पुस्तकाचे नांव वाचून आश्चर्यचकीत व्हायला होते ना! लेखकही नवीन, पुस्तकही नवीन आणि प्रकाशनही नवीन. आणि पुस्तकातील विचार ‘नित्यनवीन’. मराठीमधून लिहिल्या जाणाऱ्या अनुदिनीमधील (ब्लॉगवरील) काही निवडक लेखांचे हे संकलन आहे. अतिशय सामान्य आयुष्य जगणाऱ्या माणसाच्या आयुष्यातील निरामय आनंद देणारे क्षण आणि आनंददायी दृष्टी देणारे दृष्टीकोन लेखकाने अत्यंत सूक्ष्मपणे टीपले आहेत.
जगण्यातला उत्साह कामाच्या ताणामुळे, अतिरेकामुळे, प्रवासाचा शीण आल्यामुळे आपण अनेकदा गमावतो. इतका की दैनंदिन आयुष्यातील अत्यंत लहान-लहान वाटणाऱ्या पण निखळ आनंद देणाऱ्या गोष्टी-घटना आपल्या लक्षातही येत नाहीत. नवीन काळे यांनी या बाबींकडे आपले लक्ष वेधले आहे. आपल्या आयुष्यातील समाधानाचे क्षण कोणते असा प्रश्न जर आपल्याला विचारला तर आपण व्यक्तिगत आयुष्यातील-कौटुंबिक आयुष्यातील यशस्वी क्षण नोंदवू. नवीन काळे यांनी मात्र सर्वस्वी वेगळी उत्तरे शोधली आहेत. आपल्या पाठीवर खाज येत असताना निव्वळ शाब्दिक वर्णनाच्या सहाय्याने आपल्या बायकोला पाठीवरची ‘ती’ जागा अचूक सापडणे हा काळे यांनी वर्णन केलेला अस्साच एक ‘दुर्लक्षित’ क्षण.
मराठी भाषा, मराठी अस्मिता याबाबत समाजात-राजकीय वर्तुळांमध्ये आणि आर्थिक जगतात जे चित्र सध्या उभे आहे अन् त्यावर जे उपाय सुचविले गेले आहे त्याला छेद देणारा लेख काळे यांच्या या पुस्तकात आपल्याला सापडतो. यातील ‘फ्राईड बबल्स’ आणि ‘गोल्डन पेटल्स’ खाण्याचा मोह आपल्याला आवरता येत नाही. अशीच हृदयस्पर्शी बाब रीक्षाचालकाची. जीवनाकडे पहाण्याचा सर्वस्वी वेगळा दृष्टीकोन देणारा रीक्षावाला आणि त्याच्या शब्दांनी आपल्या जाणीवांत पडणारी समृद्ध भर, ही निव्वळ अनुभवण्याचीच गोष्ट आहे. कोणताही थेट उल्लेख न करता क्रिकेट विश्वातील अनभिषिक्त सम्राटाचं वर्णन त्याचं माणूसपण आणि त्याचं देवत्व एकाचवेळी अधोरेखित करतं.
कधीतरी मेघ दाटून यावेत, आपल्यालाही तेव्हा सुट्टी असावी, दुपारचे मस्त जेवण झालेले असावे आणि वामकुक्षीऐवजी एखाद्या महत्वाच्या कौटुंबिक समारंभाला जावे लागणार असावे. याने मनाचा हिरमोड व्हावा पण तो धड व्यक्तही करता येवू नये, हे प्रत्येकाच्याच जीवनात अनुभवास येते. पण याच ‘अँबियन्स’ला मिळालेली अनपेक्षित कलाटणी आणि त्यानंतर वर्षांधारांसह कानी पडणाऱ्या भीमसेनजींच्या ‘रामकली’धारा यांचे वर्णन आपल्याला जीवनाकडे ‘पहायला’ शिकवते.
एखादा अनुभव डोळ्यासमोर तरळावा, त्यामुळे लिखाणाची हुक्की यावी अन् लिहायला बसावे तर अचानक कोणीतरी घरी अतिथी म्हणून यावे, हा अनुभवही आपण अनेकदा घेतो. क्षणभर दुखी झालेले आपले मन अचानक एक ‘वेगळा’ अनुभव घेऊ लागते अन् त्यामुळे आलेल्या पाहुण्यावर रागावण्याऐवजी आपण त्यांचे कृतज्ञ रहातो. हे का व कसे याचे वर्णन करणारा काळे यांचा लेखही मूळातून वाचावा अस्साच.
या पुस्तकातील सर्वच लेख मग ते शिक्षकांवरील असोत किंवा गोळा-पेप्सी कोला खाण्याच्या अनुभूतीवरील, रिफ्रेश करणाऱ्या कट्टय़ाचे असोत किंवा दुरूस्तीची गरज असलेल्या ‘संगणका’वरील सगळेच आपल्या अंतकरणाला स्पर्श करतात. ‘अरेच्चा, हे तर आपल्याही आयुष्यात घडलं होतंच की, पण आपल्या तेव्हा लक्षातच नाही आलं..’, असं पदोपदी वाटत रहातं. हेच नवीन काळे यांचं यश आहे.
पु.ल.देशपांडे यांनी एका पत्रात असं लिहिलं आहे की, फुल तेच असतं पण कोणी ते प्रेयसीला देतं, कोणी देवाच्या मूर्तीला अर्पण करतं, कोणी ते मृतदेहावर वहातं आणि त्या-त्या कृतींनी त्या फुलाला अर्थ प्राप्त होतो. याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो. उगीचच कोणत्याही गोष्टीचे-प्रसंगाचे उदात्तीकरण न करता किंवा अतिभव्य गोष्टींच्या प्रेमात न पडता दैनंदिन आयुष्यातील साध्या घटनांना नवीन काळे यांनी ज्या विलक्षणतेने अर्थ दिला आहे, त्याच्या प्रेमात पडल्यावाचून रहावत नाही. अतिशय साध्या-सोप्या आणि सहज भाषेत लिहिलेले आणि आपल्या दृष्टीकोनात आमूलाग्र बदल घडविणारे हे पुस्तक.( इतके की सुमारे वर्षभरापूर्वी वाचलेले असून आणि नजरेसमोर ते पुस्तक नसतानाही त्यातील लेखांचे संदर्भ आठवत रहातात.!)

पुस्तक – काहीतरी नवीन
लेखक – नवीन काळे
पृष्ठसंख्या – १३२
प्रकाशन – राफ्टर प्रकाशन
मूल्य – १५० रुपये.