विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com
ओदिशा..लांबलचक समुद्रकिनारा आणि पर्यायाने समृद्ध सागरी जीवसृष्टी लाभलेलं राज्य. पण तेथे सारं काही आलबेल आहे असं नाही. वर्षभरात एक-दोन नव्हे, तर तब्बल दहा महाकाय देवमाशांचे मृतदेह इथल्या किनाऱ्यांवर आढळले. खोल समुद्रातली वाढती मासेमारी, प्रदूषण, जहाजांची धडक, वाट चुकल्यामुळे उथळ पाण्यात येणं, समुद्रातील वादळं अशी विविध कारणं पुढे येतात.

ओदिशातील पुरी जिल्ह्यात असलेल्या ब्रह्मगिरी वनपट्टय़ातील रामचंडी समुद्रकिनाऱ्यावर १३ मार्चला २५ फुटांचा महाकाय देवमासा (व्हेल) मृतावस्थेत आढळला. या माशाला खोल समुद्रात एखाद्या जहाजाची किंवा मोठय़ा मासेमारी नौकेची धडक बसली असावी आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असावा, लाटांबरोबर वाहत तो किनाऱ्यावर आला असावा, असा अंदाज तिथले वन अधिकारी रजत मोहपात्रा यांनी वर्तवला. माशाच्या देहाच्या बऱ्याच भागाचं विघटन झालं होतं आणि त्याच्या शरीरावरील जखमा पाहता यापूर्वीही तो मासेमारीच्या जाळ्यांत अडकला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र, महत्त्वाचा आणि चिंतेचा मुद्दा हा की मृतावस्थेतील देवमासा किनाऱ्यावर येणं ही ओरिसात आता क्वचितच घडणारी घटना राहिलेली नाही.

राज्याला लाभलेल्या ४८४ किमी किनाऱ्यावर गेल्या वर्षभरात तब्बल १० मृत देवमासे वाहून आले. १० जानेवारीला गहिरमाथा वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या अहिराजपपूर गावातही बालीन प्रजातीचा ३० फूट लांबीचा मृत देवमासा आढळला होता. याच प्रजातीचा आणखी एक मासा नोव्हेंबर २०१८ मध्ये याच अभयारण्याचा भाग असलेल्या हबलीकाटी किनाऱ्यावर वाहून आला होता. तो तब्बल ५२ फूट लांब होता. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१८ मध्ये गंजम जिल्ह्यातील एकसिंगा किनाऱ्यावर सेइ देव प्रजातीचे अनुक्रमे एक नर आणि एक मादी मासे आढळले होते. देवी नदीजवळ असलेल्या सहाना किनारी ऑगस्ट २०१८ मध्ये १५ फुटांचा मेलन हेडेड देवमासा आढळला होता. त्याआधी एकाकुला किनारी दोन आणि सातभाया किनाऱ्यावर एका देवमाशाचा मृतदेह वाहून आला होता.

संशोधक आणि अभ्यासकांच्या मते खोल समुद्रातील वाढती यांत्रिक मासेमारी, वातावरणातील बदल, सौर वादळं, प्लास्टिकमुळे होणारं सागरी प्रदूषण अशी कारणं यामागे असू शकतात. चक्रीवादळ किंवा अतिवृष्टी अशा हवामानातील बदलांचे माशांवर गंभीर दुष्परिणाम होतात. देवमासे किंवा अन्य सस्तन जलचर ध्वनी आणि प्रतिध्वनीच्या आधारे मार्गक्रमण करतात. देवमासा विविध प्रकारच्या ध्वनिलहरी निर्माण करतो. त्यांच्या काही प्रजातींचं गंधांचं ज्ञान तर काही प्रजातींचं ध्वनीचं ज्ञान अधिक विकसित झालेलं असतं. काही प्रजातींमध्ये हे ज्ञान एवढं विकसित झालेलं असतं की अंधत्व आलं, तरीही हे मासे आपल्या या ज्ञानाचा वापर करून सहज वावरू शकतात. वातावरणात अचानक बदल झाल्यास ते मार्ग चुकतात. समुद्रात नेहमीपेक्षा खूप मोठय़ा लाटा उसळू लागल्या किंवा वारे वेगाने वाहू लागले, तर माशांना प्रतिध्वनीच्या आधारे मार्ग शोधणं कठीण होतं. त्यामुळे एरवी खोल पाण्यात राहणाऱ्या आणि कधीही किनारी भागात न येणाऱ्या या माशांना किनाराही आपल्याच अधिवासाचा एक भाग असल्याचं भासू लागतं. अशा वेळी हे मासे भरकटून उथळ पाण्यात येतात.

किनारी भागातील उथळ पाण्यात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आणि ते मृतावस्थेत किंवा अर्धमेल्या स्थितीत किनाऱ्यावर येतात. जहाजं आणि मासेमारी नौकांमुळे समुद्रात मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण होतं. या ध्वनिलहरींमुळेही माशांना प्रतिध्वनीच्या आधारे मार्ग शोधण्यात अडथळे येण्याची शक्यता असते. देवमासे भरकटण्यामागे हे एक कारण असू शकतं, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

समुद्रातील प्रदूषण हेदेखील देवमाशांच्या मृत्यूचं कारण ठरत असल्याचे पुरावे आहेत. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये इंडोनेशियातल्या किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळलेल्या देवमाशाच्या शरीरात प्लास्टिकच्या बाटल्या, ११५ प्लास्टिकचे पेले, पिशव्या, नायलॉनची जाळी, सँडल्स आढळल्या होत्या. त्याच्या पोटात आढळलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंचं वजन साधारण सहा किलो होतं. विविध प्रजातींचे समुद्री पक्षी, कासवं आणि अन्य लहान-मोठय़ा माशांप्रमाणेच हे महाकाय जलचरही मानवाच्या निष्काळजीपणाचे बळी ठरत असल्याचंच या घटनेवरून स्पष्ट झालं.

देवमासे समूहाने राहतात आणि प्रत्येक समूहाचा एक नायक असतो. समूहातील सर्व मासे त्याचं अनुकरण करतात. त्यामुळे समुद्रातील स्थितीत बदल झाल्यामुळे समूहाचा नायकच वाट चुकला आणि खोल पाण्यातून किनारी भागात आला तर अन्य सर्व मासे त्याच्या मागोमाग किनाऱ्यावर येतात. अशा वेळी एकाच ठिकाणी एकाच वेळी अनेक मृत देवमासे आढळतात. तमिळनाडूतील एका किनाऱ्यावर २०१६ मध्ये अशाच प्रकारे तब्बल ८१ देवमासे आढळले होते. त्यापकी ३६ जिवंत होते. त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आलं होतं.

काही अभ्यासक समुद्रातील तापमान वाढीचाही माशांच्या मृत्यूशी संबंध असण्याची शक्यता वर्तवतात. त्यांच्या मते तापमान वाढीमुळे त्यांना त्यांच्या अधिवासात खाद्य मिळणं कमी झालं, तर ते त्यांना हव्या त्या खाद्याचा शोध घेत अन्यत्र भरकटत जातात आणि काही वेळा त्यांच्यासाठी अतिशय धोक्याच्या असणाऱ्या किनारी भागात पोहोचतात. बदलतं वातावरण आणि वाढत्या सागरी प्रदूषणामुळे लहान माशांची घटत चाललेली संख्या विचारात घेता भविष्यात हे प्रकार वाढण्याचीच चिन्हं अधिक आहेत.

हे महाकाय मासे किनाऱ्यावर जखमी अवस्थेत आढळले, तरी त्यांना पुन्हा समुद्रात सोडणं हे अतिशय कष्टप्रद काम असतं. समुद्राच्या लाटा, माशांची स्वतहून हालचाल करण्याची क्षमता आणि अन्य अनेक घटकांवर त्यांच्या जिवंत राहण्याची शक्यता अवलंबून असते. ४०-५० फुटांच्या या माशांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे हा एक मोठाच प्रश्न होऊन बसतो. अनेकदा या माशांचा मृत्यू समुद्रातच झालेला असतो. त्यामुळे ते लाटांनी किनाऱ्यावर पोहोचेपर्यंत त्यांच्या शरीराच्या बऱ्याचशा भागाचं विघटन सुरू झालेलं असतं. त्यामुळे ज्या किनाऱ्यावर हे मासे पोहोचतात तिथे प्रचंड दरुगधी पसरते. एवढय़ा मोठय़ा माशाचं दहन केलं, तर मोठय़ा प्रमाणात धूर निर्माण होण्याची भीती असते. शिवाय इंधन वगरे अन्य प्रश्नही असतात. पुन्हा-पुन्हा येणाऱ्या लाटांच्यामुळे दफन हा पर्याय मागे पडतो. किनाऱ्यावरच दफन केल्यास लाटांनी वाळू पुन्हा वाहून जाते. त्यांच्या अवाढव्य आकारामुळे मृतदेह अन्यत्र वाहून नेणंही जिकिरीचं ठरतं.

गुजरातमधील कच्छपासून सुरू होऊन पश्चिम बंगालमधील सुंदरबनमध्ये संपणाऱ्या भारताच्या किनारपट्टय़ात सुमारे २५ ते २७ प्रजातींचे देव मासे आढळतात. किनाऱ्यांवर मृत देवमासा किंवा डॉल्फिन मासा वाहून येणं हे तिथल्या रहिवाशांनाही पूर्वीएवढं आश्चर्यजनक वाटेनासं झालं आहे. एवढं हे प्रमाण वाढलं आहे. मृत मासा आढळला की तेवढय़ापुरत्या बातम्या होतात. त्याच्या लांबीच्या चर्चा रंगतात. पर्यावरणप्रेमी चिंता व्यक्त करतात. माफक हळहळ व्यक्त करून घटना विस्मरणात जाते. पण सध्या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्वात महाकाय प्राण्यांपकी एक असलेले हे जीव एवढे सहज प्राण सोडू लागले असतील, तर समुद्रात बरंच काही बिघडलं असणार आणि हे निश्चित. त्याचे पडसाद मानवी जीवनात उमटण्याची वाट न पाहणंच शहाणपणाचं ठरेल.

देवमाशांची शिकार

जगभरातील देवमाशांचे प्रमाण घटत असताना त्यांची शिकार आजही पूर्णपणे थांबलेली नाही. तेलासाठी आणि हाडांसाठी या माशांची बेसुमार शिकार केली जात असे. मात्र, इंटरनॅशनल व्हेिलग कमिशनने १९४६ मध्ये यावर र्निबध घातले. देवमाशाच्या शिकारीची प्रथा असलेल्या देशांना शिकारीचा वार्षकि कोटाच निश्चित करून देण्यात येऊ लागला. जपानमध्ये आजही देव माशांची मोठय़ा प्रमाणात शिकार केली जाते. पूर्वी दरवर्षी सुमारे ८०० देव माशांची शिकार केली जात असे. आता या माशांच्या संरक्षण-संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या संस्थांनी सातत्याने विरोध केल्यानंतर आता दर वर्षी साधारण दोनशेच्या आसपास माशांची शिकार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.