राजकारण
ज्योत्स्ना भाटवडेकर – response.lokprabha@expressindia.com

कॉलेज म्हटल्यावर त्यात अनेक गोष्टी येतात. त्यातलीच एक महत्त्वाची आणि रोजचा संबंध येणारी गोष्ट म्हणजे कॉलेजमधला आपला विभाग. खरंतर कोणत्याही विद्यार्थ्यांचा शक्यतो शेवटच्या वर्षांला आल्यावरच विभागाशी प्रत्यक्ष आणि जवळचा असा संबंध येतो. शेवटच्या वर्षी एखादा  विषय घेतला की  ‘अरे हा इकोवाला रे’. ‘अरे ती? ती तर केमिस्ट्रीवाली’ असं म्हणत त्या त्या विषयाच्या विभागाचा विद्यार्थी किंवा विद्याíथनी म्हणून आपोआपच त्याची ओळख होऊ लागते. आणि एकदा का या टी.वाय.च्या वर्षांला एका विभागामध्ये येऊन पडलं की त्या विभागाचे अंतरंग उलगडायला सुरुवात होते. कारण प्रत्येक विभागाचा बाहेरचा साज आणि आतला रंग सारखाच असेल असं नाही ना..

कॉलेजच्या अमुक अमुक दोन विभागांमध्ये स्पर्धा आहे. ते विभाग एकमेकांना नेहमी पाण्यात बघतात वगरे वगरे गोष्टी आपण नेहमीच ऐकून असतो..पण या दोन विभागांमधल्या स्पध्रेप्रमाणेच प्रत्येक विभागामध्येही अशी चुरस, स्पर्धा असतेच आणि या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी अपरिहार्यपणे त्यात राजकारण हे येतेच. हे राजकारण विद्यार्थी आणि प्राध्यापक या दोन्ही पातळीवर तितक्याच खुबीने खेळलं जातं यात काही वाद नाही.

एका विभागामध्ये दोन किंवा तीन प्राध्यापक असतील तर त्यांच्यात वाद, मतभेद आणि स्पर्धा या तशा ठरलेल्या गोष्टी असतात. प्राध्यापकांची स्वतची शैक्षणिक गुणवत्ता, अनुभव यातून त्यांना मिळालेल्या पोस्ट्स यावरून काही विभागांमध्ये शीतयुद्ध तर नेहमीच धुमसत असतं. त्यात ज्युनिअर प्राध्यापकाची डॉक्टरेट झालेली असेल तर काही बघायलाच नको.. त्यांच्याकडे डिग्री आहे म्हणून स्वत पीएचडीसाठी अर्ज करणारे प्राध्यापक वगरे वगरे गोष्टी हळूहळू एका विभागाचा भाग झाल्यावर आपसूक कळायला लागतात.

शैक्षणिक गुणवत्ता, अनुभव वगरेबरोबर प्राध्यापकांची मोठी ताकद असते ती म्हणजे आपल्या विभागामधली मुलं.  मुलांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी किंवा मुलांना आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी अनेक युक्त्या प्राध्यापकांकडून केल्या जातात. वर्षांच्या सुरुवातीला मुलांना तयार नोट्स देणे, अडी-अडचणीत मुलांची बाजू घेणे हे काही कॉमन फंडे त्यांच्याकडून राबवले जातात. अर्थात यात आमच्यासारख्या मुलांचा भारी फायदा होतो आणि सर्वाधिक लाभार्थी असणारे विद्यार्थी त्या प्राध्यापकांच्या गटात आपोआप सामील होतात. यापलीकडे जाऊन काही वेळा अक्षरश वर्गात येऊन दुसऱ्या प्राध्यापकांबद्दल वाइटसाइट सांगणे वगरे प्रकारही हळूहळू सुरू व्हायला लागतात. सुरुवातीला मनोरंजनाचे वाटणारे हे प्रकार नंतर नंतर मात्र मुलांच्या भारी अंगाशी यायला लागतात हे मात्र खरं.

हे सगळं करता करता हळूहळू विभागामध्ये गटबाजी होते आणि मग तू या प्राध्यापकांचा, तू त्या प्राध्यापकांचा असे विद्यार्थ्यांवर शेरे लागतात. मग शंका विचारायला एका प्राध्यापकांकडे गेलं की दुसऱ्या प्राध्यापकांनी नाराज होणं असे काहीसे नवीन त्रास यातून उद्भवतात. एकदा का ही गटबाजी झाली की मुलेही या राजकारणात आपसूक सहभाग घ्यायला लागतात. यातही प्राध्यापकांसमोर आपली चांगली प्रतिमा बनवण्यासाठी त्यांची चमचेगिरी करणारे विद्यार्थी असतात. वर्गात जे काही होईल त्याची खबर लगच्यालगेच त्या त्या प्रोफेसरकडे पोहोचवायची अशी जणू  शपथच यांनी घेतलेली असते.. याबाबतीत प्रत्येक विभागामधलं एक कटू सत्य म्हणजे हे चमचेगिरी करणारे विद्यार्थी इंटरनल्समध्ये सर्वाधिक मार्क्‍स मिळवून सुखात तर जगतातच; पण आमच्यासारख्या मध्येच अडकलेल्या मुलांना मिळणारे टोमणे, शिव्या-शापही एन्जॉय करतात.

बाहेरून कितीही भारी वाटणाऱ्या कॉलेजच्या प्रत्येक विभागामध्ये रोजच्या पातळीवर ही असली राजकारणं  कमीअधिक प्रमाणात घडत असतात. यात काहीजणांचा लाभ होतो तर काही जण उगाचच भरडले जातात. हे खरं असलं तरी या सगळ्याशी हुशारीने आणि युक्तिवादाने लढणारेच आपला झेंडा अटकेपार लावतात हेच यातलं अंतिम सत्य.