23 November 2017

News Flash

लोकप्रभा दिवाळी २०१७ : पुरा विदा कोस्टारिका

मध्य व दक्षिण अमेरिकेत स्पॅनिश सत्तेअगोदर संका जमातीचे राज्य होते.

गौरी बोरकर | Updated: October 18, 2017 4:01 PM

दोन्ही बाजूंना असलेल्या समुद्रामुळे कोस्टारिकाला विपुल असं निसर्गसौंदर्य लाभलं आहे. वनस्पती, प्राणी, पक्षी अशा सगळ्याच बाबतीत हा देश संपन्न आहे.

सोळाव्या शतकात स्पेनहून अमेरिकेच्या शोधात निघालेला कोलंबस समुद्री वादळामुळे अचानक एका हिरव्यागार बेटावर पोहोचला. उतरून किनाऱ्यावर गेल्यावर त्याला तेथील स्थानिक लोक अंगावर सोने लेवून समारंभ साजरा करताना दिसले. त्या ठिकाणी काही काळ केलेल्या वास्तव्यात त्याला बेटाचा अंतर्गत भागही नैसर्गिक संपत्तीने नटलेला दिसला. ते पाहून स्पॅनिश भाषेत तो म्हणाला, कोस्टारिका.. म्हणजेच रिच कोस्ट. तेव्हापासून हा देश कोस्टारिका म्हणूनच ओळखला जाऊ लागला.

मध्य अमेरिकेतील पनामा, निकुरागवा, होडुरास, बेलीज्, एल् साल्वाडोर या देशांच्या बरोबरीने असलेला हा एक देश. त्याच्या उत्तरेला आणि पश्चिमेला अनुक्रमे कॅरेबियन समुद्र तसंच पॅसिफिक महासागर आहे. या दोन्ही समुद्रांमुळे त्याला एक हजार २९० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. तालामांका व कॉडेलेरा या डोंगररांगांमुळे तसंच या दोन्ही समुद्रांवरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे इथे भरपूर पाऊस पडतो. इथे नोव्हेंबर ते मार्च एप्रिल ते डिसेंबर या काळात हिवाळा असतो. मध्य भागात काही ठिकाणी वर्षभर पाऊस असतो. त्याचे प्रमाण वर्षांला ५०० मिमी. आहे.

मध्य व दक्षिण अमेरिकेत स्पॅनिश सत्तेअगोदर संका जमातीचे राज्य होते. कोलंबसनंतर गोन्सालेज् या अधिकाऱ्याने इथे पहिली स्पॅनिश वसाहत केली. हळूहळू आपला जम बसवीत या वसाहतीने इथे १५० वर्षे राज्य केले. पुढे मेक्सिकन राजवट आली. पण कोस्टारिकन जनता त्यांना दाद देत नव्हती. १९व्या शतकाच्या मध्यावर मेक्सिकन हुकूमशाहीविरुद्धच्या लढय़ात जनतेने सैन्याचा पराभव करून स्वातंत्र्य मिळवले. त्या वेळी जीवितहानीसह इतरही बरेच नुकसान झाले. त्यानंतरच्या काळात राष्ट्रपती सुसिमोया यांनी लष्करावर खर्च करण्यापेक्षा जनतेच्या शिक्षणावर व आरोग्य सेवांवर भर दिला. त्यामुळे कोस्टारिका येथे साक्षरतेचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त असून बालमृत्यूचे प्रमाण अगदी नगण्य आहे. स्पॅनिश राजवटीत वेगवेगळ्या ठिकाणी असलेली राजधानी नंतर सॅनहोजे येथे आली, ती अजूनही तिथेच आहे.

हा भाग इतका नयनरम्य आहे की, नॅशनल जिओग्राफी संस्थेने जगातील रम्य स्थळांपैकी एक म्हणून त्याला नावाजले आहे. माँटेवेर्दे येथील इको टुरिझम पार्कमधली सुरुवात होते ती हमिंग बर्ड पार्कमधून. विविध रंगांचे, लांब, टोकदार चोच असलेले आणि आकाराने दहा-बारा सेंमी असलेले हे पक्षी एकाच ठिकाणी पंख फडफडवत किती तरी वेळ फुलातील मध चोचीने शोषून घेत असतात ते पाहून आश्चर्य वाटते. पार्कमधे काही ठिकाणी खोटय़ा फुलांमधे नळीत साखरेचं पाणी ठेवलेलं असतं. त्या ठिकाणी आपण उभे राहिलो तर हे पक्षी आरामात आपल्या डोक्यावर, खांद्यावर, हाताच्या पंजावर बसतात.
(संपूर्ण लेखासाठी प्रत्यक्ष वाचा लोकप्रभा दिवाळी २०१७. सर्वत्र स्टॉल्सवर उपलब्ध)
गौरी बोरकर

First Published on October 18, 2017 4:01 pm

Web Title: lokprabha 2017 diwali special issue pura vida costa rica