lp52घरात बाळ येणार म्हटल्यावर सगळ्यांना काय करू आणि काय नको असा आनंद होतो. ते साहजिक असलं तरी त्यापेक्षाही जास्त गरज असते ती त्या होऊ घातलेल्या आईच्या गर्भधारणापूर्व समुपदेशनाची. ते केलं तर नंतरचे अनेक धोके टाळता येतात.

तेजा मोठी हुशार मुलगी. नावाप्रमाणे तेजस्वी. खूप शिकलेली. मोठय़ा बहुदेशीय कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावरती काम करते. थोडा उशीर झाला तरी लग्न पस्तीस वर्षांवर झाले. लग्नानंतर लगेच गरोदर झाली. सोनोग्राफीत बाळाला अनेक व्यंग आहेत असे कळले आणि तेजा कोमेजून गेली. अशी परिस्थिती वैऱ्यावरही येऊ नये. गर्भपाताशिवाय पर्याय नव्हता. असे का झाले? हे टाळण्यासारखे होते का? हे प्रश्न आपल्याला नंतर भेडसावतात.

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

मातृत्व हा आयुष्यातील सुंदर अगदी स्वप्नवत वाटणारा काळ, स्त्रीच्या जीवनाची परिपूर्ती वगैरे सगळे खरे आहे; पण यात काही अंशी प्लािनगचा अभाव असतो. घर बांधायला प्लानिंग, सेविंग, लग्नाचे प्लानिंग, नवऱ्यामुलाबद्दल, मुलीबद्दल माहिती काढणे हे सगळे आपण व्यवस्थित करतो. पण प्रेग्नन्सीसारखी महत्त्वाची गोष्ट देवावर सोडतो.

प्रेग्नन्सी कधी पाहिजे याचा विचार झालेला असतो, पण त्यासाठी आपण मानसिक, शारीरिकरीत्या तयार आहोत का याबद्दल अनिश्चितता असते, जर लग्न थोडय़ा मोठय़ा वयात झाले असेल तर ही अनिश्चितता अधिक वाढते. उशीर करता कामा नये याची कल्पना असते, पण सुदृढ गर्भासाठी काय करायचे याची माहिती नसते.

माझे ठाम वैयक्तिक मत आहे की, हे मुद्दे तरुण मुला-मुलींशी कॉलेजातच चर्चिले गेले पाहिजेत. पण कदाचित आपल्या समाजाची तशी मानसिक तयारी नसावी. मग दाम्पत्याला काय माहिती असली पाहिजे ते आपण थोडक्यात पाहू.

सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल या अमेरिकन आरोग्य संस्थेच्या मार्गदर्शक सूचींचा आपण आढावा घेऊ.

यात आपण सर्वागीण आरोग्य (वजन, आहार, व्यायाम, कामाचे स्वरूप, व्यसने किंवा सवयी) शारीरिक व मानसिक आजार, आनुवंशिक आजार यांचा विचार करू.

यासाठी आपल्या कुटुंबीयांच्या स्वास्थ्याबद्दल, कोण कुटुंबीय कुठल्या आजाराने पीडित आहेत अथवा अकाली दगावले आहेत याची थोडीशी पूर्वकल्पना हवी. कारण मग डॉक्टर त्याआधारे आपल्याला तपासण्या, कुटुंबनियोजन (प्रेग्नन्सी तात्पुरती टाळावी की कसे) यावर सल्ला देतील.

वय तिशीनंतरचे खासकरून पस्तिशीनंतरचे असेल तर आपले सर्वसाधारण आरोग्य कसे आहे, ब्लड प्रेशर (उच्च रक्तदाब), मधुमेह , स्थूलपणा आहे का हे पाहिले जाते.

वजन : आपले वजन आणि उंची यावरून बॉडी मास इण्डेक्स काढली जाते, ती २६ च्या वर अथवा १९च्या खाली असू नये. तसे असल्यास बीज बनणे नियमित झाले नाही तर गर्भधारणेत अडचण येऊ  शकते. अतिस्थूल असल्यास गर्भधारणेनंतरही उच्च रक्तदाब, मधुमेह होण्याची शक्यता वाढते.

आहार : वजन कमी करण्यासाठी किंवा खायला वेळच नसतो अशा कारणांमुळे करिअर ओरिएंटेड, महत्त्वाकांक्षी तरुणी सर्व प्रकारच्या आहार घटकांचे सेवन करत नाहीत. ‘ब’ आणि ‘ड’ जीवनसत्त्व, कॅल्शियम, लोह (आयर्न) यांचा अभाव खूप पाहिला जातो. ‘ब’, ‘ड’ जीवनसत्त्वांच्या अभावामुळे बाळात जन्मजात व्यंग उद्भवू शकते.

अख्खा दिवस कॉम्प्युटर-समोरच्या बैठय़ा कामामुळे तरुण पिढीला सूर्यकिरण मिळत नाहीत. फेअर अ‍ॅण्ड लव्हली राहण्यासाठी अनेकजणी सूर्यप्रकाश टाळतात. शाकाहारी असल्यास योग्य प्रमाणात कॅल्शियम असेल असा आहार आवर्जून निवडावा लागतो. ‘ड’ अणि कॅल्शियम कमी असेल तर आपली हाडे ठिसूळ होतात. आहारात कुठच्या महत्त्वपूर्ण घटकांची कमतरता दिसून आली तर डाएटीशिअन आपल्याला योग्य ते बदल सुचवितात.

जर उच्च रक्तदाब, मधुमेह असले तर काळजीपूर्वक आहार नियमन करून ते आटोक्यात आणावे लागतात.

मधुमेह : जर पालक, भावंडे यांना मधुमेह असेल, पूर्वी गर्भ पोटातच दगावला असेल, आधीच्या बाळात व्यंगदोष असेल, तर मधुमेहाची तपासणी करावी लागते. जर मधुमेह असल्याची माहिती असेल तर एच.बी. ए. वन सी. ही तपासणी करावी ते नॉर्मल झाल्याशिवाय गर्भधारणा होऊ  देऊ  नये.

उच्च रक्तदाबासाठी औषधे चालू असल्यास त्यातली काही औषधे गरोदरपणात चालत नाहीत. ती बदलावी लागतात.

आकडीचा आजार : जर आकडीच्या आजारासाठी औषधे चालू असल्यास गर्भनिरोधक गोळ्या निकामी होऊ  शकतात व नको असताना गर्भधारणा होऊ  शकते. त्यासाठी जागरूक असणे आवश्यक आहे.

जेव्हा गर्भधारणा पाहिजे असेल तेव्हा आपल्या डॉक्टरांशी याबाबत चर्चा करून औषधे बदलावीत की नाही हे ठरवता येईल. गर्भधारणेआधी निदान महिनाभर ४ मिग्रॅ. फोलिक एसिडच्या गोळ्या घ्याव्यात.

थायरॉईडचा आजार असेल तर तो गर्भधारणेआधी पूर्णपणे आटोक्यात असावा व रक्तातील थायरॉईडचे आणि इतर संबंधित तपासण्यांचे प्रमाण योग्य असावे.

क्षयरोग आपल्या देशात मोठय़ा प्रमाणात आढळतो. वजन कमी होत असल्यास दीर्घ मुदतीचा ताप, खोकला याचे निदान व निर्मूलन करून घ्यावे. जर क्षयाचा इलाज चालू असताना गर्भधारणा झाली तर कुठली औषधे चालू आहेत यावर पुढचे निर्णय आधारित असतात.

कावीळ : हिपॅटायटिस ‘बी’ आणि ‘सी’ हे दोन काविळीचे गंभीर प्रकार आहेत. ज्या स्त्रियांना हिपॅटायटिस ‘बी’चा धोका संभवतो त्यांना गर्भधारणेआधी लस घेणे आवश्यक आहे. जर हिपॅटायटिस ‘बी’ असेल तर बाळाला त्याची लागण होण्याची शक्यता कमी करण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला व योग्य प्लानिंग केले पाहिजे. हिपॅटायटिस ‘सी’, त्या व्हायरसचे प्रमाण व गर्भावस्थेतील लागण याबद्दल स्पेशालिस्ट माहिती देतील. हिपॅटायटिस ‘सी’चा इलाज चालू असताना गर्भधारणा टाळावी.

एच.आय.व्ही. : गर्भधारणेआधी आपल्याला हे इन्फेक्शन आहे का हे माहीत असणे चांगले. त्याप्रमाणे नियोजन करता येते. इन्फेक्शन असल्यास बाळाला त्याची लागण टाळण्यासाठी काय उपाय करावेत हे नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन पुरस्कृत व्ही.सी.टी.सी. (समुपदेशन केंद्रात) उत्तमरीत्या समजावले जाते.

मलेरिया : पाश्चात्त्य देशात याचे प्रमाण कमी असल्याने त्यांच्या मार्गदर्शक सूची मलेरिया असलेल्या देशात न जाण्याबद्दल सांगतात. पण आपल्या देशात याचे प्रमाण खूप असल्याने डासांपासून बचाव एव्हढेच काय ते करता येते.

गुप्त रोग : आपण सगळेच एच.आय.व्ही.ला घाबरतो; पण त्याशिवाय इतरही गुप्त रोग असे आहेत की ज्यांची लागण बाळाला होऊ  शकते. सिफिलीस, गोनोहिृया, क्लॅमिडिआ इत्यादी जीवाणूंमुळे गर्भाला संसर्ग, गर्भपात होऊ  शकतात. जर आपल्या डॉक्टरांना आवश्यकता वाटली तर ते आवश्यक त्या तपासण्या करून घेतील.

ल्युपस आणि र्ह्युमॅटॉईड आथ्र्रायटिस हे असे आजार आहेत की त्यांची औषधे गर्भासाठी धोकादायक असतात. गर्भधारणेआधी स्पेशालिस्ट व आपल्या डॉक्टरांबरोबर चर्चा करून योग्य तो उपचार करावा.

मूत्रपिंडाचे आजार : साधारणत: हे आजार गरोदरपणात बळावतात. जर उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा आजार असेल तर त्यांची काही औषधे गर्भासाठी धोकादायक असतात ती बदलून घ्यावीत.

हृदयरोग : हृदयाच्या झडपांचे आजार तरुण वयात तर इश्किमिक हार्ट डिसिज मध्यम वयात आढळतात. जर झडपांची शस्त्रक्रिया झाली असली आणि रक्त पातळ राहण्यासाठी औषधे चालू असली तर ती बदलावी लागतात. या आजारासाठी अतिशय नेमाने तपासण्या व लक्षपूर्वक इलाज करावा लागतो. या रुग्णांना काही गर्भनिरोधके देता येत नाहीत. योग्य सल्ला घेणे व पाळणे या रुग्णांच्या आरोग्याकरिता खूपच महत्त्वाचे आहे. यांसाठी निरोध (कॉण्डोम) हेच सर्वोत्तम गर्भनिरोधक आहे.

मानसिक आजार : बायपोलार डिजॉर्डर, श्कीझोफ्रेनिआ, डिप्रेशन हे विकार असताना त्यांच्या नियमित औषधोपचारांवर रुग्ण आणि कुटुंब यांचे मानसिक स्वास्थ्य अवलंबून असते. या आजारांच्या रुग्ण व कुटुंबीयांनी औषधोपचार, त्यांचे गर्भावरील परिणाम व रुग्ण स्त्रीचे स्वास्थ्य याचा सर्वागीण विचार करावा.

धूम्रपान : हे कोणासाठीही बरे नाही हे काही नव्याने सांगायला नको. पण धूम्रपान, तंबाखूचे सेवन हे बाळासाठी फार अपायकारक असतात.

मद्यपान : मद्यपानसुद्धा गर्भासाठी अपायकारक असते.

इतर ड्रग्जचेही अपायकारक परिणाम गर्भावर होतात. त्यामुळे स्त्रियांनी गर्भधारणेआधी या सर्व उत्तेजक अणि मादक पदार्थाचे सेवन सोडून देणे फार महत्त्वाचे आहे.

व्हॅक्सिन्स (लसीकरण): सर्व प्रकारचे लसीकरण गर्भधारणेआधी करून घेणे उत्तम. अनेक लसी गरोदरपणात देता येत नाहीत. स्वाईन फ्ल्युसारख्या लसी त्या आजारांच्या  गांभीर्यामुळे गरोदरपणातही दिल्या जातात.

घरगुती हिंसाचार : आनंदी जोडप्याला हे कसे विचारायचे असे काहींना वाटणे स्वाभाविक आहे. पण हा समाजातला न दिसणारा राक्षस आहे. अनाठायी वाटले तरी या प्रश्नाच्या उत्तरावर गरोदर स्त्री, तिचे बाळ आणि कुटुंब यांचे स्वास्थ्य अवलंबून आहे.

या सर्व चर्चेचा हेतू प्रत्येक गर्भधारणा आणि प्रसूती सुखरूप व्हावी, मूल हवे असतानाही नाईलाजाने गर्भपात करण्याची वेळ कुणावरही येऊ  नये असा आहे.
डॉ. पद्मजा सामंत – response.lokprabha@expressindia.com