एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लखलखचंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ पाहताना डोळे कसे दिपून जातात नाही? सगळीकडे नुसता झगझगाट. पण हा विजेच्या दिव्यांचा कृत्रिम प्रकाश पाहताना मनात येतं की, सध्या दिव्यांची ही इतकी रोषणाई करणं आपल्याला शक्य आहे. कारण सारा विजेचा खेळ आहे. पण जेव्हा वीज नव्हती, मातीच्या पणत्या उजळूनच सण साजरा व्हायचा तेव्हा या सणाची गंमत कमी होती का? बिलकूलच नाही. हे दिवे केवळ निमित्त. मन प्रकाशाने लखलखीत असलं की सदैव दिवाळीच. या दिवाळीच्या निमित्ताने खरेदीकरता बाजारात फिरताना एक शब्द कानावर सातत्याने पडत होता लँटन.
लँटन म्हणजे कंदील. देशागणिक या कंदिलाच्या खूप वेगवेगळ्या आवृत्त्या पाहायला मिळतात. पाश्चात्य देशातले लँटन म्हणजे उत्कृष्ट कलाकारीचा नमुनाच. या शब्दाचं स्पेलिंग lantern असं लिहिलं जातं आणि १ च्या गुगलीमुळे लॅन्टर्न, लान्टर्न असे अनेक उच्चार कानी पडतात. मात्र इथला ‘r’ फक्त नावापुरता आहे. अचूक उच्चार लँटन. गंमत म्हणजे हिंदीत तर या लँटनचा पार ‘लालटेन’ झालाय. या दोन शब्दांचा एकमेकांशी सुतरामही संबंध जाणवत नाही, पण हिंदी भाषा खूपच लाडिक आहे. ती अनेकदा लाडाने असे बदल करताना दिसते.
या शब्दाच्या बाबतीत एक विलक्षण योगायोग आढळला. लँटन हा शब्द ग्रीक lampter पासून लॅटिन, फ्रेंच करत करत लँटन झाला. तसाच आपल्या संस्कृत दीपकचा दीपक > दीवअ > दिवा झाला. दोन्ही शब्द दिव्याशी निगडित असल्याने हे विशेष जाणवलं. आपली दीपावली जसा दिव्यांचा सण, तसाच चीनमधला लँटन फेस्टिव्हलही जगभरात प्रसिद्ध आहे. इथल्या घोस्ट फेस्टिव्हलमध्ये पूर्वजांच्या आत्म्याचं प्रतीक म्हणून कमळाकृती लँटन नदीच्या प्रवाहात सोडले जातात.
दीपावलीच्या या सणाच्या निमित्ताने उजळलेले आकाशकंदील ही खरंतर या मातीतली गोष्ट. पण आकाशदिवा लावूया असं म्हटल्यावर गोंधळणाऱ्या आंग्लविद्यविभूषित पिढीला sky lantern पटकन कळतो. म्हणूनच दीपावलीच्या या पर्वात लँटनचा अचूक उच्चार जाणून घ्यायचा हा प्रयत्न केला. या शब्दाच्या उच्चारातील सायलंट ‘r’ प्रमाणेच शांतपणे जळणारा हा लँटन आपल्या सर्वाच्या आयुष्यात ज्ञान, समृद्धी, शांतीचा प्रकाश घेऊन येवो याच आपणा सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा!
viva.loksatta@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on english pronunciation
First published on: 14-11-2015 at 01:30 IST