सिनेमातल्या फॅशनचा लगेच ट्रेण्ड बनतो; पण चंदेरी पडद्यावरचं हे स्टाइल स्टेटमेंट प्रत्यक्षात कसं मिरवावं यासाठी हा कॉलम. दियाचा हा फॅशन शोमध्ये शोस्टॉपर म्हणून घातलेला ड्रेस आयडियल फेस्टिव्ह वेअर कसा आहे?

सण म्हटले की पारंपरिक, विविधरंगी कपडे, दागिने हवेतच. आता तर गणपती घरी आलेत. पाठोपाठ गौरी येतील. मग पंधरा दिवसांत नवरात्र. नंतर दिवाळी पण लवकरच येईल. पण या काळात प्रत्येक सणाच्या दिवशी काही ऑफिस किंवा कॉलेजला सुट्टी नसते. भरजरी कपडे ऑफिस, कॉलेजमध्ये घालणं शक्य नसतं. ट्रॅडिशनल फेस्टिव्ह वेअरमध्ये तोचतोचपणा येतोच. शिवाय त्या साडय़ा किंवा भरजरी दुपट्टे वावरायला सुटसुटीतही नसतात. या प्रश्नाचा तोडगा दिया मिर्झाच्या या लुकमध्ये दडलेला आहे. काळ्या रंगाचा एम्ब्रॉयडरीड टॉप, सोबत घेरदार स्कर्ट, केसांचा बन आणि कानात मोठय़ा इअररिंग्स! तिचा हा लुक सिम्पल असला तरी त्याला फेस्टिव्हिटीची झालर आहे. सणासुदीच्या काळात ऑफिस, कॉलेजसाठी उत्तम आहे.
कसा कॅरी कराल?
सध्या बाजारात सुंदर स्कर्ट्स आले आहेत. छान घेरदार आणि विविध रंगांचे स्कर्ट्स कुणालाही चांगले दिसतील. सणांसाठी नेहमीच्या सलवार कुर्त्यांऐवजी याचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता.
प्रिंटेड स्कर्ट्स, प्लेन टॉप, शर्ट घालू शकता आणि टॉप भरलेला असेल तर स्कर्ट प्लेन असू द्या. एखादं एम्ब्रॉयडरी केलेलं जॅकेट असल्यास उत्तमच.
दागिन्यांची गर्दी करण्यापेक्षा स्टेटमेंट नेकपीस किंवा मोठे इअररिंग्स तुमचा लुक पूर्ण करायला पुरेसे आहेत.
मृणाल भगत – viva.loksatta@gmail.com