थरथरत्या हाताने तिने मला स्पर्श केला. माझ्यात काही तरी चाचपडत असावी ती.. डोळे बारीक करून माझ्यात पाहत होती ती.. खूप खोलवर.. क्षणभर मीसुद्धा चमकलो.. भराभर मागे जात होतो.. मागे.. मागे.. खूप मागे.. जेव्हा तिची माझ्याशी पहिल्यांदा ओळख झाली.   
खूप मोठं नाही पण मध्यमवर्गी घर होतं त्यांचं.. ही चिमुरडी सतत घरभर दुडदुडायची.. मी नेहमी पाहायचो तिला, पण तिचे काही माझ्याकडे लक्ष जायचे नाही. अचानक तिच्या एका वाढदिवशी तिच्या आईने तिला माझ्यासमोर उभेच ठाकले. म्हणाली, ‘‘चला आता आमच्या चिऊताईला छान छान तयार करू या. पाहा बरं या आरशात..’’ कधी नव्हे ते तिने माझ्याकडे नीट निरखून पाहिले.. ते निरागस डोळे स्वत:च्याच प्रतििबबाला कुतूहलाने न्याहाळत होते. त्या दिवसापासून तिची आणि माझी गट्टी जमली.. लहान असताना तिची आई तिला माझ्यासमोर उभी करायची. असंख्य प्रश्न पडायचे तिला.. त्यांची उत्तरं देता देता पुरती दमछाक व्हायची आईची.. कधी कधी आई तयार होत असताना ती हळूच आईला पाही. मग आई माघारी फिरल्यावर या बाईसाहेब माझ्यासमोर आईचं अनुकरण करण्यात दंग होत असत.
एकामागोमाग एक र्वष सरत होती.. तिला माझ्याबरोबर, माझ्यासमोर अधिकाधिक वेळ काढणं आवडायला लागलं होतं.. तासन्तास माझ्यासमोर उभी राहून ती स्वत:शीच हसे. कधी स्वत:ला न्याहाळत बसे. ‘‘पुरे झालं नटणं मुरडणं. अभ्यासाला बसा आता’’ येणारा तिच्या आईचा आवाज तिची ती सौंदर्यतपश्चर्या भंग करीत असे. अभ्यासाला बसल्यावरही थोडय़ा थोडय़ा वेळाने येणारा तिचा तो चोरटा कटाक्ष मला अजूनही आठवतो.
त्या दिवशी ती अशीच स्वत:ला न्याहाळत होती, पण का कोण जाणे, मला वाटून गेले ती माझ्यात स्वत:ला नाही तर दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीला पाहत होती. लहानपणी जशी ती आईचा डोळा चुकवून आईला स्वत:त पाहायची काहीशी तशीच.. हळूच तिने स्वत:च्या हाताकडे पाहिले अलगद त्या हाताला दुसऱ्या हाताने कुरवाळले.. जणू काही ती कोणाचा तरी स्पर्श जपून ठेवत होती..
बाहेर पडताना सतत माझ्यात पाहायची.. ‘मी कशी दिसते त्यापेक्षा त्याला मी कशी दिसेन’ हेच भाव असायचे तिच्या डोळ्यात.. एक दिवस ती बाहेरून घरी आली.. खूप भेदरलेली होती. आत्तापर्यंत पहिल्यांदाच मला जाणवले की ती माझ्यासमोर येण्याचं टाळतेय. सगळा धीर एकवटून ती माझ्यासमोर उभी राहिली.. तिची नजर बधिर होती. स्वत:चाच स्पर्श ती झिडकारत होती. जणू काही ते शरीर तिचे नव्हतेच.. अचानक तिच्या नजरेत किळस, राग, दुख, संताप दाटून आले. या सर्वाला कारणीभूत व्यक्ती माझ्यातच आहे अशा तऱ्हेने पाहत होती.. तिच्या त्या नजरेने मलाच तडा जाईल की काय असं वाटलं क्षणभर.. त्यानंतर कित्येक दिवस ती माझ्याकडे पाहिल्या न पाहिल्यासारखं करायची.. काही मीच तिचा अपराधी आहे.  
काळ वेगाने पुढे सरकत होता. एव्हाना तिच्या लग्नाची कुजबुज घरात सुरू झाली होती.. तीसुद्धा हल्ली विचारात मग्न असायची. लाखो स्वप्नं तरळायची तिच्या डोळ्यांत.. आई समजावून सांगत होती तिला, ‘‘हे बघ, लग्न ठरलंय तुझं आता. त्या घरातली कर्ती स्त्री होणारेस तू.. वागायला लाग.. घराचा सगळा डोलारा नाही म्हटलं तरी बाईलाच सांभाळावा लागतो. ते करताना बऱ्याचदा तुला तुझ्या इच्छांना मागं सारावं लागेलही, पण लक्षात घे, तेच तुझ्यासाठी आणि तुझ्या घरासाठी योग्य असेल..’’ तिने हळूच माझ्यात पाहिलं. ‘ज्या घरात मी लहानाची मोठी झाले त्या घराचा विचार मागे सारून मी जे घर अद्याप पाहिलंही नाही त्याला आपलं मानायचं?’ तिचा प्रश्न मला कळला होता..
लग्नाच्या दिवशी तिने अचानक मला तिच्याबरोबर नेण्याची मागणी केली. तिच्याबरोबर माझाही एक नवा प्रवास सुरू झाला. आता रोज ती माझ्यात झाकून पाहायची! तिने आणि तिच्या साथीदाराने रंगवलेल्या स्वप्नांसहित नंतर तर तिला तितकीशी उसंतही मिळेनाशी झाली.. अन् जेव्हा पाहायची तेव्हा स्वत:लाच न पाहता तिच्या अवतीभवती असलेल्या माणसांनाच पाहायची.. आणि आता तर ती आई झाली होती.. स्वत:च्या मुलांना तयार करता करता हळूच तिचं बालपण माझ्यात डोकावायचं, पण क्षणभरच.
आज मात्र कोणीच नाहीये.. तिच्या अन् माझ्याशिवाय.. मोठी झालीत आणि इतकी मोठी झालीयेत की तिचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीये.. ती काही तरी शोधतेय माझ्यात.. स्वत:ला पाहायचा प्रयत्न करतेय.. आयुष्यभर तू कायम इतरांच्या नजरेतून स्वत:ला पाहत आली आहेस आणि तुझी आणि माझी व्यथा काही फारशी वेगळी नाहीये.. मीसुद्धा सर्वाना माझ्यात सामावून घेतो, पण माझ्या प्रतििबबाचं काय.. आरशाला असतं का कधी स्वत:चं प्रतिबिंब…