भागवत संप्रदायात वारी फार महत्त्वाची. एरवी वारकऱ्यांचा हा संप्रदाय फार काही मागत नसतो. तेथे तीर्थाटनं, कर्मकांडं यांना किंमत नाही. नामस्मरण हा भक्तीचा सोपा मार्ग सांगणारा हा संप्रदाय. तेथे देवदलालांचे प्रस्थ वाढविणाऱ्या गोष्टींना स्थान नाही. विठोबाचे नाम घ्यावे, अभंग गुणगुणावेत, ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनमुभवण्याचा प्रयत्न करावा, गळ्यात तुळशीची माळ, कपाळी गंध आणि एकादशीचे उपवासाचे व्रत. बस्स. भक्तांकडून फार काही मागणे नाही. वारकरी संप्रदायातील तमाम संतांचे चरित्र याला साक्षी आहे. या भक्तीसोहळ्यात सर्वाना ओढ असते ती मात्र एकदा तरी श्रीमुख पाहण्याची. ते रूप याचि लोचनी पाहणे हे वारकऱ्यांच्या आनंदाचे निधान असते. त्या दर्शनाने चारी मुक्ती साधल्याचे सुख त्यांना मिळत असते. वारी ही त्यासाठी.

भक्तांचा मेळा जमवावा. निघावे. भजन-कीर्तन करीत चालावे. दरमजल करीत वाखरीला पोचावे. समस्त संतांच्या पालख्यांचे दर्शन घ्यावे आणि तेथून पंढरीरायाच्या ओढीने आवेगाने चंद्रभागेच्या वाळवंटाकडे धावावे हा नेम.

replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात

कधीपासून सुरू झाला असेल तो?

अठ्ठावीस युगे तर लोटली. तेव्हापासून ते सावळे परब्रह्म तेथेच उभे आहे. विटेवरी. भक्तराज पुंडलिकाने फेकलेली ती वीट. माता-पित्याची सेवा करतोय ना? तू का त्यांच्याहून थोर आहेस का? राहा गुमान उभा त्या विटेवरी, असे सांगणारा तो जगावेगळा भक्त. आणि त्याहून जगावेगळा त्याचा देव. काळा. महाराष्ट्र-कर्नाटकाच्या मातीसारखा. तेथील कष्टकऱ्यांसारखाच. त्यांच्यातलाच. मोठी अजब कहाणी आहे ही.

ही कहाणी आपणांस श्रुतींत दिसत नाही, स्मृतींत भेटत नाही की पुराणांत गावत नाही. श्रुती-स्मृती-पुराणांनी विठ्ठलाचा निर्देश केलेला नाही. हे महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे विष्णुचा अवतार मानले जाते. संतांनी तो विष्णुकृष्णरूप मानला आहे. पण विष्णुच्या अवतारगणनेत, नामगणनेत त्याचा समावेश नाही. त्याचे माहात्म्य आपल्यासमोर येते ते पौराणिक प्रकृतीच्या तीन संस्कृत ग्रंथांतून. त्यातील सर्वात आधीचा आहे स्कंद पुराणांतर्गत येणारा पांडुरंगमाहात्म्य. दुसरा पद्मपुराणांतर्गतचा पांडुरंगमाहात्म्य आणि तिसरा विष्णुपुराणातला पांडुरंगमाहात्म्य. स्कंद पांडुरंगमाहात्म्य हेमाद्रीच्या काळापूर्वी रचले गेले. त्यामुळे पंढरपूरचा विठ्ठलप्रधान पावित्र्यसांभार भक्कम पायावर स्थिर झाला.

विठ्ठल हा मुळचा कर्नाटकातला. कानडा विठ्ठलू कर्नाटकु हे तर सुप्रसिद्धच आहे. पंढरपूरचे भौगोलिक स्थानही या तथ्यास दुजोरा देणारे आहे. या पंढरपूरचे मूळ नाव आहे पंडरंगे आणि तेही कन्नड आहे. विठ्ठल मंदिरातील सोळखांबी मंडपातल्या तुळईवर होयसळ नृपती सोमेश्वर यांचा शके ११६९चा लेख आहे. त्यात या ग्रामनामाचा उल्लेख आहे. या पंडरंगेपासूनच विठोबाचे पांडुरंग हे नाम साकारले गेले आहे. पांडुरंग हे खासच संतप्रिय नाव. त्यात गंमत अशी की आपली विठुमाई सावळी आहे आणि पांडुरंग हे तर दृश्यत: शिववाचक आणि अर्थदृष्टय़ा कर्पूरगौर शिवाच्या शुभ्र वर्णाचे द्योतक आहे. हा विसंवाद दूर करण्यासाठी पुंडलिकाची कथा येते.

पुंडलिक हे नाव तर स्पष्टच पंडरगे, पुंडरिक यांच्या कृत्रिम संस्कृतीकरणातून साधण्यात आले आहे. पण तो मुळात आला कोठून? तर पुंडरिक हा मुळचा पुंडरिकेश्वर आहे आणि तो पंडरगे या गावाचा अधिष्ठाता देव आहे. पंढरपुरात विठ्ठलाची (या नावाची समाधानकारक व्युत्पत्ती अजून यायची आहे.) विष्णु-कृष्ण म्हणून नव्याने प्रतिष्ठा वाढविणाऱ्या वैष्णवांनी, वैष्णव क्षेत्रोपाध्यांनी पंढरपुरातील या मूळच्या देवताचे वैष्णवीकरण करून त्यास विठ्ठल परिवारात सामील करून घेतले. पुंडरिकेश्वराला भक्तराज पुंडलिकाचे नवे वैष्णवचरित्र दिले आणि त्याला विष्णुदास बनविले. दैवतांचे असे सामिलीकरण, उन्नयनीकरण अनेक ठिकाणी पाहावयास मिळते. पशुपालक अवस्थेतील समाजाच्या अनेक देवतांचे अशा प्रकारे सामिलीकरण वा उन्नयन करण्यात आलेले आहे. त्यांना नवी चरित्रे देण्यात आली आहेत. उदाहरणच सांगायचे तर शिव आणि नंदी या देवतांचे सांगता येईल. पाषाणयुगीन मानवांनी शिवाचे नावही ऐकलेले नसेल, तेव्हापासून नंदीची पूजा करण्यात येत आहे. पुढे तो शिवाचे वाहन बनला. दोन समाजांत शांततेने घडलेली ही सम्मिलिकरणाची प्रक्रिया आहे. जेथे या आणि वरिष्ठ नागर समाजात संघर्ष झाले तेथे आदिम वा पशुपालकांच्या देवतांना खालचे स्थान देण्यात आले आहे. यासंदर्भात दुर्गादेवी आणि महिषासुर ही कथा पाहता येईल. हा मूळचा म्हसोबा. देवी त्याचा वध करते. पंढरपुरात पुंडरिकेश्वराला वैष्णवचरित्र देण्यात आले आणि तो विठ्ठलाचा भक्त पुंडलिक बनला. त्यापासून पांडुरंग हे देवनाम तयार करण्यात आले.

अशा वेळी प्रश्न पडतो की मग हा भक्तजनांना मोहविणारा विठ्ठल कोण आहे? तर तोही मुळचा लोकदेवच आहे. तो गोपजनांचा, गवळी—धनगरांचा देव आहे. आजही विठ्ठल हे दैवत गोपजनांच्या, गवळी-धनगरांच्या परंपरेत आपले आदिम रूप सांभाळून आहे. म्हणजे कर्नाटक-महाराष्ट्रातले गोपजन त्याला विठ्ठल-बीरप्पा या जोडनावाने संबोधतात. त्यांच्या मंदिरात दोन पिंडी ठेवून ते या जोडदेवाची पूजा करतात. बीरप्पा किंवा विरोबा हा धनगरांचा मुख्य देव आहे. बहुसंख्य कथांमध्ये विठ्ठल हा बीरप्पाचा जवळचा सहयोगी देव किंवा भाऊ म्हणून येतो. हा विठ्ठल आणि तिरूमलैचा वेंकटेश एकच. त्यांच्या उन्नत रूपाचे आदिबीज सापडते ते गोपजनांच्या, गवळी-धनगर-कुरुबांच्या विठ्ठल-बीरप्पा नामक जोडदेवात. विठ्ठलाला गोपाळकाला प्रिय. चंद्रभागेच्या वाळवंटातील सामाजिक एकात्मतेचे ते जणू प्रतीकच. काही अभ्यासकांच्या मते हा वैदिक करंभ आणि गोपाळकाला यात संबंध आहे. ‘करंभ: दधिसक्तव:’ असे वेदज्ञ सांगतात. हा पदार्थ सातूचे पीठ आणि दही एकत्र कालवून बनवितात. तेव्हा ते गोपाळकाल्याचेच पूर्वरूप असावे. वैदिक पूषन् देवाचा हा खास आवडता पदार्थ आहे. या देवाच्या हातात वृषभमुखाची काठी आहे. तो कांबळे पांघरणारा, गायीगुरांची खिल्लारे राखणारा आणि गोपजनांना वाटा दाखविणारा आहे. तो गोपजनांचा देव. त्याला दही आणि पीठ आवडते. पंढरपूरचा विठोबा ताक आणि पीठाने संतुष्ट होतो. त्याच्या या प्रेमाची स्मृती ताकपिठय़ा विठोबाच्या रूपाने पाहावयास मिळते. तर हा गोपाळकाला आणि विठ्ठलभक्त संतांना रचलेली भारूडे यांचा संबंधही गोपजन-धनगर संस्कृतीशी येतो. भारूड या शब्दाचा तर मूळ अर्थच धनगर असा आहे. गुजरातमध्ये आजही भरवाड नावाची पशुपालक जमात आहे. तिचे नाव भारूड या धनगरवाचक नावाशी जवळचे आहे. हे पाहिल्यानंतर विठोबा आणि वारी यांच्या संबंधांचा एक वेगळाच अर्थ समोर येऊ लागतो.

पशुपालक हा एका जागी स्थिर असणारा समाज नव्हे. तो फिरस्ता आहे. त्याचे वेळापत्रक वर्षांऋतुशी बांधलेले आहे. उदाहरणार्थ धनगर—कुरुबांचे वेळापत्रक. आपले पशुधन घेऊन चाऱ्याच्या शोधात बाहेर पडलेले धनगर आषाढात परत येतात आणि पावसाळा संपला की कार्तिक महिन्यात ते पुन्हा बाहेर पडतात. पंढरपूरची वारी याच वेळापत्रकाशी जोडलेली आहे हे सहज लक्षात यावे. पंढरपूर हे स्थानही प्राचीन काळी धनगरांच्या स्थलांतराचा जो मार्ग होता त्यावरच येते. ते फिरत्या जमातींचे एकत्र येण्याचे ठिकाण होते. ते बाजाराचे, यात्रेचे ठिकाण होते. इतिहास संशोधक आणि गणितज्ञ प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी त्यांच्या ‘भारतीय इतिहासाच्या अभ्यासाची ओळख’ या इंग्रजी ग्रंथात सांगितल्यानुसार, जेव्हा स्थानिक दैवतांचे ब्राह्मणी देवतांशी नाते जोडण्यात येते, या दैवतांना ब्राह्मणी देवतांचे साकर्ते, अवतार बनविण्यात येते किंवा त्यांचे उन्नयन करण्यात येते आणि या जमाती उत्पादन वा विपणन केंद्रांशी जोडल्या जातात तेव्हा बनारस, मथुरा, नाशिक यांसारखी तिर्थे उदयाला येतात, हे भारतीय इतिहासात दिसून आले आहे. पंढरपुरात विठ्ठल या लोकदेवास नवे वैष्णवचरित्र तर देण्यात आहेच, परंतु पुंडरिकालाही त्यात सामील करून घेण्यात आले. यातून या लोकदेवांच्या यात्रेला नवे चरित्र मिळाले. वारीला नवा अर्थ प्राप्त झाला.

शेकडो वर्षांपासून ही वारी सुरू आहे. भाव-भक्तीचा हा झरा. तो अव्याहत वाहात आहे. आजच्या आधुनिक काळात त्यात बदल झाले. काही चांगले, काही वाईट. पण त्याचा उगम मात्र निर्मळच होता. तो पशुपालन अवस्थेतील समाजाशी जोडलेला आहे. ही वारी म्हणजे लोकस्मृतींचा, इतिहासाचा, परंपरेचा, धागा किती चिवट असतो त्याचे जिते जागते प्रतीक आहे.

(विठ्ठल : एक महासमन्वय- रा. चिं. ढेरे, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती, १९८४, An Introduction to the Study of Indian History – Prof. D. D. Kosambi, Popular Book Depot, 1956 या दोन ग्रंथांवरून हा लेख बेतलेला आहे.)
रवि आमले – response.lokprabha@expressindia.com