-अर्जुन नलवडे

करोना आणि टाळेबंदीमुळे सर्वांच्या नाकी नऊ आले असले तरी, कौटुंबिक पातळीवर एक बाब सकारात्मक घडलेली आहे. ती म्हणजे कोणताही मोबदला न घेता दिवस-रात्र घरात राबणाऱ्या महिलांच्या कष्टाची जाणीव संवेदनशील पुरुषांना नक्कीच झालेली दिसून येते. त्याची अनेक उदाहरणं व्हिडीओच्या स्वरूपात फेसबुक, व्हाट्सऍप, टिकटॉकसारख्या समाज माध्यमातून पाहायला मिळताहेत.

काही पती आपल्या पत्नीला धुणी-भांडी करण्यासाठी मदत करताना दिसत आहेत, तर काही मुले आपल्या आईला स्वयंपाक करण्यासाठी हातभार लावत आहेत. घरातील कामे पुरुष करतात, तेव्हा कोणकोणत्या गोष्टींना स्त्रियांना तोंड द्यावं लागतं, याचेही दर्शन व्हिडिओमधून घडत आहे. किचनमध्ये पोळी किंवा चपाती करताना पुरुषांकडून ज्या प्रकारचे नकाशे तयार होताहेत ते व्हिडीओ पाहून फेसबुक आणि टिकटॉकवर धमाल येत आहे. असे असले तरी, युट्युबवर रेसिपी सर्च करून वेगवेगळे पदार्थ करण्याचे प्रयोग मनोरंजनाबरोबर जिभेला पाणी सोडण्याचं काम करीत आहेत.

सध्या लोकांकडे वेळच वेळ असल्यामुळे युट्युबवर रेसिपी पाहण्याचे प्रमाणही जास्त आहे. त्यातून घरातील हे चविष्ट पदार्थ तयार करण्याचे व्हिडिओ इतरांनाही प्रयोग करण्याची प्रेरणा देताना दिसत आहेत. युट्युबचा आधार घेऊन काही फेसबुक बहाद्दर किचनमध्ये लाईव्ह करत मैद्याचा पाव, मिसळ, बटाटावडा, शाबू वडे, चिकनकरी, बिर्याणी, अशा एकापेक्षा एक रेसिपीचे व्हिडीओ शेअर करत आहेत. तसेच घरात राहिल्यामुळे वेगवेगळे किरकोळ आजारही लोकांचे बळावत आहेत. त्यामुळे घरगुती आयुर्वेदिक उपायही युट्युबद्वारे जाणून घेऊन लोक प्रयोग करताना दिसत आहेत.

काहीही असले तरीही लोकांना विशेष करून पुरुषांना महिलांच्या कामाचे महत्त्व आणि जाणीव या करोना नक्कीच करून दिली आहे. त्यातून घरातील सदस्यांचा आणि इतर नातेवाईकांचा संवाद वाढीस लागत आहे ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल.