सणासुदीची सुट्टी नसणारं प्रोफेशन म्हणजे कलाकारांचं. त्यांची दिवाळी कशी असते ते त्यांच्याच शब्दात  

दिवाळीला डोंबिवलीच्या घरी – तेजश्री प्रधान
माझ्याप्रमाणेच माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ व सेटवरचे लहान-मोठे कामगार या प्रत्येकाची ‘आपल्या घरची’ दिवाळी असते. मालिकांतून भूमिका करणारे आम्ही सगळे दररोज बारा-चौदा तास एकत्र असतो, त्यातून नवे भावबंध जुळतात, नाती तयार होतात, एक नवे घर वा कुटुंब आकाराला येते असे म्हटले तरी चालेल, अशा कुटुंबाची मग सेटवर दिवाळी साजरी करतो. हा एक नवा अनुभव असतो. यावर्षी ‘होणार सून मी त्या घरची’ या मालिकेच्या बाबतीत असेच होईल. मागील वर्षीच्या दिवाळीत ‘लेक लाडकी या घरची’ मालिका संपली होती. त्यामुळे डोंबिवलीतील माझ्या घरी जाऊन आई-बाबांसोबत मनसोक्त प्रमाणात दिवाळी साजरी केली. यावर्षी किमान दोन दिवसांची सुट्टी घेऊन डोंबिवलीला दिवाळीला जाईनच.

खंडाळ्यातली दिवाळी – मिलिंद गुणाजी
माझ्या ‘दिवाळी साजरी’ करण्याच्या ‘भावना’ जरा वेगळ्या आहेत. माझ्या वडिलांना फटाक्यांचा आवाज व त्याहीपेक्षा धूर यांचा प्रचंड त्रास होई. म्हणून मी माझ्या वांद्रय़ाच्या निवासस्थानापासून कुटुंबासमवेत निघून माझ्या खंडाळ्याच्या बंगल्यावर दिवाळी साजरी करू लागलो. वडिलांच्या आठवणी काढत काढत ही दिवाळी साजरी होते. वांद्रय़ाहून अवघ्या दीड तासात खंडाळा असल्याने तशी घाईदेखील होत नाही. घरी लक्ष्मीपूजन करताच मी, माझी बायको राणी व आमचा मुलगा तिघेही निघतो. मी व राणी या दिवसांत चित्रीकरणाचे कोणतेही काम घेत नाही. आमचा दिवाळी फराळ मात्र ‘विशेष’ असतो. माझी आई गोव्याची, वडील बेळगावचे व बायको कोकणातील. त्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणची खाद्यसंस्कृती आमच्याकडे आली. पोहा प्रकारच बघा. गूळ, दूध, दही, बटाटा, कांदा व तिश्तेफो म्हणजे तिखट इतक्या प्रकारचे ‘दिवाळी पोहे’ आमच्या घरी असतात. मला मात्र बनवायला कठीण असे अनारसे आवडतात.

पहिली दिवाळी – स्मिता शेवाळे
अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर चार-पाच वर्षे मी दिवाळीच्या दिवशीदेखील चित्रपट अथवा मालिका यांचे चित्रीकरण करत होते. दैनंदिन मालिकांत भूमिका करताना बऱ्याचदा महत्त्वाचे सण व घरदार यांचा कळत-नकळत विसर पडतोच. त्याला काही पर्यायही नसतो, पण यावर्षीची दिवाळी माझ्या लग्नानंतरची पहिली असल्याने त्यातले दोन दिवस तरी मी राखून ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. एक दिवस मात्र माझा नृत्याचा कार्यक्रम ठरलाय. अशा सणासुदीलाच कलाकाराला खूप चांगली मागणी असल्याने ‘नाही’ म्हणणे कठीण जाते. माझे माहेर व सासर दोन्ही पुण्यात आहे. सासरी तर मंत्रपुष्पांजलीने दिवाळी सादरी होते. हा माझ्यासाठी नवा अनुभव ठरेल.

वर्षभराच्या आनंदभेटी – गिरिजा जोशी
माझ्या सुदैवाने मी दिवाळीत घरीच असते. मागच्या वर्षीच्या दिवाळीपूर्वी ‘धमक’चे चित्रीकरण पूर्ण करून घरी आले. यावर्षी दिवाळी संपताच ‘धमक’चे ‘फटाकेबाज’ प्रमोशन सुरू होईल. वर्षभर मी ‘गोविंदा’ इत्यादी चित्रपटांतून भूमिका साकारल्या. आमचा पेशाच असा आहे की, ‘सणाच्या दिवशी तरी काम नको’ असे म्हणता येत नाही. कधी प्रदर्शनाची तारीख ठरलेली असते, तर कधी अन्य काही असते. माझ्या घरची दिवाळी खूप साधीच असते, पण भाऊबीजेच्या निमित्ताने बरेच नातेवाईक भेटतात व चक्क वर्षभराचा ‘बॅकलॉग’ भरून निघतो हे महत्त्वाचे!

दिवाळी सेटवरच – सुशांत शेलार
दिवाळीच्या चार-पाच दिवसांत मी ज्या चित्रपटाच्या सेटवर ज्यांच्यासोबत असेन तेथे मी त्यांच्यातील एक होऊन मस्त दिवाळी साजरी करतो. अर्थात,  त्या प्रत्येकाचीही तशीच प्रामाणिक भावना असते आणि त्यामुळे अधिकच उत्साहात दिवाळी साजरी होते. बऱ्याचदा तरी अनेक कलाकारांच्या तारखा जुळणे अवघड झाले असल्याने काही निर्माता-दिग्दर्शकांना दिवाळीत काम थांबवता येत नाही. म्हणून मग ‘सेटवरच दिवाळी साजरी करू या’ अशी भावना वाढीला लागते. मराठीत सर्वत्र छानसे कौटुंबिक वातावरण असल्याने दिवाळी अगदी ‘झक्कास’ साजरी होते. पाडव्याच्या दिवशी मी आवर्जून विविध प्रकारचे काम करून पैसे मात्र मिळवतो. त्या दिवशी तरी कोणत्याही कामाला ‘नाही’ म्हणत नाही.

दिवाळीचा पोषक आनंद – मनीषा केळकर
माझ्यासाठी माझे कुटुंब, माझे मित्र-मैत्रिणी व एकूणच चित्रपटसृष्टी ही त्रिमूर्ती एक ‘झक्कास’ अनुभव असल्याने या तिन्हींचा योग्य समतोल साधत दिवाळी साजरी करते. दिवाळीत माझ्या एका नवीन चित्रपटाचा मुहूर्त होईल, तर घरासाठी आवर्जून वेळ काढल्याने मी व माझ्या मैत्रिणी एकमेकींच्या घरी जाऊन रांगोळी काढू. भावाच्या मुलांसोबत अर्थात माझ्या भाच्यांबरोबर अनार, फुलबाज्या असे फटाके फोडेन, वहिनीने केलेले गोड पदार्थ आवर्जून खाईन. पण शाळेपासूनची माझी मैत्रीण तथा कर्णिक हिची आई मला आवर्जून फोन करून कानोले खायला बोलावते, पाकात बुडवलेल्या या करंज्यानी वजन वाढीची भीती मला वाटत नाही. कारण घराजवळच्या वरळी सी-फेसवर धावायला गेले की वजन घटते. जोडीला आईचे प्रेम आहेच. या साऱ्यातून मिळणारा ‘दिवाळी आनंद’ कारकिर्दीसाठी खूपच पोषक ठरतो. घर व कारकीर्द अथवा सण व दौरे यांचा व्यवस्थित समतोल ठेवला की सगळ्या गोष्टी कशा मजेत जमून जातात.