जय पाटील

ज्यांना मोकळ्या आकाशात विहार करणं, दऱ्या खोऱ्यांत भटकणं, नव्या लोकांना भेटणं, न पाहिलेल्या वाटा पालथ्या घालणं आवडतं त्यांना पिंजऱ्यात कैद करून ठेवणं अशक्यच. पण सध्या इतरांबरोबर हे भटके सुद्धा घरात अडकून पडले आहेत. घराबाहेर जाता येत नसल्यामुळे आपल्या भटक्या टोळक्यांबरोबर समाजमाध्यमांतून आठवणींना उजाळा देत आहेत. एकमेकांचे फोटो, व्हिडिओज पाहून, आठवणी वाचून घरबसल्याच भटकंतीचा आनंद घेत आहेत.

समाजमाध्यमांवर भटक्यांचे अनेक ग्रुप आहेत. त्यात ते आपल्या जुन्या साहसांचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करून तुम्ही अशा प्रकारचं साहस केलं असेल, तर कमेंट करा, असं आवाहन केलं जात आहे आणि त्याला भरगोस प्रतिसादही मिळत आहे. कोणी तुम्ही फक्त तुमच्या शहराची दोन वैशिष्ट्य सांगा आणि आम्ही तुमचं शहर ओळखू असं आव्हान दिलं आहे. कोणी आपले एखाद्या कॅम्पिंग साइटवरचे फोटो पोस्ट करून हे ठिकाण ओळखा असं आवाहन केलं आहे. कोणी बसच्या छतावर बसून केलेल्या प्रवासाचे, कोणी स्थानिकांनी गायलेल्या लोकगीतांचे तर कोणी कॅम्प भोवती केलेल्या नृत्याचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. कोणी एखादी परदेशी व्यक्ती हिंदीतून संवाद साधत असल्याचे, तर कोणी एखादी खास स्थानिक थेरपी घेत असल्याचे व्हिडिओ ग्रुपवर झळकवले आहेत.

आपला आजचा दिवस कदाचित वाईट असेल, पण भविष्य उज्ज्वल आहे. जेव्हा आपण पुन्हा घराबाहेर पडू आणि मोकळ्या आसमंतात विहार करू लागू तेव्हा ही पृथ्वी पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झालेली असेल, असा दिलासा यातील अनेकजण एकमेकांना देत आहेत.