News Flash

सुट्टी विशेषांक : कोण मी होणार..?

सगळीकडे अंधार आहे आणि अंधारातच आपल्याला आई आणि इशानच्या आवाजातले संवाद ऐकू येऊ लागतात...

इशान अर्धवट झोपेत घडय़ाळ बंद करायला जातो.. इतक्यात क्रिकेटपटूचा पेहराव केलेला एक मुलगा येऊन घडय़ाळ उचलतो...

प्रशांत जोशी – response.lokprabha@expressindia.com
(सगळीकडे अंधार आहे आणि अंधारातच आपल्याला आई आणि इशानच्या आवाजातले संवाद ऐकू येऊ लागतात…)

इशान : पण मला नाही झोप आली आहे इतक्यात..

आई : झोप बाळा. आपल्याला सकाळी लवकर उठून क्लासला जायचं आहे.. उद्या एक तर सगळे क्लास आहेत तुझे..

इशान : पण सगळे जागे आहेत ना अजून.. तू मलाच का झोपायला सांगते आहेस..?

आई : कारण सगळे तुझ्यापेक्षा मोठे आहेत.. त्यातल्या कुणालाच उद्या क्लासला नाही जायचंय.. तुला सकाळी क्रिकेट कोचिंग आहे, मग गिटार क्लास आणि मग अ‍ॅबॅकसचा क्लास आहे.. आपल्याला सगळं शिकून खूप मोठ्ठं व्हायचंय ना..? शहाणं माझं बाळ ते..

इशान : आई पण मी..

आई : इशान गपचूप झोपायचंय आता.. चल जा.. जा.. (रागाने)

(प्रकाश येतो तेव्हा रंगमंचावर इशानची खोली दिसते. मंचावर मध्यभागी असणाऱ्या पलंगावर ८-१० वर्षांचा इशान हष्रे झोपलेला आहे.. अचानक त्याच्या बाजूला ठेवलेलं गजराचं घडय़ाळ वाजायला लागतं.. इशान अर्धवट झोपेत घडय़ाळ बंद करायला जातो.. इतक्यात क्रिकेटपटूचा पेहराव केलेला एक मुलगा येऊन घडय़ाळ उचलतो.. इशान खडबडून जागा होऊन त्याला विचारणार, इतक्यात त्याला कळतं की आजूबाजूला अजून कोण-कोण आहे पाहातो तर बाजूला. एक मुलगा गिटार घेऊन कानाला हेडफोन लावून त्याच्याकडे बघत असतो. त्याच्याच बाजूला एक मुलगा डॉक्टरचं एप्रन, स्टेथोस्कोप लावून बसलेला आहे. तोसुद्धा इशानकडे बघतो आहे. अजून एक मुलगा इंजिनीअर्सचा निळा ड्रेस घालून इंजिनीअर असं लिहिलेलं आहे अशी पिवळी टोपी घालून बसलेला आहे. तो त्याच्याकडेच पाहातो आहे. भारीतला कोट, चष्मा घालून बसलेला एक मुलगा आहे तोसुद्धा इशानकडे पाहातो आहे. त्यांना सगळ्यांना पाहून इशान घाबरतो आणि सगळ्यांना एकत्र विचारतो)

इशान : कोण आहात तुम्ही?

डॉक्टर : मी डॉक्टर इशान हष्रे

क्रिकेटर : मी क्रिकेटपटू इशान हष्रे.

इंजिनीअर : मी इंजिनीअर इशान हष्रे

सी ए : मला नाही ओळखलंस..? मी तुझ्या बाबांसारखा सीए इशान हष्रे

म्युझिशियन : (गिटारवर तार छेडत) मी सिंगर, म्युझिशिअन इशान हष्रे..

इशान : तुम्ही इशान हष्रे. मग मी कोण आहे..?

इंजिनीअर : आम्ही तुझा भविष्यकाळ आहोत. म्हणजे जेव्हा तू इंजिनीअर होशील तेव्हा अगदी माझ्यासारखा असशील..

इशान : हो, पण तुम्ही इथे आता काय करताय..?

क्रिकेटर : यांचं मला माहीत नाही पण मी तुला उठवायला आलो आहे. उठ.. चल, यांच्या नादी लागू नकोस आपल्याला क्रिकेटर व्हायचंय ना. मग आता कोचिंगला जायलाच हवं..

इशान : हं (म्हणत उठायला जातो)

म्युझिशिअन : एक मिनीट.. हे कधी ठरलं की इशान क्रिकेटर होणार आहे..?

क्रिकेटर : ठरवायचं काय आहे त्यात.. त्याला आवडतं क्रिकेट. त्याच्यासारखा स्ट्रेट ड्राइव्ह कोणीच मारत नाही क्लबमध्ये.. कोचपण खूश आहेत त्याच्यावर.. आताच्या इंटर क्लबसाठी लवकरच तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल.. हे ठरलेलं आहे.. इशान क्रिकेटरच होणार.. हो ना रे.. सांगून टाक यांना..

इंजिनीअर : इशान याचं अजिबात ऐकू नकोस.. हा तुला अभ्यासापासून डिस्ट्रॅक्ट करतो आहे..

डॉक्टर : एक्झ्ॉक्टली.. हल्ली क्रिकेटला काही फ्युचर नाहीये.. खूप क्रिकेटर्स आहेत.. डोन्ट ट्रस्ट धिस फिल्ड..

सी ए : हो हो.. आणि तुला तर माहितीच आहे की तू क्रिकेट कोचिंगला जाणं बाबांनापण फारसं आवडत नाही.. त्यांनी फक्त सुट्टीपुरतं लावून दिलंय कोचिंग..

क्रिकेटर : अरे ‘धोनी’ सिनेमा पाहिला नाही वाटतं यांनी..! धोनीच्या बाबांना पण नाही आवडायचं त्याने क्रिकेट खेळलेलं.. पण तो आज साऱ्या जगात प्रसिद्ध आहे.. तुला आवडतं ना खेळायला, तू िहमत मत हार.. डर के आगे जीत है..

म्युझीशिअन : अरे क्रिकेट खेळायला फक्त आवडतं. म्हणून काय कुणी क्रिकेटर होत नाही.. असं झालं असतं तर भारतात सगळेच क्रिकेटर झाले असते.. मी म्हणतो तू सगळं सोड. म्युझिककडे वळ..(असं म्हणून तो गिटार वाजवू लागतो)

सीए : ए, थांब रे बाबा.. केवढं कर्कश्श वाजवतो आहेस.? मी हा गुंता सोडवतो.. इशान तू खूप हुशार आहेस.. मला सांग सचिन तेंडुलकर क्रिकेटर होता..

क्रिकेटर : होता नाही आहे.. ही इज गॉड ऑफ क्रिकेट..

सीए : हो हो आहे.. मला सांग सचिनचा मुलगा कोण होणार आहे..?

इशान : सचिनचा मुलगा अर्जुन ‘फास्ट बॉलर’ आय मीन क्रिकेटर

सीए : व्हेरी गुड.. ऋषी कपूर चांगले अ‍ॅक्टर आहेत.. त्यांचा मुलगा रणबीर कपूर कोण आहे..?

इशान : अ‍ॅक्टर..

सीए : ग्रेट. आणि मुकेश अंबानी बिझनेसमन आहेत. त्याचा मुलगा अनंत अंबानी पण कोण आहे तर बिझनेसमन.. सो सिमीलरली.. तुझे बाबा प्रोफेशनने कोण आहेत..

इशान : सीए.

सीए : मग तू कोण व्हायला पाहिजे ?

इशान : सीए..?

सीए : एक्झॅक्टली.. राइट.. प्रॉब्लेम सॉल्व्हड. तुम्ही सगळे घरी जाऊ शकता.. इशानचं ठरलंय सीए व्हायचं.. लेट्स गेट अप माय बॉय..

इंजिनीअर : अत्यंत चुकीचं उदाहरण आहे.. असं असेल तर मला सांग इशान सचिनचे बाबा क्रिकेटर होते का.?

इशान : नाही..

डॉक्टर : हां.. अमिताभ बच्चनचे बाबापण अ‍ॅक्टर नव्हते..

म्युझिशिअन : अरे तुझे आजोबा तरी कुठे सीए होते? पण बाबा सीए झालेत ना..? असं काही नसतं. याचं अजिबात ऐकू नकोस..

सीए : इशान, आठव त्या दिवशी दीक्षित अंकल आलेले तेव्हा बाबा काय सांगत होते? ‘आमचा इशान सीए झाला तर आम्ही दोघे मिळून फर्म काढू स्वत:ची’ म्हणजे बाबांना तू सीए झालेलं आवडेल. शिवाय तू पाहिलं आहेस बाबांना किती लोक रिस्पेक्ट देतात.. सगळ्या मोठमोठय़ा कंपन्या त्यांना केवढी गिफ्ट्स देत असतात.. त्यांच्या स्टेटमध्ये फिरायला नेत असतात.. अजून काय हवंय.. आय थिंक तू सीए झालंच पाहिजे. बाबांना त्यांच्या कामात मदतपण करू शकशील आणि बाबा विल बी प्राऊड ऑफ यू..

इशान : हं.. राइट आहे..

डॉक्टर : काय राइट आहे..? मला सांग बाबा असे सारखे इथे तिथे ऑडिटसाठी जातात. तू घरी असतोस म्हणून आईची काळजी घेता येते. तूपण सीए झालास तर आईची काळजी कोण घेणार?

इशान : हां, हे पण राइट आहे.

डॉक्टर : त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे तू डॉक्टर व्हायला पाहिजे..

म्युझिशिअन : हे काय तरी नवीन यांचं..

डॉक्टर : इशान तू पाहिलं आहेस ना, डॉक्टरांना आपल्याकडे देवासारखा मान दिला जातो.. तू तुझा दवाखाना, तुझं हॉस्पिटल चालवशील, लोक तू येण्याची वाट. बघतील. तुला दोन मिनिटं भेटण्यासाठी बाहेर रांगा लावून बसतील.. काहींना गोळ्या द्यायच्या.. राजूसारखा त्रास देणारा एखादा आला तर त्याला दोन इंजेक्शन्स आणि कडू गोळ्या द्यायच्या..

इशान : हां, हे बेस्ट आहे. डॉक्टरच बनलं पाहिजे..

क्रिकेटर : पण त्यासाठी केवढय़ा गोळ्यांची नावं पाठ करावी लागतील.. आणि तुला तर पाठांतर आवडत नाही..

डॉक्टर : छे रे, नावं आपोआप लक्षात राहतात. आपल्याला एबीसीडी पाठ करावं लागत नाही. लक्षात राहतं, तसंच औषधांची नावपण आपोआप लक्षात राहतात..

इशान : हो..? पाठ नाही करावी लागत..?

डॉक्टर : छे. अजिबात नाही..

इशान : मला अजून एक प्रश्न आहे.. आपलं डोक दुखत असलं, पाठ दुखत असली की आपण पोटात गोळी घेतो मग गोळीला कसं कळतं आपलं नेमकं काय दुखतंय ते?

डॉक्टर : मिळतील.. मिळतील, सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला मिळतील. पण आधी तुला डॉक्टर व्हावं लागेल..

इशान : चालेल मग डॉक्टर बनायचं फिक्स.

म्युझिशिअन : इशान हा तुला फसवतोय.. डॉक्टर होण्यासाठी खूप खूप जास्त अभ्यास करावा लागतो. आणि मोठमोठे डॉक्टर त्यांची डॉक्टरी सोडताहेत. तू सलील कुलकर्णीना बघ ते डॉक्टर आहेत पण आता काय करतात तर म्युझिक.. कारण संगीत हेच आयुष्य आहे इशान..

इशान : हां, खूप अभ्यास असेल तर मला बोअर होणार..

डॉक्टर : अरे, थोडा अभ्यास असतो आधी. पण.. नंतर तू तुझ्या मर्जीचा मालक. तुला हवी तेव्हा सुट्टी घ्यायची.. परत तुला तर माहितीये डॉक्टरांचं अक्षर खराब असलं तरी चालतं..

इंजिनीअर : पण डॉक्टर लोकांना मोठमोठी ऑपरेशन्स करावी लागतात.. माणसांचे हात- पाय असे कापावे लागतात.. त्यांना भरपूर सुया टोचाव्या लागतात.. तुला आवडेल हे असं करायला..

इशान : छे.. छे.. नको.. नको.. मला अजिबात आवडणार नाही असं काही करायला.. नको.. मला नाही व्हायचं डॉक्टर वगैरे.. त्यापेक्षा मी अक्षर सुधारेन माझं..

इंजिनीअर : हां, नकोच.. इशान, तुला नाही ना आवडत तर नकोच होऊस डॉक्टर वगैरे.. तू इंजीनीअर हो..

सीए : छे.. आज जो तो उठतो आणि इंजिनीअर होतो. काय स्टेट्सच नाहीये इंजिनीअरना. शिवाय त्यांना पगार पण कमीच मिळतो.. ते पण सीएपेक्षा जास्त काम करून..

इंजिनीअर : ओ.. ते साधेसुधे इंजिनीअर. मी सांगतोय त्या इंजिनीअरना अमेरिकेत मोठमोठय़ा पगाराच्या नोकऱ्या आहेत.. विचार कर इशान, तू पण बाजूच्या सुजयदादासारखा अमेरिकेला जाणार, तिकडे मोठय़ा पगाराची नोकरी करणार.. इकडे आलास की सगळ्यांसाठी चॉकलेट्स, गिफ्ट्स घेऊन येशील. सगळे तुझ्या आजूबाजूला असतील, घरात तुझ्या आवडीचंच जेवण तयार केलं जाईल..

क्रिकेटर : हं.. त्यात काय मोठं? क्रिकेटर झालास तर सगळेच देश फिरायला मिळतील..

म्युझिशिअन : हां.. पण दोन वर्षांत रिटायर झालास ना की बसावं लागेल घरी.. मग काय फक्त हरी.. हरी.. त्यापेक्षा तू.. इंजिनीअरच हो..

(म्युझिशिअन हे बोलतोय पाहून सगळे आश्चर्याने त्याच्याकडे बघतात..)

इंजिनीअर : अरे वा.. तुला पण महत्त्व पटलं ना इंजिनीअरचं..

म्युझिशिअन : तू इंजिनीअरिंगच कर.. पण त्यात तू साऊंड इंजिनीअरिंग कर.. म्युझिक आणि स्टेटस दोन्ही सोबत जपता येतील तुला. हे बेस्ट आहे. साऊंड इंजिनीअर इशान हष्रे.

डॉक्टर  : आणि काय करणार साऊंड इंजिनीअरिंग करून..? रस्त्यावरच्या मिरवणुकीत डीजे म्हणून जाणार..?

म्युझिशिअन : (इंजिनीअरला सांगतो) यांना कलेची कदरच नाही..

इंजिनीअर : बरोबर सांगतोय तो.. कोअर सब्जेक्ट इंजिनीअरिंग केलं पाहिजे तू..

डॉक्टर : अरे, माझं ऐक. डॉक्टरपेक्षा मोठं कोणीच नसतं. डॉक्टरांना देवाचं दुसरं रूप मानतात लोक..

म्युझिशिअन : आणि संगीताला दैवी देणगी मानतात.. आइनस्टाइनपण त्याच्या रिकामपणात व्हॉयलीन आणि पियानो वाजवायचा.. काही झालं तरी म्युझिशिअन तर तू व्हायलाच पाहिजेस.

सीए : बघ इशान, बाबा तुझे सगळे हट्ट, लाड पुरवतात.. तू बाबांची एक इच्छा नाही पूर्ण करणार?

क्रिकेटर : सगळं जग तुझ्या विरुद्ध असेल इशान, पण तुझ्यातला खेळाडू जागा राहू दे. इंडियन टीमची जर्सी तुझी वाट बघते आहे..

(सगळे आपापलं म्हणणं सांगून त्याच्या कानाभोवती गोंधळ घालताहेत.. तेवढय़ात इशानसारखाच दिसणारा नाइट ड्रेस घातलेला लहान मुलगा बाहेर येतो.. इशानच्या कानावरचा हात काढतो. एव्हाना सगळे शांत झालेले असतात..)

लहान मुलगा : तू यांचं कुणाचंच ऐकू नकोस.

इशान : तू कोण आहेस..

लहान मुलगा : मी लहानपणीचा इशान हष्रे..

इशान : तू पण यांच्यासारखा मला सांगायला आला आहेस ना..? मला लहान नाही राहायचंय. मला लवकर मोठ्ठं व्हायचंय.. तू जा इथून..

लहान मुलगा : बरं जातो.. पण तू यांच्यापकी कोण व्हायचं ठरवलं आहेस?

इशान : काय माहीत? मी खूप कन्फ्युज्ड आहे..

लहान मुलगा : चांगलं आहे मग.. आत्ताच कशाला ठरवायचं?

इशान : म्हणजे..?

लहान मुलगा : मोठा तर तू होणारच आहेस.. खूप मोठा होशील. तू याच्यासारखा इंजिनीअर झालास तर अमेरिकेला जाशील पण रोज रात्री आजीच्या कुशीत झोपून गोष्ट नाही ऐकता येणार तुला.. याच्यासारखा डॉक्टर झालास तर लोक खूप मान देतील, पण आता बाबांच्या पाठी करतोस तसा हट्ट नाही करता येणार, याच्यासारखा किंवा बाबांसारखा सीए झालास तर हवं ते कार्टून नाही पाहता येणार, रोज संध्याकाळी सोसायटीच्या गार्डनमध्ये खेळायला नाही जाता येणार. याच्यासारखा सिंगर झालास तर गळा जपावा लागेल. मग त्या भय्याचा गोळा नाही खाता येणार. हवं ते आईस्क्रीम नाही खाता येणार..

इशान : अरे हो.. हे माझ्या लक्षातच आलं नाही.

छोटा मुलगा : आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्यापकी कुणालाच तुझ्यासारख्या उन्हाळ्याच्या सुट्टय़ा नाही मिळत.. तुला मिळाल्या आहेत तर आपण मोठं होऊन काय व्हायचं याचा विचार करण्यापेक्षा आहे त्या सुट्टीची मजा घे की.. आता विचार नको. ऊठ आणि चल खाली. सायकल काढ. कारण सगळी मुलं जवळच्या बागेत सायकल राइडला जाताहेत.. चल चल उठ लवकर..

इशान : हां.. मला पण खूप मज्जा करायची असते सुट्टीमध्ये.. पण आईने माझं ऐकलं नाही आणि मला जबरदस्तीने सगळ्या क्लासना पाठवलं तर..?

लहान मुलगा : तर काय.. नाही.. आता मी तुला जे सांगतोय ते आईला सांगायचं.. उन्हाळ्याची सुट्टी परत परत मिळत नाही..

इशान : पण आई ऐकेल माझं..?

लहान मुलगा : तू समजावून तर बघ..

(इतक्यात अंधार होतो आणि घडय़ाळाचा गजर वाजतो. इशान झटकन उठून बसतो आणि गजर बंद करतो.. आईला जोरात ओरडून सांगायला लागतो तसं छान आनंदी संगीत वाजू लागतं..)

इशान : आज मला कोणत्याच क्लासला जायचं नाही आहे.. मी बिल्डिंगमधल्या मित्रांबरोबर सायकल खेळायला जाणार आहे. मग बर्फाचा गोळा खाणार आहे. दुपारी आम्ही सगळे मिळून बिझनेसचा गेम खेळणार आहोत. संध्याकाळी बाबांबरोबर आईस्क्रीम खाणार आहे. खूप क्रिकेट आणि बॅटिमटन खेळणार आहे. रात्री आजीकडून गोष्ट ऐकणार.. कारण मला उन्हाळ्याची सुट्टी आहे.. मला उन्हाळ्याची सुट्टी आहे..

(बोलता बोलता जवळच पडलेलं गिटार घेऊन वाजवतो, नाचतो, बॅट उचलून शॉट मारतो. ‘उन्हाळाची सुट्टी’ असं ओरडतो.. तेव्हाच पडदा पडतो..)

या नाटकाचा प्रयोग करण्यापूर्वी prashantjoshi12345@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 1:04 am

Web Title: what i want to be
Next Stories
1 सुट्टी विशेषांक : करा जादू
2 तरल सुरांचा तारा
3 आजच्या नजरेतून.. आंबेडकर आणि लोकशाही
Just Now!
X