आपल्या आयुष्यावर रोज आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. आपण कितीही ठरवलं की मला आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींमधून योग्य तेच मी घेणार तरीही अनेकदा आपण चुकीच्या गोष्टीच्या बळी पडतो. मागच्याच महिन्यात ‘संजू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अनेक गोष्टींमुळे तो चित्रपट चर्चिला गेला. या चर्चेतलाच एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे ड्रग्ज. चित्रपटातील हिरो कसा ड्रग्ज घेत होता, त्याच्यासारखं आपल्यालाही असं काही तरी कूल करता यायला हवं, असे विचार मुलामुलींच्या डोक्यात चमकून गेले नसते तर नवल! अर्थात, या चित्रपटामुळे ड्रग्जच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईचा विषय पुन्हा चर्चेत आला हे खरं..

आजकालची तरुणाई ही टेक्नोसॅवी आहे. इंटरनेट, यूटय़ूब, सोशल मीडिया अशा सगळ्या गोष्टींमध्ये अडकली आहे, असं सतत बोललं जातं. या अडकलेल्या जीवनशैलीत ते अनेकदा फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी म्हणून कित्येक गोष्टी करतात. त्यांना स्वत:ला अपडेट ठेवायला, ट्रेंडमध्ये राहायला आवडतं. त्यामुळेच अनेकदा ते चुकीच्या गोष्टीला बळी पडतात. अशीच एक चुकीची गोष्ट सध्या ट्रेंडमध्ये आहे ती म्हणजे ड्रग्ज. आपल्याला कोकेन, ब्राऊ न शुगर अशी काही नावाने माहिती असलेले ड्रग्जच फक्त अस्तित्वात आहेत असं नाही. याहूनही अनेक ड्रग्ज आपल्या आजूबाजूला रोज घेतले जातात. पण अनेकदा ड्रग्ज घेण्याचा फॉम्र्युला वेगळा असतो. तुम्ही गेल्या वर्षभरात तरुण मुलामुलींच्या सोशल मीडियावरती हुक्का पितानाचे व्हिडीओ, फोटो हमखास बघितले असतील. हुक्कासुद्धा एक प्रकारचं ड्रग्ज आहे. फ्रुट्स फ्लेवरमध्ये सुरू झालेले हे हुक्का आता ड्रग्जरूपातही आले आहेत. सरकारने बाहेरचे हुक्का पार्लर कितीही बंद केले तरी हल्ली अनेकांच्या घरीच हुक्का पॉट्स बघयला मिळतात. अनेक बॅचलर मुलांच्या रूमवर हुक्का पार्टी हमखास रंगते. या पॉटला ‘पेन हुक्का’ म्हणून नवीन पर्यायही निघाला आहे. अशा प्रकारे सोप्प्या पद्धतीने ड्रग्ज मुलांच्या हाती पडत आहेत. याविषयी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी सांगतात, ‘आताच्या मुलांना कोणतीही गोष्ट अगदी सहजरीत्या उपलब्ध होतेय. त्यांना एकाच गोष्टीचे अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत. त्यामुळे साहजिकच त्याचा वापर त्यांच्याकडून होतो आहे. आताच्या तरुणांचं जीवन बिझी आहे. ते कॉलेज, त्यानंतर क्लास आणि मग घरी तीन प्रकारच्या कोचिंगमध्ये अडकलेले असतात. त्यामुळे त्यांचं खेळणं अगदी बंदच झालं आहे. त्यामुळे त्यांना सतत चांगलं वाटण्यासाठी कशा ना कशाची गरज लागते. आणि याच गरजेतून त्यांचा शोध सुरू होतो आणि त्याचा शेवट ड्रग्ज किंवा दारूसारख्या गोष्टीवरती संपतो.’ बऱ्याचदा मुलांना दिवसातून अनेकदा कॉफी प्यायची सवय असते. परीक्षा असली किंवा रात्री अभ्यास करायचा असला तर कॉफी हवीच. अनेकदा लेट नाइट कॉफी, कॉफी इज लाइफ, दिवसाततील चौथी कॉफी अशा धाटणीच्या पोस्ट टाकण्यासाठी मुलं कॉफी पितात. ‘पण कॉफी एक प्रकारचं ड्रग्जच आहे. इंजिनीअरिंगच्या मुलांना अफाट असायमेंट्स लिहाव्या लागतात तेव्हा रात्रभर जागण्यासाठी, फ्रेश राहण्यासाठी मुलं कॉफीची मदत घेतात. आधीच्या काळात तरुणाई कट्टय़ावर बसून गप्पा मारायची, पण ही तरुणाई आता गप्पागोष्टीसाठीसुद्धा कॉफीशॉपला पसंती देते,’ असं मत डॉ. शेट्टी व्यक्त करतात.

‘सध्या इंटरनेटमुळे ‘वर्ल्ड इज व्हिलेज’ अशी अवस्था आहे. आपण जसं ऑनलाइन कपडे, काही गोष्टी, जेवण मागवतो तसंच अगदी ड्रग्जही घरपोच मिळतात. म्हणजेच काय तर या बाकीच्या गोष्टींप्रमाणे याही गोष्टींची उपलब्धता सहज आहे. आणि हेच तरुण पिढी ड्रग्जच्या जाळ्यात अडकण्यामागचं मुख्य कारण आहे,’ असं स्पष्ट मत ते व्यक्त करतात. दिवसेंदिवस जसे नवनवीन ड्रग्ज बाजारात येत आहेत तसंच ते ड्रग्ज घेणाऱ्या मुलांची वयंही कमी होत चालली आहेत. आजच्या शतकात आई-वडील दोघेही बाहेर कामाला जातात. मुलंही त्यांच्या विश्वात असतात. आई-वडिलांकडे मुलांना रोज थोडासुद्धा वेळ द्यायला नसतो. अशा वेळी मग मुलांना आपली मित्रमंडळी, आपल्याला वेळ देणारी माणसं जवळची वाटू लागतात. आणि यातूनच मुलं पुढे वाईट गोष्टीच्या मार्गावर चालू लागतात. अनेकदा याची चाहूल आई-वडिलांना खूप उशिराने लागते. अशीच एक महाविद्यालयीन तरुण मुलगी रोज कॉलेजमधून घरी उशिरा यायची. तिचे वडील कामानिमित्ताने बाहेरगावी असतात आणि आई इथेच जॉब करते. त्यामुळे मुलीकडे लक्ष देता येत नव्हतं. पण काही कारणामुळे जेव्हा तिची आई रोज घरीच राहू लागली तेव्हा आईला रोज आपली मुलगी घरी उशिरा येते हे समजलं.

कॉलेज दुपारीच संपतं तरीही तिला घरी यायला रात्र का होते? हे शोधण्यासाठी आई-वडिलांनी कॉलेज गाठलं. पण कॉलेजमध्येही याची कल्पना कोणालाच नव्हती. नंतर शिक्षक आणि आई-वडिलांनी नीट चौकशी केल्यावर ती रोज हुक्का पार्लरमध्ये काही मित्रमंडळींबरोबर जाते असं समजलं. एवढय़ा लहान वयात ती हुक्क्याच्या आहारी गेली होती. कायद्याने हा गुन्हा आहे, आपण पकडले जाऊ  हे माहिती असूनही तिला हुक्क्याचं व्यसन लागल्यामुळे तिला ते सोडणं जड गेलं. पण आता तिने मनापासून ते सोडण्याचा निर्यण घेतला आहे. या तरुण मुलीप्रमाणेच मुंबईच्या  गोरेगावमध्ये राहणाऱ्या १४ वर्षांच्या मुलाला ड्रग्ज घेण्याची सवय लागली. याबद्दल हरीश शेट्टी सांगतात, ‘एवढय़ा लहान वयाचा तो मुलगा वाईट संगतीमुळे ड्रग्ज घेऊ  लागला. त्याची आई घरकाम करते तर वडील एका छोटय़ा कंपनीमध्ये कामाला आहेत. शाळेतल्या मित्रांच्या वाईट संगतीमुळे त्यांच्याबरोबर जे ड्रग्ज मिळेल ते घ्यायला त्याने सुरुवात केली. त्याच्या घरी समजल्यावर पालकांनी त्याला माझ्याकडे आणलं. टेस्ट केल्यावर तो ड्रग्ज घेतो हे सिद्ध झालं. त्याच्यावर उपचारही सुरू झाले. शाळा सुटल्यावर संध्याकाळी त्याला ड्रग्ज घायची सवय लागली होती. त्यामुळे त्याला संध्याकाळ झाल्यावर अनेकदा त्रास व्हायचा, पण उपचार सुरू होते. उपचार घेऊ न माणूस यातून पूर्णपणे बाहेर पडू शकतो, पण या सगळ्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे त्यानेही उपचार सुरू झाल्यावर सहा महिन्यांनी एक-दोनदा ड्रग्ज घेतले होते.’

अनेक मुलं-मुली ड्रग्जसारख्या वाईट गोष्टींना सहज बळी पडतात. अनेकदा यामागे त्यांच्यावर असलेल पीअर प्रेशर कारणीभूत ठरतं. तर कधी सवय. अनेकदा आपल्याला डोकं दुखत असेल, अंग दुखत असेल तर आपण क्रोसिन ही गोळी घेतो. पण क्रोसिनसुद्धा एक प्रकारचं अ‍ॅडिक्शनच आहे. ज्याचा अतिवापर पुढे जाऊ न आपल्या शरीरावर वाईट परिणाम करतो. क्रोसिनप्रमाणेच अनेकांना कफ सिरप घेण्याचीही सवय असते. घशाला थंड वाटतं, कफ सिरप घेतलं की छान झोप येते अशा छोटय़ा-छोटय़ा कारणांमुळे आपण ते घेत राहतो जे आपल्या शरीरासाठी घातक आहे. आणि एकदा त्याची सवय लागली की त्यातून बाहेर पडणं ही लढाई होऊन बसते. असे अनेक तरुण-तरुणी आज स्वत: व्यसनातून बाहेर पडले असून इतरांनाही त्यातून बाहेर पडण्यासाठी कार्यरत झाले आहेत. मात्र मित्रांची संगत, प्रसिद्धीच्या भ्रामक कल्पना, चैनीचे व्यसन अशा अनेक कारणांमुळे आपण नशेला जवळ तर करत नाही ना, याचे भान खुद्द तरुणाईनेही ठेवणे गरजेचे आहे. याबद्दल आपल्या आई-वडिलांशी संवाद साधणेही महत्त्वाचे असते मात्र अनेकदा हाच मोकळा संवाद मुलं हरवून बसल्याने नशेचा हा विळखा तरुणाईभोवती घट्ट बसत चालल्याचे चित्र दिसते आहे!

पाशमुक्त होताना..

ड्रग्जच्या विळख्यातून स्वत:ला बाहेर काढत आता बाकीच्यांनाही त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एका तरुणाने त्याचा अनुभव नाव न सांगण्याच्या अटीवर व्हिवाकडे सांगितला. तो म्हणतो, मला काही परस्थितीमुळे वयाच्या अवघ्या अकराव्या-बाराव्या वर्षी सिगरेट आणि दारू प्यायची सवय लागली. पुढे हळूहळू मी वयाच्या १५व्या वर्षी ड्रग्जही घ्यायला सुरुवात केली. घरच्या काही कारणांमुळे, काही इमोशनल गोष्टींमुळे मी ड्रग्ज घेणं थांबवलंच नाही.’ ड्रग्ज घेण्यासाठी एवढय़ा लहान वयात पैसे कुठून मिळायचे यावर त्याने त्या वेळी ड्रग्ज विकत घेण्यासाठी काहीही करायचो. अगदी वेळ पडली तेव्हा चोरीसुद्धा केली. इतका मी नशेच्या आहारी गेलो होतो. वयाच्या २४व्या वर्षांपर्यंत मी त्यातच अडकलो होतो, असे सांगितले. ‘माझ्या आयुष्यातील अनेक र्वष मी अशीच वाया घालवली. पण सतत कुठे तरी यातून बाहेर पडायचं आहे हे जाणवत होतं. रस्ता मात्र सापडत नव्हता. एके दिवशी माझ्याचप्रमाणे ड्रग्ज घेणाऱ्या एकाने मला ‘नॉरकोटिक्स’ या संस्थेविषयी माहिती दिली. जसं एक आंधळाच दुसऱ्या आंधळ्याची मदत करतो तसंच त्याने मला मदत केली. मग मीही आता यातून बाहेर यायचं असं ठरवून तिकडे गेलो.’  ‘नॉरकोटिक्स’ ही संस्था शंभरहून अधिक देशात काम करते आहे. त्यांचा ड्रग्जमधून मुक्त होण्यासाठीचा १२ स्टेप्सचा एक प्रोग्रॅम आहे. या प्रोग्रॅममुळे जगभरातून अनेक माणसं ड्रग्ज घेण्यापासून मुक्त होतात. तिकडे गेल्यावर या सगळ्यातून बाहेर पडायला कशी मदत झाली त्याविषयी तो सांगतो, ‘या प्रोग्रॅममध्ये मी माझ्यासारख्याच ड्रग्ज अ‍ॅडिक्टला भेटलो. यात वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटी होतात. सुरुवातीला त्रास झाला पण हळूहळू सवय होऊ  लागली. तिथे आलेला प्रत्येक जण एकमेकांना यातून बाहेर पडणार असा विश्वास देतो. आणि यामुळेच यातून मला बाहेर पडायला मदत झाली. आता मी गेली अनेक र्वष अजिबात ड्रग्ज घेतलेले नाहीत. मी आता स्वत: या संस्थेबरोबर काम करतोय. काही वर्षांपूर्वी माझी जी अवस्था होती त्यातून अनेकांना बाहेर काढायचा माझा रोजचा प्रयत्न सुरू असतो.’