आरोग्य विशेष
डॉ. वैशाली जोशी – response.lokprabha@expressindia.com

‘आमच्या काळात असं नव्हतं’ हे शब्द तुम्ही कधी ना कधी घरातल्या वडिलधाऱ्यांकडून ऐकले असतीलच! तुम्हीही तुमच्या मुलांना असे अनेकदा म्हणत असाल. प्रत्येक पिढीच्या जीवनशैलीत बदल होत आहेत आणि या बदलांचे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहेत. बदलत्या जीवनशैलीतही आरोग्य उत्तम राखण्यासाठी आहार कसा असावा हे जाणून घेणे आवश्यक आहे.

long term investment, early investment planning, financial planning in todays world, loss minimization, risk optimization, achieve finanacial goals, portfolio in share market, share market, mutual fund, health insurance, bank repo rate, loan, inflation, investment, returns, profit, loss, financial article,
मार्ग सुबत्तेचा : दीर्घकाळासाठी नियोजन करताना…
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?

जागतिकीकरणामुळे संधी वाढल्याने करिअरच्या संकल्पना बदलत आहेत. पगाराचे आकडेही वाढत आहेत. हे आकडे जेवढे मोठे तेवढाच कामाचा ताण अधिक हे नव्याने सांगायला नको. कामाच्या पद्धती व खाण्याच्या सवयींत बदल होत आहेत. नवीन व वेगळी जीवनशैली आपला वेगाने ताबा घेत आहे. काळजीची बाब म्हणजे तरुण पिढीवर त्याचा विपरीत परिणाम होऊन वृद्धापकाळात होणारे आजार हल्ली तारुण्यातच गाठू लागले आहेत.

जीवनशैलीतील बदलांची मुख्य कारणे :

स्पर्धा व सतत कामाचा ताण

पैसे खर्च करण्याची क्षमता व वस्तूंची सहज उपलब्धता

झपाटय़ाने विकसित होणारे विज्ञान व तंत्रज्ञान

यामुळे आहार आणि व्यायामाच्या सवयी बदलत चालल्या आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी आहारात कोणते बदल झाले आहेत आणि व्यायामावर काय दुष्परिणाम झाला आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

आहारातील बदल

नको ती स्पर्धा

स्पर्धा ही अगदी के.जी.मधल्या लहान मुलांनासुद्धा चुकलेली नाही तर मोठय़ांबद्दल काय बोलावे? शाळा, महाविद्यालयापासूनच प्रवेशाची, त्यासाठी जास्तीतजास्त गुण मिळवण्याची धडपड सुरू होते. यामुळे मुलांना प्रचंड ताण असतो. मोठय़ांच्या ऑफिसमध्ये कामाचा व्याप वाढत असतो. डेडलाइन पाळण्याची घाई असते. कामगिरी चांगली न झाल्यास नोकरी जाण्याची भीती असते. ऑफिसला जाण्या-येण्यातच अनेकांचे दिवसाचे तीन-चार तास सहज खर्च होतात. बराचसा वेळ प्रवासात व नोकरीमध्ये खर्च झाल्यामुळे छंद जोपासण्यासाठी किंवा इतर काही करण्यासाठी त्यांच्याजवळ वेळच उरत नाही.

सततच्या तणावामुळे भुकेचे प्रमाण वाढते. याला ‘स्ट्रेस इटिंग’ असेही म्हणतात. तणावामुळे शरीरात ‘कोर्टिसोल’ नावाचे संप्रेरक पाझरते. त्यामुळे भूक वाढते.

आपण काय खातोय?

कामामुळे खाण्याच्या वेळा अनियमित असतात. वेळेअभावी काही वेळा खाल्लेच जात नाही. काम संपल्यावर मात्र, मनाचे समाधान होईल असे काहीतरी अरबटचरबट खाल्ले जाते. तसेच काही वेळा इच्छा असूनही दिवसभराचे डबे ऑफिसला नेणे शक्य नसते. त्यामुळे बाहेर खाणे हा एकमेव पर्याय असतो. लहान मुलांना पालक सांगतात, सकस आहार घ्यावा, वेळेवर जेवावे. पण मोठय़ांचे काय? त्यांनाही नाइलाजाने का होईना या पदार्थाचा आधार घ्यावा लागतो. एकटे राहणारे किंवा नवरा-बायको नोकरी करणारे असल्याने वेळेअभावी सतत बाहेरचे अन्न खावे लागते.

पैसा आहे, पण आरोग्याचे काय?

लहान वयातही खूप पगार मिळत असल्याने पसे खर्च करण्याची क्षमता वाढते. वेळेअभावी इतर काही आनंद घेता येत नाही, त्यामुळे खाण्यात आनंद शोधला जातो. सततच्या तणावामुळे भूक वाढते व ती भूक पिष्टमय, तळलेले व चमचमीत अन्नपदार्थ खाऊन भागवली जाते. या पदार्थाना कम्फर्ट फूड्स असे म्हणतात. हे खाल्ल्याने शरीरात ‘सिरिओटोनिन’ (फील गुड हार्मोन) हे संप्रेरक पाझरते. त्यामुळे मनाचे समाधान होते. आनंद मिळवण्याचा दुसरा उपाय म्हणजे पाटर्य़ा व सोशलायिझग. परिणामी अवेळी व

चांगलेचुंगले खाणे व ‘अपेयपान’ इत्यादींचे प्रमाण वाढले आहे.

थोडक्यात कधी वेळ नाही म्हणून, कधी जरासा चेंज हवा म्हणून तर कधी तरी पार्टी आहे, म्हणून आपण सतत फास्ट फूड व जंक फूड पोटात ढकलत असतो. या अन्नपदार्थात पोषण कमी असले, तरी उष्मांक मात्र भरपूर असतात. अर्थातच यामुळे वजन वाढू लागते, आजार होऊ लागतात. योग्य आहाराअभावी जीवनसत्त्व व खनिजांच्या गोळ्या सुरू होतात.

झपाटय़ाने विकसित होणारे विज्ञान व तंत्रज्ञान

तंत्रज्ञानामुळे एका क्लिकवर हवा तो अन्नपदार्थ हव्या त्या वेळी घरपोच मिळू शकतो. तसेच तंत्रज्ञानाचा दुसरा तोटा म्हणजे समाजमाध्यमे. आहारावरील अनेक लेख व्हायरल होत असतात. त्यांची पडताळणी न करताच त्यावर विश्वास ठेवून शरीरावर विविध प्रयोग करण्यास सुरुवात होते. प्रत्येकाची शरीरप्रकृती व अन्नघटकांच्या गरजा वेगळ्या असतात, मग त्यानुसार प्रत्येकाने आपल्या आहारात योग्य ते बदल केले पाहिजेत, हेच खरे.

व्यायामावर होणारे परिणाम

वेळेचा अभाव

ट्रेन व बसने ऑफिसला पळायचे व मिळेल तेवढा वेळ झोपायचे, असे जीवन आज बरेच जण जगत आहेत. व्यायामाला वेळच मिळत नाही अशी त्यांची तक्रार असते. त्याशिवाय ऑफिसमधल्या बठय़ा कामांमुळे व्यायामच होत नाही. व्यायामाला वेळ न मिळाल्यामुळे अपराधीपणाची भावना मनात निर्माण होते. वजन वाढताना दिसत असते.

व्यायामाचे समाधान विकत घेणे

वाढत्या वजनावर उपाय म्हणून जिमचे पत्ते शोधले जातात. पशाची कमतरता नसतेच. पसे भरले जातात. नियमित जाणे मात्र होत नाही. त्यामुळे अधिकच खंत वाटू लागते. असे विचार येतात की घरी मशीन असेल तर निदान वेळ मिळेल तेव्हा तरी व्यायाम करू. त्यापुढचे समाधान मिळविण्यासाठी ट्रेडमिल व इतर अनेक व्यायामाची उपकरणे विकत घेतली जातात. अर्थात ही नवलाई संपली की त्यावर कपडे वळवले जातात. पुढचा विचार मनात येतो तो व्यायाम न करण्याचा. याला जोड मिळते, ती वजन कमी करण्यासंदर्भातील टी.व्ही. वरच्या जाहिरातींची.

घाम आणणारा बेल्ट, व्हायब्रेट होणारे बेल्ट, अनेक प्रकारचे चहा, काही महागडे अन्नपदार्थ, चरबी कमी करण्यासाठी पोटावर लावण्याचे जेल या प्रकारच्या साधनांचा घरात प्रवेश होतो. यांचा कितपत उपयोग आहे याचा विचारही न करता अनेकजण ही उत्पादने खरेदी करतात. या बेल्ट व इतर उत्पादनांबरोबर इतर कुठल्या गोष्टींचे पालन करावे, याची एक भली मोठी यादी असते. या उत्पादनांमुळे नव्हे तर इतर सूचनांचे पालन केल्यामुळे वजन उतरताना दिसते.

जेलचेही काहीसे असेच असते. ते जेल लावल्यामुळे तेवढय़ा भागातील त्वचा आक्रसते व चरबी कमी झाल्यासारखे वाटते पण दोन-तीन दिवसांत ती पूर्ववत होते. ही उत्पादने म्हणजे ग्राहकांची फसवणूकच असते. कारण अशा चमत्कार घडवणाऱ्या उत्पादनांना कोणताही शास्त्रीय आधार नसतो.

जुने ते सोने

विकसित तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य अगदी सोपे होत चालले आहे. ओटय़ाजवळ उभ्याने स्वयंपाक करणे, डायिनग टेबलवर जेवणे, परदेशी पद्धतीचे स्वच्छतागृह वापरणे, पलंगावर झोपणे, घरात वॉिशग मशीन, मिक्सर, फूड प्रोसेसर, ओव्हन व गिझर ही यंत्रे वापरणे यामुळे रोजच्या कामामध्ये जमिनीवरची उठबस किंवा शारीरिक हालचाल जवळपास बंदच झाली आहे. दारात उभ्या असलेल्या मोटारगाडय़ा किंवा स्कूटरचा वापर, रिक्षा व विविध प्रकारच्या टॅक्सी सेवा यामुळे सर्वाचे चालणे अगदी बंद झाले आहे. माणसाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनात अतिवापर केल्याने त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होत आहे. ऑफिसमधील बठे काम, मोबाइल, गेम व समाजमाध्यमांमुळे व्यायाम होतच नाही.

भय इथले संपत नाही

आपण जेवढय़ा उष्मांकांचा आहार घेतो त्यापेक्षा कितीतरी कमी प्रमाणात त्याचे ज्वलन करतो. या कॅलरीज शरीरात चरबीच्या रूपात साठतात आणि वजन वाढू लागते. साधारण वर्षांकाठी अर्धा-एक किलो वजन वाढू लागते. त्याकडे दुर्लक्ष झाले तर मात्र, वजनवाढीची गती वाढतच जाते. अर्थात याचा परिणाम म्हणजे आपण स्थूल दिसू लागतो. मग उच्चरक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, अ‍ॅसिडिटी व पोटफुगी असे पोटाचे विकार, सांधेदुखी, टाचेचे हाड वाढणे, सायटिका, कोलेस्टेरोल वाढणे इत्यादी आजारांना आमंत्रण मिळते.

आरोग्याची गुरुकिल्ली

समतोल आहार, नियमित व्यायाम व पुरेशी शांत झोप ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. दैनंदिन जीवनात नियमितपणा ठेवणे आवश्यक आहे. आपल्या शरीराचे स्वत:चे असे एक जैविक घडय़ाळ असते जे आपल्या दिनक्रमाला सरावलेले असते. म्हणूनच वेळच्या वेळी जेवण, नियमित झोप व ठरलेल्या वेळी व्यायाम असा आपला जीवनक्रम ठरलेला असावा. ऋतुमानानुसार आहारात आवश्यक तो बदल करावा. रोजच्या आहारात ऋतुमानाप्रमाणे मिळणारी फळे व भाज्या अवश्य असाव्यात.

पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे या सर्व अन्नघटकांचे योग्य प्रमाण असलेला संतुलित आहार घ्यावा. हा आहार व्यक्तीसापेक्ष व प्रकृतीसापेक्ष असावा. कृत्रिम प्रक्रिया केलेले नुडल्स, पिझ्झा, पास्ता असे अन्नपदार्थ टाळावेत व जास्त सकस असे नसíगक अन्न खावे. खूप मीठ असलेले व मसालेदार पदार्थ टाळावेत. गोडाचा अतिरेक नक्कीच टाळावा. जास्त स्निग्धांश असणारे पदार्थ टाळावेत. रोजचा व्यायाम हा हवाच. थोडक्यात योग्य आहारला पुरेशा व्यायामाची जोड देणे व शांत झोपून शरीलाला आराम देणे हीच उत्तम आरोग्याची आणि सुडौल शरीराची गुरुकिल्ली आहे.