।
बहुरि जाय परिबेहू यमके फंद॥’’

कबीरांनी सद्गुरूदेवास शरण जाऊन वसंतरूपी योगमार्गाचा अवलंब करण्यास सुचवले आहे. ते सांगतात,

मै आयो मेस्तर मिलन तोहि।
रितू बसंत पहिरावहू मोहि॥

त्याचप्रमाणे त्यांनी सदैव आशा, तृष्णा व नवयौवनाचा भास निर्माण करणाऱ्या काया, वाचा, मन, माया इत्यादींना वसंताचे रुपक मानले आहे. कारण वसंत हे चैतन्य आणि नवयौवनाचे प्रतीक आहे. तसेच त्यांनी नश्वरतेवर भर देऊन रामनाम संकीर्तनाचा सदुपदेश केला आहे. ते म्हणतात,

‘‘ऐसो दुर्लभ जात सरीर।
राम नाम भजु लागू तीर॥’’

कबीरांच्या वसंत काव्यात नित्य आणि अनित्य अशा वसंताचे वर्णन करण्यात आले आहे. रुपकात्मक अध्यात्माची परिचर्चा करण्यात आल्याने या काव्यांतील प्रसंग अत्यंत रोचक बनले आहेत. यातील काही पद मायिक तर काही पद अमायिक आहेत. ‘वसन्तो विण्रतौ मायिका अमायिकावुमो।’ याचे अनुसार मायिक वसंताचे अस्तित्व पारमार्थिक सत्तेत असून अमायिक वसंताचे अस्तित्व पारमार्थिक सत्तेत आहे. म्हणून कबीर आपल्या वसंत पदात सांगतात, जसे कुलीन समाजाच्या कुटुंबात शांतीप्रद जीवनाची आवश्यकता असते. तसे मानवाने अंतर्द्वद्वातून विमुक्त होऊन योग वा भक्तीमार्गाने परमात्म्याच्या चिंतनास लागले पाहिजे. मायेचे अनेक भेद आहेत. त्यांनी वसंत पदातून जीवाला मायेपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. जीव हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे या दुष्ट मायेच्या कचाटय़ात अडकवत असतात आणि ते तिच्याद्वारा मारले जात असतात. या चंचल मनाच्या दुष्टतेसाठी रामनामाची कास धरण्याचा उपदेश संत कबीरांनी केला आहे. तसेच सद्गुरू कबीरांनी वसंत पदात जख्खड म्हातारीच्या सोदाहरणाद्वारे मायेचे तर्जन करून आपल्या जीवनात बहार आणण्यास सुचवले आहे. त्यांनी निर्दयी व चपळ अशा सर्पिणी तथा मायिक पद्मिनी आणि लक्ष्मीच्या रुपकातून मायेपासून सावध राहून आपल्या जीवनात वसंत साजरा करण्यास सांगितले आहे.

सद्गुरू कबीरांनी जीवरूपी कार्मिक पतीची अविद्यारूपी पत्नीद्वारा थट्टा-मस्करी मांडून जीवाला चेतवण्यासाठी बोध केला आहे. अविद्येला टाळून मायेचे तर्जन केल्यास मानवी जीवनात बहारदार वसंत गावण्याची ते ग्वाही या पदातून देत आहेत.

समाजातील प्रतिष्ठित व ज्ञानी लोकांना ‘बाबू’ असे संबोधण्यात येते. तसेच लोक जीवनात घरच्या कर्त्यांधर्त्यां पुरुषाला ‘बाबू’ असे म्हणतात. त्या योगे आपल्या गूढ शैलीद्वारे सद्गुरू कबीरांनी जीवाला ‘बाबू’ नावाने संबोधून जीवनात बहारदार वसंत साजरा करण्यास सुचवले आहे.

सद्गुरू कबीरांनी वसंत पदांतून मायेच्या चलाखीपासून वाचवण्याचा विडा उचलला आहे. बहारदार मानवी जीवनासाठी परमात्मप्राप्तीची कासणी धरण्यास त्यांनी सुचवले आहे आणि शाश्वत सुखासाठी सच्चा अंत:करणाने परमात्म्याचे नामस्मरण करण्याचा बोध केला आहे. जीवनात बहार आणण्यासाठी ते मानव जन्म सार्थकी लावण्यास सांगत आहेत. मृत्यू हा अटळ असल्याने या नरदेहाचा लोभ न धरता रामभजनाने जीवनात वसंत साजरा करण्यास ते आवर्जून सांगतात. तसेच ते जीवनाच्या बहारीसाठी मदाचा सर्वथा त्याग करण्यास सांगतात. सद्गुरू कबीरांनी परमात्म्याच्या शोधानेच जीवनात बहार येऊन वसंत साजरा करता येत असल्याचे कथन केले आहे. त्यासाठी त्यांनी दांभिक गुरुजनांना वेठीस धरले आहे. कारण त्यांच्या पाखंडांमुळेच सामान्य लोकांचे जीवन दु:खग्रस्त होत जाते.

कबीरांनी तथाकथित काशीतील सेवाकार्याची आलोचना केली आहे. हे त्यांच्या समाजात प्रचलित धार्मिक भावनेच्या प्रति विद्रोहाचे द्योतक आहे. त्यांत त्यांनी अनेक लोकरूढ म्हणींचा वापर करून तत्कालीन सामाजिक तथ्यांचा परिचय दिला आहे. यात संतकवी कबीरांची अनुभूती प्रदर्शित होते. कबीर हे सामाजिक सिद्धांत आणि व्यवहाराचे अध्येता होते. ते समाजाप्रति अत्यंत जागरूक असल्याचे त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून लक्षात येते. एका वसंत पदात सद्गुरू कबीरांनी तत्कालीन काशीचे यथार्थ वर्णन केले आहे. कबीरांच्या काळातील काशीतील लोक स्वैराचार आणि दंभग्रस्त होते. ते संप्रदाय पृथक, दांभिक भक्त तथा कर्मकांड अनुरक्त असल्याचे आजही आढळते. ते असे मानत की, काशीत मरणाने मुक्ती मिळते. परंतु कर्म खराब असल्यास काशीत मृत्यू झाला तरी मोक्ष मिळणार नाही. हे ते आपल्या रहस्यपूर्ण शैलीत शिवाच्या मर्यादशील संवादाच्या माध्यमातून ठासून सांगत आहेत. तसेच ते जीवनात वासंतिक बहार आणण्यासाठी अनिष्ठ रूढींचा परित्याग करून सत्कर्माची कास धरण्यास सांगत आहेत.

वसंताचा उन्मेशयुक्त ऋ तू जसजसा फाल्गुनाकडे सरकत जातो तसतशी परमभक्ताला आपल्या साजनास भेटण्याची उत्कट इच्छा होते. त्यास प्रभूच्या अवीट सुखाची ओढ लागते. तो अलबेला साईरूपी परमात्मा केव्हा भेटेल आणि त्याच्या रंगात चिंब भिजण्याचे सौभाग्य केव्हा प्राप्त होईल, त्याकडे तो आतुर असतो. माझा प्राणप्रिय साजण तर परदेशी गेला आहे. आता मी कोणासोबत खेळू? तो जीवनात बहार आणणारा वसंत ऋ तू येऊन निघून गेला. आता फुलेसुद्धा पडून कोमेजून सुकत आहेत. आता धरणी हरित वस्त्र धारण करणार आहे आणि ही प्रभूची विरहीण मात्र अश्रू ढाळत बसली आहे.

‘ऋतु रे बसंत के आय गये है, फूलन लगे टेसवा॥ (क. श. होळी पद ६)

कबीर सांगतात, असा बहारदार वसंत साजरा करा की त्याने निरंजनरूपी परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सहज शून्यात होळी खेळता येईल. एकदा का तुम्ही सहज शून्यात लगन लावली की, मग मृदंग, टाळ, डफाचा नाद अंतरात निनादू लागेल.

‘ऐसे खेलत फाग बसंत, निरंजन सहज सुन्न मे होरी॥ (क. श. होळी पद ११)

तुम्ही पण निजपतीसोबत अशी होळी खेळा. हाच तुमच्या जीवनात बहार आणणारा वसंत आहे. हाच तुम्हास प्रभूंच्या रंगात रंगवणारा फाग आहे. म्हणूनच कबीर म्हणतात की, तुम्ही पण अशीच होळी खेळा की ज्याने तुमच्या आवगमनाच्या दु:खाचे निवारण होईल. मात्र त्यासाठी तुम्हास प्रभू परमात्म्याच्या असिम रंगात रंगावे लागेल.

‘अपने पिया संग होरी खेलौ, एही बसंत एही फाग री॥ (क. श. होळी पद २९)

अशा प्रकारे सद्गुरू कबीरांनी वसंत या काव्यरूपास आपल्या अद्वितीय शैलीद्वारे लोकप्रिय केले आहे. त्यांनी वसंत ऋ तूच्या नैसर्गिक वातावरणाचे सूक्ष्मातिसूक्ष्म अवलोकन केले आहे. तसेच त्यांनी उपदेशांद्वारे आध्यात्मिक दृष्टिकोनातून आत्मोन्नतीचा मार्ग सुगम केला आहे.
संजय बर्वे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 1:09 am

Web Title: kabirs spring season
Next Stories
1 प्रासंगिक : विद्यापीठांतील राजकारण
2 जमीनसुधार नव्याने हवा
3 नाटक : दशा नाट्यगृहांची
Just Now!
X