रायगड जिल्ह्यतही वर्षभरात सहा हजाराहून अधिक श्वानदंशाची प्रकरणे समोर आली आहे. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी व्यापक मोहिमा राबविल्या जात असल्या तरी भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे.

पनवेल शहरातील सेक्टर-८ मध्येच भटक्या कुत्र्यांनी एका बारा वर्षांच्या मुलावर सामूहिक हल्ला केल्याची घटना नुकतीच समोर आली. बारा वर्षांचा अर्थव राणे हा मुलगा गार्डनमध्ये खेळण्यासाठी गेला होता. त्या वेळी याच परिसरातील पाच ते सहा कुत्र्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. अर्थवच्या हातापायाचे लचके तोडून त्याला गंभीररीत्या जखमी केले. यात त्याला अनेक ठिकाणी खोलवर जखमा झाल्या. हा प्रकार आसपासच्या लोकांनी पाहिला. त्यांची कुत्र्यांच्या हल्ल्यातून सोडवणूक केली. अर्थवला रुगणालयात दाखल करण्यात आले. त्याला १३ टाके पडले.

रायगड जिल्ह्यत २०११-१२ मध्ये श्वानदंशाची सहा हजार ६२३ प्रकरणे समोर आली. २०१२-१३ मध्ये ही संख्या वाढून सात हजार २९८ वर पोहोचली. २०१३-१४ मध्ये हे प्रमाण वाढून आठ हजार ६०५ वर पोहोचले. २०१४-१५ मध्ये नऊ हजार ८३६ श्वानदंशाच्या घटना घडल्या. २०१५-१६ मध्ये ८,३५६ लोकांवर श्वानदंशाचे उपचार करण्यात आले. तर या वर्षी २०१६-१७ मध्ये डिसेंबर अखेपर्यंत सहा हजार ५२९ श्वानदंशाच्या घटना समोर आल्या आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आकडेवारी शहरी भागात शासकीय रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांची आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांचा समावेश नाही. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात श्वानदंशाचे प्रमाण अधिक आहे. पनवेल, उरण, कर्जत, अलिबाग, पेण, महाड या शहरात श्वानदंशाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे भटकत्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शहरी भागात भटके कुत्रे झुंड करून राहतात. रात्रीच्या वेळी हे शहरातील रस्त्यावर झुंडीनेच फिरतात. काळोखात येणाऱ्या जाणाऱ्यांवर भुंकतात. वाहनचालकांच्या मागे लागतात. आक्रमक होऊन बरेचदा लहान मुले, वृद्ध माणसांवर हल्लेदेखील करतात. त्यामुळे त्यांचे करायचे काय, हा प्रश्न नगरपालिकांना पडला आहे. कुत्र्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. यात अनेक दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

प्राणिमित्र संघटनांच्या दबावामुळे गेल्या काही वर्षांत जिल्ह्यतील शहरी भागात कुत्र्याचे निर्बीजीकरण मोहिमा राबविण्यात आल्या. मात्र या मोहिमांना फारसे यश मिळतांना दिसून येत नाही. दर वर्षी लाखो रुपये खर्चूनही शहरी भागात भटक्या कुत्र्याचे प्रमाण कमी झालेले नाही. भटक्या कुत्र्यांना पकडणे हे मोठे जिकिरीचे काम ठरते. कुत्रे आक्रमक होऊन हल्ला करीत असल्याने नगरपालिकेचे कर्मचारी यासाठी पुढे येत नाही. निर्बीजीकरणानंतर आठ दिवस कुत्र्यांची काळजी घेणे गरजेचे असते. या कुत्र्यांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न नगरपालिका प्रशासनासमोर असतो. त्यामुळे अनेकदा नगरपालिका या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हा प्रश्न अधिकच जटिल होत असल्याचे दिसून येते.
हर्षद कशाळकर – response.lokprabha@expressindia.com