‘नाचत क्रिष्ण झनक झुम झननन, तकतकथोम तकतकथोम तिगदा दिग दिग थेई..’च्या तालावर मुलींचा सराव चाललाय. त्यांच्या या सरावात मुद्रा करताना होणारी छोटीशी चूक तिच्या लगेच लक्षात येते आणि ती त्वरेनं ती चूक सुधारते. त्याच्याकडून कसून सराव करून घेते. याच निरीक्षणाचा तिला स्वत:चा सराव करताना उपयोग होतो नि तिचं नृत्य आणखी समरसून पेश केलं जातं. ही आहे मिथिला भसे! जाणून घेऊ या मिथिलाच्या मराठी नि कथ्थक या लाडक्या विषयांविषयी.
मिथिला ‘डी. जी. रु पारेल महाविद्यालया’त एसवायबीएला आहे. एकूण ८ विषयांपैकी मराठी विषय तिला अतिशय आवडतो. तिच्या संग्रही खूप पुस्तकं असून वेळोवेळी ती ग्रंथालयातूनही पुस्तकं आणते. ती शेवटच्या वर्षांला मराठी विषयच घेणार असून पुढं त्यात एमए करायचं किंवा एलएल.बी. करावं असं मनाशी ठरवत्येय. शाळेत असल्यापासून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणं आणि सूत्रसंचालन करण्याची तिला आवड आहे. मराठी भाषेवरच्या प्रेमामुळं हे सगळं करणं तिला मनापासून आवडतंय.
मराठी भाषेएवढीच तिला नृत्यकलाही आवडते. तिच्या आईला नृत्याची आवड होतीच. त्यामुळं लहानपणी मिथिलानं त्यांच्याकडं नृत्याची मुळाक्षरं गिरवली. सीनिअर केजीपासूनच ती सोसायटी, वडिलांच्या ऑफिसमधल्या कार्यक्रमांत सहभागी व्हायची. नृत्याची आवड असली तरी त्याला शिक्षणाचा बेस हवा, हेही तिनं ओळखलं होतं. अकरावीत असताना मिथिला नृत्याच्या क्लासला गेली नि रु पाली देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा कथ्थकचा प्रवास सुरू झाला. तिची नृत्यक्षमता रु पालीताईच्या लक्षात आली. तिनं थेट दुसऱ्या वर्षांची परीक्षा द्यावी, असं तिला ताईनं सुचवलं. त्या परीक्षेत ती यशस्वी ठरली व आता चौथ्या वर्षांची परीक्षा देत आहे. थिअरी आणि प्रॅक्टिकल असं या परीक्षेचं स्वरूप असतं.   
सध्या छोटय़ांचा डान्स बसवायला तिला आवडतंय. पुढं जाऊन तिला कोरिओग्राफर नि आर्टिस्ट व्हायचंय. ही इच्छा सांगितल्यावर ताई नेहमी सांगते की, ‘शिक्षणही तेवढंच महत्त्वाचं आहे.’ छोटय़ांची कथ्थकची परीक्षा असल्यावर मिथिलाची जाम तारांबळ उडते. कारण ताई तेव्हा एस्क्ट्रा क्लास बोलावते नि कॉलेजचा अभ्यासही करायचा असतो. कॉलेजच्या परीक्षेच्या वेळी कथ्थकच्या व्यवधानाला थोडी खीळ बसते. आताही मार्चमध्ये कॉलेजची परीक्षा आहे. अशा वेळी तिला मैत्रिणींची फार मदत होते.
बारावीत असताना इतरांप्रमाणं तिनं अभ्यासासाठी म्हणून कथ्थकला गॅप घेतली नाही. तेव्हापासून ताई तिच्या मागं लागली होती की ‘लहान मुलांचा सराव तू घे म्हणून’. मिथिला त्यांना शिकवू शकेल असं ताईला वाटत होतं. ती आधी थोडी टाळाटाळच करत होती. मग ताई म्हणाली, ‘येऊन तर बघ.’ ती गेली, शिकवलं नि जमलंदेखील. छान वाटलं.. आवडलं. ताईला मदत करता येणार होती. आणि गमतीनं सांगायचं तर थोडासा अधिकारही गाजवायला मिळणार होता. मग एफवायपासून तिनं शिकवायला सुरुवात केली.
मिथिला कसं शिकवते? ती सांगते की, ‘कथ्थकमध्ये मूव्हमेंटस् महत्त्वाच्या असतात. आधी पाय आणि मग हात करून घेते. मग हातपाय दोन्ही कॉन्फिडन्टली करून घेते. मुद्रा, तत्कार वगैरे करून घेते. मुलींना एक तोडा पाच वेळा करायला सांगायचा. तो कसा करतायत ते बघायचं. चुकत असेल तर समजावायचं. मी होमवर्क करून यायला सांगते. तो नाही केलात तर शिक्षा करेन, अशी भीतीही घालते. काही वेळा छोटय़ा मुलींना शिकवताना थोडं ओरडावंही लागतं. क्वचित वैतागायलाही होतं. त्या आपण सांगतो तसं करत नाहीत. काहीजणी लक्षच देत नाहीत. अशा वेळी त्यांना रागावणार किती? मग ताईला सांगितल्यावर ती बरोब्बर करून घेते. तिचा दराराच तसा आहे.’
‘कथ्थक शिकताना लक्ष एकाग्र होतं. त्याचा फायदा अभ्यासातही होतो. तर शिकवताना स्वत:चंही कळत-नकळत निरीक्षण केलं जातं. आपलं कुठं काही चुकत नाही ना वगैरे.. मी शिकवताना ताई अमुक ग्रुपच्या अमुक तमुक मूव्हमेंटस् करून घे, असं सांगते. ती आम्हाला शिकवताना आपण मुलांना कसं शिकवावं, याचं आपसूकच निरीक्षण केलं जाऊन ती पद्धत कुठंतरी मनात रु जत जाते. आत्ता मी कथ्थकविषयी एवढं बोलतेय खरं, पण एकेकाळी एकूणच शास्त्रीय नृत्य प्रकार पाहायला मला वैताग यायचा. आता त्याची एवढी गोडी लागल्येय की कथ्थकचे कार्यक्रम तिकीट काढून अनुभवायला जाते. या कार्यक्रमांतील ज्येष्ठांचा आदर्श ठेवून सराव करण्याचा विचार करते. त्यासाठी मेहनतीची तयारी ठेवल्येय. त्यामुळं मॅच्युरिटी आली. आपण कथ्थक सीरिअसली करायचं. त्यात नुसतं पास होण्याला काहीच अर्थ नाही. ‘कर के दिखाएंगे..’ असा अप्रोच ठेवलाय,’ असं मिथिला म्हणते.
कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी आपण अमुक एक करून दाखवायचंय, असे विचार तिच्या मनात येतात. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी आधी कितीही स्टेज परफॉर्म केलेला असला तरी उगीचच थोडीशी भीती वाटते. आपली स्टेप तर चुकणार नाही ना, आपल्यामुळं ग्रुपचं चुकणार नाही ना असं वाटतं. ती म्हणते की, ‘एकदा स्टेजवर पाऊल ठेवल्यावर एकदम समा बदलतो. सकारात्मक विचार मनात येतात. आपल्याकडून १00 टक्के चांगलं देता येईल, तेवढं चांगलं द्यायचा प्रयत्न करते. ते वातावरण, तो अटायर आणि तो तालानंद यांतून आगळी ऊर्जा मिळते. या सगळ्यासाठी घरून खूपच सपोर्ट आहे. मात्र अभ्यास नि डान्समुळं थोडंसं खाण्यापिण्याकडं दुर्लक्ष झालं, कॉलेज-शोमुळं खूप वेळ घराबाहेर राहिले तर थोडासा प्रेमळ ओरडा खावा लागतो.’
मिथिला सांगते की, ‘ताईला मी आदर्श मानते. तिचा अ‍ॅक्सिडंट झाला होता. ती व्हिलचेअरवर होती. ‘तुला कथ्थक करता येणार नाही,’ असं तिला सांगण्यात आलं होती. पण आपल्या अपूर्व मन:शक्तीच्या बळावर या संकटावर मात करत ती उठून उभी राहिल्येय. मला तिच्यासारखं काहीतरी करायचंय. क्लास काढायचाय. हे सगळं करताना प्रसिद्धी मिळाली नाही तरी चालेल, पण कला शिकवायला मला आवडेल. कारण कलेवर माझं प्रेम आहे.’
क्लासमध्ये कार्यक्रमाच्या आधी महिना-पंधरा दिवस प्रॅक्टिस केली जाते. स्टेप्स, पॉलिशिंग, जागा ठरवल्या जातात. क्लासमधून तिनं ४-५ शो केल्येत. तर कॉलेज, सोसायटी, बीपीटी ऑफिस आदी ठिकाणी सोलो शो केल्येत. ती म्हणते की, ‘एबीसीडी’ अर्थात ‘एनी बडी कॅन डान्स’ असं म्हटलं जातं. पण तो फार तर गल्ली डान्स असू शकेल. कोणतंही नृत्य कुणीही करू शकत नाही. नृत्यासाठी इच्छा, ते करण्याची तयारी आणि ध्येयपूर्तीची आस लागते. मग भले एकच गाणं परफॉर्म केलं तरी ते वाहवा मिळवणारं व्हायला हवं. क्लासिकल बेस लागतो. काही ते न शिकताही करतात. स्वत:त थोडंसं इंस्टिंग असावं लागतं, नाहीतर स्पर्धेत मागं पडतो.’
आपण कमवावं असं तिला कधी वाटलं नाही. पण ताईनं शिकवायला सांगितलं. तिची सिटिंग्ज लिहून दिल्यावर तिची वेळ, मेहनत, शक्ती यासाठी ताई पे करणार होती. ही तिच्यासाठी अनपेक्षित गोष्ट होती. तिच्या ‘पहिल्या कमाई’चा तिला एवढा आनंद झाला की तिनं उडय़ाच मारल्या. मिथिला सांगते की, ‘याआधी बक्षिसं खूप मिळाली होती. पण ही ‘कमाई’ होती. ती मी स्वामी समर्थांसमोर ठेवली नि त्यांचा आशीर्वाद घेतला. आता मी ताईची असिस्टंट झाल्येय. सुरु वातीला मी शिकत होते, तेव्हा फारसा रिस्पॉन्स द्यायचे नाही. कधी गेम खेळ कधी जोक मार वगैरे. मी शिकवायला लागल्यावर आपण जे समोरच्याकडं दुर्लक्ष करत होतो, त्यामुळं कसं वाटतं ते कळलं. तसं करणं मी कमी केलं. निव्वळ स्टेटससाठी नृत्य शिकणं आणि कलेची आराधना करण्यातला फरक समजून घ्यायला हवा. कितीही आधुनिकता आली तरी शास्त्रीय नृत्यकला अजरामर राहीलच. त्यात पारंपरिकतेला महत्त्व आहे. त्याचा गाभा पारंपरिक ठेवून त्यात प्रयोगशीलता दाखवता येईल. असे नवनवे प्रयोग करायची खूप इच्छा आहे..’

लर्न अ‍ॅण्ड अर्न या नव्या कॉलममधून तुम्हाला तुमच्या अशा काही मित्रांना आणि मैत्रिणींना भेटायला मिळणारेय जे शिकताना स्वतची आवड जपत आहेत. अर्थात ही आवड म्हणजे केवळ छंद जोपासण्याइतपत मर्यादीत नाही तर ही आवड आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्याची आहे. तरूणांमध्ये अलीकडे लर्निग प्लस अर्निग हे चित्र दिसून येत आहे. पूर्वी केवळ समर जॉब करणारे चेहरे आता कॉलेजच्या लेक्चर्ससह इतर जॉबसाठीही वेळ देत आहेत. अशाच तरूणांची आणि त्यांच्या कामाची महती आपण जाणून घेऊया. यासंदर्भात आपणास मेल करावयाचे असल्यास viva.loksatta@gmail.com या संकेतस्थळावर माहिती पाठवावी.