News Flash

डिझायनर मंत्रा : व्यवसायच महत्त्वाचा मोहम्मद मझहर

नवीन फॅशन डिझायनरसाठी ‘लॅक्मे फॅशन वीक’चे ‘जेन नेस्ट फॅशन डिझायनर’ हे खूप मोठे आणि महत्त्वाचे व्यासपीठ आहे.

डिझायनर मंत्रा : व्यवसायच महत्त्वाचा मोहम्मद मझहर
(संग्रहित छायाचित्र)

तेजश्री गायकवाड

लॅक्मे फॅशन वीकमध्ये मागच्या वर्षीच्या सीझनमध्ये ‘जेन नेक्स्ट फॅशन डिझायनर’च्या माध्यमातून लॉंच झालेल्या मोहम्मद मझहरने नुकत्याच झालेल्या ‘लॅक्मे फॅशनवीक समर रिसॉर्ट’ या सीझनमध्ये स्वत:चं मोठं कलेक्शन सादर केलं.

पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या एका लहानशा गावातून आलेला तरुण त्याच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मधील पहिल्याच कलेक्शनमुळे खूप चर्चेत आला. लॅक्मे फॅशन वीकमध्ये मागच्या वर्षीच्या सीझनमध्ये ‘जेन नेक्स्ट फॅशन डिझायनर’च्या माध्यमातून लॉंच झालेल्या मोहम्मद मझहरने नुकत्याच झालेल्या ‘लॅक्मे फॅशनवीक समर रिसॉर्ट’ या सीझनमध्ये स्वत:चं मोठं कलेक्शन सादर केलं. फॅशनविश्वात ओळख मिळताच भरारी घेत स्वत:चं स्वतंत्र, संपूर्ण मोठं कलेक्शन तितक्याच आत्मविश्वासाने सादर करणं हे खूप मोठं धाडस आहे. हे आव्हान पेलणाऱ्या या तरुण फॅशन डिझायनरचा प्रवासही तितकाच रंजक आहे..

टेक्स्टाईल आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये इतक्या कमी वेळात नावलौकिक मिळवणारा मोहम्मद मझहर त्याच्या आजवरच्या प्रवासाबद्दल बोलताना म्हणतो, ‘मला लहानपणापासून चित्रकलेची खूप आवड होती. आणि माझी चित्रकलाही उत्तम होती. पण त्यावेळी करिअर कुठल्या क्षेत्रात करायचं याचा निर्णय तर दूरची गोष्ट, मी कोणत्याही फिल्डचा विचारही केला नव्हता. माझं फॅशन डिझायनर बनणं हे तसं नशिबाने मिळालेली संधीही नव्हती. माझी चित्रकला बघून खूप लोक मला तू फॅशन डिझायनर हो, असाच सल्ला द्यायचे. पण माझ्या घरच्यांची मी एमबीए करावं अशी इच्छा होती. पण शेवटी मी खूप विचार करून माझा निर्णय घेतला आणि फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं’, असं मोहम्मद म्हणतो. अर्थात फॅशनच्या बाराखडीचा श्रीगणेशा हीच आपली डिझायनर म्हणून झालेल्या प्रवासाची सुरुवात होती हेही सांगायला तो विसरत नाही.

नवीन फॅशन डिझायनरसाठी ‘लॅक्मे फॅशन वीक’चे ‘जेन नेस्ट फॅशन डिझायनर’ हे खूप मोठे आणि महत्त्वाचे व्यासपीठ आहे.पण म्हणूनमोहम्मदसाठी ‘जेन नेक्स्ट फॅशन डिझायनर’ म्हणून लाँच होणंही तितकं सोपं नव्हतं. ‘जेन नेक्स्ट हे माझं स्वप्न होतं. या व्यासपीठावर प्रवेश व्हावा यासाठी लॅक्मेच्या प्रत्येक सीझनला मी प्रयत्न करत होतो. ‘जेन नेक्स्ट’साठी सात वेळा प्रयत्न केल्यानंतर हे यश साध्य झालं’, असं तो म्हणतो. अर्थात, प्रत्येक वेळी निवड हुकल्यानंतर आपण कुठे कमी पडलो याचा विचार करत पुढची तयारी करत गेलो आणि आठव्या सीझनला सातही सीझनचा विचार करून जे जे कमी पडलं त्यात पूर्णत्व आणण्याचा माझा प्रयत्न यशस्वी ठरला आणि मी या जेन नेक्स्टसाठी निवडलो गेलो असं त्याने सांगितलं. खरं तर हा सगळाच एक ड्रॅमॅटिक प्रवास होता. जेव्हा जेव्हा माझं सिलेक्शन झालं नाही तेव्हा तेव्हा मी रडलो, पण पुढच्याच दिवशी नवीन प्रेरणा घेऊन काम करायला लागलो, असं सांगणाऱ्या मोहम्मदचा जेन नेक्स्टचा प्रवास म्हणजे सराव माणसाला परफेक्ट बनवतो याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल.

प्रत्येक फॅशन डिझायनरची एक स्टाईल असते, एखादी गोष्ट किंवा डिझाइन ते त्यांच्या प्रत्येक कलेक्शनमध्ये आवर्जून वापरतात. अशीच मोहम्मदने युनिक स्टाइल आणि त्याचा यूएसपी तयार केला तो रंगांच्या माध्यमातून.. तो नेहमी त्याच्या कलेक्शनमध्ये पांढरा, काळा किंवा नैसर्गिक रंगच वापरतो. ‘रंगांच्या या निवडीमागे दोन मोठी कारणं आहेत. एक म्हणजे मला नैसर्गिक रंग आणि त्यातही काळा-पांढरा रंग खूप आवडतात. आणि दुसरं म्हणजे माझे जास्तीत जास्त ग्राहक हे मध्य पूर्वेकडील प्रदेशातील आहेत. त्या बाजूच्या देशातील लोकांना असेच रंग आवडतात त्यामुळे मी तेच रंग वापरतो. हे रंग फक्त तिकडच्याच लोकांना जास्त आवडतात असं नाही तर सर्वसामान्यपणे हे दोन रंग आवडणाऱ्या लोकांचं प्रमाण मोठं आहे’, असं निरीक्षणही तो नोंदवतो. रंगांनंतर अनेक फॅशन डिझायनर त्याच्या सिल्हाऊटची स्टाइल सेट करतात. मोहम्मदची स्टाइल वेस्टर्न आहे, परंतु त्याच्या डिझाइन्सला नेहमीच भारतीय टच असतो. त्याबद्दल तो म्हणतो, ‘मी भारतीय आहे. माझी मूळं इथली आहेत त्यामुळे माझ्या डिझाइनमध्ये भारतीयत्व उतरणारच.’

सर्जनशील कलाकार म्हटले की त्याच्या कलाकृतीमागे काहीएक प्रेरणा, विचार निश्चित असतातच. फॅशन डिझायनर्सचे तर प्रत्येक कलेक्शन हे कुठल्या ना कुठल्या प्रेरणेतून उमटत असते. मी खूप वेगवेगळ्या गोष्टींपासून प्रेरित होतो, त्यातला एखादा छोटा घटकही असा असतो ज्यावरून क लेक्शन डिझाइन केलं जातं, असं सांगताना आपल्याबरोबर काम करणारे कारागीर, विणकर यांच्याबरोबरीने छोटी छोटी कामं करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडूनच आपल्याला प्रेरणा मिळत असल्याचं त्याने स्पष्ट केलं. ‘मी उत्तर प्रदेशातील सहारनपूरसारख्या छोटय़ा गावातून आलेलो आहे. मी माझ्या गावात ही माणसं, त्यांच्या या सगळ्या गोष्टी रोज बघतो. लहानपणापासून मी धोबी, मोची, कुंभार, शिंपी, वेगवेगळ्या गोष्टी बनवणारी माणसं यांना बघतच मोठा झालो आहे. रोजच्या कामातूनही आपल्या कलेला वेगळेपणा मिळवून देणारी ही मंडळी मला प्रभावित करतात’, असं मोहम्मद म्हणतो. आपल्या आयुष्यातील अनेक घटना, ठिकाणं, वापराच्या गोष्टी अशी कुठलीही बाब फॅशन डिझायनरला प्रेरणा देते. फॅशन डिझायनरची स्वत:ची राहण्याची, स्वत:ला प्रेझेंट करायचीही हटके पद्धत असते, स्टाइल असते. मोहम्मद मात्र मिनिमल लाइफस्टाइलला प्राधान्य देतो. तो म्हणतो, ‘मी छोटय़ा गावातून असल्यामुळे लहानपणापासूनच अगदी छोटय़ा गोष्टी वापरून चांगलं जगण्याची सवय मला आहे. आणि तीच माझी लाइफस्टाइल असून आजही मी त्याचाच अवलंब करतो. याची झलक तुम्हाला माझ्या कलेक्शनमध्येही दिसेल. जेवढं कमी तेवढं चांगलं हा माझा मंत्रा आहे. या क्षेत्रात डिझायनिंग एवढं मॅटर करत नाही जेवढा बिझनेस मॅटर करतो. त्यामुळे या फॅशन इंडस्ट्रीमध्ये पाय रोवायची महत्त्वाकांक्षा असणारे नवीन फॅशन डिझायनर त्यांचे डिझाइन्स जेवढे व्यावसायिक पद्धतीने, लोकांना रोजच्या रोज सहज वापरता येतील आणि उठून दिसतील असे बनवतील तेवढा जास्त फायदा त्यांना मिळेल आणि ही एकच गोष्ट सगळ्याच बाजूने फायद्याची आहे’, हेही तो ठामपणे नमूद करतो.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 2:18 am

Web Title: article on mohammed mazhar presented lakme fashion week summer resort season
Next Stories
1 चवीने जगणार त्याला : रॉ फिशचा प्रवास!
2 शेफखाना :रॉयल खाना
3 व्हिवा दिवा : प्राजक्ता सकपाळ
Just Now!
X