डॉ. यश वेलणकर

तथागत गौतम बुद्धांचा ‘सम्यक’मार्ग हा आजच्या जीवनशैलीत लहान-सहान कृतींनाही लागू केल्यास, भावनिक त्रास दूर होऊ शकतात. तथागतांच्या मानसोपचारातील योगदानाचे करोनाकाळातील बुद्धपौर्णिमेनिमित्त हे स्मरण..

loksatta satire article on arvind kejriwal mango eating controversy
उलटा चष्मा : पुन्हा आंबापुराण
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

सिग्मंड फ्रॉइड यांच्यापासून सुरू झालेली आधुनिक मानसोपचार पद्धती ही व्यक्तिगत- वैयक्तिक उपचारांची पद्धती आहे. मात्र सध्या चिंता, भीती, उदासी या भावनिक त्रासांवरील मानसोपचार संपूर्ण समाजाला आवश्यक आहेत, कारण करोनामुळे साधारण दहा टक्के कुटुंबे बाधित झाली असली तरी महासाथीचे सावट सगळ्याच समाजावर आहे. आपल्या आयुष्यात असा जीवघेणा, वेगाने पसरणारा साथीचा आजार प्रथमच आला असला तरी बुद्धकाळात (फ्रॉइडच्या दोन हजार वर्षांपूर्वी) असे आजार नेहमीचेच होते. त्यावेळी बुद्धाने सांगितलेली विद्या हे एकप्रकारे सर्व समाजाला दिलेले मानसोपचारच होते.

मानसोपचार हा भावनांचा त्रास व दु:ख कमी करण्याचा उपाय आहे. तो घ्यायचा असेल तर मला असा त्रास, दु:ख आहे हे प्रथम मान्य करावे लागते. बरीच माणसे धाडसीपणाचा मुखवटा लावून स्वत:चे दु:ख, तणाव नाकारण्याचा प्रयत्न करतात. पण असा नकार हा खोटा असतो, तो भविष्यात त्रास वाढवतो. बुद्धाने या नकारावर पहिला घाव घातला आणि ‘दु:ख हे एक सार्वकालिक सत्य आहे, वास्तव आहे’ हे ठामपणे सांगितले. या सत्याचा आज आपण सारेच जण अनुभव घेत आहोत.

सध्या आपण सारे अनिश्चितता व असहायतेचे दु:ख अनुभवत आहोत. या दु:खाचे बाह्य कारण आजार,लॉकडाऊन, यंत्रणांची हतबलता हे असले तरी माझे आयुष्य हे माझ्या योजनेनुसार घडावे, या माझ्या स्वप्नावर आघात झाल्याचे हे दु:ख आहे.

बुद्धाने सांगितले होते की, या दु:खाला उपाय आहे. तो उपाय म्हणजे अष्टांगिक मार्ग. हाच त्यांचा मानसोपचार होता. तो आजच्या परिस्थितीत खूप उपयोगी आहे. मानसोपचाराची एक शाखा कोणतीही औषधे वापरत नाही, तर माणसाचे भावनांना सामोरे जाण्याचे कौशल्य कसे विकसित करायचे याची तंत्रे शिकवते. बुद्धानेदेखील ही आठ तंत्रे समाजाला शिकवली. ती आपण उपयोगात आणली तर सध्याची मानसिक अस्वस्थता आपण कमी करू शकतो. गौतम बुद्धांनी त्या काळात पाली भाषेत जे शब्द वापरले होते त्यांचा आजचे मेंदू- विज्ञान व मानसशास्त्राला अनुसरून अर्थ समजून घेऊन त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे.

बुद्धाने ही आठ तंत्रे सांगताना ‘सम्यक’ हा शब्द वापरला आहे. त्याचा अर्थ समतोल (बॅलन्स) असा आहे. मध्यम मार्ग स्वीकारावा असा त्याचा अर्थ आहे.

बुद्धाच्या मानसोपचाराची ही आठ तंत्रे आज आपण कशी उपयोगात आणू शकतो ते पाहू.

१) सम्यक दृष्टी- आपण जे काही पाहतो, ऐकतो त्याचा अर्थ लावताना तो सम्यक असावा. कोणत्याही रंगात रंगलेला, पूर्वग्रहदूषित नसावा. आपण टीव्हीवरून, समाजमाध्यमांतून माहिती घेतो, ती विशिष्ट प्रकारे सांगितलेली माहिती प्रचारकी असू शकते, पण तेच सत्य असते असे नाही याचे भान ठेवून काय पाहायचे/वाचायचे हेदेखील आपण निवडू शकतो. जगात काय घडते आहे याचे ज्ञान असले पाहिजे, पण त्यासाठी सतत न्यूज चॅनेल पाहत राहणे आवश्यक नसते. याचे भान सध्या खूप महत्त्वाचे आहे. हीदेखील ‘सम्यक दृष्टी’ आहे

२) सम्यक संकल्प- सतत समाजमाध्यमे पाहत राहणे योग्य नाही. रोज व्यायाम, ध्यान करायला हवे हे पटत असले तरी तशी कृती मात्र होत नाही. ती होण्यासाठी जे करायचे आहे त्याचा दृढ संकल्प, ठाम निर्धार करणे गरजेचे असते. असा संकल्प केला की त्याविरोधी विचार आले, कंटाळा आला तरी त्याला महत्त्व द्यायचे नाही. असा संकल्प करताना आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहे याचा विचार करणे म्हणजेच ‘सम्यक संकल्प’ होय. आरोग्य हे सर्वासाठी महत्त्वाचे आहे, आपले प्राधान्यक्रम ठरवताना त्याला महत्त्व द्यायला हवे, हा बोध आपण या करोनाकाळात घेतला व त्यानुसार नियोजन केले तर तो ‘सम्यक संकल्प’ ठरेल.

३) सम्यक व्यायाम- आपण आपली दिनचर्या ठरवताना शरीर व मनासाठी, त्यांच्या स्वच्छतेसाठी, कार्यक्षमता वाढावी यासाठी रोज काय करणार आहोत हे ठरवणे, तसे नियोजन करणे आवश्यक आहे. हाच ‘सम्यक व्यायाम’ आहे.

४) सम्यक समाधी- ‘समाधी’ याचा अर्थ लक्ष देण्याचे कौशल्य (अटेन्शन), ध्यान असा आहे. आपले चित्त अनेक विचारांमध्ये भरकटत असते. त्याचे भान आले की लक्ष पुन:पुन्हा वर्तमान क्षणात आणायला हवे. लक्ष कुठे द्यायचे हे ठरवून त्यानुसार आपण लक्ष देऊ शकतो याचा सराव म्हणजेच ध्यान रोज काही काळ करायला हवे. परिसरात, शरीरात व मनात काय घडते आहे याकडे लक्ष देत राहायला हवे. सतत भविष्याची चिंता करत न राहता वर्तमान क्षणात लक्ष आणण्याचा सराव करत राहणे म्हणजे ‘सम्यक समाधी’, योग्य ध्यान होय.

५) सम्यक कर्मान्त- असे लक्ष देऊन काम केले, कोणतीही कृती केली की ती अधिक प्रभावी आणि आनंद देणारी असते. भटकणारे मन आनंदी नसते, हे मानसशास्त्रीय प्रयोगांतून दिसते. आंघोळ करताना, जेवताना, वाचताना, बोलताना, ऐकताना त्या कृतीवर लक्ष देणे म्हणजे ‘सम्यक कर्मान्त’ होय.

६) सम्यक उपजीविका- अर्थप्राप्तीसाठी माणसे काम करत असतात. मात्र, खूप पैसे मिळवण्यासाठी इतरांना फसवून, ग्राहकांना लुबाडून, भ्रष्टाचार करून व्यापार/ व्यवसाय न करता तो सचोटीने करणे म्हणजे ‘सम्यक उपजीविका’ होय. माणसांची कोणती तरी गरज पूर्ण करणे यासाठीच सर्व उपजीविका निर्माण होतात. मात्र, गरज आहे, मागणी आहे म्हणून खोटे दावे करणे, चुकीच्या जाहिराती करणे, प्रेक्षक वाढावेत म्हणून भडक बातम्या, कार्यक्रम करणे ही ‘सम्यक उपजीविका’ नाही. ती लोभ आणि तणाव वाढवते, दु:ख देते.

७) सम्यक वाणी- मनात येणाऱ्या विचारांचे भान ठेवून प्रत्यक्ष बोलताना योग्य शब्द वापरणे, एका व्यक्तीवरचा किंवा परिस्थितीवरचा राग दुसऱ्याच व्यक्तीवर न काढणे हीदेखील ‘सम्यक वाणी’ ठरेल. सध्या माणसे अधिक काळ घरात राहू लागल्यानंतर कौटुंबिक भांडणे वाढली आहेत. ती टाळण्यासाठी बोलताना सजगता ठेवणे म्हणजेच ‘सम्यक वाणी’ होय.

मनातील विचार हीदेखील एक वाणी आहे. माणसाच्या मनात आपोआप विचार येत असतात, तसेच तो काही वेळा विचार करत असतो. रोज काही काळ मनात संतोष, समाधान, आनंद, कृतज्ञता, क्षमा अशा उन्नत भावना निर्माण करणारे विचार काही वेळ धरून ठेवायला हवेत. त्यासाठी रोज ‘करुणा ध्यान’ करायला हवे. असे विचार रोज काही वेळ करणे हीदेखील ‘सम्यक वाणी’ आहे.

८) सम्यक सति (स्मृति)- आजचे सारे दु:ख हे मी म्हणजे केवळ शरीर आणि मन आहे असे मानल्यामुळे आहे. मी शरीर-मन आहे; पण या शरीर-मनापासून अलग होऊन शरीर-मनात जे काही घडते त्याचा स्वीकार करणारा ‘साक्षी’देखील मी आहे याचे भान, स्मरण ठेवणे म्हणजे ‘सम्यक सति’ होय. ‘ऑब्झवर्ि्हग सेल्फ’ विकसित करणे हेच तंत्र आधुनिक मानसोपचार पद्धतीत वापरले जाते.

आयुर्वेदात ‘स्मृतिविभ्रंश म्हणजे साक्षीभावाचा विसर हे सर्व दु:खाचे मूळ कारण’ म्हटले आहे. ते दूर करण्यासाठी ‘सत्त्वावजय’ ही मानसोपचार पद्धत सांगितली आहे. त्यामध्ये शरीर आणि मनात काय जाणवते आहे त्याकडे लक्ष देऊन ज्या संवेदना आणि विचार जाणवतात त्यांचा स्वीकार करण्याचे ‘साक्षी ध्यान’ म्हणजेच ‘माइंडफुलनेस मेडिटेशन’ मानसोपचार म्हणून शिकवले जाते. विघातक भावनांचा दुष्परिणाम शरीरावर होतो. त्या भावना केवळ विचार बदलून कमी करता येत नाहीत, त्यासाठी भावनिक मेंदूची सतत अनावश्यक प्रतिक्रिया करण्याची सवय बदलणे गरजेचे असते. साक्षी ध्यानाने असे प्रशिक्षण दिले जाते आणि त्यामुळे मेंदूत रचनात्मक बदल दिसून येतात.

सध्याच्या परिस्थितीत सर्वावर असणाऱ्या मानसिक तणावाचे दुष्परिणाम करोनाच्या विषाणूपेक्षा अधिक घातक असणार आहेत. प्रत्यक्ष विषाणूच्या परिणामामुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा भीतीमुळे शरीरात जे बदल होतात त्याने मृत्यूंचे प्रमाण वाढते असे अनेक उदाहरणांत दिसते आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवणे याला सर्वानी महत्त्व द्यायला हवे. त्यासाठी योग्य वेळी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. सर्वानी मानसिक प्रथमोपचार प्रशिक्षण घ्यायला हवे. त्यादृष्टीने आद्य मानसोपचार तज्ज्ञ गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या आठ तंत्रांचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात केला तर करोनाच्याच नव्हे, तर अन्य प्रकारच्या दु:खांतूनही मुक्ती होऊ शकते. यंदाची बुद्धपौर्णिमा निरामय मनासाठी कारणी लावू या.

लेखक ‘माइंडफुलनेस’चे प्रशिक्षक आहेत. yashwel@gmail.com