अभिषेक तेली

कलात्मकतेला प्रयोगशीलतेची जोड देत सभोवताली घडणाऱ्या विविध गोष्टींवर एकांकिकांच्या माध्यमातून नेहमीच भाष्य करण्यात आलंय. तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाने भरलेल्या या क्षेत्राने आजवर अनेक स्थित्यंतरे पाहिली. परंतु तरीही एकांकिका क्षेत्राशी तरुणाईची नाळ घट्ट जोडली गेली आहे. त्यामुळे काळानुरूप एकांकिका क्षेत्र कसं बदलत गेलं आणि नवनवीन प्रयोग कसे होत आहेत, याबाबत मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर तरुण रंगकर्मीसोबत साधलेला हा संवाद.

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

गेल्या काही वर्षांमध्ये एकांकिका क्षेत्राने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. आशयाच्या अनुषंगाने आणि तांत्रिकदृष्टय़ा अनेक बदल होत गेले. मात्र या स्थित्यंतरातही आशयात नावीन्यता, नेपथ्य असो किंवा प्रकाशयोजनेत आविष्कार घडवत एकांकिका क्षेत्राने स्वत:चे वेगळेपण जपून ठेवले आहे. समाजात ज्या प्रकारे गोष्टी घडत गेल्या, त्याप्रमाणे एकांकिकांचे विषय बदलत गेले. आपल्या सभोवताली घडणाऱ्या घडामोडींचे प्रतििबब हे एकांकिकांमध्ये सातत्याने उमटत असते. सध्याच्या काळात चित्रपट, मालिका, सोशल मीडिया या क्षेत्राकडे काही कलाकारांचा कल आहे. मात्र या परिस्थितीतही तरुण रंगकर्मीना एकांकिकांची ओढ आहे. याबाबत लेखक – दिग्दर्शक अनिकेत पाटील सांगतो, ‘रंगभूमी’ ही चिरंतर व शाश्वत आहे आणि एकांकिकेच्या माध्यमातून आपला पाया भक्कम होईल, याची तरुणाईला जाणीव आहे. त्यामुळे आजच्या तरुणाईला निश्चितच एकांकिकांचे आकर्षण आहे. एक कलाकार म्हणून सर्वागीण विकास करण्यासाठी अनेकजण चित्रपट व मालिकांच्या आधी नाटय़क्षेत्राकडे वळतात. पूर्वी एका एकांकिकेवर पाच ते सहा महिने काम व्हायचे. आता स्पर्धाच्या वाढत्या संख्येमुळे एकांकिकाही वाढत असून एकांकिकेच्या दर्जावर परिणाम होतो आहे. पूर्वी एका वर्षांला दहा ते पंधरा दर्जेदार एकांकिका असायच्या, आज तेच प्रमाण पाच ते सहावर आलं आहे. मात्र आजही प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धाचं महत्त्व टिकून आहे, कारण अनेकांना त्याच स्पर्धाच्या माध्यमातून व्यासपीठ आणि व्यावसायिक संधी उपलब्ध झाल्या आहेत.’ तर एकांकिकांच्या निकालामुळे विषयांमध्ये कसे बदल होतात याबाबत लेखक – दिग्दर्शक अजय पाटील म्हणतो, ‘दरवर्षी एकांकिकांच्या विषयांमध्ये आणि संबंधित सर्व गोष्टींमध्ये नावीन्यता असते. मात्र अलीकडच्या काळात विषयावर अधिक भर न देता इतर गोष्टींचा दिखावा अधिक उभा केला जातो. कदाचित स्पर्धामधील निकालाचा प्रभाव कुठेतरी तरुणाईवर पडत असतो. ज्या एकांकिका सातत्याने विजयी होत आहेत, त्याच पद्धतीच्या एकांकिका करत राहू अशी मानसिकता तरुणाईची झाली आहे. ‘दिखावा जास्त व विषय कमी’ अशा धाटणीच्या एकांकिका विजयी ठरतात आणि तेच तरुणाई फॉलो करते. त्यामुळे जर निकालात परिवर्तन घडले तरच काहीतरी बदल होईल.’

लेखन आणि दिग्दर्शनाच्या जोरावर एकांकिका जितकी प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. तितकाच एकांकिकेचा विषय नेपथ्याद्वारे जिवंतपणे उभा केला जातो. प्रकाशयोजनेच्या आविष्कारासह नेपथ्यामध्येही विविध प्रयोग केले जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उभे केले जाणारे भलेमोठे नेपथ्य प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असून ब्लॅक आउटच्या दरम्यान काही क्षणातच चटकन नेपथ्यात होणारा बदल प्रेक्षकांना थक्क करतो. ‘पूर्वीच्या एकांकिकांमध्ये नेपथ्याचा फारसा वापर केला जात नव्हता. मात्र सध्याची तरुणाई ‘सिम्बॉलिक’ गोष्टी न करता ‘वास्तववादी’ नेपथ्य उभारण्यावर भर देते. काहीजण हे गिमिक्सकडे वळले आहेत. महाविद्यालयात पुरेसे विद्यार्थ्यांचे मनुष्यबळ असल्यामुळे वास्तववादी नेपथ्य उभारणं आणि ब्लॅक आउटमध्ये नेपथ्यामध्ये पटकन बदल करणं शक्य होतं. एकाच एकांकिकेमध्ये विविध चार ते पाच ठिकाणे सहजरित्या उभी केली जातात. एका ब्लॅक आउटमध्ये एक संपूर्ण ठिकाण उभारलं जातं, त्यामुळे हा एकांकिका क्षेत्राच्या दृष्टीने मोठा बदल आहे. लेखकाने लिहिलेल्या संहितेचे वाचन करून उभारलेलं अभ्यासपूर्ण नेपथ्य हे गेल्या काही एकांकिकांमध्ये दिसून येतं आहे’,  असं मत नेपथ्यकार देवाशिष भरवडे याने व्यक्त केलं.

सध्याच्या घडीला तरुण रंगकर्मी आपापल्या परीने एकांकिकेचा विषय प्रभावी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत असतात. आशयघन एकांकिका या खूप महत्वाच्या ठरत असून त्या कशा पद्धतीने मांडल्या जातात हे निर्णायक ठरतं. लेखक – दिग्दर्शक चैतन्य सरदेशपांडे सांगतो, ‘सध्या एकांकिकेप्रमाणे नाटय़क्षेत्रातही विनोदी धाटणीच्या नाटकांऐवजी आशयघन नाटक पाहणं प्रेक्षक पसंत करतात. संबंधित नाटकातून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळेल, याकडे त्यांचं लक्ष असतं. आपली नाटकं ही काल्पनिक आशयाऐवजी वास्तवाला धरून असतात. काळानुरूप नाटय़क्षेत्र तांत्रिकदृष्टय़ा, आशयदृष्टय़ा अचूक झालं आहे.  स्टॉक म्युझिक न वापरता नवीन म्युझिक तयार केलं जात आहे, हा खूप मोठा बदल आहे’. सध्याच्या घडीला शहरांपासून ते गावखेडय़ातही एकांकिका स्पर्धाचे आयोजन केलं जातं आहे. या स्पर्धा पाहण्यासाठीही प्रेक्षक मोठी गर्दी करतात, त्यामुळे जर भविष्यात हाच प्रेक्षकवर्ग व्यावसायिक नाटकांना आला तर खूप मोठय़ा प्रमाणात फायदा होईल. गेल्या १० ते १५ वर्षांत नवीन प्रेक्षकवर्ग तयार करण्यावर कोणी भर दिला नाही, असं निरीक्षण चैतन्यने नोंदवलं.

एकांकिका स्पर्धाच्या संख्येत वाढ झाली आणि या क्षेत्रात चुरस अधिक वाढत गेली. परिणामी स्पर्धामधील नियमांच्या अनुषंगाने एकांकिका बांधल्या गेल्या. मात्र या नियमांच्या चौकटीत विषयाला मोकळीक देणं कुठेतरी राहून जातंय आणि नवीन गोष्टी शिकताही येत नाहीत अशी खंत तरुण रंगकर्मीमध्ये आहे. प्रकाशयोजनाकार अमोघ फडकेच्या मते, सर्वच एकांकिका स्पर्धाच्या आयोजकांनी स्पर्धकांवर जे नियम लादलेले आहेत, त्यामध्ये आवश्यक बदल होणं गरजेचं आहे. साठ मिनिटात नेपथ्य लावण्यासह एकांकिका सादर करा, दहा मिनिटात प्रकाशयोजनेची व्यवस्था करा, विशिष्ट प्रकारच्याच लाइटसचा वापर करा आदी अटी व नियमांमुळे दर्जेदार एकांकिकाही स्पर्धेच्या बाहेर पडणं योग्य नाही. अशा नियमांमुळे रंगभूमीवर वेगळे प्रयोग होणार नाहीत आणि तरुणाईलाही वेगळं काही शिकता येणार नाही. एकांकिका क्षेत्रात काम करणारी मंडळी ही नवीन असल्यामुळे त्यांना सर्व गोष्टी शिकायला आणि समजायला वेळ लागतो हे लक्षात घेऊन नियमांमध्ये काही बदल व्हायला हवेत, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

मराठी रंगभूमी सशक्त करण्याचे आणि अनेक कलाकार घडविण्याचे काम एकांकिका स्पर्धानी केले आहे. गेल्या काही वर्षांपासून अतिशय कल्पकतेने नावीन्यपूर्ण प्रयोग एकांकिकांमध्ये घडले आहेत. अभिनयासह आजची तरुण पिढी एकांकिकांचे नेपथ्य, संगीत, वेशभूषा, रंगभूषा अभिनव पद्धतीने करण्यासाठी धडपडते. ग्लॅमरच्या दुनियेतही वेगळेपणा जपणाऱ्या एकांकिका मंचाशी तरुणाईची नाळ घट्ट जोडली गेली आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.

एकांकिकांसाठी नव्याने संगीत निर्मिती होणे गरजेचे

प्रभावी एकांकिकेसाठी आवश्यक गोष्टींमध्ये संगीत हाही एक महत्त्वाचा घटक आहे. सध्या संगीत एकांकिकांचेही प्रमाण वाढले आहे. एकांकिकांना लाइव्ह किंवा रेकॉर्डिग संगीताची जोड दिली जाते. एकांकिका हे माध्यम प्रयोगशील असल्यामुळे नव्याने संगीत निर्मिती होण्याची गरज असल्याचा सूर काही तरुण रंगकर्मीमध्ये आहे. अनेक एकांकिकांना संगीतबद्ध केलेला संगीतकार श्रीनाथ म्हात्रे म्हणतो, ‘घरबसल्या संगीत निर्मितीचे तंत्र हल्ली वाढते आहे, परंतु तरीही एकांकिकांसाठी ‘स्टॉक म्युझिक’चा वापर केला जातो या गोष्टीचे आश्चर्य वाटते. आपण जेव्हा कोणताही विषय मांडतो तेव्हा संहिता, कलाकार, नेपथ्य, वेशभूषा, प्रकाशयोजना या गोष्टी मुळापासून नव्याने डिझाइन करतो, मग संगीत का आपण जुने म्हणजेच आधी बनलेल्या कलाकृतींचे वापरतो? संगीत निर्मिती करताना बजेटसारख्या पारंपरिक अडचणीला सामोरे जावे लागते. पण एकांकिका हे असे माध्यम आहे, जिथे सर्वाधिक गोष्टींचे जुगाड केले जातात आणि तीच या माध्यमाची गंमत आहे. त्यामुळे जुगाड करून का होईना एकांकिकांसाठी नव्याने संगीत निर्मिती करण्याचे प्रमाण वाढायला हवे.’

विषयांची देवाणघेवाण वाढली

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जिव्हाळय़ाचा विषय असतो. सध्याच्या घडीला शहरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत असंख्य एकांकिका स्पर्धाचे आयोजन केले जाते. याचा एक वेगळा पैलू आशय मांडणीबाबत दिसून येतो. त्याबद्दल लेखक – दिग्दर्शक रावबा गजमल सांगतात, ‘सध्याच्या तरुणाईला सोशल मीडिया, मालिका आणि चित्रपटाचे आकर्षण अधिक असल्याचे आपण सातत्याने म्हणत असतो. परंतु तरीही तरुण पिढी एकांकिकांच्या माध्यमातून रंगभूमीवर खूप चांगले विषय मांडते आहे. शहरातील मुले ग्रामीण विषयांकडे वळली आहेत, तर ग्रामीण भागातील मुलांचा कलही शहरी विषयांकडे अधिक दिसून येतो. परिणामी पूर्वीच्या तुलनेत विषयांची देवाणघेवाण मोठय़ा प्रमाणात वाढली असून विषयानुरूप नवनवीन प्रयोग पाहायला मिळत आहेत. एकांकिकांवर आधारित यूटय़ूब चॅनेल्स सुरू झाले असून एकांकिकांच्या लेखक – दिग्दर्शकांना बोलावून चर्चा घडविली जात आहे. त्यामुळे आगामी काळात अधिकाधिक एकांकिका व्यावसायिकदृष्टय़ा रंगभूमीवर येऊ शकतात.’

viva@expressindia.com