साधारण साडेपाच वर्षांपूर्वी म्हणजे ६ ऑक्टोबर २०१० ला एक मोबाइल अ‍ॅप्लिकेशन लाँच झालं. फोर्ब्स तसंच अ‍ॅप स्टोअर मेट्रिक्सच्या माहितीनुसार जगभरात दर दिवशी साधारण ३०० ते ४०० अ‍ॅप्स लाँच होतात. हा डेटा दर वर्षी बदलत असतो. पण मुद्दा हा आहे की या भाऊगर्दीत लाँच झालेल्या ‘त्या’ अ‍ॅपने इतिहास रचला. त्या अ‍ॅपने तरुणाईला एवढी भुरळ घातली की फेसबुकच्या मार्क झकरबर्गला असुरक्षित वाटू लागलं आणि त्याने ते अ‍ॅप थेट विकतच घेऊन टाकलं. ते अ‍ॅप म्हणजे इन्स्टाग्राम. इन्स्टंट कॅमेरा आणि टेलिग्राम या शब्दांचा मिलाफ करून तयार झालेलं हे कॅची नाव तरुणाईच्या मुखी नांदू लागलं. नुकत्याच बदललेल्या चेहऱ्यामोहऱ्यामुळे इन्स्टाग्राम पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पण मुळात इन्स्टाग्राम लोकप्रिय होण्यामागचं कारण काय? इतक्या सोशल नेटवर्किंग वेबसाइट्स असताना इन्स्टाग्रामचं वेगळेपण ते काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* पहिली गोष्ट म्हणजे इन्स्टाग्राम हे मोबाइल अ‍ॅप आहे. ते फक्त आणि फक्त मोबाइलवरच वापरता येतं. वेबसाइटवर लॉगइन करून इतरांचे फोटो बघणं, लाइक, कमेंट करणं शक्य आहे. पण अपलोडिंग करता येत नाही.
* दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे फोटो शेअरिंग अ‍ॅप आहे. फोटो क्लिक करायचे आणि लागलीच ते अपलोड करायचे. कॅची कॅप्शन आणि डझनभर हॅशटॅग वापरले की लाइक्स-कमेंट्सचा पाऊस सुरू झाला म्हणून समजा.
* मोबाइल फोन्समध्ये उत्तम मेगापिक्सेल्सचे कॅमेरे येऊ लागल्यामुळे फोटो काढण्याला ऊतच आला. फोनकॉल्सपेक्षा मेसेजिंग, गाणी आणि फोटो यासाठीच मोबाइलचा वापर होऊ लागला. यात फोटो काढण्याकडे तरुणाईचा कल असल्यामुळेच हे फोटो शेअिरग अ‍ॅप सुरू करण्यात आलं आणि मुद्दाम ते फक्त मोबाइल फोन्स, टॅब यांसारख्या मोबाइल डिव्हाइसेसपुरतंच मर्यादित ठेवण्यात आलं.
* इन्स्टाग्राम लोकप्रिय होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे फोटो अपलोड करताना देण्यात येणारे फिल्टर्स. अपलोड करताना एडिटिंगची अत्यंत सोपी आणि सुलभ सुविधा असल्यामुळे अगदी शेंबडं पोरसुद्धा हे अ‍ॅप वापरू शकतं. हीच सहजता अनेकांना आणि विशेष करून तरुणाईला भावली आणि त्यांनी इन्स्टाग्रामला डोक्यावर घेतलं.
* फोटो एडिटिंग म्हणजेच फोटो मॅनिप्युलेशनचे ११ वेगवेगळे पर्याय इन्स्टाग्रामकडून देण्यात आले आहेत. ज्याचा वापर करून क्लिक केलेल्या फोटोचं सौंदर्य आणखी खुलवता येतं. त्यामुळेच अगदी टुकार फोटोजनाही इफेक्ट्स देऊन आकर्षक बनवता येतं.
* इन्स्टाग्रामचं वेगळेपण हे की इथे तुम्हाला फोटोतून व्यक्त होता येतं. तुमची प्रतिमा ही तुम्ही पोस्ट केलेल्या फोटोजमधून तयार होत असते. तुमचं राहणीमान, विचारसरणी. दैनंदिन जीवन हे सगळं काही तुम्ही शेअर केलेल्या फोटोजमधून दिसत असतं.
* याशिवाय १५ सेकंदाचे व्हिडीओजही इन्स्टाग्रामवर अपलोड करता येतात. त्यामुळे एकूणच मार्केटिंग तसंच अ‍ॅडव्हर्टायजर्ससाठीही इन्स्टाग्राम हे माध्यम उपयुक्त ठरतं. दृश्य माध्यम अर्थात व्हिज्युअल मीडियम असल्यामुळे त्यावर वेगवेगळ्या प्रकारे खेळता येतं. आणि त्यातूनच युजर्सना खिळवून आणि खेळतं ठेवता येतं.
इतर सोशल नेटवर्किंग वेबसाइट्स आणि इन्स्टाग्राम यात नेमके फरक तरी काय?
फेसबुक : फेसबुकवर प्रत्येकाची अशी एक प्रोफाइल असते. ही प्रोफाइल म्हणजे एक प्रकारे रंगीबेरंगी रेझ्युमे किंवा बायोडेटाच. स्टेटस, अबाउट, खासगी माहिती, प्रोफेशनल डिटेल्स असं एकत्रित पॅकेज म्हणजे फेसबुक. या पॅकेजमधला एक घटक म्हणजे फोटोज.
लिंक्डइन : ही पूर्णत: प्रोफेशनल नेटवर्किंग साइट आहे. इथे टाइमपासला मज्जाव आहे. इथल्या प्रोफाइल्स या पूर्णत: व्यावसायिक कारणासाठीच बनवल्या आणि बघितल्या जातात. त्यामुळे अर्थात तरुणाई इथे नांदते तीच मुळात करिअरविषयी गंभीर बनल्यावर.
गुगल प्लस – ऑर्कुटला तिलांजली देऊन गुगलकडून सुरू करण्यात आलेली ही सोशल नेटवर्किंग वेबसाइट फारशी लोकप्रिय नाही हे वास्तव आहे. पण गुगल सर्चमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ही उपयुक्त अशी वेबसाइट आहे.
फ्लिकर – काही वर्षांपूर्वी फोटो शेअिरगसाठी ही सोशल नेटवर्किंग वेबसाइट लोकप्रिय होती. पण मुळातच याहूच्या कारभारातल्या गोंधळाचा फटका फ्लिकरला बसला आणि तिकडचा ओघ कमी झाला.

‘मार्केट में जो नया है वह बिकता है’ हा नियम इन्स्टाग्रामला पुरेपूर लागू होतो. पण आज मार्केटमध्ये पुराना माल झाल्यावरही इन्स्टाग्रामची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. फारसे मोठे बदल न करताही लोकप्रियता टिकवता येते हेच इन्स्टाग्रामने दाखवून दिलं.

More Stories onविवाViva
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All you need to know about instagram
First published on: 20-05-2016 at 01:40 IST