हॉकी हा भारतीयांचा एके काळी श्वास मानला जात असे. हॉकीचे जादूगार म्हणून ख्याती मिळविलेले मेजर ध्यानचंद यांनी केवळ भारतात नव्हे तर परदेशातही आदर्श खेळाडू म्हणून आपली प्रतिमा उंचावली. त्यांच्याबरोबरच देशाचे नावही त्यांनी उंचावले. त्या काळात सुविधा व सवलतींची वानवा असताना त्यांनी ऑलिम्पिक सुवर्णयुग निर्माण केले. दुर्दैवाने याच खेळामध्ये आपली पीछेहाट होत असताना मनाला खूप यातना होतात.

स्वातंत्र्यापूर्वी भारताला हॉकीत आठ वेळा सुवर्णपदक मिळाले असे सांगूनही कोणास खरे वाटणार नाही. त्या वेळी भारतीय संघास अन्य देशांचे खेळाडू टरकूनच असत. आता भारतीय संघाविषयी कोणासही भीती वाटत नाही. आम्ही मॉस्को येथे १९८० च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्या वेळी ऑलिम्पिक स्टेडियममध्ये भारताचा तिरंगा फडकताना आम्हाला आनंदाने रडू आले होते. आम्ही मिळविलेले भारतीय हॉकी संघास मिळालेले अखेरचे ऑलिम्पिक पदक होते. त्यानंतर या आपल्या राष्ट्रीय खेळात भारताला पदक मिळविता आलेले नाही, ही खरे तर लाजिरवाणी गोष्ट आहे. एकदा तर ऑलिम्पिकसाठी पात्रताही करू शकलो नाही हे तर आपल्या देशासाठी लांछनास्पदच आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही सतत धडपडत असायचो. तशी जिद्द हल्लीच्या खेळाडूंमध्ये दिसून येत नाही. कनिष्ठ खेळाडूंसह अनेकांना गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळतात. परदेशातील स्पर्धा व सराव शिबिरांमध्ये सहभाग, परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण, फिजिओ, मसाजिस्ट, वैद्यकीय सुविधा आदी सर्व मिळत असूनही ऑलिम्पिक पदक मिळविण्याची इच्छाच या खेळाडूंमध्ये दिसून येत नाही. व्यावसायिक लीगही आता सुरू झाली आहे. अल्प काळात भरपूर आर्थिक उत्पन्नाचे साधन या खेळाडूंना मिळाले आहे. त्यांना सदिच्छादूत म्हणूनही संधी मिळत आहे. आणखी काय पाहिजे. मात्र अनेक वेळा देशापेक्षा वैयक्तिक फायदा बघण्यातच त्यांना धन्यता वाटत असते.

खेळाच्या प्रगतीसाठी व्यावसायिकतेचे स्वातंत्र्य आता मिळत आहे याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला जातो. कारण व्यावसायिक फायदा पाहण्यापलीकडे खेळाच्या प्रगतीसाठी काही तरी त्याग केला पाहिजे अशी भावनाच दिसून येत नाही. नि:स्वार्थी वृत्तीने खेळले पाहिजे ही खेळाडूंमध्ये भावना दिसत नाही. संघटकांनीही या राष्ट्रीय खेळाची पाळेमुळे कशी खोलवर रुजली जातील यावर भर दिला पाहिजे. क्रिकेटने लोकप्रियता मिळविली आहे हे त्या संघटकांच्या प्रयत्नांचे यश आहे. त्यांच्यामुळे अन्य खेळांची प्रगती खुंटली असे मी मुळीच मानत नाही. कारण खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टिकोन ठेवीत क्रिकेट संघटकांनी खेळाडूंचा विकास व खेळाचा विकास याचा योग्य समतोल राखला आहे. असे प्रयत्न अन्य खेळांच्या संघटकांनी केले पाहिजेत. खेळासाठी आपण आहोत, खेळाडूंमुळेच आपल्याला नाव मिळाले आहे हे ओळखूनच त्यांनी कार्य केले पाहिजे.

आपल्या देशात स्वातंत्र्य शब्दाचा आपल्याला कसेही वागण्याचे स्वातंत्र्य आहे, असा चुकीचा अर्थ लावला जातो. उत्तेजक, मॅचफिक्सिंग, भ्रष्टाचार, बेशिस्त वर्तनाचे अनेक प्रसंग सातत्याने पाहावयास मिळतात. झटपट यश मिळविण्यासाठी खेळाडू गैरमार्ग अवलंबत असतात. उत्तेजकांमुळे कालांतराने आपल्या शरीरावर अनिष्ट परिणाम होतात याचा  गांभीर्याने विचार करीत नाहीत. आता यश मिळत आहे ना, भविष्यात काही का होईना, याची पर्वाच दिसत नाही. गैरमार्गाने मिळविलेले यश फार काळ टिकत नाही. कधी ना कधी कीर्तीच्या शिखरावरून घसरण होत असते. आमच्या पिढीने असा कोणताही मार्ग न स्वीकारता ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. तसाच प्रयत्न करीत आताच्या खेळाडूंनी पुन्हा हॉकीचे युग निर्माण करावे व त्या क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला मिळावे एवढीच प्रार्थना.

जफर इक्बाल

शब्दांकन : मिलिंद ढमढेरे