हाय फ्रेण्डस्! नवीन वर्षांच्या हार्दकि शुभेच्छा. काल पाडव्याच्या सेलिब्रेशनमध्ये बिझी असाल ना? नववर्षांच्या स्वागतयात्रांमध्ये सामील झाला होतात की नाही? नटून-थटून देवळात जाऊन आल्यावर घरात गोडाधोड झालंच असेल ना? का काही ग्रुप्सप्रमाणं सुट्टीचा मुहूर्त गाठून फिरस्ती नि हॉटेलिंग केलंत? पण बॉस आता फार फिरस्ती करता येणार नाहीये, कारण उन्हाची तलाखी वाढतच जाणारेय. दुपारच्या वेळी सूर्यराजे अधिकाधिक रागे भरणार आहेत. आपल्याला रखरखीत नि भगभगीत वाटणाऱ्या वातावरणातून थोडंसं बाहेर यायला हवं. एसीच्या थंडाव्यापेक्षा एखाद्या झाडाच्या सावलीत मिळणारा गारवा लई भारी असतो राव. त्यासाठी थोडं रुटिनपलीकडं डोकवायला हवं.
चत्रपाडव्याचं सेलिब्रेशन आपण आपल्या पद्धतीनं केलं, तसंच सेलिब्रेशन निसर्गही करतोय.. फक्त ते थोडय़ा सजगपणं पाहायला हवं. कसं? पाहा हं.. या संदर्भात बी.एन.एच.एस.चे जनसंपर्क अधिकारी अतुल साठे सांगतात की, ‘‘काही झाडांची पानगळ अजून होत्येय. काही झाडांची पानगळ होऊन त्यांना नवीन पालवी फुटत्येय. शहरांतल्या देशी बदाम, गुलमोहर, सोनमोहोर, रेन ट्री यांना पालवी यायला सुरुवात झाल्येय. तर जंगलात पांगारा, बहावा, ताम्हणला फुलं येऊ लागल्येत. या फुलांचे लाल, पिवळाधम्मक रंग मन आकर्षति करताहेत. कुसुंबाला लाल-हिरवी पानं आल्येत. पिंपळाची पालवी दाट होतेय. सागाची पानगळ अजून सुरूच असून त्याला मेअखेरीस पानं येतील.
‘‘चत्राची चाहूल देणारं कोकिळ कूजन सकाळीच ऐकू येऊ लागलंय. पक्ष्यांमधले कोकिळ-कोकिळा, शिंपी हे पक्षी अ‍ॅक्टिव्ह आहेत. दुपारी तांबट पक्षी दिसतोय. विणीच्या हंगामातली हळद्याची पिसं पिवळीजर्द व्हायला लागल्येत. जंगलात सातभाईंच्या वेगवेगळ्या जाती अ‍ॅक्टिव्ह आहेत. नव्या फुलांमधला मध चाखणारे पक्षी, कीटक खाणारे पक्षीही दिसू लागल्येत. जसजसा उन्हाळा वाढत जाईल, तसतशी उन्हाळ्याच्या सुरुवातीला झाडांची फुललेली फुलं गळून पडतील. ही फुलं पडल्यावर फळं, बिया, शेंगा आणि इतर झाडांना नवीन पानं येतील. ही प्रोसेस बराच काळ चालते. त्यात गुलमोहराची फुलं उशिरा फुलतात. पहिला पाऊस पडून गेल्यावर ही फुलं गळून पडतात.
‘‘मुंबई आणि आसपासच्या परिसरातल्या जंगलात मिश्र पानगळ होतेय. त्यामुळं जंगल एकदम उघडंबोडकं झालेलं नाहीये. लांबपर्यंतचा परिसर दिसू शकतोय. पक्षी बघण्यासाठी हा सीझन चांगला आहे. त्यामुळं सावरी, पांगारा या झाडांखाली बसून हे निरीक्षण करता येईल. कुडाच्या फुलांचा वास, करवंदाचा वास असे वेगवेगळ्या फुलांचे वास घेता येतील. कोकणातल्या काजू-आंब्याला कधीचाच मोहर येऊन आता त्यांना फळं धरल्येत. मोठय़ा मेहनतीनं या कैऱ्या पाडून त्या झाडाखालीच बसून तिखट-मीठ लावून खाण्याचा आनंद काही औरच.
‘‘आता हळूहळू उन्हाचा त्रास जाणवायला लागलाय. ज्यांना फिरण्याची हौस असेल, त्यांना सकाळी १०पर्यंत फिरता येऊ शकेल. आंबोली घाट, महाबळेश्वर, भीमाशंकर अशासारख्या घाटमाथ्यावरच्या सदाहरित जंगलांमध्ये वर उन्हाचा कडाका असला तरीही झाडांखाली गारवा मिळेल. भर दुपारी पक्षी बघायला-ऐकायला मिळू शकतील. यापकी आंबोली घाटात सध्या मलबार कस्तूरचा आवाज अधूनमधून कानावर पडतोय. स्वर्गीय नर्तक, पांढऱ्या कंठाचा सातभाई, समशेर सातभाई असे पक्षीही दिसताहेत. अधूनमधून शेकरूचा आवाजही कानी पडतोय.’’  
मंडळी, ही आहे निसर्गातल्या चतन्यदायी सेलिब्रेशनची तोंडओळख. एकदा का ही ओळख पटली की निसर्गाशी आपली नकळत मत्री होते. त्यातल्या चतन्याची खूण पटली की मग त्याचा अधिकाधिक माग काढावासा वाटतो.. या पालवत्या हिरवाईमुळं अलगदपणं बहरणाऱ्या आपल्या संवेदनांना जपायला हवं. त्यासाठी निसर्गाचं जतन करणारे हात मन:पूर्वक पुढं यायला हवेत. तेव्हा हीच ती वेळ, हाच तो क्षण.. पाहत राहा.. चतन्याचं सेलिब्रेशन..